बालाकोटः भारताच्या हल्ल्यात 300 दहशतवाद्यांचा मृत्यू; पाकिस्तानच्या माजी अधिकाऱ्याची कबुली #5मोठ्या बातम्या

बालाकोट, पाकिस्तान
फोटो कॅप्शन, बालाकोट इथलं दृश्य

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.

1. भारताच्या हल्ल्यात 300 दहशतवाद्यांचा खात्मा; पाकिस्तानच्या माजी अधिकाऱ्याची कबुली

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने थेट बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक केला होता. भारताच्या मिराज फायटर विमानांमधून दहशतवादी तळांवर बॉम्बफेक करण्यात आली होती. या हल्ल्यात मोठया प्रमाणावर दहशतवादी मारले गेले, पण पाकिस्तानने हे मान्य केलं नव्हतं.

26 फेब्रुवारी 2019 ला भारताने केलेल्या या स्ट्राइकमध्ये काहीही जीवितहानी झाली नाही असे पाकिस्तानी लष्कराचे म्हणणे आहे. पण पाकिस्तानच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्याने एअर स्ट्राइकमध्ये झालेल्या नुकसानीची कबुली दिली आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

आगा हिलाली या पाकिस्ताच्या माजी राजनैतिक अधिकाऱ्याने, टीव्हीवर दिलेल्या मुलाखतीत भारताच्या एअर स्ट्राइकमध्ये 300 दहशतवादी मारले गेल्याची माहिती दिली. पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाल्यानंतर भारताने ही कारवाई केली होती.

"भारताने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून युद्धाची कृती केली. ज्यात 300 जण ठार झाले. त्यांच्या लक्ष्यापेक्षा आपले लक्ष्य वेगळे होते. आपण त्यांच्या हाय कमांडला लक्ष्य केले" पाकिस्तानी उर्दू चॅनलवर बोलताना आगा हिलाली यांनी हे सांगितलं. भारताने बालाकोटमध्ये हल्ला करण्यासाठी स्पाइस 2000 अस्त्राचा वापर केला होता.

2. 'दिल्लीचे राज्यकर्ते शहराच्या सीमेवरील शेतकऱ्यांना भेटायला जात नाहीत'

स्वातंत्र्याचे हनन परकीयांकडून होते असं नाही. स्वातंत्र्यासाठी घामही न गाळणारे राज्यकर्ते म्हणून येतात तेव्हा ते स्वातंत्र्यावरच सगळ्यात निर्घृण हल्ला करतात. आजारी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी रतन टाटा मुंबईहून पुण्याला जातात. पण दिल्लीचे राज्यकर्ते शहराच्या सीमेवरील शेतकऱ्यांना भेटायला जात नाहीत.

बादशहाच्या टोपीला मुजरा करणाऱ्यांनी देश खराब केला. दुसरं काय? असं सामनातल्या रोखठोक सदरात संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शेतकरी आंदोलन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शेतकरी आंदोलन

कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताबाहेर गेलेले नाहीत. पण देशातल्या जनतेचे किती प्रश्न या काळात सुटले? वर्षभरापूर्वी डोनाल्ड ट्रंप नमस्ते ट्रंप कार्यक्रमासाठी अहमदाबादेत अवतरले. 50 लाख लोकांनी त्यांचं स्वागत केलं. ट्रंप आणि त्यांच्याभोवती असलेल्या अमेरिकन मंडळींनी कोरोनाचा प्रसार केला. ट्रंप आता सत्ता गमावून बसले आहेत. त्यांच्या समर्थकांनी झुंडशाहीचं टोक गाठलं.

"अमेरिका असेल किंवा भारतात, लोकशाही ही शोभेचा आणि पोकळ डोलारा म्हणूनच उभी आहे. निवडणूक निकाल फिरवावा अशी ट्रंप यांच्यासारखी गयावया भारतात करावी लागत नाही. विरोधात उभे राहणाऱ्यांना नष्ट केलं की काम भागतं आणि निवडणुकांचे निकाल ठरवून घेतले की झाले. लोकशाही या संस्थेवरील लोकांशी श्रद्धा पूर्ण उडाली आहे."

3. स्टेट बँक ऑफ इंडियासह अनेक बँकांची फसवणूक

हैदराबादमधील एका पाणी आणि पर्यावरण, सिंचन, वाहतूक, इमारती आणि औद्योगिक संरचना, वीज वितरण आणि प्रसारण, ऑपरेशन्स आणि देखभाल आणि खाणकाम क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या कंपनीने स्टेट बँक ऑफ इंडियासह आठ बँकांना तब्बल 4300 कोटींची फसवणूक केल्याची तक्रार बँक ऑफ इंडियाने केली आहे. 'इंडिया टीव्ही'ने ही बातमी दिली आहे.

आयव्हीआरएसएल लिमिटेड ही इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी असून गेल्या 25 वर्षांपासून कार्यरत असून या कंपनीने आठ सार्वजनिक बँकांची 4837 कोटींची फसवणूक केली आहे. सीबीआयने याप्रकरणी कंपनीविरोधात आणि काही अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने केलेल्या तक्रारीनंतर सीबीआयने आयव्हीआरएसएल (IVRCL) कंपनी, व्यवस्थापकीय संचालक ई सुधीर रेड्डी, सह-व्यवस्थापकीय संचालक आर बलरामी रेड्डी, काही सरकारी कर्मचारी आणि अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, कॅनरा बँक, आंध्रा बँक, कॉर्पोरेशन बँक, इक्सएआयएम बँक, पंजाब अॅण्ड सिंध बँक, युनिअन बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. या सर्व बँकांना 4837 कोटींची फसवणूक झाली आहे.

नुकतंच स्टेट बँक ऑफ इंडियाची 67.07 कोटी रुपयांची फसवणूक झाल्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून अहमदाबादमधील कृष्णा निटवेअर टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीने 67.07 कोटी रुपये आणि दिल्लीस्थित कंपनीने 64.78 कोटी रुपयात एसबीआय बँकेची फसवणूकीच्या आरोपाखाली यामध्ये दोन स्वतंत्र प्रकरणे नोंदवली आहेत.

4. चंद्रकांतदादांची अवस्था डोनाल्ड ट्रंप यांच्यासारखी-सचिन सावंत

"भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची अवस्था डोना़ल्ड ट्रंप यांच्यासारखी झाली आहे. त्यांना पराभवाची कारणमीमांसा भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा समोर करताना नाकीनऊ आले असतील," अशी खोचक टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे. 'टीव्ही9'ने ही बातमी दिली आहे.

"ज्या ठिकाणी बॅलेटवर निवडणुका झाल्या आहेत. तिथेही भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे", असं सावंत म्हणाले.

चंद्रकांतदादा पाटील, भाजप

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, चंद्रकांतदादा पाटील

दरम्यान शुक्रवारी, 8 जानेवारी रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनंगटीवार हे तीन बडे नेते दिल्लीत दाखल झाले होते.

या तिन्ही नेत्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा केली. यावेळी भाजपच्या दिल्लीतील या बैठकीत स्थानिक निवडणुकांमध्ये पराभव आणि आगामी निवडणुकांवर बैठक आयोजित केली होती.

5. कंगना राणावतविरोधात मानहानीचा दाखला

अभिनेत्री कंगना राणावत विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिंदर कौर या वृद्ध शेतकरी महिला यांनी कंगना विरूद्ध भठिंडा न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. आता या प्रकरणातील पुढील सुनावणी 11 जानेवारी रोजी होणार आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

कंगना रणौत

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, कंगना रणौत

महत्त्वाचं म्हणजे दीड महिन्यांपूर्वी भाकियूच्या उगराहांच्या बॅनरखाली वृद्ध महिला शेतकरी महिंदरपाल कौर या युनियनचा झेंडा हातात घेऊन इतर शेतकऱ्यांसोबत चालत होत्या. त्यांचा हा फोटो कंगनाने ट्वीट करत आक्षेपार्ह टीका केली होती. अशा महिला 100 रुपयांसाठी कोणत्याही आंदोलनात सामील होतात असं कंगनाने ट्वीट केलं.

कंगनाच्या या ट्वीटवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतला होता. हा वाद वाढत असल्याचं पाहिल्यानंतर कंगनाने आपलं ट्वीट डिलीट केलं. संपूर्ण प्रकरणावर प्रसारमाध्यमांसमोर महिंदर यांनी आपली प्रतिक्रियाही दिली होती. यासोबतच हवं असेल तर कंगनाला मी माझ्या शेतात शेतकरी म्हणून ठेवते आणि तिला याचा मोबदलाही देते अशी प्रतिक्रिया दिली होती. कंगनासारख्या सात महिलांना त्यांनी शेतात कामावर ठेवलं आहे. जर कंगनाला हवं असेल तर त्या दिवसाला 700 रुपये प्रमाणे तिला मानधन देतील.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)