आहार : मासे खाणं तब्येतीसाठी चांगलं की वाईट?

मासे

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जेसिका ब्राउन
    • Role, बीबीसी

मासे खाणं तब्येतीला चांगलं असल्याचं आपल्याला माहीत असतं, पण गरोदर स्त्रियांनी मासे खाण्यावर ताबा ठेवावा असंही सांगितलं जातं.

मासे खाण्यात काही धोके असतील, तर त्यांचे फायदे त्याहून जास्त असतात का? विशेषतः माशांचा साठा रोडावत असताना या प्रश्नाचं उत्तर काय असेल?

आपल्या आहारातील सर्वाधिक पोषक अन्न म्हणून माशांची ख्याती आहे.

पण वनस्पतींकडून मिळणाऱ्या अन्नाचे पर्याय वाढत असताना आणि समुद्री खाद्याची शाश्वतता व कार्बनची उपस्थिती याबद्दलच्या चिंता वाढत असताना, मासे आपल्या आहारात असणं गरजेचं आहे का, असा प्रश्न काही मंडळी विचारू लागली आहेत. 1974 साली जैविक शाश्वतक्षम पातळीअंतर्गत माशांचे साठे 90 टक्के होते, ते आता 66 टक्क्यांहून खाली आले आहेत, असं संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व शेती संघटनेच्या अहवालात म्हटलं आहे.

दरम्यान, पारा व इतर प्रदूषणकारी घटकांबाबतच्या चिंतेमुळे गरोदर असलेल्या किंवा स्तनपान देणाऱ्या स्त्रियांनी माशांच्या काही प्रजाती खाण्यावर ताबा ठेवावा, असंही सांगितलं जातं. हे अर्थातच एक उदाहरण झालं. मासे खाणं मर्यादित करण्याच्या अशा सूचना इतरही संदर्भांत दिल्या जातात.

मासे खाणं तब्येतीसाठी उपकारक आहे की अपायकारक आहे?

अवजड धातू

अलीकडच्या काही दशकांमध्ये माशांमधील प्रदूषणकारी घटकांची व धातूंची संभाव्य हानिकारक पातळी, हा चिंतेचा मोठा विषय बनला आहे.

पॉलीक्लोरिनेटेड बायफेनिल (पीसीबी) हे या चिंतेचं एक कारण आहे. 1980 च्या दशकामध्ये या औद्योगिक रसायनांवर जगभरात बंदी घालण्यात आली, पण त्यांचा वापर इतक्या प्रचंड प्रमाणात झाला की अजूनही आपल्या मातीत व आपल्या पाण्यामध्ये त्यांचा वावर आहे.

या रसायनामुळे आरोग्यावर विविध नकारात्मक परिणाम होतात, रोगप्रतिकारक्षमतेपासून ते मेंदूपर्यंत सर्वत्र हे परिणाम दिसतात. दुग्धोत्पादनांपासून ते पिण्याच्या पाण्यापर्यंत सगळीकडे पीसीबी अस्तित्वात असले, तरी माशांमध्ये ते सर्वाधिक प्रमाणात आढळण्याची शक्यता असते.

मासे

फोटो स्रोत, Getty Images

माशांच्या माध्यमातून पीसीबींचं सेवन कमी करण्यावरचा उपाय सर्वमान्य समजेला छेद देणारा असू शकतो, असं इंग्लंडमधील हर्टफोर्डशायर इथल्या 'रोदमस्टेड रिसर्च' या संस्थेचे विज्ञान संचालक जोनाथन नेपियर म्हणतात.

"मानवाने थेट खाण्यासाठी पकडल्या जाणाऱ्या वन्य प्रजातींच्या बाबतीत विषारी घटकांची समस्या जास्त गंभीर असण्याची शक्यता आहे," असं ते म्हणतात.

मत्स्य शेती करताना मात्र समुद्रातून मिळवलेले जे घटक या माशांना खायला दिले जातात ते धुतले किंवा घासले जातात, त्यामुळे त्यांच्यावरील विषारी घटक दूर झालेले असतात, त्यामुळे पाण्यातल्या मुक्त माशांपेक्षा मत्सशेतीतून मिळणारे मासे बहुतेकदा सुरक्षित असतात.

पण हेदेखील प्रत्येक वेळी लागू होतंच असं नाही, शिवाय पीसीबीचं प्रमाणही मोसमानुसार कमी-जास्त होत राहतं.

आपल्या आरोग्यासाठी व पर्यावरणासाठी जलचर जीवांची शेती सर्वसाधारणतः उपकारक मानली जात असली, तरी मोठ्या प्रमाणात असं संवर्धन करण्यातूनही काही समस्या उद्भवतात. यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्यामुळे समुद्रातील प्रदूषण वाढू शकतं किंवा असं संवर्धन काही आजारांचा स्त्रोत ठरू शकतं आणि हे आजार मग मोकळ्या असलेल्या जलचरांमध्येही पसरू शकतात.

गरोदर व स्तनपान देणाऱ्या स्त्रियांनी आठवड्याला केवळ दोन वेळाच मासे खाणं मर्यादित ठेवलं, तर पीसीबीचं प्रमाण कमी राहील, त्याचप्रमाणे डायॉक्सिनसारख्या इतर प्रदूषणकारी घटकांचंही प्रमाण कमी होईल, अशी शिफारस एनएचएसने केली आहे.

या प्रजातींमध्ये सामन व सर्डाइन यांच्यासारख्या तेलकट माशांच्या प्रजाती आहेत, तर खेकडे व समुद्री बाससारख्या तेलकट नसलेल्या प्रजातीही आहेत. गरोदर व स्तनपान देणाऱ्या स्त्रियांसाठी सुचवण्यात आलेलं मासे खाण्याचं प्रमाण एका वेळी सुमारे 140 ग्रॅम इतकं आहे.

दुसरी चिंता पाऱ्याशी संबंधित आहे. हा न्यूरोटॉक्सिन प्रकारातला घटक नाळेमधून जाऊन बाळाच्या वाढीवर परिणाम करू शकतो.

पारा शरीरात जाणं आणि कर्करोग, मधुमेह व हृदयविकार होणं यांच्यात असंख्य दुवे आहेत. भाज्यांसारख्या इतर अन्नपदार्थांमध्येही पारा आढळत असला, तरी एका सर्वेक्षणातील 78 टक्के सहभागी लोकांच्या शरीरात माशांमधून व समुद्री खाद्यातून पारा आल्याचे आढळले होते.

मासे

फोटो स्रोत, Getty Images

माशांमध्ये पाऱ्याची पातळी इतकी जास्त असते की अमेरिकेच्या अन्न व औषधं प्रशासनाने गरोदर लोकांना काही लोकप्रिय मासे मर्यादित प्रमाणात खाण्याची शिफारस केली.

हॅलिबट व टूना यांसारख्या काही प्रजातींचा यात समावेश आहे. आठवड्यात केवळ एकदाच गरोदर व्यक्तीने हे मासे खावेत, असे शिफारसीत म्हटले आहे.

परंतु, माशांमधील अवजड धातूंच्या संचयाविषयीची चिंता अतिशयोक्तीची आहे, असं नेपियर म्हणतात. स्वॉर्डफिशसारख्या विशेष दीर्घ काळ जगणाऱ्या प्रजातींच्याबाबतीतच ही समस्या उद्भवते- हे मासे 15 ते 20 वर्षं जगू शकतात, असं ते सांगतात.

स्वॉर्डफिशमध्ये पाऱ्याचं प्रमाण 0.995 पीपीएम इतकं असतं, तर सरासरी चार ते पाच वर्षं इतकं जगणाऱ्या सामनमध्ये हे प्रमाण सुमारे 0.014 इतकं असतं. या संदर्भातील संशोधन अजून सुरू आहे, परंतु आठवड्याला एक वेळा खाण्यातून पारा शरीरात जात असेल, तर अशा वेळी सरासरी 0.46 पीपीएम इतकाच कमाल पारा गरोदर स्त्रीच्या शरीरात जाणं हानिकारक नसेल, असं अमेरिकेतील पर्यावरण संरक्षण संस्थेने सध्या म्हटलं आहे.

पण हा प्रश्न आणखी जटील बनतो आहे, कारण पृथ्वी अधिक तापत जाईल त्यानुसार समुद्रातील पाऱ्याची पातळीही वाढण्याची शक्यता पुराव्यांच्या आधारे दिसू लागली आहे. धृवप्रदेशांवरील बर्फाळ जमीन वितळत असताना गोठलेल्या जमिनीत अडकलेला बाहेर पडतो आणि पाण्याच्या प्रवाहामध्ये मिसळतो (धृवीय बर्फ वितळताना बाहेर पडणाऱ्या विषारी घटकांविषयी अधिक वाचा).

पाऱ्यामुळे उद्भवणारा धोका कमी असतो, त्या तुलनेत माशांकडून शरीराला मिळणाऱ्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत, विशेषतः समुद्री ओमेगा 3 हा घटक असाच आवश्यक आहे, याकडे नेपियर लक्ष वेधतात.

मेदाम्ल

सामन, टूना, सर्डाइन व मॅकरील यांसारख्या तेलकट माशांच्या सेवनाने हृदविकारांचा धोका कमी होतो, कारण त्यात आइकोसेपेन्टाएनोइक अॅसिड (ईपीए) व डोकोसाहेक्साएनोइक अॅसिड (डीएचए) यांसारख्या समुद्री ओमेगा-3 प्रकारच्या मेदाम्लांचा समावेश असतो.

ओमेगा-3 चे वनस्पतींशी संबंधित काही स्त्रोत म्हणजे अंबाडीच्या बिया व अक्रोड- ते तिसळ्या प्रकारच्या एएलएने संपन्न असतात. वनस्पतींपासून मिळणाऱ्या ओमेगा-3 मेदाम्लांनी होणारे आरोग्यविषयक लाभ आणि ईपीए व डीएचए यांच्यामुळे होणारे लाभ समतुल्य असतात, असा निष्कर्ष 2014 सालच्या एका अभ्यासात काढण्यात आला होता, पण त्याला आधार देणारं संशोधन अजून झालेलं नाही. परंतु, शेवाळातून मिळणारे पूरक घटक व खाण्यायोग्य समुद्री शेवाळ यांमध्ये ईपीए व डीएचए दोन्ही आढळतात.

मासे

फोटो स्रोत, Getty Images

"मानवी चयापचय क्रियेमध्ये ईपीए व डीएचए या दोन्हींच्या अनेक महत्त्वाच्या भूमिका असतात, पण हे घटक आपण आपल्या शरीरातच पुरेशा परिणामकारकतेने निर्माण करू शकत नाही, त्यामुळे आपल्या आहारामध्ये त्यांना जागा करून देणं खरोखरच महत्त्वाचं आहे," असं नेपियर सांगतात.

आपला मेंदू, दृष्टिपटल व इतर विशेष तंतूंमध्ये डीएचए मुबलक आढळतं. ईपीएसोबत डीएचए हे मेदाम्ल शरीरातील जळजळीशी लढायला उपयुक्त ठरतं. ही जळजळ हृदयविकार, कर्करोग व मधुमेह यांची जोखीम वाढवणारी असते.

"समुद्री ओमेगा-3चे शरीरावरील परिणाम कोणते आहेत, हे दाखवणारी लोकसंख्याधारित आकडेवारी सातत्यपूर्ण व सक्षम आहे. ईपीए व डीएचए यांचं जास्त सेवन करणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकारासारखे आजार आढळण्याची व त्यात त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता कमी असते," असं इंग्लंडमधील साउदम्प्टन विद्यापीठातील मानवविकास व आरोग्य विभागाचे प्रमुख फिलिप काल्डर म्हणतात.

ओमेगा-3 मिळवत असतानाच पाऱ्यापासून होणारा धोका टाळण्याचा एक मार्ग म्हणजे मत्सतेलाचा पूरक अन्न म्हणून वापर करावा. परंतु, ओमेगा-3 पूरक अन्नाचे आरोग्यावर कोणकोणते परिणाम होतात, यासंबंधी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने अलीकडेच संशोधन करण्यात आलं, त्यानुसार तेलकट मासा खाण्यासारखा परिणाम अशा पूरक खाद्यातून होत नाही.

मासे

फोटो स्रोत, Getty Images

"आपली शरीरामध्ये विशिष्ट पोषक पदार्थाच्या किंवा घटकाच्या एका तुकड्यावर नव्हे, तर संपूर्ण अन्नावर चयापचय क्रिया पार पडते," असं नेपियर सांगतात.

"याचा आपल्या तब्येतीवर खूपच लहानसा लाभदायक परिणाम होतो, असं आम्हाला आढळलं. उदाहरणार्थ, हृदयविकाराने मरण येण्याचा धोका कमी होतो," असं ईस्ट अँग्लिआ विद्यापीठातील प्रपाठक व जागतिक आरोग्य संघटनेच्या उपरोक्त अभ्यासातील एक संशोधक ली हूपर सांगतात.

सुमारे 334 लोकांनी चार ते पाच वर्षं ओमेगा-3 पूरक खाद्याचं सेवन केलं, तर त्यातल्या एका व्यक्तीला रक्तवाहिन्यांशी निगडित हृदयविकाराने मृत्यू येणार नाही, अशी ही सरासरी असल्याचं त्या सांगतात.

पण हूपर यांनी हाती घेतलेल्या लोकसंख्येच्या अभ्यासामध्ये एक अडचण असते. सर्डाइनसारखे काही तेलकट मासे जास्त महागडे नसले, तरी एकंदरीत मासे हे अन्न महागडं मानलं जातं. सामाजिक-आर्थिक स्थानाचा तब्येतीवर परिणाम होतो, हे सर्वमान्य आहे- त्यामुळे जास्त मासे खाणारी कुटुंबं जास्त उत्पन्नगटातील असतील आणि त्यांची एकंदर जीवनशैली अधिक निरोगी असेल, अशी शक्यता आहे.

सर्वसाधारणतः संशोधक अशा गोंधळवणाऱ्या घटकांची दखल घेतात, पण अभ्यासाच्या निष्कर्षांना बाधा आणू शकतील अशा प्रत्येकच गोष्टीचा विचार ते करतीलच असं नाही, असं काल्डर म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालामध्ये 79 अभ्यासांचं पुनरावलोकन केलं होतं, आणि हे अभ्यास त्यातील सहभागी व्यक्तींच्या सामाजिक-आर्थिक स्थानाबाबत भिन्न नियंत्रणं लागू करणारे असू शकतात.

पण हस्तक्षेपनिष्ठ चाचण्यांबाबत- म्हणजे लोकांना यादृच्छिक पद्धतीने निवडून एका गटाचा भाग केलं जाणं आणि मग ओमेगा-3सारख्या पूरक खाद्यांच्या सेवनाचं प्रमाण मोजण्यासाठी त्या गटात हस्तक्षेप करणं, काही समस्या उद्भवतात. उदाहरणार्थ, ईपीए व डीएचए यांच्या आरोग्यावरील संभाव्य परिणामांचं विश्लेषण करणं अशा चाचण्यांमध्ये अवघड जातं, कारण या चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्या लोकांच्या शरीरव्यवस्थेमध्ये ओमेगा-3चं प्रमाण वेगवेगळं असतं, असं काल्डर म्हणतात.

मासे

फोटो स्रोत, Getty Images

शिवाय, माशाचा प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यावरचा परिणाम वेगवेगळ्या प्रमाणात असू शकतो. ईपीए व डीएचए या मेदाम्लांची पूर्वरूपं त्या-त्या व्यक्तीच्या शरीरात कशा रितीने रूपांतरित होतात, यावर हा परिणाम अवलंबून असतो. व्यक्तीचा एकंदर आहार व जीवनशैली यांच्यावर हा भेद ठरू शकतो, पण जनुकीय भिन्नत्वाचीही इथली भूमिका महत्त्वाची असते, असं काल्डर सांगतात.

शिवाय, मासे कसे वाढवले जातात यावरही माशांच्या आरोग्यविषयक लाभांमध्ये फरक पडू शकतो.

समुद्री परिसंस्थेमध्ये ओमेगा-3 मुबलक प्रमाणात असतो: लहान मासे समुद्रातील प्लवक खातात आणि या माशांना मोठे मासे खातत, आणि संपूर्ण अन्नसाखळीद्वारे ओमेगा-3 माणसांकडे येतो. पण मत्सशेतीमध्ये ही व्यवस्था निराळ्या पद्धतीने चालते आणि आपल्यापैकी बहुतांश लोक असे पाळलेले मासे खातात. "मत्सशेतीमध्ये एका पिंजऱ्यात हजारो मासे असतात. संबंधित शेतकरी देईल ते हे मासे खातत," असं नेपियर सांगतात.

मोकळ्या वातावरणात होतं त्याप्रमाणे मत्सशेतीतही मोठ्या माशांना त्यांच्याहून छोट्या माशांच्या प्रजाती खायला दिल्या जातात. मोकळ्या वातावरणात मात्र मासे वेगवेगळ्या प्रकारचे लहान मासे खातात. शेतात माशांना बहुतेकदा पेरूवियन अँकोव्हीपासून तयार केलेलं मासांचं अन्न दिलं जातं.

त्यात या अँकोव्ही प्रजातीतल्या माशांचं उत्पादन एकंदर मत्सोद्योग सुरू ठेवण्यासाठी शक्य तितक्या कमाल पातळीवर केलं जातं, असं नेपियर सांगतात. जागतिक मत्स्यशेती वाढतच जाण्याची अपेक्षा आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व शेती संघटनेनुसार, मत्सतेलाच्या पूरक पदार्थांना वाढती मागणी आहे, म्हणजे शेतातल्या माशांना दिल्या जाणाऱ्या मत्स्यान्नामधील मत्स्यतेलाचं प्रमाण कमी होतं आहे. याचा अर्थ, माशातील आपण सेवन करत असलेल्या ओमेगा-3चं प्रमाणही कमी होतं आहे.

"दर वर्षी समुद्रातून बाहेर येणाऱ्या ओमेगा मत्स्यतेलाचं प्रमाण मर्यादित आहे, अशा वेळी मत्सशेती वाढत असेल, तर त्यातून लोकांच्या आहारात जाणारं मत्सतेल कमी होत जातं, कारण ठराविक प्रमाणातच उपलब्ध असलेला मत्सतेलाचा साठा माशांना दिला जातो."

शेतीतून वाढवलेल्या सामन माशांमधील ईपीए व डीएचए या मेदाम्लांची पातळी गेल्या दशकभरात अर्ध्याने कमी झाली आहे, असं 2016मधील एका संशोधनात आढळलं.

"वन्य सामन मासे अटलान्टिक महासागरात सर्वत्र पोहत राहतात; हा बारीक प्रजातीतला मासा आहे. तो लठ्ठ होत नाही, कारण खाल्लेलं सगळं तो वापरून टाकत असतो," असं ते सांगतात.

मेंदूसाठी लाभदायक अन्न

ओमेगा-3 व्यतिरिक्त माशांमध्ये इतरही लाभदायक पोषक घटक असतात, यात सेलेनियमचा समावेश होतो. सेलेनियम पेशींना नुकसान होण्यापासून व संसर्गापासून संरक्षण पुरवतं. शिवाय आयोडिन निरोगी चयापचयक्रियेसाठी उपयुक्त ठरतं. त्याचप्रमाणे माशांमधून प्रथिनंही मिळतात.

पूर्वीपासून मासे हे मेंदूसाठी लाभदायक अन्न मानलं गेलं आहे. पण हे केवळ माशांमधील ओमेगा-3च्या प्रमाणामुळे होत नाही, असं अलीकडच्या अभ्यासांतून दिसून आलं आहे. परंतु, ओमेगा-3 आणि बोधक्षमतेचा ऱ्हास कमी गतीने होणं यांच्यात संबंध असल्याचं विविध अभ्यासांमध्ये आढळलं आहे.

मासे खाणाऱ्या लोकांच्या मेंदूची घनता व मासे न खाणाऱ्या लोकांच्या मेंदूची घनता, यांची तुलना संशोधकांनी केली, तेव्हा त्यांना असं आढळलं की, भाजलेला किंवा शिजवलेला मासा करड्या भागाची घनता जास्त वाढवतो. ओमेगा-3 ची पातळी किती आहे, याच्या अलाहिदा हा निष्कर्ष निघतो.

"सुधारलेलं आरोग्य व आजार यांनी आपल्या मेंदूची घनता बदलते. मज्जातंतूंची संख्या जितकी जास्त तितकी मेंदूची घनता जास्त," असं वॉशिंग्टन विद्यापीठातील 'स्कूल ऑफ मेडिसिन'मधील रेडिऑलॉजी व न्यूरॉलॉजीचे सहायक प्राध्यापक सायरस राजी सांगतात.

सरासरी सत्तरीच्या अखेरच्या टप्प्यात असलेल्या 167 व्यक्तींच्या मासे खाण्याच्या सवयी आणि एमआरआय स्कॅन यांची तुलना संशोधकांनी केली. तेव्हा त्यांना असं आढळलं की, मासे न खालेल्या सहभागी व्यक्तींपेक्षा दर आठवड्याला मासे खालेल्या व्यक्तींच्या मेंदूची घनता जास्त होती.

विशेषतः त्यांच्या अग्रखंडाची (फ्रंटल लोब) घनता जास्त होती- लक्ष केंद्रित करण्यासाठी हा भाग महत्त्वाचा असतो. शिवाय, त्यांच्या शंखखंडाची (टेम्पोरल लोब) घनताही जास्त होती- स्मरणशक्ती, अध्ययन व बोधक्षमता यांच्यासाठी हा भाग कळीचा असतो.

मासे जळजळ कमी करतात, या परिणामाशी मासे व मेंदू यांच्यातील संबंध घनिष्ठ जोडलेले असावेत, कारण जळजळ कमी करण्यासाठी मेंदू प्रतिसाद देतो तेव्हा त्या प्रक्रियेत मेंदूतील पेशींवर परिणाम होत असतो, असं राजी म्हणतात.

मासे

फोटो स्रोत, Getty Images

"याचा अर्थ, माशाला नेहमीच्या आहारात जागा दिली, तरी आपण मेंदूचं आरोग्य सुधारू शकतो आणि त्यातून अल्झायमर्ससारख्या आजारांना प्रतिबंध होऊ शकतो," असं राजी म्हणतात. छिन्नमनस्कतेसंदर्भात मेंदू शक्य तितका चिवट व्हावा, यासाठी विशी-तिशीतल्या लोकांनी आठवड्यातून किमान एकदा मासे खायला सुरुवात करावी, असं राजी सुचवतात.

शिवाय, आपल्या आहारातील कमी पोषक अन्नाची जागा मासा घेऊ शकतो, त्यामुळे तो अधिक पोषक ठरतो. "आपण अधिक मासे खाल्ले, तर इतर पदार्थ कमी खाण्याकडे आपला कल असतो," असं हूपर म्हणतात.

तरीही, मासे न खाणाऱ्या लोकांमध्ये आरोग्यविषयक काही मोठा अपुरेपणा राहत असल्याचं सुचवणारं सक्षम संशोधन अजून झालेलं नाही, त्यामुळे एकंदर मानवी आरोग्यासाठी मासा अत्यावश्यक आहे, असं ठामपणे म्हणता येणं अवघड आहे, असं काल्डर म्हणतात. परंतु, ओमेगा-3 मुळे आरोग्याला पोषकता लाभते आणि आजारांचा धोका कमी होते, हे स्पष्ट असल्याचंही ते सांगतात.

पण मासे आरोग्याला खरोखरच किती पोषक असतात, हे ठरवणं हा खरा कळीचा मुद्दा आहे. "मासे हा शाश्वत अन्नस्त्रोत नाही, त्यामुळे त्यावरील उपायांवर आता संशोधनातून अधिक लक्ष केंद्रित केलं जाण्याची शक्यता आहे- शेवाळ कसं वाढवावं आणि ओमेगा-3 तेल कसं तयार करावं, यावर अधिक भर दिला जाईल, परिणामी खुद्द माशावरील अभ्यास कमी होतील," असं काल्डर म्हणतात.

उपलब्ध असलेल्या सर्वाधिक शाश्वत माशांच्या प्रजातींमधून निवड करून माणसं आपलं काम भागवू शकतात. मरिन कन्झर्वेशन सोसायटीसारख्या संस्थांच्या मार्गदर्शनाने कोणता मासा सर्वोत्तम आहे याचा अंदाज बांधता येतो. या संस्थेच्या संकेतस्थळावर नोंदवलेल्या 133 प्रजातींपैकी 50 प्रजाती बहुतांशाने शाश्वत गटातील आहेत, त्यांची खाद्यान्न म्हणून निवड करणं "चांगलं" ठरू शकतं. यात, सुदैवाने, सामन, कोळंबी, कॉड, मॅकेरल, कालव, ऑयस्टर व हॅलिबट या माशांचाही समावेश आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)