आरोग्य : इतरांप्रती दयाळू असल्यास आपलं आरोग्य कसं सुदृढ राहतं?

आरोग्य

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मार्टा झरास्का
    • Role, बीबीसी

इतरांना मदत करणं किंवा आपला थोडासा वेळ दानधर्मासाठी देणं, यातून आपल्याला काहीशी उबदार भावना अनुभवायला मिळते, पण यातून आपल्याला काही शारीरिक लाभही होत असण्याची शक्यता आहे.

बेटी लोव 96 वर्षांच्या झाल्यावर वर्तमानपत्रांमध्ये त्यांच्याबद्दल बातम्या येऊ लागल्या. निवृत्तीचं वय उलटूनही बरीच वर्षं झालेली असतानाही त्या युनायटेड किंगडममधील ग्रेटर मँचेस्टर इथे सालफोर्ड रॉयल हॉस्पिटलच्या कॅफेत कॉफी देण्याचं, ताटल्या घासण्याचं आणि रुग्णांशी गप्पा मारण्याचं काम स्वयंसेवा म्हणून करतात. अशातच लोव यांनी वयाची शंभरी पार केली.

"अजूनही त्या रुग्णालयात स्वयंसेवक म्हणून काम करतात," अशा आशयाचे मथळे बातम्यांना दिले गेले. मग त्यांचं वय 102 वर्षं झालं आणि बातम्यांचे मथळे त्याच आशयाचे येत राहिले: "अजूनही स्वयंसेवा सुरूच." त्या 104 वर्षांच्या झाल्यावरही तसंच. अगदी 106 वर्षांच्या झाल्यावर, दृष्टी साथ देत नसतानाही, लोव आठवड्यातून एकदा या कॅफेत येऊन काम करत होत्या.

बहुतांश लोक ज्या वयात घरी बसून विश्रांती घेतात असं वय ओलांडल्यानंतरही लोव कॅफेत काम करत राहिल्या, यामागचं कारण काय, असा प्रश्न पत्रकार त्यांना विचारत असत. स्वयंसेवेमुळे आपण सुदृढ राहतो, असं त्यांचं त्यावरचं उत्तर असायचं. आणि बहुधा त्यांचं उत्तर बरोबरच होतं.

दयाभावाने वागल्याने (औपचारिक स्वयंसेवा व आर्थिक देणग्यांपासून ते दैनंदिन पातळीवरच्या दयाळू कृतींपर्यंत विविध गोष्टींचा यात समावेश होतो) सुदृढ व दीर्घ आयुष्य लाभण्याची शक्यता असते, असं विज्ञान म्हणतं.

उदाहरणार्थ, काही अभ्यासांमध्ये दिसून आल्यानुसार, स्वयंसेवा करणाऱ्यांचा लवकर मृत्यू होण्याचा धोका 24 टक्क्यांनी कमी असतो- रोज सहा किंवा अधिक वेळा फळं व भाज्या खाण्याने अकाली मृत्यूचा धोका याच प्रमाणात कमी होतो, म्हणजे असा आहार आणि स्वयंसेवा यांचा आरोग्यावरील सकारात्मक परिणाम सारखाच होतो.

शिवाय, स्वयंसेवकांना हाय ब्लड ग्लुकोजचा त्रास होण्याचा धोका कमी असतो आणि हृदयविकारांशी संबंधित जळजळीची पातळीही त्यांच्यात कमी राहते. दानधर्मात सहभागी न होणाऱ्या लोकांपेक्षा असा सहभाग असणाऱ्या लोकांचं रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण 38 टक्क्यांनी कमी असतं.

स्वयंसेवेचे आरोग्यासाठी उपकारक ठरणारे हे परिणाम स्पेन व इजिप्त इथपासून ते युगांडा व जमैका इथपर्यंत जगाच्या सर्व कानाकोपऱ्यांत दिसून येतात, असं गॅलप वर्ल्ड पोल या संस्थेच्या आकडेवारीवर आधारलेल्या एका अभ्यासात म्हटलं आहे.

आरोग्य, नातेसंबंध

फोटो स्रोत, Getty Images

चांगलं आरोग्य लाभलेले लोक स्वयंसेवा करण्याची शक्यता स्वाभाविकपणेच जास्त असते. उदाहरणार्थ, तुम्हाला सांधेदुखीचा तीव्र त्रास असेल, तर तुम्ही एखाद्या सार्वजनिक खानावळीत स्वयंसेवा करायला जाण्याची शक्यता कमी आहे.

"चांगली तब्येत असलेले लोक स्वयंसेवा करण्याची शक्यता जास्त असते, असं सुचवणारं संशोधन झालेलं आहे. पण वैज्ञानिकांना याची पुरेशी जाणीव असल्यामुळे आम्ही आमच्या अभ्यासावेळी अशा प्रकारच्या घटितांबाबत सांख्यिकी नियंत्रण ठेवून पुढे जातो," असं इंडियाना विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ आणि परोपकारविषयक संशोधक सारा कॉनरथ सांगतात.

आधीपासूनच्या आरोग्यविषयक परिणामांना वगळून वैज्ञानिक विचार करत असले, तरी स्वयंसेवेने तब्येत चांगली राहायला मदत होते हे दिसतंच. इतरांना मदत केल्याने आपलं आरोग्य चांगलं राहतं, यामागच्या जीवशास्त्रीय यंत्रणांवर प्रकाश टाकण्याचं काम अनेक प्रयोगांमधून झालेलं आहे.

अशा एका प्रयोगामध्ये कॅनडातल्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांपैकी काहींना दोन महिन्यांसाठी प्राथमिक शाळेतल्या मुलांना शिकवण्याचं काम देण्यात आलं आणि काही विद्यार्थ्यांना वेटलिस्टवर ठेवण्यात आलं. चार महिन्यांनी, अध्यापनाचा हा प्रयोग बऱ्यापैकी काळ सुरू राहिल्यानंतर, या दोन विद्यार्थीगटांमधला फरक त्यांच्या रक्तातून स्पष्टपणे दिसू लागला. वेटलिस्टवरील विद्यार्थ्यांच्या तुलनेत प्राथमिक इयत्तांमधील मुलांना शिकवण्यात सक्रिय सहभागी असलेल्या माध्यमिक विद्यार्थ्यांमध्ये कोलेस्टरॉलची पातळी कमी होती, त्याचप्रमाणे त्यांच्या रक्तात 'इंटरल्यूकिन 6'सारख्या ज्वलनशील पदार्थांच्या खुणाही कमी होत्या- हृदयवाहिकेच्या आरोग्यसंदर्भात अंदाज येण्यासाठी याचा उपयोग होतोच, शिवाय विषाणूजन्य संसर्गासंदर्भातही याची भूमिका महत्त्वाची असते.

आरोग्य, नातेसंबंध

फोटो स्रोत, Getty Images

जागतिक साथीच्या काळात स्वयंसेवक म्हणून काम करण निश्चितपणे अधिक आव्हानात्मक असतं. परंतु, ऑनलाइन असं काम केलं, तरी आपली प्रेरणा खरोखरच इतर लोकांना मदत करण्याची असेल तर तेही आरोग्याला लाभदायक ठरतं, असं कॉनरथ म्हणतात. स्वयंसेवेमधील सामाजिक घटक सुदृढ आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे, असं संशोधनातून दिसतं, त्यामुळे मित्रमैत्रिणींसोबत आभासी स्वयंसेवाही करावी, अशी शिफारस त्या करतात.

पण केवळ औपचारिक स्वयंसेवेचेच सकारात्मक परिणाम रक्तामध्ये प्रतिबिंबित होतात असं नव्हे- दयाळूपणाच्या सहजगत्या घडलेल्या कृतीही असाच परिणाम करतात. कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या एका अभ्यासात, काही सहभागार्थींना दयाळूपणाच्या साध्या कृती करण्यास सांगण्यात आलं होतं- उदाहरणार्थ अनोळखी व्यक्तीसाठी कॉफी घेऊन द्यावी, असं. तर, जळजळीशी संबंधित असलेल्या ल्यूकोसाइट जनुकांची त्यांच्या शरीरातील सक्रियता कमी झाल्याचं आढळलं. ही चांगली बाब आहे, कारण गंभीर जळजळ संधिवात, कर्करोग, हृदयविकार व मधुमेह यांसारख्या आजारांना खतपाणी घालते.

आरोग्य, नातेसंबंध

फोटो स्रोत, Getty Images

लोकांना 'फंक्शनल मॅग्नेटिक रेसोनन्स इमेजिंग' (एफ-एमआरआय) स्कॅनरमध्ये ठेवून लोकांना औदार्याची कृती करायला सांगितली, तर त्यांच्या मेंदू वेदनेवर कशी प्रतिक्रिया देतात यातले बदल आपल्याला दिसू शकतात. अलीकडच्या एका प्रयोगामध्ये स्वयंसेवकांना पैसे दान करायचे किंवा नाही यांसह इतर विविध निर्णय घ्यायचे होते. या वेळी त्यांच्या हातांना सौम्य विजेचे धक्के दिले जात होते.

देणगी देण्याचा निर्णय घेतलेल्यांच्या मेंदूमध्ये वेदनेला कमी तीव्र प्रतिसाद मिळाला. आणि आपली कृती मदतीची होईल असा विचार ते करू लागल्यावर त्यांची वेदनाप्रतिकारकता वाढली. त्याचप्रमाणे एखाद्या चाचणीसाठी आपलं रक्त काढलं जात असेल, तर त्यापेक्षा रक्तदानावेळी कमी वेदना होतात, असंही दिसतं. वास्तविक रक्तदानावेळी वापरली जाणारी सुई दुप्पट जाडीची असण्याची शक्यता असते.

दयाळूपणा आणि आर्थिक देणग्या देण्याचे आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात, हे दाखवणारे अगणित दाखले आहेत. उदाहरणार्थ, नियमितपणे आपल्या नातवंडांची काळजी घेणाऱ्या आजीआजोबांची मरणाधीनता अशा प्रकारे नातवंडांची काळजी घेण्यात न गुंतलेल्या आजीआजोबांहून 37 टक्क्यांनी कमी असते.

नियमित व्यायामाहून अधिक मोठ्या प्रमाणात हा परिणाम होतो, असं अभ्यासांचा लेखाजोखा घेतल्यावर स्पष्ट झालं आहे. आजीआजोबा पूर्णतः पालकांच्याच भूमिकेत शिरणार नाहीत, हे यात गृहित धरलेलं आहे (परंतु, नातवंडांची, विशेषतः रांगत्या मुलांची काळजी घेण्यामध्येही बरीच शारीरिक हालचाल करावी लागते, हे कबूल करायला हवं).

दुसऱ्या बाजूला, स्वतःच्या सुखाऐवजी दुसऱ्यांच्या सुखासाठी पैसा खर्च केल्यास, त्यातून ऐकण्याची क्षमता वाढते, झोप सुधारते आणि रक्तदाब कमी होतो. अतितणावावरील नवीन औषधोपचारांचा जो काही परिणाम होईल, तितक्या प्रमाणात याचा परिणाम दिसतो.

दरम्यान, देणगी देण्यासाठी चेकवर सही करणं, हा तुमचे स्नायू बळकट करण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो. हाताची पकड किती घट्ट आहे, याची तपासणी करणाऱ्या एका प्रयोगामध्ये सहभागी व्यक्तींपैकी ज्यांनी युनिसेफला देणगी दिली त्यांनी, अशी देणगी न देणाऱ्या लोकांहून 20 सेकंद अधिक वेळ हँड एक्सरसायझर पकडून ठेवला. तर, पुढच्या वेळी तुम्हाला, समजा, हात लढवायचा असेल, तर त्याआधी चेकबुकावर सह्या करायला विसरू नका.

खेळ

फोटो स्रोत, Getty Images

सॅन दिआगो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये मज्जावैज्ञानिक असलेल्या त्रिस्तेन इनागाकी यांच्या मते, दयाळूपणा व औदार्य यांचा आरोग्य सुदृढ होण्यावर परिणाम होतो यात काहीच आश्चर्यकारक नाही. "माणसं अत्यंत सामाजिक असतात, आपण परस्परांशी जोडलेले असतो तेव्हा आपलं आरोग्य चांगलं राहतं, आणि परस्परांशी संबंधित राहण्याचा एक भाग म्हणजे काहीएक देत राहणं," असं त्या म्हणतात.

इनागाकी आपल्या काळजीसेवा व्यवस्थेचा अभ्यास करतात- ही व्यवस्था म्हणजे मदत करण्यासंबंधीचं वर्तन आणि आरोग्य या दोन्हींशी जोडलेल्या मेंदूच्या प्रांतांचं जाळं असतं. आपल्या बालकांचं पालकत्व सुकर व्हावं यासाठी ही व्यवस्था उत्क्रांत झाली असावी. सस्तन प्राण्यांच्या प्रमाणित सरासरीपेक्षा मानवी बालक असाधारण म्हणावं इतकं असहाय असतं. त्यानंतर ही व्यवस्था इतर लोकांना मदत करण्यासंदर्भातही सक्रिय झाली असावी.

सलग यश मिळाल्यावर उत्तेजित होणाऱ्या मेंदूतील सेप्टल एरिया आणि वेन्ट्रल स्ट्रइअटम हे भागही या व्यवस्थेमध्ये असतात. पालकत्वाची सांगड लाभदायक व्यवस्थेशी घालून निसर्गाने अशी तजवीज केली आहे की, आपण आपल्या किंचाळत्या, गरजू बालकांपासून दूर जाऊ नये. इनागाकी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या मज्जाकल्पना अभ्यासातून असं दिसून आलं की, आपण आपल्या प्रियजनांना पाठबळ देतो तेव्हादेखील मेंदूतील हे भाग उत्तेजित होतात.

काळजी घेण्याचा भाग लाभदायक ठरवण्यासोबतच उत्क्रांतीप्रक्रियेने याचा संबंध तणाव कमी करण्याशीही जोडून ठेवला. आपण दयाळूपणे वागतो, किंवा आपल्या गतकालीन दयाळूपणाविषयी नुसता विचार करतो, तेव्हाही आपल्या मेंदूच्या भय केंद्रामधली- अॅमिग्दालामधली- हालचाल कमी होते. याचाही संबंध पुन्हा मुलं वाढवण्याशी जोडता येतो.

मुलांची काळजी घेणं तणाव कमी करणारं ठरतं, हे सर्वसामान्य अनुभवाच्या विपरित वाटण्याची शक्यता आहे. कोणत्याही नवीन पालकांना यासंबंधी विचारलं, तर ते बाळांची काळजी घेण्यात किती कटकट होते त्याची कहाणी सांगतील. पण संशोधनानुसार, प्राण्यांना त्यांच्याच प्रजातीमधील बालकांचे हुंदके ऐकू आले की, त्यांच्या मेंदूतील अॅमिग्दालाची हालचाल कमी होते, आणि पालकांना त्यांच्या स्वतःच्या बाळाचा फोटो दाखवल्यावरही असंच घडतं.

आपल्याला खरोखरच इतरांच्या उपयोगी पडायचं असेल, तर आपल्या मेंदूतील भयकेंद्रामधली हालचाल कमी व्हावी लागते, असं इनागाकी सांगतात. "आपण आपल्याच तणावाच्या ओझ्याखाली असलो, तर मुळात इतरांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे जाणंही आपल्याला शक्य नसतं," असं त्या म्हणतात.

या सगळ्याचे आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होतात. काळजीसेवा पुरवण्याशी संबंधित व्यवस्था- अॅमिग्दाला आणि लाभदायक प्रांत- आणि आफली सहानुभूतीपूर्ण मज्जाव्यवस्था यांच्यात जाळं तयार झालेलं असतं. आपल्या रक्तदाबाचं नियमन करण्यामध्ये व जळजळीला प्रतिसाद देण्यामध्येही या जाळ्याचा सहभाग अशतो, असं इनागाकी सांगतात. त्यामुळेच काळजी घेतली, सेवा केली, की आपल्या हृदयवाहिकेची तब्येत सुधारते आणि आपल्याला दीर्घ काळ जगण्यासाठी ते उपकारक ठरतं.

स्वयंसेवा करणाऱ्या पौगंडावयीन मुलामुलींमध्ये इंटरल्यूकीन-6 आणि सी-रिअॅक्टिव्ह प्रथिनं या जळजळीच्या दोन खुणांची पातळी कमी राहत असल्याचं दिसून आलं आहे. कोव्हिड-19ची लागण झालेल्या रुग्णांमध्ये गंभीर परिणामांबाबत या दोन्ही घटकांचा आढळ झालेला आहे. यातून साथीच्या काळात काही उत्साहवर्धक शक्यता निर्माण होतात- इतरांना गरजेच्या काळात मदत करणं आरोग्याच्या दृष्टीने उपकारक ठरतं आणि टाळेबंदीच्या उदासीमध्ये आपली मनस्थितीही स्थिरस्थावर राहायला त्याचा उपयोग होतो.

स्वयंसेवेचा कोव्हिड-19 विरोधात संरक्षणात्मक परिणाम होतो का, यासंबंधी प्रत्यक्ष चाचण्या घेऊन अजून संशोधन झालेलं नाही. शिवाय, इतरांसोबतचा आपला संपर्क वाढवणारी कोणतीही कृती विषाणूच्या संसर्गाचा धोका वाढवणारी ठरू शकते.

पण स्वयंसेवेची प्रेरणा आपल्याला स्वाभाविकपणे जाणवत नसेल तर काय?

स्वयंसेवा आणि दानवृत्तीशी घनिष्ठरित्या जोडल्या गेलेला सहानुभूती हा गुण तीव्र आनुवांशिक आहे. आपल्या सहानुभूतीचा एक तृतीयांश भाग आपल्या जनुकांमधून आलेला असतो. पण जन्मजात कमी सहानुभूतीची भावना असणाऱ्या लोकांचं भलं होत नाही, असा याचा अर्थ नसल्याचं कॉनरथ नमूद करतात.

"आपल्यापैकी प्रत्येकाची शारीरिक चपळतेची क्षमताही वेगवेगळी असते. काहींना स्नायू बळकट करणं इतरांहून अधिक सोपं वाटू शकतं, पण आपल्यापैकी प्रत्येकाला स्नायू निश्चितपणे असतात आणि कोणीही थोडा व्यायम केला तर स्नायू बळकट होतातच," असं त्या सांगतात. "सुरुवात कुठूनही केली, तरी आपल्या सर्वांना सहानुभूती वाढवणं शक्य आहे, असं संशोधनातून दिसतं."

यातील काही कृती अगदी मोजक्या सेकंदांपुरत्या आहेत. उदाहरणार्थ, दररोज एखाद्या वेळी तुम्ही जगाकडे दुसऱ्या व्यक्तीच्या परिप्रेक्ष्यातून पाहण्याचा प्रयत्न करू शकता, त्या व्यक्तीमध्ये कायाप्रवेश केल्यासारखा विचार करून पाहावा. किंवा, सजगता आणि प्रेम-दयाळूपणा यांच्याशी निगडीत साधना तुम्ही करू शकता. पाळीव प्राण्यांची काळजी घेणं आणि भावनिक ओलावा असलेली पुस्तकं वाचणं, हा टाळेबंदीच्या काळात वेळ घालवण्याचा उत्तम मार्ग होता आणि त्यातून सहानुभूतीलाही उत्तेजना मिळते.

ब्रिटनवासीयांनी 2020च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये 2019मधील याच कालावधीच्या तुलनेत जास्तीचे 80 कोटी पौंड दानधर्मावर खर्च केले. इतर देशांमधूनही अशीच आकडेवारी समोर आली आहे. जवळपास अर्ध्या अमेरिकी लोकसंख्येने अलीकडच्या काळात त्यांच्या वृद्ध किंवा आजारी शेजाऱ्यांची विचारपूस केली. जर्मनीमध्ये कोरोना विषाणूच्या संकटामुळे लोक एकमेकांजवळ आले.

फेब्रुवारी 2020मधील सर्वेक्षणानुसार सुमारे 41 टक्के लोकांना इतरांची फिकीर वाटत नव्हती, ही आकडेवारी उन्हाळ्याच्या आरंभी केवळ 19 टक्क्यांवर आली होती. शिवाय, साथीच्या आजारात दयाभावाने वागल्याच्या इतरही अनेक कहाण्या समोर आल्या- उदाहरणार्थ, मुलांना उत्साह वाटावा यासाठी अमेरिकेत व ऑस्ट्रेलियात लोकांनी त्यांच्या खिडक्यांमध्ये टेडी बेअर ठेवले. फ्रान्समध्ये फूलविक्रेत्या म्युरिएल मार्सेनाक यांनी पेरपिग्नानमधील रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या कारवर 400 पुष्पगुच्छ ठेवले.

अशा प्रकारच्या दयाळूपणाच्या कृतींनी आपलं चित्त शांत होतंच, शिवाय आपलं हृदय दीर्घ काळ अधिक सुदृढ राहायलाही त्याची मदत होते, असं संशोधनातून सूचित होतं. "केवळ इतरांवर लक्ष केंद्रित केल्यानेही काही वेळा आपला लाभ होत असतो," असं इनागाकी सांगतात.

हे लक्षात ठेवून आता येत्या काळात आपण सगळेच काही क्षण दयाभावाने वागण्यात घालवू.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)