IndvsAus: मेलबर्न कसोटीवर टीम इंडियाची घट्ट पकड

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने मेलबर्न इथं सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर मजबूत पकड मिळवली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या 195 धावांसमोर खेळताना भारतीय संघाने 326 रन्सची मजल मारली. भारतीय संघाने 131 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची अवस्था 133/6 अशी असून त्यांच्याकडे दोन धावांची आघाडी आहे.

277/5 हून पुढे खेळणाऱ्या भारतीय संघाने 5 विकेट्सच्या मोबदल्यात 49 रन्सची भर घातली. चोरटी धाव घेण्याचा रवींद्र जडेजाचा प्रयत्न कर्णधार अजिंक्य रहाणेसाठी घात ठरला. रहाणेने 12 चौकारांसह 112 धावांची सुरेख इनिंग्ज साकारली.

रहाणे बाद झाल्यावर जडेजाने सूत्रं हाती घेतली. जडेजाने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र दुसऱ्या बाजूने नियमित अंतरात विकेट्स पडत गेल्या. जडेजाने 57 रन्सची खेळी केली. ऑस्ट्रेलियातर्फे मिचेल स्टार्क आणि नॅथन लॉयन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी सुरूच राहिली. जो बर्न्स 4 रन्स करून तंबूत परतला. मार्नस लबूशेन आणि मार्क वेड यांनी डाव सावरला. मात्र अश्विनच्या फिरकीने लबूशेनची खेळी संपुष्टात आणली. त्याने 28 रन्स केल्या. भरवशाचा स्टीव्हन स्मिथ या डावात जसप्रीत बुमराहची शिकार ठरला. लेग स्टंप उघडा ठेवून खेळणारा स्मिथ त्रिफळाचीत झाला. स्मिथला फक्त 8 रन्स करता आल्या.

रवींद्र जडेजाने वेडला तंबूत धाडलं. त्याने 40 रन्सची खेळी केली. पदार्पणवीर मोहम्मद सिराजने ट्रॅव्हिस हेडला स्थिरावून दिलं नाही. रवींद्र जडेजाच्या बॉलिंगवर ऋषभ पंतने टीम पेनचा कॅच घेतला. टीव्ही रिप्लेनंतर थर्ड अंपायरने पेनला आऊट ठरवलं. पेन या निर्णयावर नाराज दिसला. अडलेड कसोटीत पेनच्या 73 रन्सच्या खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने मॅचमध्ये पुनरागमन केलं होतं.

पेन बाद झाल्यानंतर कॅमेरुन ग्रीन आणि पॅट कमिन्स यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 133/6 रन्स झाल्या आहेत. यजमानांकडे फक्त 2 रन्सची आघाडी आहे. ग्रीन 17 तर कमिन्स 15 रन्सवर खेळत आहेत.

चौथ्या दिवशी उर्वरित 4 विकेट्स झटपट मॅच जिंकण्यासाठी टीम इंडिया आतूर असेल. दुसरीकडे चिवटपणे खेळ करून टीम इंडियासमोर 100 ते 150 रन्सचं लक्ष्य ठेवण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल.

उमेश यादव दुखापतग्रस्त

टीम इंडियाचे आधारस्तंभ असलेले इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी या मालिकेत नाहीत. तिसऱ्या दिवशी अनुभवी बॉलर उमेश यादव दुखापतग्रस्त झाला. उमेशच्या दुखापतीचं स्वरुप अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र ओव्हरदरम्यान उमेश पॅव्हेलियनमध्ये परतला. उमेशने उर्वरित दिवसात बॉलिंग केली नाही.

मोहम्मद शमीच्या हाताला दुखापत झाल्याने मोहम्मद सिराज या मॅचमध्ये पदार्पण करतो आहे. उमेशची दुखापत किती गंभीर आहे हे एक्स रे स्कॅननंतर स्पष्ट होऊ शकेल. उमेश पुढची कसोटी खेळू न शकल्यास नवदीप सैनीला पदार्पणाची संधी मिळू शकते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)