You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बॉक्सिंग डे टेस्ट म्हणजे नक्की काय?
ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू होणाऱ्या कसोटीला बॉक्सिंग डे कसोटी म्हटलं जातं. ऑस्ट्रेलियात मेलबर्न शहरातल्या एमसीजी अर्थात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड स्टेडियमवर होणारी टेस्ट मॅच बॉक्सिंग डे टेस्ट म्हणून ओळखली जाते.
खूप वर्षांआधी ख्रिसमस आणि पुढच्या काही दिवसांमध्ये ऑस्ट्रेलियातील स्थानिक संघ व्हिक्टोरिया आणि न्यू साऊथ वेल्स यांच्यादरम्यान मॅच होत असे.
1950-51 अॅशेस मालिकेत मेलबर्न टेस्ट 22 ते 27 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. 1953 ते 1967 दरम्यान बॉक्सिंग डे दिनी टेस्ट मॅचचं आयोजन करण्यात आलं नाही.
1980 मध्ये मेलबर्न क्रिकेट क्लब आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम यांच्यात बॉक्सिंग डे दिवसापासून टेस्ट मॅचचं आयोजन करण्याचे हक्क रीतसर विकत घेतले. त्यामुळे तेव्हापासून दरवर्षी मेलबर्न येथे बॉक्सिंग डे टेस्ट होते.
बॉक्सिंग डे टेस्टमध्ये भारताची कामगिरी
ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारताने पहिल्यांदा कसोटी विजय साकारला तो मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरच. त्यामुळे भारतासाठी हे मैदान खूपच जिव्हाळ्याचं आहे.
चंद्रशेखर आणि गावस्कर चमकले
मेलबर्न, 30 डिसेंबर 1977 -4 जानेवारी 1978- 222 धावांनी विजयी
भारताच्या ऑस्ट्रेलियातल्या पहिल्या विजयाचं श्रेय चंद्रशेखर आणि गावस्कर या दुकलीला जातं. चंद्रशेखर यांनी पटकावलेल्या 12 विकेट्स आणि गावस्कर यांनी झळकावलेलं शतक यांच्या बळावर भारतीय संघानं ऑस्ट्रेलियातला पहिलावहिला विजय मिळवला.
बिशन सिंग बेदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा ऐतिहासिक विजय साकारला.
भारतीय खेळाडूंच्या कामगिरीइतकंच केरी पॅकर लीगला या विजयाचं श्रेय जातं. आताच्या घडीला ट्वेन्टी-20 लीगचं जगभर पेव फुटलं आहे. मात्र 80च्या दशकात केरी पॅकर यांनी पहिल्यांदा अशी संकल्पना राबवली.
ऑस्ट्रेलियाचे चॅपेल बंधू, डेनिस लिली तसंच अन्य महत्त्वाचे खेळाडू या मालिकेत खेळले नाहीत. भारतीय संघाने या मालिकेतील सुरुवातीच्या दोन टेस्ट गमावल्या. तिसऱ्या टेस्टमध्ये भारतीय खेळाडूंनी खेळ उंचावत बाजी मारली.
भारतीय संघाने 256 धावांची मजल मारली. मोहिंदर अमरनाथ यांनी 72 तर गुंडप्पा विश्वनाथ यांनी 59 धावांची खेळी केली. चंद्रशेखर यांनी घेतलेल्या 6 विकेट्सच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव 213 धावांत गुंडाळला. भारताला 43 धावांची आघाडी मिळाली.
लिटील मास्टर सुनील गावस्कर यांच्या शतकाच्या बळावर भारतीय संघाने 343 धावा केल्या. 387 धावांचं प्रचंड लक्ष्य मिळालेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव 164 धावांतच गडगडला. चंद्रशेखर यांनी दुसऱ्या डावातही 6 विकेट्स पटकावल्या.
विश्वनाथ यांचं शतक, कपिल यांचं पंचक
मेलबर्न, 7 ते 11 फेब्रुवारी 1981- 59 धावांनी विजयी
गुंडप्पा विश्वनाथ यांच्या शतकाच्या बळावर भारतीय संघाने 237 धावा केल्या. मात्र दुसऱ्या बाजूने त्यांना कोणाचीही खंबीर साथ मिळाली नाही.
ऑस्ट्रेलियाकडून डेनिस लिली यांनी 4 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने 419 धावा करत मोठी आघाडी मिळवली. अॅलन बॉर्डर यांनी 124 धावांची शतकी खेळी साकारली, ग्रेग चॅपेल यांनी 76 तर डग वॉल्टर्स यांनी 78 धावांची खेळी केली.
भारतीय संघाने 324 धावा केल्या. चेतन चौहान यांनी 85 तर सुनील गावस्कर यांनी 70 धावांची खेळी केली. गावस्कर यांना LBW देण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला.
आऊट नसल्याचं वाटल्याने गावस्कर यांनी चौहान यांच्या साथीने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला होता. गावस्कर यांनी डाव आहे त्या स्थितीत सोडण्याची तयारी दर्शवली होती. मात्र व्यवस्थापक सलीम दुर्रानी यांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती हाताळली.
ऑस्ट्रेलियाला 143 धावांचे छोटेखानी लक्ष्य मिळाले. मात्र कपिल देव यांनी 5 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडलं. ऑस्ट्रेलियाच्या 8 फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. विश्वनाथ यांना मॅन ऑफ द मॅच देण्यात आला.
अन्य कुठल्या देशात बॉक्सिंग डे टेस्ट होते?
न्यूझीलंडमध्ये वेलिंग्टन शहरातल्या बेसिन रिझर्व्ह मैदानावर बॉक्सिंग डे टेस्ट होते. न्यूझीलंडचा संघ पाहुण्या संघाविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटी खेळतो. गेल्या काही वर्षांमध्ये बॉक्सिंग डे दिनी वनडे किंवा ट्वेन्टी-20 मॅच आयोजित करण्यात येत होती. मात्र 2014 पासून हेगले ओव्हल, ख्राइस्टचर्च इथं बॉक्सिंग कसोटी होते.
दक्षिण आफ्रिकेत बॉक्सिंग डे दिनापासून कसोटीला सुरुवात होते. गेली अनेक वर्षं सहारा स्टेडियम किंग्समीड, दरबान इथं ही कसोटी होते. गेल्यावर्षी दक्षिण आफ्रिका संघ बॉक्सिंग दिनी सुरू झालेल्या चारदिवसीय कसोटीत सहभागी झाला होता.
बॉक्सिंग डे काय असतो?
ख्रिसमसचा पुढचा दिवस बॉक्सिंग डे म्हणून ओळखला जातो. इंग्लंडमध्ये बॉक्सिंग डे या परंपरेची सुरुवात झाली. एकेकाळी जगभर पसरलेल्या इंग्लंड साम्राज्याचा भाग असलेल्या देशांमध्ये बॉक्सिंग डे साजरा केला जातो.
25 डिसेंबर रोजी ख्रिसमस असतो तर बॉक्सिंग डे 26 डिसेंबरला असतो.
'बॉक्सिंग डे'ला नेमकं काय असतं?
ख्रिश्चनधर्मीय आपल्या घरी काम करणाऱ्या व्यक्तींना पैसे तसंच भेटवस्तू देतात. या दिवशी या मंडळींना घरी जाऊन आपल्या कुटुंबीयांची भेट घेण्याची संधी मिळते. एरव्ही कामानिमित्त घरापासून दूर असणारी मंडळी ख्रिसमसचा सण कुटुंबीयांसमवेत साजरा करतात.
अन्य एका प्रवादानुसार, व्हिक्टोरियन युगात ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी चर्चमध्ये समाजातील गरजूंसाठी एक पेटी अर्थात बॉक्स ठेवला जातो. यातली देणगी परिसरातील सगळी माणसं गरीब, वंचित-उपेक्षितांना दिली जाते.
आताही अनेक चर्चमध्ये असा बॉक्स ठेवला जातो. ख्रिसमसनिमित्ताने चर्चमध्ये येणारी माणसं या बॉक्समध्ये देणगी जमा करतात. पैसे आणि भेटवस्तू गरिबांना आजही दिल्या जातात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)