विराट कोहली ठरला दशकातील सर्वोत्कृष्ट खेळाडू; सर गारफिल्ड सोबर्स पुरस्काराने सन्मानित

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा झाली. 2010-2020 या दशकातील सर्वोत्तम खेळाडूला सर गारफिल्ड सोबर्स पुरस्काराने गौरवण्यात येतं. या पुरस्कारासाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची निवड झाली.

कोहलीने या दशकात कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 प्रकारात मिळून 66 शतकं झळकावली. या दशकभरात त्याने 94 अर्धशतकी खेळी केल्या. या काळात कोहलीने सर्वाधिक 20396 धावा केल्या. या दशकात खेळणाऱ्या फलंदाजांमध्ये कोहलीची सरासरी सर्वोत्तम अर्थात 56.97 इतकी आहे.

रविवारी आयसीसीने दशकातील सर्वोत्तम खेळाडूंचा संघ निवडला होता. कोहलीने टेस्ट,वनडे आणि ट्वेन्टी-20 तिन्ही संघात स्थान पटकावलं होतं.

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सध्याचा कर्णधार विराट कोहली आणि धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा यांनी वनडे आणि ट्वेन्टी-20 संघात स्थान पटकावलं आहे.

कोहली टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी-20 अशा तिन्ही संघांचा भाग आहे.

2020 वर्षाच्या निमित्ताने हे दशकही संपतंय. आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दशकातील सर्वोत्तम संघाची घोषणा केली आहे.

पुरुष आणि महिला अशा दोन्ही प्रकारात दशकातील सर्वोत्तम संघ आयसीसीने निवडला आहे.

दशकातील सर्वोत्तम कसोटी संघात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन यांनी स्थान पटकावलं आहे.

दशकातील सर्वोत्तम वनडे संघात धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा, रनमशीन म्हणून ओळखला जाणारा कर्णधार विराट कोहली आणि फिनिशर आणि कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी यांनी स्थान पटकावलं आहे. धोनीकडेच या संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे.

दशकातील सर्वोत्तम ट्वेन्टी-20 संघात पुन्हा एकदा कोहली, रोहित शर्मा यांच्यासह महेंद्रसिंग धोनीने स्थान पटकावलं आहे. धोनीकडेच या संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. भेदक गोलंदाजीच्या जोरावर भल्याभल्या बॅट्समनची भंबेरी उडवणाऱ्या जसप्रीत बुमराहची या संघात निवड झाली आहे. अशाप्रकारे अंतिम अकरात चार भारतीय खेळाडूंनी स्थान मिळवत भारताचा दबदबा राखला आहे.

दशकतील महिलांच्या सर्वोत्तम वनडे संघात अनुभवी मिताली राज आणि झूलन गोस्वामी यांनी स्थान पटकावलं आहे. मितालीने दमदार फलंदाजीच्या तर झूलनने गोलंदाजीच्या बळावर स्थान मिळवलं आहे.

दशकातील महिलांच्या सर्वोत्तम ट्वेन्टी20 संघात भारताच्या हरमनप्रीत कौर आणि पूनम यादव यांची नावं झळकली आहेत.

सर्वोत्तम कसोटी संघ (पुरुष)

अॅलिस्टर कुक, डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन, विराट कोहली (कर्णधार), स्टीव्हन स्मिथ, कुमार संगकारा, बेन स्टोक्स, जेम्स अॅडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, डेल स्टेन, रवीचंद्रन अश्विन

सर्वोत्तम वनडे संघ (पुरुष)

रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), एबी डीव्हिलियर्स, शकीब अल हसन, बेन स्टोक्स, इम्रान ताहीर, मिचेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट, लसिथ मलिंगा

सर्वोत्तम ट्वेन्टी20 संघ (पुरुष)

रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), आरोन फिंच, ख्रिस गेल, ग्लेन मॅक्सवेल, एबी डीव्हिलियर्स, कायरेन पोलार्ड, रशीद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा

सर्वोत्तम वनडे संघ (महिला)

अलिसा हिली, सुझी बेट्स, मिताली राज, मेग लॅनिंग (कर्णधार), स्टेफानी टेलर, सारा टेलर, एलिस पेरी, डेन व्हॅन निइरर्क, मॅरिझॅन काप, झूलन गोस्वामी, अनिसा मोहम्मद.

सर्वोत्तम महिला संघ (ट्वेन्टी-20)

अलिसा हिली, सोफी डेव्हाईन, सुझी बेट्स, मेग लॅनिंग (कर्णधार), हरमनप्रीत कौर, स्टेफानी टेलर, देआंद्रा डॉटिन, एलिस पेरी, अन्या श्रूसबोल, मेगन शूट, पूनम यादव

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)