कोरोना व्हायरस: बाळा नांदगावकर यांची कोरोना कॉलर ट्यून बंद करण्याची मागणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी कोरोना व्हायरस संदर्भातली कॉलर ट्यून बंद करण्याची मागणी केली आहे.

"कोरोना संदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाने गेली अनेक महिने कॉलर ट्यून म्हणून कोरोनाची माहिती देण्यात येत आहे. पण, आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे आणि या कॉलरट्यून मुळे अनेकदा महत्त्वाचे फोन असले तरी विलंब होतो अथवा लागत नाही.

"त्यामुळे जी काही जनजागृती करायची ती विविध माध्यमातून जाहिरातीद्वारे होतच आहे. त्यामुळे आता ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी," असं नांदगावकर यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.

नांदगावकर यांच्या ट्वीट नंतर सोशल मीडियावर अनेकांनी यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.

सुबोध नाईकडे यांनी ट्वीट करत म्हटलंय, "एकदम अचूक मुद्दा आहे हा. अर्धा वेळ ह्या कारणामुळे घाईच्या कामाला खूप विलंब होतो."

तर विकास यांनी म्हटलंय, "अगदी योग्य आणि अचुक मुद्दा आहे. या कॉलर ट्यूनमुळे तर कधी-कधी आपण ज्या व्यक्तीला कॉल लावलाय त्यांच्याशी काय बोलायचे आहे तेही विसरायला होते."

दिलीप कासर्डेकर यांनी ट्वीट केलंय की, "टीव्हीवर कोरोना. वर्तमानपत्र उघडले की कोरोना. महत्त्वाचं काम असेल फोन लावला तर आधी हे ऐकायचं. या सततच्या माऱ्यामुळे एक नैराश्याचे वातावरण तयार होण्यास मदत होत आहे. एखादी मोहीम राबविण्याची गरज आहे आपण नक्कीच लक्ष द्याल."

"एस. टी. ने प्रवास केला तर ई-पास गरजेचा नाही. पण खाजगी वाहनानं प्रवास केला तर मात्र ई-पास लागणार. साहेब कॉलरट्यून पेक्षा हा विषय जास्त महत्त्वाचा आहे असं मला वाटतं," असं ट्वीट श्रीराम शिंदे यांनी म्हटलं आहे.

अशोक वनारे यांनी फेसबुक कमेंटमध्ये प्रश्न विचारला आहे की, "साहेब जो शेतकरी नियमित कर्ज फेड करतो, त्याला कधी कर्जमाफी भेटणार?"

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)