You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बिस्मिल्ला खान : सरस्वतीचा सच्चा अनुयायी आणि गंगेची अफाट ओढ असलेला अवलीया
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
सनईवादक बिस्मिल्ला खान यांचा जन्म 21 मार्च 1916 रोजी झाला, तर 21 ऑगस्ट 2006 रोजी त्यांचं निधन झालं.
बिस्मिल्ला खान यांच्यासाठी संगीत हेच आयुष्य होतं. संगीत, सूर आणि नमाज यांमध्ये त्यांना फरक जाणवत नसे. ते मंदिरातही शहनाई वाजवत असत. सरस्वतीचे सच्चे अनुयायी होते आणि गंगा नदीची तर त्यांना अफाट ओढ होती.
बिस्मिल्ला खान पाचवेळा नमाज पढायचे, जकात द्यायचे आणि हज यात्रेलाही जायचे. हे सांगण्याचं कारण म्हणजे, सनईवादनात ते इतके तल्लीन होत, की बऱ्याचदा नमाजही विसरून जात असत.
संगीत कुठल्याही नमाज किंवा प्रार्थनेपेक्षा सर्वोच्च आहे. संगीताबद्दल त्यांचे हे आध्यात्मकि गुणच श्रोत्यांना भावत असत आणि त्यांच्याशी जोडले जात असत.
नेहरूंच्या विनंतीवरून स्वातंत्र्य दिनी शहनाईवादन
1947 साली ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला, त्यावेळी पंडित नेहरूंना वाटलं या क्षणी बिस्मिल्ला खान यांची सनई वाजली पाहिजे.
स्वातंत्र्यदिनाच्या समारंभाच्या आयोजनाचं काम पाहणारे संयुक्त सचिव बद्रुद्दीन तैयबजी यांच्याकडे जबादारी देण्यात आली की, बिस्मिल्ला खान यांना सोधायचं आणि दिल्लीत कार्यक्रमसाठी आमंत्रित करायचं.
बिस्मिल्ला खान त्यावेळी मुंबईत होते. त्यांना विमानाने दिल्लीत आणलं गेलं आणि सुजान सिंह पार्क येथे राजकीय पाहुणे म्हणून त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली.
बिस्मिल्ला खान यांच्यावर सिनेमा बनवणाऱ्या आणि पुस्तक लिहिणाऱ्या जुही सिन्हा सांगतात, स्वातंत्र्यदिनाला सनई वाजवण्याबाबत बिस्मिल्ला खान उत्सुक होतेच. मात्र, लाल किल्ल्यावर चालत सनई वाजवू शकणार नसल्याचं त्यांनी नेहरूंना सांगितलं.
त्यावेळी नेहरू म्हणाले, "तुम्ही एखाद्या सर्वसाधारण कलाकारासारखं चालायचं नाही. तुम्ही पुढे चालाल आणि तुमच्या मागून मी आणि संपूर्ण देश चालेल."
बिस्मिल्ला खान आणि त्यांच्या साथीदारांनी सनई वादनातून स्वतंत्र भारताच्या पहाटेचं स्वागत केलं. 1997 साली ज्यावेळी भारताच्या स्वातंत्र्यांचा सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरा केला गेला, त्यावेळीही लाल किल्ल्यावर बिस्मिल्ला खान यांनी सनई वादन केलं होतं.
बेगम अख्तर यांचे चाहते
1930 च्या दशकात कोलकात्यात पार पडलेल्या एका संगीत संमेलनामुळे बिस्मिल्ला खान यांना पहिल्यांदा प्रसिद्धी मिळाली. या संमेलनाचं बिहारमधील भूकंपग्रस्तांच्या मदतनिधीसाठी आयोजन करण्यात आलं होतं.
अनेकांना माहित नाहीय की, याच संमेलनातून बेगम अख्तर यांनीही आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर बिस्मिल्ला खान आणि बेगम अख्तर हे एकमेकांचे शिष्य बनले.
उन्हाळ्याच्या दिवसात घडलेली एक गोष्ट सांगितली जाते. बिस्मिल्ला खान यांना रात्री झोप लागत नव्हती. त्यावेळी रस्त्याच्या पलिकडे एक महिला 'दिवाना बनाना है... तो दिवाना बना दे...' हे गाणं गात होती.
बिस्मिल्ला खान ते गाणं ऐकत बसले. बिस्मिल्ला खान यांनी आजूबाजूला विचारलं, तेव्हा कळलं की, ती महिला म्हणजे बेगम अख्तर होत्या!
विलायत खान यांच्यासोबतची जुगलबंदी
बिस्मिल्ला खान आणि महान सतारवादक उस्ताद विलायत खान यांच्यात अनोखं नातं होतं. जेव्हा कधी जुगलबंदीची वेळ येत असे, तेव्हा विलायत खान हे बिस्मिल्ला खान यांच्यासोबत सतार वाजवणं पसंत करत.
विलायत खान यांची मुलगी आणि प्रसिद्ध गायिका जिला खान सांगतात, "बिस्मिल्ला खान यांच्या सनईवादनात ठुमरी होता. माझ्या वडिलांना ते कळायचं आणि ते आम्हाला सांगायचे की, जुगलबंदीत एकमेकाला साथ देणं महत्त्वाचं असतं, तरच प्रेक्षकांच्या काळजापर्यंत पोहोचता येतं."
एकदा विलायत खान यांनी बिस्मिल्ला खान यांच्याबद्दल म्हटलं होतं, "माझा आणि बिस्मिल्लाह खान यांचा आत्मा एकच आहे."
सिनेमांची आवड
बिस्मिल्ला खान यांना सिनेमे पाहण्याची आवड होती. सुलोचना या त्यांच्या आवडत्या अभिनेत्री होत्या.
1959 साली यांनी 'गूँज उठी शहनाई' या सिनेमात संगीत दिग्दर्शनही केलं होतं. 'दिल का खिलौना हाए टूट गया' या गाण्याला बिस्मिल्ला खान यांनी संगीत दिलं होतं.
या गाण्यामागेही एक कथा आहे. ते तरुण असताना एका मुलीवर त्यांचं खूप प्रेम होतं. बाला असं त्या महिलेचं नाव होतं आणि त्यांच्यासाठी त्यांनी कजरी गायली होती. 'बरसे बदरिया सावन की' हे 'गूँज उठी शहनाई'मधील गाणं त्याच कजरीच्या सुरातील होतं.
स्वत:चे कपडे स्वत:च धुण्याची सवय
सुरुवातीच्या काळात बिस्मिल्ला खान यांना हवाईप्रवास करण्यास भीती वाटत असे. त्यानंतर ही भीती कमी होत गेली आणि कार्यक्रमांच्या निमित्तानं जगातल्या अनेक देशांमध्ये त्यांनी प्रवास केला.
यशानं अक्षरश: त्यांच्या पायाशी लोटांगण घातलं होतं. मात्र, त्यांच्या जीवनशैलीत यामुळे अजिबात बदल झाला नाही. साधी राहणीच ते पसंत करत.
थंडीच्या काळात ते अंगणातील पलंगावर बसून, उन्हाचा आनंद घ्यायचे. त्यावेळी त्यांच्या मागे कपडे वाळत घातलेले असायचे. जुही सिन्हा सांगतात, "बिस्मिल्ला खान यांनी आयुष्यभर स्वत:चे कपडे स्वत:च धुतले. इस्त्री न करताच ते कपडे घालायचे. एक पलंग आणि एक खुर्ची यापलिकडे त्यांच्या खोलीत काहीच नव्हतं. कधीच कार खरेदी केली नाही. रिक्षानेच जात. कधीच दारू प्यायले नाहीत. कधी कधी विल्सची एखादी सिगरेट मात्र ओढत असत."
एकदा बिस्मिल्ला खान यांच्या चाहत्यानं त्यांच्या घरात कूलर लावण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, बिस्मिल्लाह खान यांनी त्यास नकार दिला आणि तो सर्व पैसा गरीब विधवांना देण्यास सांगितलं.
जागतिक स्तरावर धर्मनिरपेक्ष भारताची ओळख म्हणून बिस्मिल्ला खान हे अभिमानानं वावरले. जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या सनईचे सूर पोहोचलो आहेत. लाखो लोक त्यांच्या सुरांनी मंत्रमुग्ध झाले.
2006 साली ज्यावेळी संकटमोचन मंदिरावर हल्ला झाला, तेव्हा बिस्मिल्ला खान यांनी गंगेच्या काठावर शांतता नांदण्यासाठी सनई वाजवली होती. त्यांना लोकांना वेगळं कोणतंच आवाहन करावं लागलं नाही. त्यांनी सनईतून केवळ गाणं वाजवलं, ते गाणं होतं, रघुपति राघव राजा राम...!
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)