पंडित जसराज: 'गोविंद दामोदर माधवेती'मध्ये रंगलेली स्वरमैफल अनुभवताना...

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सिद्धनाथ गानू
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
'जय होss'…. पंडित जसराज यांच्या निधनाची बातमी आली आणि एकदम हे शब्द मनातल्या मनात ऐकू आले. मन एकदम 9 वर्षं मागे गेलं, 2011 सालच्या सवाई गंधर्व महोत्सवात.
तुम्ही जिथे कुठे राहता त्या शहराच्या काही रिचुअल्स असतात. मी 2008 साली पुण्यात शिक्षणासाठी आलो आणि 2013 पर्यंत तिथे शिकलो. पुण्यात राहत नव्हतो तेव्हाही दरवर्षी होणाऱ्या सवाई गंधर्व महोत्सवाचं एक वेगळंच आकर्षण होतं. 'सवाई' ही अशीच एक रिचुअल होती जी चुकवणं शक्यच नव्हतं.
डिसेंबर महिन्यात म्हणजे पुण्यात सांस्कृतिक मेजवानी असते. सगळ्या एक्स्ट्रा-करिक्युलर (पाठ्येतर) गोष्टी आणि (जमला तर) अभ्यास सांभाळून सवाईला जाण्याचं ठरलं. साक्षात स्वरभास्कर पं. भीमसेन जोशींनी सुरू केलेल्या या संगीत महोत्सवात त्या वर्षी संगीत मार्तंड पंडित जसराजांना प्रत्यक्षात पाहायला आणि ऐकायला मिळालं.
त्यापूर्वी मी पंडित जसराजांना लाईव्ह कधीच ऐकलं नव्हतं. आमची सगळी श्रवणभक्ती ही कॅसेट्स, दूरदर्शन किंवा 'सारेगम' सारख्या कार्यक्रमांमध्ये ते परीक्षक म्हणून यायचे त्यावरच होत होती.
जसराजांना पाहायला मिळणार या उत्सुकतेपोटी त्यांची कार ज्या गेटने यायची होती तिथे आम्ही सुरुवातीला थांबून होतो. ते स्टेजवर आले, बसले. मी हे सगळं पहिल्यांदा अनुभवत होतो पण तिथल्या अनेकांना त्यांच्या सगळ्या लकबी, शिरस्ते पक्के ठाऊक होते. मला त्या लोकांचा हेवा वाटला. पण हे आज माझ्या नशिबात आहे याचा पराकोटीचा आनंदही होता.
जसराज मंचावर बसले, स्वरमंडल, तानपुरे सगळ्यांचे गज तापले आणि त्यानंतरचा काळ एखाद्या तंद्रीसारखा होता. पुण्याच्या रमणबागेचा अख्खा आसमंत त्या धीरगंभीर स्वराने आणि थेट परमात्म्याला भेटल्याची अनुभुती देणाऱ्या सुराने मंतरल्यासारखा झाला होता. सुरुवातीला रागदारी झाली. प्रत्येक तानेला गर्दीतले दर्दी माना डोलवत होते, दाद देत होते, समोर बसलेल्या प्रेक्षकांवर जसराजांच्या प्रत्येक स्वराने गारूड केलं होतं.
रागदारी संपली. पुढच्या गायकांची वेळ जवळ येत होती. पण अजून भजन झालं नव्हतं. हा शिरस्ता मला ठाऊक नव्हता. जवळच बसलेला मित्र दबकेच म्हणाला, 'गोविंद दामोदर...', मी काहीच न कळून त्याच्याकडे पाहिलं. पंडितजीही काही क्षण स्तब्ध होते, एकाग्र होते.
पण त्यानंतर जे झालं ते शब्दांत सांगण्याची माझी कुवत नाही. एखाद मिनिट षड्ज आळवल्यानंतर पंडितजींनी त्यांचं दैवत समोर असल्याच्या थाटात त्यांचं प्रसिद्ध 'गोविंद दामोदर माधवेति' हे भजन गायला सुरुवात केली. मृदुंगावर पहिली थाप पडली तेव्हा मैदानात बसलेल्या काही हजार प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यानंतर संपूर्ण श्रोतृगण पंडितजींच्या स्वरात एकरूप झाले.

फोटो स्रोत, Getty Images
खर्जात जाणारा त्यांचा प्रत्येक स्वर ऐकणाऱ्याला आपल्या माणूसपणाची आठवण करून देतो आणि ते तारसप्तकात जाताना सगळ्यांना माणसापलीकडे असलेल्या कुठल्यातरी शक्तीची जाणीव करून देतायत असंच वाटत होतं. तुम्ही आस्तिक आहात की नास्तिक याने इथे काहीच परक पडत नाही. माणसापलीकडे कुठलीतरी ताकद आहे या विचारानेच किती नम्र व्हायला होतं.
आजही कधीही हे भजन ऐकताना डिसेंबरची ती संध्याकाळ झाल्याचा भास होतो. पंडितजींना त्यानंतरही काही वेळा कार्यक्रमांमध्ये पाहण्याची संधी मिळाली, पण तोवर त्यांनी या कार्यक्रमांमध्ये एकट्याने गाणं कमी केलं होतं. त्यांचे शिष्यगण जास्त गात.
आज जसराज गेल्याची बातमी आली तेव्हा 2020 हे वर्षं किती अर्थाने चटका लावून जातंय याची पुन्हा जाणीव झाली. कालौघाने हे होणारच होतं, पण तरीही काही गोष्टींची बोच असतेच ना.
कानात अखंड 'गोविंद दामोदर माधवेती' वाजतंय आणि डोळ्यांसमोर पंडितजींची दोन्ही हात वर करून, मान हलवत 'जय हो' म्हणणारी हसतमुख मुद्रा आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








