निशिकांत कामत यांचे निधन, काविळशी झुंज ठरली अपयशी

फोटो स्रोत, Getty Images
सिनेदिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन झाले. हैदराबादमधील AIG हॉस्पिटलमध्ये निशिकांत कामत यांच्यावर उपचार सुरू होते. निशिकांत कामत यांनी आज दुपारी 4 वाजून 24 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांना काविळ झाला होता तसेच त्यांचं यकृत निकामी झालं होतं असं रुग्णालयाने सांगितले.
निशिकांत कामत यांना काय झालं होतं?
हैदराबादच्या AIG हॉस्पिटलने म्हटलं आहे, "31 जुलै रोजी निशिकांत कामत (वय वर्षं 50 ) यांना AIG रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना तीव्र ताप होता आणि थकवा जाणवत होता. गेल्या दोन वर्षांपासून त्यांना लिव्हर सिरिऑसिस आहे याचं निदान झालं. आम्ही कामत यांना अॅंटीबायोटिक्स आणि इतर औषधं सुरू केली. त्यांनंतर त्यांच्या प्रकृतीत हलकीशी सुधारणा दिसू लागली होती.

फोटो स्रोत, AIG Hospital
पुढे रुग्णालयाने म्हटलं आहे, " उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती ढासळू लागली. त्यांचं यकृत निकामी होऊ लागलं होतं. नंतर त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं. कालपासून त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला होता आणि रक्तदाबही कमी झाला होता.
"डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नानंतरही निशिकांत यांची प्रकृती गंभीर होत गेली आणि त्यांचे अवयव निकामी होत गेले. 17 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी 4 वाजून 24 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे कुटुंबीय, मित्र परिवार आणि चाहते यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत," असं रुग्णालयाने म्हटलं आहे.
अभिनेता रितेश देशमुखने याबाबत ट्वीट केले आहे. निशिकांत तुला मी नेहमीच मिस करेन असं रितेशने लिहिलं आहे.
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत अनेक सिनेमांचं निशिकांत कामत यांनी दिग्दर्शन, लेखन केलं. काही सिनेमांमधून ते अभिनेत्याच्या रुपातही प्रेक्षकांच्या भेटीला आलेत.
मराठीतील प्रसिद्ध 'सातच्या आत घरात' या सिनेमाचं दिग्दर्शन करत निशिकांत कामत यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर 'डोंबिवली फास्ट' सारखा प्रेक्षकांची पसंती मिळवलेला सिनेमाही त्यांनीच दिग्दर्शित केला आहे.
अजय देवगनची प्रमुख भूमिका असलेला 'दृश्यम', जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असलेले 'फोर्स', 'रॉकी हँडसम', तर इरफान खानची मुख्य भूमिका असलेला 'मदारी' असे प्रेक्षकांची पसंती मिळवलेल्या सिनेमांचं दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केलंय.
निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केलेला 'लई भारी'ही सुपरहिट ठरला होता.
अभिनेता रणदीप हुडाने निशिकांत कामत यांना श्रद्धांजली वाहताना म्हटलं आहे की "तू तुझ्या आयुष्यभर तेच काम केलंस जे तुला आवडलं. यामुळे तुझ्या आयुष्याचं नक्कीच सार्थक झालं असंच तुला वाटत असणार. तुझ्या सर्व चित्रपटांसाठी मी तुझा आभारी आहे. तुझ्या स्मितहास्यासाठी, तुझ्या गप्पा गोष्टींसाठी आणि तुझ्या दिलखुलास स्वभावासाठी तुझे आभार."
राजकीय नेत्यांनीही निशिकांत कामत यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
"अवघ्या 50 व्या वर्षी कामत यांनी जगाचा निरोप घेतला हे अजूनही मनाला पटत नाही. दर्जेदार चित्रपट देणाऱ्या निशिकांत कामतच्या जाण्याने चित्रपसृष्टीने एक उमदा दिग्दर्शक गमावला आहे," असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








