अंखी दास : ज्यांच्यामुळे फेसबुकसंबंधी वाद सुरू झालाय, त्या कोण आहेत?

अंखी दास

फोटो स्रोत, MINT

अंखी दास कोण आहेत? या प्रश्नाची अनेक उत्तरं असू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी त्या महत्त्वाच्या आहेत आहे, ही एक गोष्ट त्यांची ओळख समजून घेण्यासाठी पुरेशी आहे.

नरेंद्र मोदी डॉट इन नावाची पंतप्रधानांची वैयक्तिक वेबसाईट आहे. त्यांचं एक वैयक्तिक अप आहे- नमो अॅप. या वेबसाईटच्या न्यूज सेक्शनमध्ये रिफ्लेक्शन विभागात कॉन्ट्रिब्युटर्स कॉलममध्ये तसंच नमो अॅपवर 'नमो एक्सक्लुसिव्ह' सेक्शनमध्ये अनेक लोकांचे लेख प्रकाशित झाले आहेत.

यामध्ये जी 33 नावं आहेत, 32व्या क्रमांकावर अंखी दास यांचं नाव आहे. म्हणजेच अंखी दास या नरेंद्र मोदींची वेबसाइट तसंच अॅपसाठी लेख लिहितात. ही त्यांची अजून एक ओळख आहे.

एप्रिल 2017 पासून अंखी नमो अॅपशी संबंधित आहेत, पण त्यांचा एकच लेख इथं पहायला मिळतो. या लेखाचं शीर्षक आहे- पंतप्रधान मोदी आणि प्रशासनाची नवीन कला.

इथं त्यांचा परिचय करून देताना लिहिलं आहे- अंखी दास या भारत आणि दक्षिण तसंच मध्य आशियामध्ये फेसबुकच्या पब्लिक पॉलिसीच्या संचालिका आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रामधील पब्लिक पॉलिसी या विषयात त्यांचा 17 वर्षांचा अनुभव आहे.

कोरोना
लाईन

अंखी दास अन्य माध्यमांमधूनही लेख लिहायच्या हे इथं नमूद करायला हवं. इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राच्या स्तंभलेखकांच्या यादीतही त्यांचं नाव आहे. त्या अमेरिकन वेबसाइट हफिंग्टन पोस्टच्या भारतीय एडिशनसाठीही लिहितात.

फेसबुक आणि त्याच्या आधी...

अंखी दास ऑक्टोबर 2011 पासून फेसबुकसाठी काम करत आहेत. त्या भारतात फेसबुकच्या पब्लिक पॉलिसी प्रमुख आहेत.

फेसबुकच्या आधी त्या भारतामध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या पब्लिक पॉलिसी हेड होत्या. जानेवारी 2004 मध्ये त्या मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू झाल्या. या कंपनीत जवळपास आठ वर्षे काम केल्यानंतर त्या फेसबुकमध्ये गेल्या.

अंखी दास

फोटो स्रोत, Getty Images

त्यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंध आणि राज्यशास्त्र या विषयातून मास्टर्स डिग्री मिळवली. त्या 1991 ते 1994 दरम्यान जेएनयूमध्ये शिकत होत्या. कोलकात्यातील लॉरेटो कॉलेजमधून त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं.

विशेष म्हणजे या जगातील सर्वांत यशस्वी आणि प्रभावशाली कंपन्यांमध्ये गणना होणाऱ्या फेसबुकनं आपल्या फेसबुक इंडिया या पेजवर किंवा वेबसाइटवर भारतात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल कोणतीही माहिती दिली नाहीये.

अंखी आता चर्चेत का?

हे जाणून घेण्यासाठी आधी अंखी दास यांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये छापलेल्या एका लेखाची चर्चा करायला हवी.

मुंबईवरील हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाली तेव्हा म्हणजेच 24 नोव्हेंबर 2018 ला अंखी दास यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. त्याचं शीर्षक होतं- No Platform For Violence

त्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं, "कट्टरतावादाला प्रोत्साहन देणाऱ्या लोकांना आपला वापर करू न देण्याबद्दल फेसबुक कटिबद्ध आहे." या वर्षभरात आम्ही 1 लाख 40 हजार गोष्टी हटवल्या आहेत, ज्यामध्ये कट्टरतावादाशी संबंधित गोष्टी होत्या.

या लेखात त्यांनी म्हटलं होतं की, फेसबुककडे तज्ज्ञांची एक टीम आहे. यामध्ये माजी सरकारी वकील, कायदेतज्ज्ञ, कट्टरतावाद विरोधी संशोधक, बुद्धिजीवी सहभागी आहेत. त्याचबरोबर जिथे कट्टरतावादी कारवाया चालतात अशा केंद्रातील भाषा समजणारे लोकही आहेत.

मार्क झुकेरबर्गसोबत अंखी दास

फोटो स्रोत, FACEBOOK/ANKHID

एकूणच त्यांच्या लेखाचा सूर असा होता, की फेसबुक कट्टरतावादाशी संबंधित गोष्टींचा प्रचार-प्रसार करणाऱ्या गोष्टी पकडण्याबद्दल अतिशय सजग आहे आणि त्यावर त्यांचं प्रभावी नियंत्रणही आहे.

सध्या जो वाद सुरू आहे त्याच्या केंद्रस्थानी हाच मुद्दा आहे- भारतात फेसबुकवर काही द्वेष पसरवणाऱ्या गोष्टी प्रसिद्ध झाल्या, मात्र अंखी दास यांनी त्या हटवण्यास विरोध केल्याची चर्चा आहे.

काय आहे आरोप?

अमेरिकन वर्तमानपत्र वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये 14 ऑगस्टला एक रिपोर्ट प्रसिद्ध झाला होता. जगातील सर्वांत मोठी सोशल मीडिया कंपनी, जिच्याकडेच व्हॉट्स अॅपचीही मालकी आहे, त्यांनी भारतात सत्ताधारी भारतीय जनता पार्टीसमोर शरणागती पत्करल्याचा आरोप वॉल स्ट्रीट जर्नलनं आपल्या लेखात केला आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी फेसबुकनं भाजपशी संबंधित फेक पेजेस हटवल्याची माहिती अंखी दास यांनी दडवल्याचा दावाही या लेखात करण्यात आला आहे.

सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना अडविल्यामुळे भारतात कंपनीच्या व्यावसायिक हिताला बाधा येऊ शकते, असं म्हणत फेसबुकनं भाजप नेत्यांच्या द्वेष पसरवणाऱ्या भाषणांना कोणतीही आडकाठी केली नसल्याचंही वॉल स्ट्रीट जर्नलनं आपल्या लेखात म्हटलंय.

रवीशंकर प्रसाद

फोटो स्रोत, THE INDIA TODAY GROUP

या रिपोर्टमध्ये तेलंगणामधील भाजप आमदार टी राजा सिंह यांच्या एका पोस्टचा दाखला देण्यात आलाय. या पोस्टमध्ये अल्पसंख्यांकांविरुद्ध हिंसेचं कथित समर्थन करण्यात आल्याचं म्हटलंय.

या प्रकरणाची माहिती असलेल्या फेसबुकच्या माजी आणि सध्याच्या कर्मचाऱ्यांच्या हवाल्यानं लिहिलेल्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, कंपनीच्या धोरणानुसार टी राजा सिंह यांच्यावर बंदी घालण्यात यावी असं फेसबुकच्या कर्मचाऱ्यांनी निश्चित केलं होतं. मात्र अंखी दास यांनी सत्ताधारी भाजपा नेत्यांवर 'हेट स्पीच' संबंधीचे नियम लागू करायला विरोध केला होता.

वॉल स्ट्रीट जर्नलनं म्हटलं आहे- "कंपनीच्या भारतातील उच्चपदस्थ पब्लिक पॉलिसी अधिकारी अंखी दास यांनी द्वेष पसरवणाऱ्या भाषणासंबंधीचे नियम टी राजा सिंह आणि अन्य तीन हिंदू राष्ट्रवादी व्यक्ती आणि संघटनांवर लागू करण्याचा विरोध केला होता. मात्र यामुळे हिंसाचाराला प्रोत्साहन मिळू शकतं, असं कंपनीतल्या काही लोकांचं म्हणणं होतं."

आपण आजही आपल्या विधानांवर ठाम आहेत. आपली भाषा अयोग्य नव्हती. आपल्या प्रतिमेला धक्का लावण्यासाठी हा दावा करण्यात आल्याचं आमदार टी राजा सिंह यांनी बीबीसी तेलुगूच्या प्रतिनिधी दीप्ती बथिनी यांच्याशी बोलताना म्हटलं.

टी राजा सिंह यांनी म्हटलं, "केवळ मलाच लक्ष्य का करण्यात येत आहे? जेव्हा समोरचा अशा भाषेचा वापर करतो, तेव्हा कोणी तरी उत्तर द्यायला हवंच ना...मी तेच करत आहे."

राजकारणाचा मुद्दा

दरम्यान, भारतात या लेखावरून राजकारण सुरू झालं आहे. राहुल गांधींसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी या लेखाचा आधार घेत सत्ताधारी भाजपवर टीका केली आहे. दुसरीकडे भाजपचे नेतेही पक्षाच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत.

राहुल गांधी यांनी रविवारी (16 ऑगस्ट) ट्वीट करून म्हटलं की, भारतात फेसबुक आणि व्हॉट्सअपवर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) कंट्रोल आहे. ते या माध्यमातून द्वेष पसरवतात. अमेरिकन माध्यमांनी फेसबुकचं सत्य उघडकीस आणलं.

राहुल गांधी ट्वीट

फोटो स्रोत, Twitter

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींच्या ट्वीटला उत्तर देताना म्हटलं, "पराभूत व्यक्ती आपल्या पक्षातील लोकांवरसुद्धा प्रभाव पाडू शकत नाहीत. ते जगावर भाजप आणि RSS चं नियंत्रण असल्याचं बोलत असतात."

ट्वीट

फोटो स्रोत, Twitter

या आरोप-प्रत्यारोपादरम्यान फेसबुकनं स्पष्टीकरण देताना म्हटलं, की फेसबुकची धोरणं सर्वांनाच सारखी लागू होतात. कोणत्याही राजकीय विचारसरणीच्या पक्षासाठी ती समानच आहेत.

फेसबुकच्या एका प्रवक्त्यानं बीबीसीचे प्रतिनिधी सौतिक बिस्वास यांच्याशी बोलताना म्हटलं, "आम्ही द्वेष पसरवणाऱ्या गोष्टींचा विरोध करतो. जगभरात आमची धोरणं सारखीच आहेत. ती कोणत्याही राजकीय व्यक्ती आणि पक्षासाठी वेगळी नाहीयेत. ही धोरणं राबविण्याच्या दृष्टिनं अजून प्रयत्न करण्याची गरज आहे, याचीही आम्हाला जाणीव आहे आणि त्यादिशेनं आम्ही पावलंही उचलत आहोत."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)