पंडित जसराज यांचे निधन, संगीत विश्वावर शोककळा

फोटो स्रोत, Twitter
शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे अमेरिकेतील न्यू जर्सी येथे अमेरिकेच्या वेळेनुसार पहाटे साडे पाच वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते.
पंडित जसराज यांचे पहाटे निधन झाले असून ते भगवान श्रीकृष्णाकडे गेले आहेत. असं त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.
पंडित जसराज यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे गायन अभूतपूर्व तर होतेच पण त्यांनी उत्तम गायकही घडवले. ते एक महान गुरू देखील होते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंडित जसराज यांनी शास्त्रीय संगीताचे तब्बल आठ दशकं सेवा केली. त्यांच्या निधनाने मला दुःख झालं आहे. आत्मानुभव देणाऱ्या संगीताने त्यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केले या शब्दांत कोविंद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पंडित जसराज यांनी श्रीकृष्णावर शेकडो भजने गायली आहेत. त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कार दिला होता. त्यांच्या निधनामुळे संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे.
गायिका मैथिली ठाकूरने पंडित जसराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांचं निधन झालं यावर माझा विश्वासच बसत नाहीये असं मैथिलीने म्हटलं आहे.
गायिका सोना मोहापात्राने म्हटलं आहे की दोन दशकांपूर्वी पंडितजींचे गाणे प्रत्यक्षपणे ऐकण्याचा योग आला होता. असं वाटत होतं जणू पृथ्वीवर स्वर्गच अवतीर्ण झाला आहे. त्या सकाळचं चैतन्य मी कधीही विसरू शकणार नाही. पंडितजी हे भारतीयांना सतत प्रेरणा देत राहतील असं सोना मोहापात्राने म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








