You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विकास दुबे : कानपूर जवळ 4 गोळ्या लागल्या, रुग्णालयात नेण्याआधीच मृत्यू – डॉक्टर
उत्तर प्रदेश पोलिसांचं म्हणणं आहे की कानपूर चकमकीतला मुख्य आरोपी विकास दुबेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. डॉक्टरांनी सांगितलं की हॉस्पिटलमध्ये आणण्याआधीच विकास दुबेचा मृत्यू झाला होता.
कानपूरच्या जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. बी. कमल यांनी पत्रकारांना सांगितलं, "विकास दुबेला 4 गोळ्या लागल्या होत्या. 3 गोळ्या छातीत तर एक हातात लागली. विकास दुबेला हॉस्पिटलमध्ये आणण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता."
त्यांनी पुढे सांगितलं की चकमकीत 3 शिपाईसुद्धा जखमी झाले आहेत. त्यांना मल्टिपल इंज्युरी आहेत. दोन पोलीस कर्मचाऱ्यांना तर गोळी चाटून गेली. त्यांची परिस्थितीही सध्या स्थिर आहे.
यापूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितलं होतं की राज्याच्या स्पेशल टास्क फोर्सचं एक पथक विकास दुबेला उज्जैनहून कानपूरला घेऊन जात असताना रस्त्यात त्यांच्या ताफ्यातली एक गाडी उलटली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातानंतर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला. यातच आरोपीचा मृत्यू झाला.
या अपघातानंतर विकास दुबे याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या फायरिंगमध्ये त्याचा मृत्यू झाला आहे, कानपूरचे पोलीस महानिरिक्षक मोहित अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांची स्पेशल टास्क फोर्स विकास दुबे उज्जैनहून कारने कानपूरला जात होती. मात्र, कानपूरच्या रस्त्यावरच या ताफ्यातली एक गाडी उलटली.
कानपूर रेंजचे पोलीस महानिरिक्षक मोहित अग्रवाल यांनी अधिक माहिती देताना सांगितलं की, या चकमकीत चार पोलीस कर्मचारीदेखील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कानपूरमधल्या सीएससी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
या संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती देण्यासाठी पोलीस पत्रकार परिषद घेणार असल्याचं यूपी पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की शुक्रवारी सकाळी कानपूर चकमकीतला मुख्य आरोपी विकास दुबेला उत्तर प्रदेशची स्पेशल टास्क फोर्स उज्जैनहून कानपूरला घेऊन जात असताना कानपूर मार्गावरच ताफ्यातली एक गाडी उलटली.
त्या पोलीस अधिकाऱ्याने पुढे सांगितलं की गाडी उलटल्याने काही पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्याच जखमी पोलीस कर्मचाऱ्यांचं पिस्तुल घेऊन विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला.
यानंतर पोलिसांनी त्याला घेरलं आणि आत्मसमर्पण करायला सांगितलं. मात्र, त्याने गोळीबार सुरू केला. त्यामुळे पोलिसांनाही गोळीबार करावा लागला.
यानंतर विकास दुबेला जखमी अवस्थेत स्ट्रेचरवरून हॉस्पिटलला नेण्यात आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
दरम्यान, कायद्याने आपलं काम केलं, अशी प्रतिक्रिया मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिली आहे.
कानपूरमधल्या बिकुरा गावात विकास दुबेच्या माणसांनी 8 पोलिसांना ठार केल्याचा आरोप आहे. या नंतर विकास दुबेला गुरुवारी मध्यप्रदेशातल्या उज्जैनमधल्या महाकालेश्वर मंदिरातून अटक करण्यात आली होती. उज्जैन पोलिसांनी विकास दुबेला उत्तर प्रदेश पोलिसांना सुपूर्द केल्यानंतर त्याला कानपूरला नेण्यात येत होतं.
कोण होता विकास दुबे
कानपूरमधल्या चौबेपूर पोलीस ठाण्यात विकास दुबेविरोधात एकूण 60 गुन्ह्यांची नोंद आहे. यात खून आणि खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हेदाखील आहेत.
चौबेपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारींच्या आधारावर असं म्हणता येईल की गेल्या 30 वर्षांपासून गुन्हेगारी जगताशी विकास दुबेंचं नाव जोडलं गेलं आहे. त्यांना अनेकदा अटकही करण्यात आली. मात्र, कुठल्याच प्रकरणात शिक्षा झालेली नव्हती.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी या घटनेवर ट्वीट करत "गुन्हेगार तर संपला, पण त्याला संरक्षण देणाऱ्या लोकांचं काय," असा सवाल विचारला आहे.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी विकास दुबेच्या मृत्यूच्या बातमीनंतर एक ट्वीट केलं आहे.
या ट्वीटमध्ये ते लिहितात, "खरंतर ही कार उलटलेली नाही, गुपित उघडं झाल्याने सरकार उलथण्यापासून वाचवण्यात आलं आहे."
दरम्यान, विकास दुबेच्या मृत्यूबाबत उत्तर प्रदेश पोलिसांकडून जो दावा करण्यात येतोय त्यावर इतर पक्षांतूनही प्रतिक्रिया उमटत आहेत.
शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी ट्वीटमध्ये लिहितात, "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी"
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह ट्वीट करतात, "विकास दुबेने सरेंडर करण्यासाठी मध्य प्रदेशातल्या उज्जैनमधल्या महाकाल मंदिराचीच निवड का केली, हे शोधून काढणं गरजेचं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या चकमकीपासून वाचण्यासाठी तो मध्य प्रदेशातल्या कुठल्या बड्या व्यक्तीच्या भरवशावर इथे आला होता?"
जम्मू-काश्मीरच्या नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीट केलं आहे, "मृत व्यक्ती काहीच सांगत नाही."
जस्टिस मार्कंडेय काटजू लिहितात, "अलाहबाद उच्च न्यायालयाचे जस्टिस ए. एन. मुल्ला यांनी एक निर्णय देताना म्हटलं होतं - मी जबाबदारीने हे म्हणू इच्छितो की संपूर्ण देशात एकही अशी गुन्हेगारी टोळी नाही ज्यांचे गुन्हे, गुन्हेगारांचं संघटित स्वरुप ज्याला आपण इंडियन पोलीस फोर्स नावाने ओळखतो, त्यांच्या जवळपासही जाणारे आहेत."
गीतकार स्वानंद किरकिरे यांनीही या घटनेवर ट्वीट केलं आहे. ते लिहितात, "एखाद्या लेखकाने असा एखादा सीन लिहिला तर 'किती फिल्मी आहे हे', असं म्हणतील सगळे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)