असद अहमदप्रमाणे उत्तर प्रदेश पोलिसांनी विकास दुबेला एन्काऊंटरमध्ये ठार मारलं होतं तेव्हा...

    • Author, समीरात्मज मिश्र
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

उमेश पाल हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेले 'बाहुबली नेते' अतीक अहमद यांना गुरुवारी 13 एप्रिल 2023 रोजी कोर्टात हजर करण्यात आलं.

दरम्यान, याच कालावधीत अतीक अहमद यांचा मुलगा असद अहमद याचा झाशीमध्ये एनकाऊंटरमध्ये मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. यामुळे .3 वर्षांपूर्वी घडलेल्या विकास दुबे एन्काउंटरची चर्चा सुरू झाली आहे.

विकास दुबे एन्काउंटर

विकास दुबेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला होता. कानपूरमध्ये त्याला अटक करायला गेलेल्या पोलीस पथकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात 8 पोलीस ठार, तर 7 पोलीस गंभीर जखमी झाले होते.

पीटीआय या वृत्तसंस्थेनं तो पोलीस चकमकीत मारला गेल्याचं म्हटलं आहे.

"मध्य प्रदेशातल्या उज्जैनमधून पोलीसांचा ताफा त्याला कानपूरला घेऊन जात असताना कानपूर जवळ ताफ्याला अपघात झाला. या अपघातानंतर विकास दुबे याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या फायरिंगमध्ये त्याचा मृत्यू झाला आहे," कानपूरचे पोलीस महानिरिक्षक मोहित अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.

दरम्यान, ज्या विकास दुबेंना अटक करायला पोलीस पथक गेलं होतं त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल होते.

इतकंच नाही तर अनेक खटलेही दाखल होते. राजकीय पक्षांमध्येदेखील त्यांची उठबस असल्याचं बोललं जात होतं.

कानपूरमधल्या चौबेपूर पोलीस ठाण्यात विकास दुबेविरोधात एकूण 60 गुन्ह्यांची नोंद होती. यात खून आणि खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हेदाखील होते.

कानपूरचे पोलीस महासंचालक मोहीत अग्रवाल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की पोलीस एका खून प्रकरणातच विकास दुबेंना अटक करायला गेले होते.

चौबेपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारींच्या आधारावर असं म्हणता येईल की गेल्या 30 वर्षांपासून गुन्हेगारी जगताशी विकास दुबेंचं नाव जोडलं गेलं होतं. त्याना अनेकदा अटकही करण्यात आली. मात्र, अजूनतरी कुठल्याच प्रकरणात त्याला शिक्षा झालेली नाही.

कानपूरमधले स्थानिक पत्रकार प्रवीण मोहता सांगतात, "2001 साली विकास दुबे याच्यावर पोलीस ठाण्यात घुसून भाजपचे राज्यमंत्री संतोष शुक्ला यांची हत्या केल्याचा आरोप लावण्यात आला. संतोष शुक्ला हत्याप्रकरण हायप्रोफाईल प्रकरण होतं. इतकी मोठी घटना घडूनही एकाही पोलीस कर्मचाऱ्याने विकास दुबेविरोधात साक्ष दिली नाही. कोर्टात विकास दुबेविरोधात कुठलेच पुरावे सादर न झाल्याने त्याची सुटका झाली."

2000 साली कानपूरच्याच शिवली पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ताराचंद इंटर कॉलेजचे सहव्यवस्थापक सिद्धेश्वर पांडेय यांच्या हत्या प्रकरणातही विकास दुबे याचं नाव तक्रारीत नोंदवण्यात आलं होतं.

पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारींनुसार, 2000 सालीच विकास दुबे याच्यावर रामबाबू यादव यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. विकास दुबेनं कारागृहातूनच हा कट रचल्याचं बोललं जातं.

2004 साली एका केबल व्यावसायिकाच्या हत्येतदेखील विकास दुबे याचं नाव आलं होतं. पोलिसांच्या माहितीनुसार यातल्या अनेक प्रकरणांमध्ये विकास दुबेला अटक झाली. मात्र, दरवेळी तो जामिनावर सुटला. 2013 सालीसुद्धा एका खून प्रकरणात विकास दुबेचं नाव आलं होतं. 2018 साली त्याच्यावर चुलत भाऊ अनुराग याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचाही आरोप ठेवण्यात आला होता. त्याप्रकरणात अनुराग याच्या पत्नीनं विकाससह चार लोकांविरोधात एफआयआर दाखल केली होती.

प्रवीण मोहता सांगतात, "प्रत्येक राजकीय पक्षात विकास दुबेचा दबदबा आहे आणि त्यामुळेच त्याला आजवर अटक होऊ शकलेली नाही आणि अटक झाली तरी काही दिवसातच तो बाहेर आले."

कानपूरजवळ विठूरच्या शिवली पोलीस ठाण्यांतर्गत येणारं बिकरू हे त्याचं मूळ गाव. गावातलं त्याचं घर एखाद्या किल्ल्यासारखं आहे. स्थानिक सांगतात की त्याच्या मर्जीशिवाय कुणीही आत जाऊ शकत नाही.

स्थानिकांचं म्हणणं आहे की 2002 साली जेव्हा राज्यात बहुजन समाज पक्षाची सत्ता होती, त्यावेळी विकास दुबेचा बराच दबदबा होता. बिकरूचे एक गावकरी नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगतात, की त्या काळात त्यांनी गुन्हेगारी जगतात चांगलाच जम बसवला. शिवाय गडगंज पैसा कमावला.

चौबेपूर पोलीस ठाण्यात दाखल सर्व प्रकरणं जमीन गैरव्यवहारांची आहेत. भूखंडाच्या या कथित बेकायदेशीर खरेदी-विक्रीतूनच विकास दुबेनं कोट्यवधी रुपयांची माया जमवली. विठूरमध्येच त्याची काही शाळा आणि महाविद्यालयं आहेत.

बिकरूचे गावकरी सांगतात, की फक्त गावातच नाही, तर आसपासच्या गावातही विकास दुबेचा दबदबा कायम होता. जिल्हा पंचायत आणि अनेक गावांमधल्या सरपंच निवडणुकीत विकास दुबे याच्या आवडी-निवडीला फार महत्त्व होतं.

गावातले एक वयोवृद्ध आजोबा सांगतात, "बिकरू गावात गेल्या 15 वर्षांपासून संरपंचाची निवड बिनविरोध होत आहे. विकास दुबेच्या कुटुंबातील लोकच गेल्या 15 वर्षांपासून जिल्हा पंचायत निवडणूक जिंकत आहेत."

गावकरी सांगतात की विकास दुबे यांचे वडील शेतकरी आहेत आणि ते तीन भाऊ आहेत. यातल्या एका भावाची जवळपास 8 वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती. भावंडांमध्ये विकास दुबे थोरले आहेत. विकासची पत्नी रुचा दुबे सध्या जिल्हा पंचायत सदस्य आहेत.

बिकरू गावच्याच एका गावकऱ्यानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की विकास दुबेंविरोधात पोलीस ठाण्यात कितीही तक्रारी दाखल असल्या तरी गावात त्याच्याविषयी वाईट बोलणारं कुणीही सापडणार नाही आणि कुणी त्याच्याविरोधात साक्षही देणार नाही.

त्याच्या मते, 2000 साली शिवलीचे तत्कालीन नगर पंचायत चेअरमन लल्लन वाजपेयी यांच्याशी झालेल्या वादानंतर विकास दुबेनं गुन्हेगारी जगतात पाऊल ठेवलं.

गावकऱ्यांच्या मते, विकास दुबेला दोन मुलं आहेत. यातला एक मुलगा लंडनमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेतोय. तर दुसरा मुलगा कानपूरमध्येच शिकतोय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)