You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कानपूरमध्ये विकास दुबे या गुन्हेगाराला पकडायला गेलेल्या 8 पोलिसांचा मृत्यू
कानपूरमध्ये विकास दुबे नावाच्या गुन्हेगाराला पकडायला गेलेल्या पोलिसांवरच हल्ला झाला आहे. पोलीस उप-अधीक्षक देवेंद्र मिश्रा यांच्यासह 8 पोलिसांचा यात मृत्यू झाला आहे. शिवाय अनेक पोलीस कर्मचारी जखमीही झाले आहेत. जखमी पोलिसांना कानपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
कानपूरचा एक सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगार विकास दुबे याला पकडण्यासाठी पोलीस चौबेपूर पोलीस ठाणे अंतर्गत दिकरू गावात गेले होते. पोलिसांना रोखण्यासाठी जेसीबी लावून रस्ता अडवण्यात आला होता, असं उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक हितेश चंद्र अवस्थी यांनी सांगितलं.
पोलीस गावात पोहोचताच गुंडांनी घराच्या छतांवरून गोळीबार सरू केला. यात 8 पोलीस मृत्युमुखी पडले. यात पोलीस उप-अधीक्षक देवेंद्र मिश्रा, तीन पोलीस उपनिरीक्षक आणि चार पोलीस कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे. या घटनेनंतर एकच खळबळ माजली आहे. फॉरेन्सिक पथकाला बोलावण्यात आलं असून बाकीची तपासणी करण्यात येत आहे.
विकास दुबे याच्यावर 60 गुन्हे दाखल आहेत. गेल्या आठवड्यातच एका व्यक्तीने त्याच्याबाबत तक्रारीनंतर 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी विकास यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचं पथक दिकरू गावात गेलं होतं.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या आठ पोलीसांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. तसेच या घटनेत दोषी असलेल्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश डीजीपी एच. सी अवस्थी यांना दिले आहेत.
घटनेची माहिती मिळताच कानपूर परिक्षेत्राचे अप्पर पोलीस महासंचालक जयनाराय सिंह, पोलीस महानिरीक्षक मोहीत अग्रवाल आमि वरीष्ठ पोलीस अधीक्षक दिनेश कुमार यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी गावाला चारी बाजूंनी घेरल्याचं कळतंय.
सध्या या गावात सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे. विकास दुबेच्या संपर्कातील लोकांचे मोबाईल नंबर सर्व्हिलंसवर लावण्यात आले आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)