विकास दुबेः कानपूरमध्ये 8 पोलिसांना कसं मारलं गेलं?

    • Author, अनंत प्रकाश
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

दिवसः शुक्रवार, तारीख- 3 जुलै, स्थळ- बिकरु गाव, चौबेपूर, जिल्हा- कानपूर

या एवढ्याशा प्राथमिक माहितीवर काल कानपूरमध्ये एक मोठं प्रकरण घडलं. या माहितीच्या आधारावर एक थरारक घटना घडली. त्या घटनेत आठ पोलीस मृत्युमुखी पडले आणि गुन्हेगार पळून गेले.

पोलिसांचा मृत्यू कसा झाला, गुन्हेगार कधी आणि कसे फरार झाले? पोलिसांनी बुलेटप्रुफ जॅकेट्स का घातले नव्हते? याची माहिती कधी समोर येईल हे अद्याप समजलेले नाही. आज विकास दुबेला उज्जैनमध्ये अटक करण्यात आली आहे.

पण त्या रात्री काय झालं हे तुम्ही येथे जाणून घेऊ शकता.

विकास दुबेच्या घरी पोलिसांच्या गाड्या पोहोचल्या

बिकरु गाव हे विकास आणि त्याच्या परिवाराचा बालेकिल्ला समजला जातो.

12 फुट उंच तटबंदीसारख्या भिंतीच्या घरामध्ये विकास दुबेचा परिवार राहतो. विकासविरोधात 60 प्रकरणांमध्ये एफआयआर नोंदवला गेला आहे.

परंतु नुकतीच राहुल तिवारी नावाच्या एका व्यक्तीने विकास दुबेच्या विरोधात कलम 307 अंतर्गत एक तक्रार दाकल केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्याची योजना सुरू केली.

मात्र त्यामध्ये 8 पोलिसांचे प्राण गेले आणि अनेक पोलीस अजूनही जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. बीबीसी हिंदीचे पत्रकार प्रविण मोहता यांनी या घटनास्थळावरुन माहिती पाठवलेली आहे.

मोहता सांगतात, ही घटना गुरुवारी रात्री घडली. "बिल्होर सर्कलचे डीएसपी देवेंद्र मिश्र चौबेपूर, बिठूर आणि बिल्हौर या पोलीस ठाण्यातील कुमक घेऊन बिकरू गावात पोहोचले होते. त्यांच्याबरोबर अनेक पोलीस ठाण्यांमधला फौजफाटा होता."

चकमक

उत्तर प्रदेश पोलिसांच्या अनेक गाड्या हळूहळू बिकरु गावाच्या दिशेने जात होत्या.

गावाच्या एकदम मध्यवर्ती असलेल्या विकासच्या घराच्या छतावरुन संपूर्ण परिसराचा अंदाज घेता येत होता. त्यामुळे पोलिसांच्या गाड्या दिसल्यावर पळून जाता येईल हे समजण्यासाठी घराचं स्थान अत्यंत योग्य जागी आहे.

अशातच पोलीस जेव्हा विकासच्या घराच्या दिशेने पुढे सरकत होते तेव्हा त्याच्या घरापासून 100 मीटर अंतरावर एक जेसीबी मशीन दिसलं.

प्रविण मोहता सांगतात, जेसीबी मशिनमुळे पोलिसांचा रस्ता अडवला, त्यामुळे पोलीस तेथेच अडकून पडले.

तिथं जे पाहिले ते थरकाप उडवणारं होतं असं, घटनास्थळी गेलेले आणखी एक पत्रकार अंकित शुक्ल सांगतात.

अंकित म्हणतात, "पोलीस अचानक आले आणि गुन्हेगारांना प्रत्युत्तर म्हणून हालचाल करावी लागली अशी ही घटना नव्हती. ही एक विचार करुन केलेली नियोजनबद्ध घटना होती."

अंदाधुंद गोळीबार आणि रक्ताचे पाट

मोहता सांगतात, पहिली गोळी कोणत्या बाजूने चालवली गेली हे माहिती नाही पण पहिली गोळी चालवल्यानंतर दोन्ही बाजूंनी अंदाधुंद गोळीबार सुरु झाला.

"विकासबरोबर अर्धा डझन शूटर नेहमीच असतात. हेच शूटर्स त्याच्या घराच्या छतावरुन पोलिसांवर गोळ्या झाडत होते. जे पोलीस जेसीबीच्या खालून विकासच्या घराच्या दिशेने गेले ते परतलेच नाहीत. त्याच्या घराच्या गेटवर वरुन गोळीबार आणि दगडांचा वर्षाव करण्यात आला. त्यामुळे पोलिसांना आजूबाजूच्या घरांच्या बाथरुममध्ये लपावं लागलं."

"जवळपास दोन डझनहून अधिक पोलीस कर्मचारी जीव वाचवून शेतांच्या दिशेने पळाले. त्यात बहुतेक कर्मचारी जखमी होते. त्यानंतर विकास दुबे बरोबर राहाणारे शूटर त्याच्या घरातून बाहेर आले आणि त्यांनी आजूबाजूच्या घरात लपलेल्या पोलिसांना बाहेर काढून ठार मारलं."

अंकित सांगतात, "आपला जीव वाचवण्यासाठी पोलिसांना कुठेच आसरा मिळाला नाही."

ते म्हणाले, "त्या रात्री गुन्हेगारांनी पोलिसांनाच घेरलं आणि त्यांचे प्राण घेतले. सर्कल ऑफिसरला ज्या पद्धतीनं मारलं गेलं ते तर शब्दांमध्ये सांगणंच कठीण आहे."

रक्तरंजित पहाट

पोलिसांना मारुन विकास दुबे पळाला तेव्हा त्याच्या घराबाहेर अक्षरशः रक्ताचे पाट वाहिले होते.

प्रविण पुढे सांगतात, विकास दुबे एका मोटरसायकलवर बसून फरार झाला. पोलिसांनी त्यानंतर दोन लोकांचं एन्काऊंटरसुद्धा केलं आहे.

सकाळीच घटनास्थळी पोहोचणारे अंकित शुक्ल म्हणाले, विकास दुबेच्या घराच्या ओटीपासून ती सगळी गल्लीच रक्ताने माखलेली होती.

तिथं इतकं रक्त होतं की सगळा रस्ता रक्ताने भिजलेला होता. एका बाथरुममधून चार पोलिसांचे मृतदेह काढण्यात आले. तिथल्या भिंतींवर गोळ्यांच्या खुणा किती आहेत याची गणतीच नाही.

या घटनेनंतर पोलिसांमध्ये संतप्त भावना तयार झाली आहे आणि विकास दुबेच्या गावात खळबळीचं वातावरण आहे.

ही सगळी माहिती प्रत्यक्ष घटनास्थळी गेलेल्या दोन पत्रकारांच्या माहितीवर आधारित आहे. या घटनेवर कोणीही अद्याप अधिकृत बाजू समोर ठेवलेली नाही. ती आली की या बातमीत समाविष्ट केली जाईल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)