You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमिताभ बच्चन केबीसीचं सुत्रसंचालन करू शकतील की नाही?
- Author, प्रदीप सरदाना
- Role, जेष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी
लॉकडाऊनच्या काळात जेव्हा टीव्ही सीरियल आणि पिक्चर्सचं शुटिंग बंद होतं तेव्हाही अमिताभ बच्चन आपल्या घरातून प्रेक्षकांना प्रश्न विचारत होते. याच्या पहिल्या प्रोमोचं शुटही त्यांनी घरातूनच केलं होतं.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं होतं. अर्थात ते आधीच्या सिझनच्या वेळेसही तसंच करायचं होतं. पण या टीव्ही शोच्या इतिहासात पहिल्यांदाच या शोमधले स्पर्धक सामान्य ज्ञानाची स्पर्धा आणि ऑडिशन दोन्हीही ऑनलाईनच करणार आहेत. या निवडप्रक्रियेचा शेवटचा टप्पा म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यूही ऑनलाईन होणार आहे.
पण सध्या या शोविषयी विचारला जाणारा सगळ्यांत मोठा प्रश्न हा आहे की यंदा अमिताभ बच्चन हा शो होस्ट करू शकतील की नाही?महाराष्ट्र सरकारच्या नव्या नियमांनुसार 10 वर्षांखालील आणि 65 वर्षांवरील व्यक्ती शुटिंग करू शकणार नाहीत तसंच त्यांना सेटवर उपस्थित राहाण्याची परवानगी मिळणार नाही.
गेल्या काही दिवसांपासून सरकारच्या कडक नियमांचं पालन करत काही ठिकाणी शुटिंगला सुरुवात झाली आहे. पण अमिताभ बच्चन यांचं वय 77आहे, अशात कौन बनेगा करोडपतीचं (केबीसी) सुत्रसंचालन करायला त्यांना परवानगी मिळणार कशी हा प्रश्न आहे.
टीव्ही आणि सिनेमांच्या प्रोड्युसर्सनी या नियमांमधून सुट देण्याची विनंती राज्यसरकारला केली आहे. पण अजून सरकारने ही मागणी मान्य केलेली नाही. त्यामुळे बिग बी ऐवजी दुसऱ्या कुठल्या कलाकाराला हा शो होस्ट करण्यासाठी बोलावलं जाऊ शकतं असाही अंदाज आहे.
केबीसी आणि अमिताभ बच्चन
खरं पाहिलं तर केबीसीच्या लोकप्रियतेचं मुख्य कारण अमिताभ बच्चन आहेत. या शोमध्ये 7 कोटी रूपये जिंकण्याची संधी असते हे जरी खरं असलं तरी अमिताभ बच्चन यांच्यासमोर बसण्याच्या संधीचं आकर्षणही कमी नाही. केबीसीचा यंदा 12 वा सिझन येईल आणि या गेम शोला आता 20 वर्ष पूर्ण होतील. याचा पहिला सिझन स्टार प्लस वाहिनीवर 3 जुलै 2000 ला सुरु झाला होता.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
ब्रिटनच्या 'Who wants to be millionaire' या गेम शोवर केबीसी आधारित आहे. जेव्हा स्टार प्लसने हा शो होस्ट करण्यासाठी अमिताभ बच्चन यांना विचारलं तेव्हा ते दोलायमान मनस्थितीत होते कारण तेव्हा मोठे फिल्मी सितारे टीव्हीवर येण्यात कमीपणा मानत.
पण तेव्हा अमिताभ आपल्या आयुष्यातल्या एका कठीण कालखंडातून जात होते. 1991 नंतर त्यांचं फिल्मी करियर उतरणीला लागलं होतं आणि त्यांना आर्थिक समस्यांचाही सामना करावा लागत होता.
कोरोना व्हायरस आकडेवारी
अशात अनेकांनी बच्चन यांना सल्ला दिला की त्यांनी चुकूनही छोट्या पडदावर येण्याचा विचार करू नये नाहीतर थोडंबहुत जे नाव शिल्लक आहे तेही धुळीला मिळेल. पण हा शो होस्ट करण्यासाठी स्टार प्लस वाहिनीने अमिताभ यांना चांगलं मानधन देण्याचा प्रस्ताव दिला ज्याला ते नाही म्हणू शकले नाहीत.
त्यानंतर जे झालं ते सगळ्यांनाच माहीत आहे. या शोने भारतीय टेलिव्हिजनचा चेहरामोहरा रातोरात बदलला. स्टार प्लस जगातलं सर्वाधिक लोकप्रिय चॅनल बनलं आणि अमिताभ यांची लोकप्रियता शिगेला पोहचली.
केबीसीचे आजवर 11 सिझन प्रदर्शित झालेत ज्यापैकी फक्त तिसऱ्या सिझनचं सुत्रसंचालन अमिताभ यांनी केलं नव्हतं. दुसऱ्या सिझनच्या शुटिंगच्या वेळेस 61 भाग शुट करून झाल्यानंतर अमिताभ गंभीररीत्या आजारी पडले. त्यामुळे दुसरा सिझन ते पूर्ण करू शकले नाहीत.
तिसऱ्या सिझनचं सुत्रसंचालन शाहरूख खान यांनी केलं होतं. त्यावेळस त्यांना किंग खान म्हणून ओळखलं जायचं आणि त्यांची लोकप्रियता प्रचंड होती. पण तरीही केबीसीमध्ये अमिताभ यांच्यासारखी छाप ते सोडू शकले नाहीत आणि या सिझनची लोकप्रियताही कमी होती.
तिसऱ्या सिझनचं अपयश पाहून हा शो टेलिव्हिजनवर वापसी करेल की नाही याविषयी शंका होती पण 2010 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या 68 व्या वाढदिवसाच्या दिवशी सोनी चॅनेलने पुन्हा एकदा केबीसीला सुरुवात केली. सोनीवरचा चौथा सिझन बऱ्याच काळानंतर आला होता पण त्याने पुन्हा प्रेक्षकांची मन जिंकली.
चॅनलचं म्हणणं काय?
सोनी चॅनेलचे सीईओ एन पी सिंह यांचं म्हणणं आहे की, "सरकारच्या 65 पेक्षा मोठ्या वयाच्या कलाकारांनी शुटिंग करता कामा नये या नियमामुळे आमची मोठीच अडचण होणार आहे. पण आमच्या टीम्स यावर काम करत आहेत आणि मला वाटतंय यावर काही ना काही उपाय निघेल."
पण मग या अडचणींच्या पार्श्वभूमीवर केबीसी वेळेवर सुरू होऊ शकेल का? आणि समजा या अडचणीवर तोडगा निघाला नाहीच तर मग केबीसीचं सुत्रसंचालन दुसरा कलाकार करणार का? या प्रश्नांची उत्तर देताना ते म्हणतात, " नाही नाही! केबीसीपासून अमित साहेबांना लांब ठेवणं शक्यच नाही. आम्ही सध्यातरी केबीसी वेळेवर सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. अमितजींबरोबरही आमची सतत चर्चा होतेय. मला खात्री आहे केबीसी वेळेवर सुरू होईल."
सोनी चॅनल कोणत्या पर्यायांवर काम करतंय हे तर सिंह मला सांगत नाहीत पण केबीसीचा हा सिझन अमिताभ बच्चन यांच्यासोबतच सुरू होईल हे ते ज्या आत्मविश्वासाने मला सांगतात, त्यावरून लक्षात येतं की त्यांच्याकडे काही ना काही ठोस पर्याय आहे.
एक पर्याय हा असू शकतो की केबीसीचं शुटिंग मुंबईत न करता महाराष्ट्राच्या बाहेर कोणत्या अशा शहरात केलं जाऊ शकतं जिथे ज्येष्ठ कलाकारांनी शुटिंग करण्यावर बंधनं नसतील. हैदराबाद हे असं शहर ठरू शकतं. या शहरात केबीसीचं शुटिंग करणं अवघड गोष्ट नाही. फ्लाईटने मुंबईहून हैदराबादचं अंतर फक्त दीड तासाचं आहे. आणि तिथे अत्याधुनिक रामोजी फिल्ससिटीही आहे.
तेलंगणा सरकारनेही शुटिंगसाठी अटी-शर्ती लागू केल्या आहेत. यानुसार 60 वर्षांपेक्षा मोठ्या असणाऱ्या कलाकारांना शुटिंग करण्यास मनाई आहे पण मेडिकल क्लीअरन्स नंतर 60 वर्षांपेक्षा मोठे कलाकार शुटिंग करू शकतात.
यंदा केबीसीच्या सेटवर दर्शक उपस्थित राहू शकणार नाही ही शक्यताही प्रबळ आहे कारण मुंबई असो वा हैदराबाद कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत शुटिंग करण्याचे निर्देश आहेत. तेही सोशल डिस्टन्सिंग पाळून.
असं झालं तर ऑडियन्स पोल ही लाईफलाईनही संपून जाऊ शकते किंवा त्यांचं स्वरूप बदलू शकतं. हॉट सीटवर अमिताभ बच्चन आणि त्यांच्या समोर बसलेले स्पर्धक यांच्यामध्ये काचेची भिंत असू शकते किंवा स्पर्धक आणि अमिताभ दोघांच्या चेहेऱ्यावर मास्क असू शकतो.
इतकं तर नक्की की यंदाच्या केबीसीचं स्वरूप बऱ्याचं अंशी बदललेलं असेल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)