सुशांत सिंह राजपूत : ताऱ्यांमध्ये रमणारं स्वप्नाळू मन आयुष्य संपवण्याच्या विचारापर्यंत कसं पोहोचलं?

    • Author, चिंकी सिन्हा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

सिनेसृष्टीत अत्यंत यशस्वी पावलं टाकणाऱ्या मोजक्या कलाकारांमध्ये सुशांत होता. पण 14 जून 2020 रोजी सुशांतने आत्महत्या करत अकाली एक्झिट घेतली.

"त्या रात्री त्यांनी अवकाशात कोट्यवधी किलोमीटर दूर असलेला शनी ग्रह बघितला. त्याचे चंद्रही पाहिले. चंबल खोऱ्यातली धौलपूर एक छोटीशी वस्ती. या वस्तीत लावलेल्या टेलिस्कोपमधून अवकाशातले आपल्या पृथ्वीच्या सोबत्यांना ते बघत होते."

रणवीर शौरी त्या रात्रींच्या आठवणींना उजाळा देत होते. गुरूही दिसला होता. मात्र, त्यांना भुरळ घातली होती शनीभोवतीच्या नारंगी कड्याने.

त्यावेळी धौलपूरमध्ये 'सोनचिरैया' सिनेमाचं शूटिंग सुरू होतं. त्याचदरम्यान दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने विलक्षण खगोलीय घटना बघण्याचा बेत आखला होता. त्यावेळी चंद्र एका विशिष्ट रेषेत येणार होता. याचंच निमित्त करून सुशांतने आपल्या सहकलाकारांसह शूटिंगसाठी जमलेल्यांना आपल्या टेलिस्कोपमधून अवकाशदर्शन घडवलं होतं. असा होता सुशांत सिंह राजपूत. थोडा वेगळा.

सुशांतविषयी बोलताना रणवीरने सांगितलं सुशांतने त्यांना गणिताची प्रमेयही अगदी सोप्या शब्दात समजावून सांगितली होती.

रणवीर सांगतात, मृत्यूची बातमी ऐकून त्यांचा थरकाप उडाला होता. पण, बॉलीवूड एक क्रूर ठिकाण आहे. इथे सुशांत सिंहला साईडलाईन करण्याचा प्रयत्न होत असेलही कदाचित. मात्र, तोवर तो स्टार झाला होता.

सळसळत्या ऊर्जेचा स्रोत - सुशांत

शौरी सांगतात बॉलिवडचं जग जोखिमीने भरलेलं आहे. इथे यश कधी तुमच्यावर खट्टू होईल, सांगता येत नाही. इथे साऱ्या दुनियेचं गणित जोडलं तरीही यशाचा कुठलाही एकमेव फॉर्मुला तयार करता येत नाही. शेवटी हे एक मार्केट आहे. शिवाय, निर्दयी आणि पूर्वग्रहदूषित मीडियाही आहेच.

शौरी सांगतात, "सुशांतमध्ये एक प्रकारचा अस्वस्थपणा होता. त्याच्या आत अमाप ऊर्जा होती. तो एक लाजाळू शांत रहाणारा मुलगा होता. त्याच्याशी कुणीही सहज बोलू शकत नव्हतं. कारण तो त्याच्याच विश्वात असायचा. मी तर म्हणेन स्टार दोन प्रकारचे असतात. एक ते जे बॉक्स ऑफिस चालवतात आणि दुसरे ते ज्यांना मीडिया आणि घराणेशाहीची शक्ती स्टार बनवते. सुशांत अस्सल स्टार होते. तुम्ही त्या क्लबचे सदस्य नसाल तर तुमचं आयुष्य खूप खडतर बनतं. तुम्ही नाकारले जाता. तुम्ही अडवले जाता आणि तुमच्यासमोर एक भिंत उभी केली जाते."

स्वाभाविकच या सर्वांमध्ये टिकणं सोपं नाही. या सर्वांमध्ये तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवायचं असतं. बॉलिवुडच्या चमचमत्या झगमगाटामागे काळाकुट्ट अंधारही आहे. अगदी चंद्राच्या काळ्या भागाप्रमाणे. तो काळा भाग जो सुशांतच्या टेलिस्कोपमधूनही दिसत नाही.

लोक म्हणतात की, सुशांत सिंह राजपूत डिप्रेशनच्या गोळ्या घेत होता. रविवारी (14 जून) सकाळी त्याने आत्महत्या केली. मागे राहिला त्याचा टेलिस्कोप.

भूतकाळाकडे अनेक अंगांनी बघता येतं. 34 वर्षांच्या या अभिनेत्याने जाताना कुठलंही पत्र लिहिलं नाही. मात्र, त्याने काही शब्द मागे सोडले आहेत. काही आकृत्या, काही विचार मागे ठेवले आहेत आणि यापैकी बरेचसे त्याविषयी आहेत जे तो अंतराळात बघायचा. अंतराळातला त्यांचा हा प्रवास त्यांच्या अपूर्ण कवितांमध्ये सापडतो. त्या कविता ज्यांना तो आपले 'विचार' म्हणायचा. तो विज्ञानात गर्क असायचा. तो निम्मा कवीही होता.

सुशांतला समजून घ्यायचं असेल तर तो जे काही वाचायचा त्यावरून थोडाफार अंदाज बांधता येतो. त्याने जे बघितलं ते बघूनच त्याच्याविषयी थोडीफार कळू शकतं. सुशांतला माहिती होतं की, शनिभोवती दिसणारं कडं धुमकेतूचे तुकडे, छोटे तारे किंवा शनिच्या गुरुत्वाकर्षणामुळे माती झालेले चंद्राचे तुकडे आहेत. ते बर्फ, दगड आणि धूळ आहेत.

सुशांतने फिलिप रोथला वाचलं. वॉल्डो इमर्सनही. तो ई. ई. कमिंग्जला कोट करायचा. तो रात्री अनंतात बघायचा. आकाशातले तारे कसे एकमेकांना मिठी मारतात, हे तो सांगायचा. त्यांना पिटर प्रिन्सिपल कॉन्सेप्टचं ज्ञान होतं. त्याच्याजवळ 200 किलो वजनाचा टेलिस्कोप होता. त्याने आकाशाची मॅपिंग केली होती. त्याला 'ब्लॅक होल' ठाऊक होता. त्याला चंद्रावरच्या खड्ड्यांची खडानखडा माहिती होती.

त्याला 'डार्क साईड ऑफ द मून'चीही माहिती होती आणि नीत्शेही माहिती होता. नीत्शे म्हणायचे तुम्ही दिर्घकाळ शून्यात बघता तेव्हा शून्यही तुम्हाला बघू लागतो. कदाचित ताऱ्यांच्या गर्दीत तो स्वतःला एकाकी मानायचा.

सुशांत कदाचित स्पुटनिक होते. स्पुटनिक हा पृथ्वीवरून सोडण्यात आलेला पहिला कृत्रिम उपग्रह होता. पृथ्वीवरून सोडल्यानंतर तीन महिन्यांनी तो दर 96 मिनिटाला पृथ्वीची एक प्रदक्षिणा करणार होता.

मात्र, तो उपग्रह लवकरच तुटला आणि अंतराळात विलीन झाला. कदाचित स्पुटनिक तो प्रियकर होता जो ब्लॅक होलमध्ये हरवून गेला. पृथ्वीची प्रदक्षिणा न करताच तो थेट अनंतात विलीन झाला. यामागे कुठलाच प्रमेय काम करत नव्हता, कुठलंच भौतिकशास्त्र नाही की कुठलंच रसायनशास्त्र नाही.

सुशांत एक असं व्यक्तिमत्व होतं जे आपल्यासमोर थोडं खुलंही होतं आणि थोडं बंदही. त्यांच्यात अनेक गुणांचा मिलाप होता. ही एका अशा व्यक्तीची कहाणी होती जिला आपण फारसं महत्त्वच दिलं नाही.

आत्महत्येनंतर अनेकांनी सुशांतबद्दल बरंच काही लिहिलं. कुणी आत्महत्या कशी केली, याबद्दल लिहिलं, तर काहींनी आत्महत्येच्या कारणांविषयी लिहिलं. सुशांतच्या मृत्यू म्हणजे षडयंत्र होतं का, याचीही चर्चा झाली. पोलीस तपास ते डॉक्टरांच्या वक्तव्यापर्यंत चर्चा झाली.

सुशांतच्या आत्महत्येवरून अनेक लॉबीही दिसल्या. घराणेशाहीवर कठोर टीका करण्यात आली. बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये बॉलीवुड अभिनेते, दिग्दर्शक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. काही लोकांनी सुशांतला आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचवल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला. तर काहींचं म्हणणं आहे की, त्यांना आधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यात आलं आणि मग त्यांना फसवण्यात आलं.

एका प्रसार माध्यमाने तर म्हटलं की, त्यांच्या आत्महत्येचा संबंध त्यांच्या ट्वीटर प्रोफाईलवरच्या वॅन गॉग यांच्या पेंटिंगशी आहे. वॅन गॉग जगविख्यात डच चित्रकार होते. त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या सगळ्यांमध्ये डिप्रेशन, नैराश्याची कहाणी गायब होती. आणि कदाचित हाच आत्महत्येच्या या दुःखद कहाणीचा सर्वात महत्त्वाचा पैलू होता.

मोठी स्वप्नं असणारा छोट्या शहरातला मुलगा

बॉलीवुडसाठी सुशांत पूर्णपणे बाहेरचा होता. प्रेक्षक त्याला ओळखायचे. त्याला सेलिब्रेट करायचे. सुशांतच्या पहिल्या 'काय पो चे' या सिनेमात त्याने एका क्रिकेटवेड्या तरुणाची भूमिका बजावली. हा तरुण एका मुस्लीम तरुणाला पुढे जाता यावं, यासाठी त्याला क्रिकेटचे धडे देतो.

ही एक अशी भूमिका होती जी तुम्ही विसरू शकत नाही. सिनेमातलं ते एक दृष्य तर तुमच्या स्मृतीतून कधीच पुसलं जाऊ शकत नाही. या दृष्यात तो खिडकीतून बाहेर पडून बसच्या छतावर जाऊन बसतो.

सुशांतमध्ये तुम्हाला छोट्या शहरातल्या त्या तरुणाची झलक दिसते जो आपल्या आशा-आकांक्षा आणि आवड यांच्यात अडकला आहे. आई-वडिलांची महत्त्वाकांक्षा आणि स्वातंत्र्याचं आकर्षण यातल्या दुविधेची ही कहाणी आहे.

तुम्हाला आयुष्याची ती बाजू माहिती असेलच. बिहार असंच ठिकाण आहे जिथे कमी वयातल्या मुलांच्या मनात स्वप्न पेरली जातात. इंजीनिअर, डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी ते लग्न करून सेटल होण्याची स्वप्नं. इथल्या प्रत्येक भिंतीवर तुम्हाला कोचिंग सेंटरचे पोस्टर चिकटवलेले दिसतील.

सुशांत सिंह राजपूतने इंजीनिअरिंगची प्रवेश परीक्षा दिली होती. या परीक्षेत तो देशातून सातवा होता. अभिनय क्षेत्रात येण्याआधी तो मेकॅनिकल इंजीनिअरिंगचं शिक्षण घेत होता. अभिनयासाठी त्याने इंजीनिअरिंग सोडलं.

त्याला एकांत आवडायचा

1986 साली बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातल्या मलडीहामध्ये सुशांतचा जन्म झाला. पाच भावंडात तो सर्वात धाकटा. चारही बहिणी, तो एकटा भाऊ. आईच्या खूप जवळ होता सुशांत. तो शांत मुलगा होता. 2003 साली त्याची आई गेली. या घटनेच्या त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्याला कायम एकांत आवडायचा.

सुशांतच्या कुटुंबीयांच्या जवळच्या असणाऱ्या रंजिता ओझा सांगतात की, सुशांत आईच्या खूप जवळ होता. त्याला आईची खूप आठवण यायची. हंसराज शाळेत प्रवेश घेण्यासाठी तो बहिणीसोबत दिल्लीतल्या मुखर्जी नगरला गेला होता. बहीण सिव्हिल सर्विसेसची तयारी करायची. सुशांतने दिल्ली कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला होता.

तो कायम हसतमुख असायचा. त्याचा तो हसतमुख चेहरा रंजिताच्या नजरेसमोरून जात नाही. सुशांत पार्कमध्ये एकटा फिरायचा किंवा मग अभ्यासाच्या टेबलावर दिसायचा.

सुशांतचा अभ्यासाचा टेबलही वेगळा होता. त्या टेबलावर अँटिक कारचे मिनिएचर ठेवले होते. तसंच स्वतः सुशांतने असेंबल केलेल्या छोट्या-छोट्या मशीन ठेवल्या होत्या. त्या वयातही सुशांत देकार्त आणि सार्त्रविषयी बोलायचा. सुशांतच्या बहिणीने फिलॉसॉफीमध्ये पदवी मिळवली आहे. रंजिता सांगतात तो खूप समजदार मुलगा होता.

घराणेशाही नवीन नाही. ज्या घरातले लोक सुप्रसिद्ध असतात अशा घरातल्या मुलांकडूनही तीच प्रसिद्धी मिळवण्याची अपेक्षा बाळगली जाते. दिवंगत ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांचे चिरंजीव रणवीर कपूर, कपूर घराण्याच्या चौथ्या पिढीतले अभिनेते आहेत. रणवीरने स्वतः एका मुलाखतीत म्हटलं होतं की, सिनेसृष्टीत त्यांना जास्त संधी मिळाली कारण ते एका फिल्मी कुटुंबातून आहेत.

करिअरची गाडी सुसाट

सुशांत सिंह शामक दावर यांच्या डान्स ग्रुपमध्ये होता. बेरी जॉन यांच्या अभिनय शाळेत त्याने अभिनयाचे धडे गिरवले. यानतंर नादिरा बब्बर यांच्या 'एकजूट थिएटर'मध्येही त्याने काम केलं. सुशांत कॉलेजमध्ये होता तेव्हा त्याने थोरल्या बहिणीला कॉल करून मला डान्स करायचा आहे, हे सांगितलं.

सुशांतच्या एका कौटुंबिक मित्राने सांगितलं की, त्यावेळी सुशांतच्या बहिणीनेच मदत केली. तिने वडिलांपासून ही गोष्ट लपवली की, सुशांत डान्ससाठी मुंबईला गेलाय. आपण इंटर्नशिपसाठी मुंबईला जात असल्याचं त्याने वडिलांना सांगितलं होतं. मुंबईत लवकरच सुशांत नजरेत भरू लागला आणि 'किस देश में है मेरे दिल' ही पहिली मालिका त्याला मिळाली. यानंतर एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' या गाजलेल्या मालिकेत त्याला मुख्य भूमिका मिळाली.

2011 साली त्याने बॉलीवुडकडे मोर्चा वळवला. तिथे रणवीर कपूर, रणबीर सिंह, वरूण धवन असे स्टार होतेच. फिल्म बॅकग्राउंड असणाऱ्यांना या क्षेत्रात दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदाही संधी मिळते. सिनेसृष्टीच्या बाहेरच्या व्यक्तीसाठी तर एकच संधी असते. पहिली संधी.

मात्र, सुशांतचा पहिलाच चित्रपट यशस्वी ठरला. यानंतर आला मनीष शर्मा यांचा 'शुद्ध देसी रोमांस' (2013)

त्यानंतर सुशांतने राजकुमार हिराणींच्या 'पीके' (2014) चित्रपटात सरफराजची भूमिका साकारली. पुढे सुशांतला यशराज फिल्मने साईन केलं आणि सुशांतला दिबाकर बॅनर्जीचा 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्शी' चित्रपट मिळाला.

'सर्व्हायवल ऑफ फिटेस्ट'चा सिद्धांत

ब्योमकेश बक्शीच्या सेटवर विकास चंद्रा यांची सुशांतशी भेट झाली. विकास सांगतात, "ज्या घराणेशाहीवर टीका केली जाते त्याने सुशांतचा जीव गेलेला नाही. त्याला साथीने आणि एकटेपणाने मारलं. आपल्या चहुबाजूंनी एकटेपणा भरून आहे. एकटेपणा काय करू शकतो, याची तुम्हाला कल्पनाही नाही. विशेषकरून अशा व्यक्तीला जी नैराश्याच्या गर्तेत अडकली आहे आणि कुठल्यातरी रुपात एकटी आहे. इंडस्ट्रीमध्ये घराणेशाही असूनही तो स्टार बनला होता. सुशांतलाही हे ठाऊक होतं की, त्याला सगळं मिळालं आहे. मात्र, तो वेगळा होता."

बॉलीवुडविषयी बोलताना चंद्रा सांगतात, "हे एका विशिष्ट चौकटीतलं जग आहे. यात एकप्रकारचा पोकळपणा आणि उग्रपणा आहे आणि सोबतच या चौकटीत स्वतःला फिट करण्यासाठीचं प्रेशरही आहे. इथल्या व्यवस्थेपासून थोडं जरी लांब गेलं की तुमच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होतात."

चंद्रा यांच्या मते घराणेशाही खरंतर आपल्या भारतीय समाजाचाच भाग आहे.

चंद्रा पुढे सांगतात, "भारत विश्वास न ठेवणाऱ्यांचा देश आहे. आपल्याला कुणाचाच भरवसा वाटत नाही. आपण अशाच वातावरणात वाढलोय. आपल्याला शिफारशीची गरज का पडावी? खरंतर आपण दुहेरी आयुष्य जगण्यात सरावलो आहे. बॉलीवुड हेच दुहेरीपण जगतो. इथे लोक खानदानी व्यापार करतात. मात्र, इथे कठोर स्पर्धा आहे, हेदेखील तेवढंच खरं आहे."

म्हणूनच तर सुप्रसिद्ध तारे-तारकांच्या मुलांपैकी काहीच इथे तग धरू शकतात. कारण इथेही 'सर्व्हायवल ऑफ फिटेस्ट'चा सिद्धांतच चालतो.

बॉलीवूड तुम्हाला उंचीवर नेण्याचं आश्वासन देतं. तुम्हाला देशभरात प्रसिद्ध व्हायचं असतं. बॉलीवूड तुम्हाला यातून बाहेर पडू देत नाही. चंद्रा म्हणतात, "लोक इथे स्तुती करून घेण्यासाठी येतात. शो बिजनेस असाच असतो."

'बाहेरच्यांना दुप्पट मेहनत करावी लागते'

सत्य हेच आहे की, आदित्य चोप्रानेच 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्शी' चित्रपटासाठी सुशांत सिंह राजपूत याचं नाव सुचवलं होतं. चंद्रा म्हणतात, "तो आपलं काम गांभीर्याने करायचा. स्टारसारखे नखरे नव्हते त्याचे. तो येणाऱ्या काळातला स्टार होता. त्याला ही गोष्ट नीट कळाली होती."

चंद्रा पुढे सांगतात, "सुशांतला याची जाणीव करून देण्यात आली की, तो आउटसाईडर आहे. त्याला नेटवर्किंग आणि पीआरचा राग यायचा. त्याला हे सगळं आवडत नव्हतं, हे मला माहिती होतं. मात्र, तुम्ही हे सगळं केलं नाही तर यातून मिळणारे फायदेही तुम्हाला मिळणार नाही. मात्र, तरीही तो तिथवर पोहोचला जिथवर त्याला जायचं होतं. नव्या पिढीतल्या स्टार्समध्ये त्याचंही नाव होतं."

'पद्मावत' चित्रपट राजपूत संस्कृतीचा अपमान करत असल्याने हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका करणी सेनेने घेतली होती. त्यावेळी ज्या नावावरून इतका वाद आहे ते 'राजपूत' हे नाव आपण काढत असल्याचं सुशांतने म्हटलं होतं.

चंद्रा म्हणतात की घराणेशाही असा मुद्दा आहे ज्याता आता दम उरलेला नाही. "सुशांतने घराणेशाहीला छेद दिला. त्याला कुठल्याच करण जोहरची गरज नव्हती. खरं सांगायचं तर शिखरावर एकटेपणा असतो. एकटेपणा कुणालाही वेडं करू शकतो. यश कसं हाताळायचं, हे आपल्याला कुणीच शिकवत नाही. यशाचं करायचं काय, हे आपल्याला माहितीच नसतं."

तर दिबाकर बॅनर्जी म्हणाले होते की, बाहेरच्या व्यक्तीला इथे जम बसवण्यासाठी दुप्पट मेहनत घ्यावी लागते.

स्टार किड्सचा स्ट्रगल

'गली बॉय'चे सिद्धांत चतुर्वेदी यांनी चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडे हिच्या 'स्टार किड्सनाही स्ट्रगल करावा लागतो' या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली होती. नव्या कलाकारांसोबतच्या राजीव मसंद यांच्या राउंड टेबलमध्ये सिद्धांत म्हणाले होते, "जिथून तुमची स्वप्नं पूर्ण व्हायला सुरुवात होते तिथूनच आपला संघर्षही सुरू होतो."

जे सुशांतला ओळखायचे त्यांचं म्हणणं आहे की, सुशांत कायमच एक वेगळा मुलगा होता. तथाकथित आउटसायडर्सना बॉलीवुडमधल्या घराणेशाहीची माहिती असते. मात्र, सुशांतने त्यात काम केलं होतं. त्याच्याशी लढला आणि त्याच्याशी समन्वयही साधला होता.

दहा वर्षांपूर्वी बंगळुरूहून मुंबईला अॅक्टर व्हायचं स्वप्न घेऊन आलेले गुलशन देवैया म्हणतात की, लोकांना स्वतःच्या दुर्दैवासाठी इतरांना दोष द्यायला आवडतं. काही बाबतीत सुशांत सिंह राजपूत आणि गुलशन देवैया या दोघांचीही कहाणी सारखी आहे. दोघंही लाजाळू, शांत आणि अंतर्मुख मुलं... देवैया सांगतात की, शाळेत 'क्युट किड' म्हणत त्यांची टर उडवली जायची.

अशीच काहीशी कहाणी नसिरुद्दीन शाह यांचीही होती. त्यांना वेगळं काहीतरी करायचं होतं. स्वतःला खुलेपणाने व्यक्त करण्यासाठी त्यांना स्टेज आवडायचं. जे इतर कुठेच बोलता येत नव्हतं ते सगळं ते स्टेजवर बोलू शकत होते. देवैया म्हणतात, "बॉलीवूड संगिताप्रती माझ्या वडिलांचं प्रेम आणि त्यांनी गोळा केलेल्या शेकडो टेप हा माझा वारसा आहे. काहीही न कळण्याच्या वयात मी हिंदी सुपरस्टार व्हायचं स्वप्न उराशी बाळगलं होतं."

मात्र, 1997 मध्ये त्यांनी बंगळुरूच्या नॅशनल इंस्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला. डिझायनर बनण्यासाठी. 1998 साली त्यांनी 'सत्या' चित्रपट बघितला आणि 2008 साली मुंबई गाठली. बॉलीवुडमध्ये नशीब आजमावायला.

देवैया यांच्या मते बॉलीवूड असं काल्पनिक जग आहे जे भ्रामक आहे. देवैया सांगतात, "मी इथे असण्याचं संपूर्ण श्रेय राम गोपाल वर्मा आणि मनोज वाजपेयी यांना जातं. मला माहिती आहे की, मी स्मार्ट दिसतो. मात्र, मी स्वचःला कधीही शानदार 'मुव्ही स्टार' म्हणून बघितलं नाही."

'बॉलीवुडमध्ये अपमान गिळण्याची सवय होते'

सुशांतप्रमाणेच देवैया यांचीही सुरुवात रंगभूमीपासून झाली. ते ही नजरेत भरले आणि ऑडिशनसाठी बोलवणं आलं. 'गर्ल इन यलो बूट'मध्ये त्यांना भूमिका मिळाली. यात कल्कीची मोठी भूमिका होती. गुलशन सांगतात की, तुम्हाला इतक्यांदा नाकारलं जातं की पुढे तर तुम्ही नकार फार मनावर घेत नाही आणि ज्यांनी नकार दिला त्यांच्याविषयी कुठलीच नकारात्मक भावना मनात ठेवत नाही.

गुलशन देवैया सांगतात की, आजही इंडस्ट्रीमध्ये अनेकजण ऑडिशन देत आहेत. आर्मीतून मेजरपदाच्या नोकरीचा राजीनामा देऊन बॉलीवुडमध्ये नशीब आजमावायला आलेल्या एकाने तर वर्षभरात 200 ते 300 ऑडिशन्स दिल्या होत्या.

देवैया म्हणतात, "बॉलीवुडमध्ये तुमचं निभावून जातं आणि तुम्ही अपमान गिळायला शिकता. माझ्यात ही क्षमता नव्हती. मी तिथेच ऑडिशन द्यायचो जिथे मला स्वतःला वाटायचं की इथे गेलं पाहिजे. एका परफॉर्मन्सवरून तुम्ही एखाद्याची क्षमता ओळखू शकत नाही. तुम्ही केवळ एक मत बनवता. इथे मेरिटवर कुणीच लक्ष देत नाही. मी स्वतःला इनसायडरही मानत नाही आणि आउटसायडरही मानत नाही."

सुशांत आणि गुलशन यांची दोन वेळा भेट झाली होती. गुलशन सांगतात, "इंडस्ट्रीमध्ये घराणेशाही नक्कीच आहे. घराणेशाहीचं स्वतःचं असं पॉवर स्ट्रक्चर आहे. इथे लोक चुकीच्या माणसांवर राग काढतात आणि काही अशी मंडळी आहेत ज्यांना वाटतं की यशावर त्यांचाच अधिकार आहे. शिवाय स्टार किड्सची जादुई दुनिया तर आहेच. इथे केवळ मेरिटवर काम भागत नाही."

गुलशन देवैया सांगतात की, ते गोव्यात 'दम मारो दम'चं चित्रिकरण करत असताना लोक त्यांना येऊन विचारायचे की, तुम्ही राज बब्बर यांचे चिरंजीव आहात का? ते राजस्थानमध्ये शूटिंग करत असताना आमिर खान यांची मुलगी दिग्दर्शकाला असिस्ट करत होती. तिला बघायला गर्दी व्हायची. त्यामुळे स्टार किड्स असण्याचा फायदा तर होतोच.

मात्र, सरतेशेवटी कुठल्याही अभिनेत्याचं नशीब बॉक्स ऑफिसवरूनच ठरतं. शाहरूख खानचं उदाहरण घेता येईल. ते तर पूर्णपणे आउटसायडर होते. मात्र, आज ते यशाच्या शिखरावर आहेत. त्यांच्यावेळी इतर अनेक सुपरस्टार्सनी आपल्या मुलांना लॉन्च केलं होतं. त्या मुलांना दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा संधीही मिळाली. मात्र, ते चालले नाही. आज केवळ घराणेशाहीला दोष देणं, योग्य ठरणार नाही. आरोप करण्यापासून वाचलं पाहिजे. आता आपल्याला तर्कशुद्ध आकलन करायला हवं.

देवैया यांनीही 2013 साली प्रदर्शित झालेल्या 'काई पो छे'साठी ऑडिशन दिलं होतं. तो चित्रपट बऱ्यापैकी हिट झाला होता.

ते म्हणतात, "सुशांतला तो चित्रपट मिळाला आणि त्याचा फॅन बेसही तयार झाला. मला तो चित्रपट मिळाला नाही. इथे प्रत्येकाला यशराज फिल्म्सचं कॉन्ट्रॅक्ट हवंय. पण ते प्रत्येकालाच मिळत नाही."

घराणेशाहीचा अडथळा असूनही सुशांतने मिळवलं यश

सोशल मीडियावर ज्या काही घटना सांगितल्या जात आहेत आणि जे काही पुरावे दिले जात आहेत ते बघितल्यावर असं वाटतं की सुशांतला साईडलाईन करण्यात आलं होतं. त्याची टर उडवण्यात आली आणि त्याला त्रास देण्यात आला. हे खरं आहे की नाही, माहिती नाही. मात्र, त्याच्या हातात जे प्रोजेक्ट होते आणि बॉक्स ऑफिसवर त्याच्या चित्रपटांना जे यश मिळालं होतं, त्यावरून तरी असंच वाटतं की त्याला त्याच्या करियरसाठी कुणा करण जोहरची गरज नव्हती.

इंडस्ट्रीमध्ये घराणेशाहीचं वर्चस्व असूनही सुशांतने यश मिळवून दाखवलं. शाहरूख आणि इरफान वगळता इंडस्ट्रीमध्ये मालिकांमधून येऊन स्टार झालेला अभिनेत्याची उदाहरणं दुर्मिळच. सुशांत त्यापैकी एक होता. आणि देवैया सांगतात त्याप्रमाणे सुशांतने बॉलीवुडमध्ये आपली इनिंग उत्तमरित्या खेळली.

बॉलीवुडमध्ये लोक लवकरच घराणेशाहीत काम करायला शिकतात. स्टार किड्स चमकत असतील तर असेही लोक आहेत जे कुठल्याही नातेसंबंधाशिवाय, पॉवर सेंटर आणि अशा प्रकारच्या कुठल्याच आधाराशिवाय यश मिळवतात.

दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी सुशांतच्या आत्महत्येनंतर दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे, "एका कोमल मेंदूवर अत्यंत सुनियोजितपणे आघात करण्यात आला."

मात्र, सुशांतला जो मानसिक त्रास झाला त्यासाठी केवळ घराणेशाहीला दोष देऊन उपयोग नाही.

शेखर कपूर दिग्दर्शित 'पानी' चित्रपटासाठी सुशांतने 12 प्रोजेक्ट नाकारले होते. सुशांतची ही पात्रता होती की, तो प्रोजेक्ट नाकारू शकत होता. 2019 साली कर्मशिअल हिट चित्रपट देणारा तो एकमेव स्टार होताा. 'सोनचिरैया' चित्रपटातल्या त्याच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं.

सुशांतच्या यशाकडे बघण्याचा दृष्टिकोन

इंडस्ट्रीच्या बाहेरचा होता आणि घराणेशाहीचा बळी ठरला, असा युक्तिवाद करून आपण सुशांतच्या यशाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन क्षुद्र करतो.

सुशांतला नवाजुद्दीन सिद्दीकी आवडायचे. मात्र, सुशांतला कधीही नवाजुद्दीनसारखा संघर्ष करावा लागला नाही. एखाद्या गरिबाची व्यक्तिरेखा चितारण्यासाठी योग्य, अशी ज्याची प्रतिमा होती. त्याला जो संघर्ष करावा लागला, तो सुशांतने केलेला नाही.

अनेक वर्षांपूर्वी नवाजुद्दीन यांनी मला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं, "मला माझ्या संघर्षाचा राग यायचा. मला प्रत्येक गोष्टीचा राग यायचा."

एक काळ होता जेव्हा कुणीच त्यांना गांभीर्याने घेत नव्हतं. ते जेव्हा म्हणत की मला मुख्य भूमिका हवी, तेव्हा त्यांचे मित्र, 'तू हिरो मटेरियल नाही' म्हणून त्याला फेटाळत.

ते पुढे म्हणाले होते, "मला बॉलीवुडचा सर्वाधिक फी घेणारा अभिनेता व्हायचं आहे." बॉलीवुडमध्ये संघर्ष आहे. काही हा संघर्ष सहन करू शकले नाही. उदाहरणार्थ-अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर. मात्र, नवाजुद्दीन सिद्दिकीसारख्या लोकांनी संघर्ष करून आपलं स्थान बळकट केलं. सुशांतनेही संघर्ष करूनही जागा मिळवली.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) आकडेवारीनुसार 2018 साली देशात एकूण 1 लाख 34 हजार 516 आत्महत्या झाल्या. 2017 च्या तुलनेत ही संख्या 3.6 टक्क्यांनी जास्त होती.

आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात काय विचार असतात?

डॉक्टरांच्या मते आत्महत्या एक अंधुक विषय आहे. हा विषय समजून घेण्यासाठी आपल्याला बायपोलर डिसॉर्डर आणि डिप्रेशनला बळी पडलेल्या लेखकांच्या आयुष्याचा अभ्यास करावा लागतो. यावरून आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात काय विचार सुरू असतात, याचा अंदाज बांधता येतो.

ज्यांना डिप्रेशनचा त्रास आहे त्यांना हे ठाऊक असतं की यावर औषध नाही. त्यांना एका वेदनेपासून दुसऱ्या वेदनेपर्यंतचा प्रवास सतत करावा लागत असतो.

म्हणूनच डिप्रेशनचा सामना करणाऱ्यांना 'वॉकिंग वुंडेड' म्हणतात. 'वॉकिंग वुंडेड' युद्धात जखमी झालेला तो जवान असतो जो जखमी आहे पण तरीही स्वतःच्या पायावर उभा असतो.

प्रफुल्लित हास्य असणारा सुशांत अनोळखी लोकांसोबत रहात होता. पुढे तो आपल्या भूतकाळासोबत राहू लागला.

सुशांतच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यानेच लिहिलेल्या कवितेतून तो कोण होता, याचा अंदाज येतो. सुशांत निरंतर प्रवास करत होता. पण त्याने स्वतःची जमीन सोडली नाही. 3 जून रोजी त्याने आपल्या आईचा फोटो शेअर केला होता. त्याखाली त्याने लिहिलं होतं - 'आंसूओं से धुंधली होती आंखों से मां की इस तस्वीर को निहारा'.

प्रत्येक आयुष्याचा एक पूर्णविराम असतो. मात्र, अनेकदा प्रवास अनंत असतो. याचा अर्थ की, प्रवास पुढे सुरू राहणार आहे. ज्या व्यक्तीने ग्रहगोल बघितले त्याचा प्रवास अजून संपलेला नाही.

या कहाणीचे आणखी अनेक रुप आणि पात्र पुढे दिसतील. पुढच्या काही वर्षात जग पूर्णपणे बदलणार नाही आणि स्वप्न बघणारेही संपणार नाहीत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)