लॉकडाऊनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या संकटातून कोकण कसं सावरणार? - ग्राउंड रिपोर्ट

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

'निसर्ग' चक्रीवादळाचे घाव कोकणप्रांतावरुन फार लवकर नष्ट होतील असं दिसत नाही. दशकभरापूर्वी आलेल्या 'फयान'च्या आठवणी अद्याप कोकणवासियांच्या मनात ताज्या आहेत.

पण 'निसर्ग'नं केलेल्या नुकसानातून, विशेषत: उत्तर कोकणाला, उभं रहायला वेळ लागणार हे नक्की. अलिबाग, नागाव, चौल, रेवदंडा या भागात आम्ही जेव्हा वादळाच्या दुस-या दिवशी फिरतो तेव्हा निसर्गानं केलेला कहर समोर दिसतो.

कोकण किनारपट्टीवर 'निसर्ग' चक्रीवादळानं असं विध्वंसाचं प्रदर्शन मांडलंय. तुफानी वारा बेदरकारपणे होत्याचं नव्हतं करुन गेला आहे. भलेमोठे वृक्ष मुळापासून उन्मळून पडलेत, माडा-सुपारीच्या बागा तुटून पडल्या आहे, वा-यानं फेकल्या गेलेल्या आंब्यांचा सडा पडला आहे. रस्ते अडले आहे आणि घरं उध्वस्त झाली आहे. निरातिशय सुंदर कोकणाचं नेहमीचं चित्रं विस्कटून गेलं आहे.

जेव्हा मुंबईच्या बाहेर पडून अलिबागच्या दिशेला आम्ही जायला लागलो तेव्हाच वादळी वा-यानं त्या काही तासांमध्ये मांडलेला उच्छाद रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसायला लागतो. झाडांची अवस्था तर दयनीय झाली आहे, पण मोठमोठे जाहिरांतींचे बोर्ड ठिकठिकाणी उडून पडले आहेत तर काही वाकलेले, मोडलेले आहेत. वादळाचा जमिनीवरचा प्रवास मंगळवारी दुपारी सुरू झाल्यावर काय ताकदीचे वारे वाहिले असतील ते या झाडांकडे, खांबांकडे पाहिलं तर जाणवतं.

पण या वादळाची खरी पावलं पुढे दिसायला लागतात. जसजसं आम्ही अलिबागच्या जवळ जातो तसतसं पडलेल्या झाडांची संख्या वाढत जाते. तुटलेल्या बोर्डांसोबतच नुकसान झालेली घरंही दिसायला लागतात.

बहुतांश झाडं मुळापासून उखडली आहेत, काही खोडातून तुटली आहेत. 'एन डी आर एफ' आता ती काही तासांतच बाजूला करुन रस्ते मोकळे केलेले दिसतात. अलिबागच्या अगोदरच एक सिलेंडरनं भरलेला ट्रक भेलकांडून रस्त्या कडेला ढकललेला दिसतो. वा-याचा रोलर असा भवतालावरुन फिरला आहे असं फिरुन सगळीकडे बघतांना जाणवत राहतं.

अलिबाग शहर दुस-या दिवसापासूनच (लॉकडाऊनमधल्या नियमांप्रमाणे) नॉर्मल झालं होतं. रहदारी सुरू झाली होती. कोसळलेली झालं, विजेच्या खांबांच्या तारा, दुकानांचे बोर्ड्स वादळाची साक्ष देत होते. पण आलिबाग शहरात बहुतांशी पक्की बांधकामं आहेत, नवी आहेत. ती व्यवस्थित होती.

जसं अलिबाग सोडऊ आम्ही नागांवच्या दिशेला निघालो तसा वादळाचा तडाखा अधिक दिसायला लागला. मोबाईल नेटवर्क गेलं. जुनी घरं दिसायला लागली. माडा-सुपारीच्या बागा दिसायला लागल्या. झाडांची तर अपरिमित हानी झालेली आहे. वाकलेले, कोसळलेली, तारांमध्ये गुंडाळलेले विजेचे खांब कसेबसे उभे होते. घरांवर झाडं पडलेली दिसायला लागली.

हे विस्कटलेलं चित्रं वेळ न दवडता कोकणवासियांनी आवरायला घेतलं आहे. बहुतांश रस्ते तर प्रशासनानं लगेच साफ केले, मोकळे केले. घरांवर पडलेल्या झाडांचं काय? त्यानं झालेल्या राहत्या घराच्या पडझडीचं काय? हेच चित्र अगदी प्रत्येक घरापाशी, गल्लीपाशी होतं. कुठं घरावर झाड पडलेलं होतं, कुठं एखादा पत्रा येऊन घरावर कोसळलेला होता भिंत पडली होती. एका दिवसाआधी घरात दबा धरून, वादळापासून जीव वाचावा म्हणून आता बसलेली माणसं आता घराबाहेर पडली होती.

कोणाची वाट न बघता त्यांनी आवरावरी करायला सुरुवात केली होती. कोणी करवतीनं झाड तोडत होतं, कोणी तुडलेलं कपांऊंड परत उभारत होतं. घरात, बाहेर बाहेरून वा-याबरोबर आलेल्या गोष्टी साफ करत होतं. कोणी उडालेली, फुटलेली कौलं गोळा करत होतं. कोणी एकेकटं होतं, कोणासाठी शेजारी मदतीसाठी आलेले होते. तक्रार न करता सगळ्यांनी आवरायला घेतलं होतं.

नागावमध्ये शिरताच एक कोकणी खाद्यपदार्थांचं एक दुकान आहे. दारात भलथोरलं हापूस आंब्याचं झाड मुळासकट उन्मळून पडलं होतं. शेडवरचे काही पत्रे उडाले होते. आत एक आजी एकट्या होत्या. बोलायला गेलो. निलिमा नाईक 70 वर्षांच्या आहेत. पापड, लोणचं, वेगवेगळ्या प्रकारची पीठं असं काय काय विकत असतात. बचतगटांकडून करवून आणतात आणि विकतात. दुकानात काही व्यवस्थित ठेवलं होतं, काही इतस्तत: पसरलेलं होतं.

"मी चार वाजेपर्यंत तिकडे होते. चार वाजता आहे तर इकडे आले तर सगळं पडलं होतं. पत्रे उडाले होते. संध्याकाळी पत्रे लावले. आंबा कोसळला. लांबून बघत होतो. पण काय करणार मी," नाईक आज्जी सांगत होत्या. त्या एकट्या होत्या. जीव वाचवायला बाजूच्या घरी गेल्या, पण तोवर इकडे सगळं वा-यावर होतं. आता त्यांनी ब-यापैकी सगळं उरलेलं सामान गोळा केलं होतं.

"सरबतं गेली सगळी. पापडाचं नुकसान झालं. करायचं काय? आपलं ठीक आहे, पण लोकाचं किती नुकसान झालंय. आपण काय करणार?" त्या म्हणतात.

पण नाईक आज्जींकडून आणखी एक महत्वाची गोष्ट समजली. ती म्हणजे, कोकणच्या वादळात झालेल्या या हानीला, आर्थिक नुकसानाला लॉकडाऊनचीही किनार आहे. किंबहुना तो खूप महत्वाचा भाग आहे.

आजी सांगतात की जेव्हा सीझन असतो तेव्हा शनिवारी आणि रविवार मिळूनच एक-दीड लाखापर्यंतही व्यवसाय होतो. पण लॉकडाऊनमुळे तो पूर्णपणे ठप्प झाला. गेल्या दोन महिन्यात हजार रुपये सुद्धा मिळाले नसल्याचं त्या सांगतात.

"लॉकडाऊनमध्ये काहीही झालं नाही. मेमध्येही टूरिस्ट नाही म्हटलं तर काय चालणार? पुण्यातले नाही, मुंबईतले नाहीत. धंदा काहीच झाला नाही. एक हजार जरी झाला असता तरी बरं वाटलं असतं. पण तेवढेही नाहीत. आणि आता हे नुकसान, प्रचंड नुकसान. सगळी धूळदाण झाली. मसाले गेले. बोर्ड पडले. पीठं सगळी ही अशी पडली आहेत बघा," त्या सांगतात.

जे या भागातले व्यावसायिक आहेत, त्यांचे व्यवसाय सगळ्या देशासारखे गेले दोन महिने बंदच होते. त्यामुळे कमाई काहीच नाही. आता या वादळानं आणखी आर्थिक नुकसान पदरात पाडलं. म्हणजे कमाई काही नाही, पण वर भुर्दंड. विशेषत: जे पर्यटनावर अवलंबून आहेत, त्यांची परिस्थिती अधिकच बिकट आहे. नाईकांच्या शेजारीच आनंद खामकरांचं कॉटेज आहे.

इथं या भागात अशी ओळीनं कॉटेजेस आहेत. पर्यटक येतात आणि राहतात. पर्यटन हाच महत्त्वाचा उद्योग आहे. यंदाचा हंगाम मात्र कोरडा गेला होता. लॉकडाऊन आहे तर पर्यटन बंद. खामकरांच्या शेजारी असेच एक कॉटेज आहे. वादळात तिथले पत्रे उडाले आणि यांच्या इमारतीवर कोसळले. छत तोडून घरात घुसले. पावसाचं पाणी घरात शिरलं. त्यांच्या इमारतीभोवतीचं सगळी झाडं पडलेली आहेत. त्यांचा प्रश्न हा आहे की यंदा कमाईच झाली नाही तर आता दुरुस्ती करायला पैसे कसे आणायचे?

"या वर्षी अगोदर सगळा सिझन निघून गेला लॉकडाऊनमुळे. लॉकडाऊनमुळे खूप फरक पडला. जे टूरिस्ट यायचे तेही आले नाहीत. त्यामुळे व्यवसायावर खूप फरक पडला. काल जे वादळ आलं त्यात शेजारच्या बिल्डिंगवरचा पत्रा उडून आमच्या कॉटेजवर पडला. त्यामुळे सगळं पिओपो, सिलिंग याची खूप हानी झाली. मोठं नुकसान झालं. आता रिडेव्हलपमेंट करायची म्हणजे अजून फटका बसणार. सिझनही निघून गेला. त्यामुळे तीही भरपाई होऊ शकत नाही.

लॉकडाऊन आणि वादळ एकत्र आल्यामुळे खूप मोठं नुकसान झालं आमचं. अगोदर पर्यटक आले नाहीत म्हणून धंदा नाही आणि आता वादळात रुम्सचं नुकसान. भविष्यात काय होईल तेही दिसत नाही. असेच अजून किती महिने जातील ते सांगता येत नाही. जरी लॉकडाऊन संपला तरीही पर्यटक येण्यासाठी अजून खूप वेळ लागेल. लोक घरातून बाहेर पडतांनाही विचार करतील. लोक येतील तेव्हाच आमचा बिझनेस सुरु होईल," खामकर म्हणतात.

वादळ समुद्रातून येऊन जमिनीवर थडकल्यावर पहिल्यांदा त्याला तोंड दिलं ते मच्छिमारांनी. समुद्रात मासेमारी बंद होती. पण बोटी, नाव समुद्रात होत्या. काही बाहेर काढून ठेवल्या होत्या. त्यांचं नुकसान झालं. मोठे मच्छिमार किंवा व्यावसायिक यांना नुकसानासमोर तग धरता येईलही. पण चिंतामणी पाटलांसारख्या छोट्या मच्छिमारांची परिस्थिती मात्र वेगळी आहे, बिकट आहे.

अलिबागच्या दक्षिणेच्या पट्ट्यात फिरतांना आम्हाला चिंतामणी पाटील भेटतात. खाडीच्या पाण्यात त्यांच्या छोट्या बोटीची डागडुजी चालली होती. समुद्राच्या कडेलाही ओढून आणून ठेवलेल्या त्यांच्या बोटी दाखवयला ते आम्हाला घेऊन जातात.

त्यांच्या सारख्या छोट्या मच्छिमारांचा व्यवसाय लॉकडाऊनमुळे जवळपास थांबलाच होता. आता वादळ आलं आणि त्यानंतर मान्सूनमुळे ते किमान दोन महिने समुद्रात जाणार नाहीत. सहा महिन्यांचा तोटा आणि वर वादळानं केलें नुकसान.

"मासेमारी जवळपास 15-20 दिवस अगोदरच थांबवली होती. पंचायतीनं सांगितलं होतं की तुम्ही जाऊ नका म्हणून म्हणून आम्ही सगळे मच्छी मारायला जायचे बंदच झालो होतो. होड्या समुद्राच्या जवळ होत्या. लाटा दिसायला लागल्या म्हणून आमच्या छोट्या होड्या अगोदरच बाहेर काढल्या. मी जवळपास 30-40 वर्ष मासेमारी करतो. आमच्या जाळ्यांचं नुकसान झालं.

होड्या तशाच बाहेर काढल्या. जाळी फाटली. होड्यांना दगड अडकले लाटेनं. आता आम्ही दोन महिने पावसाळ्यात बाहेर समुद्रात जाणार नाही. लॉकडाऊनमुळे दोन महिने तसंही बंद आहे. बाहेर कोणी मच्छी घेत पण नाही. लोकं पण यायला घाबरतात. त्यामुळे आमची मच्छीपण बंद केली. लॉकडाऊनमध्ये आमच्या छोट्या होड्या बंदच ठेवल्या होत्या. जातच नव्हतो आम्ही. मच्छीला भाव पण मिळत नव्हता. अशी परिस्थिती आमची व्हायची," पाटील सांगतात.

ही अशी लॉकडाऊनची किनार आहे 'निसर्ग' चक्रीवादळाच्या तडाख्याला. उद्धव ठाकरे तिस-या दिवशी या भागात आले आणि राज्य सरकारनं 100 कोटींची मदत जाहीर केली. पण ती किती पुरेल याबाबत शंका आहे. या कोकणपट्ट्यात नेमकं किती नुकसान झालंय याचा पूर्ण अंदाज अजून यायचाय. पण ते केवळ पंचनाम्यांमध्ये सापडणार नाही आणि मावणारंही नाही.

ज्या पट्ट्यात आम्ही फिरलो त्यातले बहुतांश रस्ते खुले झाले आहेत. पण वीज मात्र अनेक दिवस नसणार आहे. अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्क नाही आहे. बाहेर असणा-यांना आपले अडकलेले लोक कसे आहेत हे अद्याप माहित नाही आहे. श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरची खरी स्थिती अद्याप समोर यायची आहे. कोकणाला उभं रहायला मोठी लढाई करावी लागणार आहे.

हेही नक्की वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)