You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : हायड्रॉक्सिक्लोरोक्विनमुळे (HCQ) धारावीत कोरोनाच्या संसर्गाला आळा बसेल?
- Author, मयांक भागवत
- Role, मुक्त पत्रकार
मुंबईत दिवसेंदिवस वाढणारे रुग्ण आणि होणारे मृत्यू यामुळे राज्य सरकार आणि पालिकेची चिंता वाढलीये. राज्यातील 65 टक्क्यांहून अधिक रुग्ण एकट्या मुंबईत आहेत आणि इतर भागात ही संख्या कमी अधिक प्रमाणात वाढते आहे.
मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाने लक्ष केंद्रीत केलं आहे. मात्र, सर्वात मोठं आव्हान आहे, कोरोना व्हायरसचा संसर्ग मुंबईच्या झोपडपट्यांमध्ये पसरण्यापासून रोखण्याचं. यासाठी आरोग्य विभागाने एक महत्वाकांक्षी योजना आखली आहे.
सरकारने धारावी, वरळी-कोळीवाडा आणि जिजामाता नगर या परिसरात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 'हायड्रोक्सिक्लोरोक्विन’ (HCQ) हे औषध रहिवाशांना देण्याचा निर्णय घेतलाय. पुढील आठवड्यात रहिवाशांना हे औषध देण्यात येईल.
राज्य सरकारची योजना
या योजनेबाबत माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलं, “तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने केलेल्या शिफारसीनुसार मुंबईत प्रतिबंधात्मक योजना आणि कोरोनाची व्याप्ती रोखण्यासाठी धारावी, वरळी-कोळीवाडा आणि जिजामाता नगर परिसरात दोन लाख लोकांना 'हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’ औषध देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे औषध 15 वर्षाखालील मुलं, हृदय आणि यकृतासंबंधी आजार असलेल्यांना दिलं जाणार नाही.”
- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?
“या औषधामुळे रुग्ण संख्येत घट होईल. आजाराचा संसर्ग आणि संभाव्य गुंतागुंत कमी होईल. रुग्णांचा मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल. राज्य आणि केंद्राच्या संयुक्त समितीने हा निर्णय घेतला आहे,” असंही ते पुढे म्हणाले.
मात्र या मलेरिया प्रतिबंधक औषधाचा कोरोनाविरोधात फायदा होतो का, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला.
'HCQचा फायदा होतो याचा पुरावा आहे का?
महाराष्ट्र मेडिकल काउंसिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे म्हणतात, “कोव्हिड-19 आजाराबाबत कोणालाच जास्त माहिती नाही. कोव्हिड-19, तीन ते चार महिने फक्त जुना आजार आहे. HCQचा प्रतिबंधात्मक म्हणून फायदा होईल का याबाबतही संशोधन झालेलं नाही. त्यामुळे याचा फायदा होईल किंवा नाही हे कोणीच ठामपणे सांगू शकत नाही. मात्र प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जे शक्य आहे, ते आपण केलं पाहिजे.”
तज्ज्ञांच्या मते, धारावीसारख्या दाटीवाटीच्या परिसरात कोरोनाविरुद्धची लढाई जिंकायची असेल तर या औषधाचा वापर करून पाहाणं अयोग्य नाही.
याबाबत बोलताना इंडियन कॉलेज ऑफ फिजिशिअनचे डीन डॉ. शशांक जोशींनी म्हटलं, “धारावीसारख्या दाटीवाटीच्या परिसरात फिजिकल डिस्टंसिंग शक्य नाही. मग अशा परिस्थितीत या रहिवाशांना वाऱ्यावर सोडून देणार का? 'हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’ औषधाच्या वापरामुळे कोव्हिड-19 व्हायरस नष्ट होतो याचा पुरावा नाही. पण, संशोधनातून स्पष्ट झालंय की मलेरियाचा संसर्ग पसरू नये म्हणून या औषधाचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फायदा नक्की होतो, हे संशोधनातून स्पष्ट झालं आहे.
या औषधाच्या वापरामुळे व्हायरल लोड कमी होण्यास नक्की मदत होईल.”
जागतिक आरोग्य संघटनेचं मत काय?
जागतिक आरोग्य संघटनेच्या कोव्हिड-19 बाबतच्या क्लिनिकल मॅनेजमेंट ब्लू-प्रिंटमधील माहितीनुसार, प्रयोगशाळेतील तपासणीत 'हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’चा कोव्हिड-19 विरोधात एंटी व्हायरल म्हणून फायदा होत असल्याचं आढळून आलं आहे. मात्र, चीनमध्ये कमी लक्षणं असलेल्या कोव्हिड-19 च्या तीस रुग्णांवर करण्यात आलेल्या संशोधनात या औषधाच्या वापरामुळे रुग्ण बरा होण्याच्या अवधीचा वेळ कमी झाला किंवा व्हायरस क्लिअरन्स झाल्याचं आढळून आलं नाही.
हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’चा उपचार पद्धत म्हणून वापर करण्याबाबत सध्या संशोधन सुरू आहे.
धारावीत पोहोचला कोरोना
आशिया खंडातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत 15 लाख लोक राहतात. 100 फुटांपेक्षा कमी जागेत 8-10 लोक राहतात. धारावीत आतापर्यंत कोव्हिड-19 चे 60 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत.
कोरोनाविरोधातील युद्ध सोपं नाही. या व्हायरसबाबत फार जास्त माहिती अजून उपलब्ध नाही. त्यामुळे कोरोनाविरोधातील युद्धात आपण सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत असं तज्ज्ञांचं मत आहे.
डॉ. उत्तुरे सांगतात, “मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. धारावी, वरळी या परिसरात कोरोनाने शिरकाव केलाय. कोव्हिड-19 विरोधातील लढाई जिंकण्यासाठी आपल्याला शक्य ते प्रयत्न केले पाहिजेत. संसर्ग होण्यापासून लोकांना वाचवणं हेच आपल्यासमोरचं एकमेव ध्येय आहे. 'हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’ देणं याच प्रयत्नांचा एक भाग आहे. सरकार सर्व मार्गांनी धारावी आणि वरळी परिसरात कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा प्रयत्न करत आहे.”
धारावीत लोकांची तपासणी करणारे इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टरही 'हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’ औषध घेऊन काम करत आहेत.
वरळी भागात कोरोनाचा फैलाव
वरळी कोळीवाडा, जिजामाता नगर आणि प्रभादेवी या परिसरात कोरोनाचे 350 पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. परिसर दाटीवाटीचा असल्याने कोरोनाच्या संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरण्याची भीती आहे. यासाठी मुंबई महापालिका आणि सरकार विविध उपाययोजना आखत आहे.
भारतातील संशोधन क्षेत्रात काम करणारी सर्वात मोठी संस्था ICMR म्हणजे इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने देशात 'हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’ औषधाच्या प्रतिबंधात्मक वापरासाठी शिफारसी जारी केल्या आहेत.
“प्रयोग शाळेत झालेल्या संशोधनातून या औषधाचा फायदा होत असल्याचं समोर आलं आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची काळजी घेणारे आरोग्य कर्मचारी आणि कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लक्षणं नसलेल्या व्यक्तींना हे औषध प्रतिबंधात्मक म्हणून देण्यात यावं.”
इंडियन कॉलेज ऑफ फिजिशिअनचे डीन, डॉ. शशांक जोशी म्हणतात, “हे औषध आरोग्य कर्मचारी आणि कोव्हिड-19 रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना प्रतिबंधात्मक म्हणून दिलं जात आहे. धारावीत याचा फायदा होतो की नाही यावर संशोधन करता येईल. लाखोंच्या संख्येने एकत्र राहणाऱ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी आपल्याला काहीतरी उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे. कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क कॉन्टॅक्टना हे औषध दिल्यामुळे संसर्ग कमी होण्यास मदत होण्याची शक्यता आहे.”
औषधाची मात्रा कशी असेल?
याबाबत बोलताना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलच्या किडनीविकार विभागाचे प्रमुख डॉ. श्रीरंग बिच्चू म्हणतात, “इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या शिफारसींनुसार दिल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक डोसचा लोकांवर फारसा विपरीत परिणाम होणारा नाही. पहिल्या दिवशी 400 मिली-ग्रॅम गोळी दिवसातून दोन वेळा आणि त्यानंतरच्या प्रत्येक आठवड्यात, सात आठवड्यांपर्यंत हा डोस दिवसातून एकदा लोकांना देण्यात येणार आहे. याचा एक फायदा म्हणजे भविष्यात आपल्याला या संशोधनातून उत्तर मिळू शकतं.”
'हायड्रोक्सिक्लोरोक्वीन' मुळे काय होईल?
ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयाचे हृदयविकारतज्ज्ञ डॉ. विजय सुरासेंनी सांगितलं, “हायड्रोक्सिक्लोरोक्वीनच्या वापराने कोव्हिड-19 इन्फेक्शनचा वेळ आणि तीव्रता कमी होण्यास मदत होईल. ज्यामुळे रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते. या औषधामुळे आजारात निर्माण होणारी गुंतागुत आणि मृत्यूची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे न्यूमोनिया होण्याची शक्यताही कमी होण्यास मदत होईल.”
तर, डॉ. बिच्चू म्हणतात, "हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’ चा कोव्हिड-19 विरोधात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फायदा झाल्याचा काहीच वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. पण या औषधातील मेकॅनिझमचा फायदा कोव्हिड-19 व्हायरसला शरीरातील पेशींमध्ये जाण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी होऊ शकतो.”
'हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’औषध कोणाला दिलं जातं?
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, मलेरिया आणि रूमटॉईड आर्थरायटिसवर उपचारांसाठी या औषधाचा वापर करण्यात येतो.
डॉ. जोशी म्हणतात, “हायड्रोक्सिक्लोरोक्वीन औषधाच्या वापराला भारतात मान्यता देण्यात आली आहे. मधुमेह आणि रूमटॉईड आर्थरायटिसवर उपचारांसाठी याचा डॉक्टर वापर करतायत. मधुमेही रुग्णांवर याचा विपरीत परिणाम होत नाही. कोव्हिड-19 च्या रुग्णांमध्ये लंग एक्सप्लोजन (lung explosion) होतं. ज्यामुळे 'हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’चा प्रमुख वापर म्हणजे केमिकल स्टॉर्म (Chemical Storm) होण्यापासून प्रतिबंध करणं.”
द-लॅन्सेट या जर्नलमध्ये एक अहवाल छापण्यात आला आहे. फ्रान्समध्ये करण्यात आलेल्या दोन संशोधनातून मिळालेल्या माहितीनुसार, जर हे औषध अॅझिथ्रोमायसिनसोबत देण्यात आलं, तर 'हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’च्या वापरामुळे कोव्हिड-19 रुग्णांच्या शरीरातील व्हायरल लोड कमी होतो.
जामा नेटवर्क जर्नलमध्ये छापण्यात आलेल्या संशोधनानुसार हायड्रोक्सिक्लोरोक्वीनचा मलेरियाविरोधात प्रतिबंधक उपाय म्हणून वापर करण्यात येत असल्याचा इतिहास आहे. या औषधाच्या वापराने शरीरातील पेशीत व्हायरसची एन्ट्री बंद होण्यास मदत होते असं प्रयोगशाळेतील संशोधनातून समोर आलं आहे.
इंटरनॅशनल जर्नल ऑफ अँटीमायक्रोबिअल एजन्टमध्ये छापण्यात आलेल्या संशोधनानुसार,
फ्रान्समध्ये 36 कोव्हिड-19 रुग्णांमधील 20 रुग्णांना हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’ देण्यात आलं आणि अन्य 16 रुग्णांना फक्त सपोर्टिव्ह केअर देण्यात आली. हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’ दिलेल्या रुग्णांमध्ये 70 टक्के विषाणू कमी झाल्याचं आढळून आलं. या रुग्णांची स्वॅब टेस्ट करण्यात आली. सपोर्टिव्ह केअर दिलेल्या रुग्णांमध्ये व्हायरल लोड फक्त 12 टक्के कमी झाल्याचं दिसून आलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)