कोरोना व्हायरस : मुंबईत डायलिसिसच्या रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास अडचणी

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

"मी गेली दोन वर्ष डायलिसिसमुळं जिवंत आहे. डायलिसिसला एखादा दिवस उशीर झाला तरी माझे पाय सुजू लागतात. जगणंच कठीण असतं, त्यात कोरोना व्हायरस आला," 59 वर्षांचे अदनान (नाव बदललंय) सांगतात.

मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणारे अदनान यांना गेली 20 वर्षं मधुमेह आहे. काही वर्षांपासून ते मूत्रपिंडाच्या म्हणजे किडनीच्या विकारानंही त्रस्त आहेत. त्यामुळे आठवड्यातून किमान तीन वेळा त्यांना डायलिसिस करावं लागतं.

पण अदनान जोगेश्वरीतल्या ज्या मिल्लत रुग्णालयात डायलिसिससाठी जायचे, तिथल्या एका रुग्णाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी ते सील केलं होतं. "आम्ही दुसरीकडे चौकशी केली, पण काही हाती लागत नव्हतं. मला कोव्हिड चाचणी करून घ्यावी लागली. ती निगेटिव्ह आल्यावरच दुसऱ्या एका सेंटरमध्ये जाता आलं, पण त्यात दोन-तीन दिवस गेले."

मुंबई महापालिकेनं आता हे केंद्र निर्जंतुकीकरणानंतर ताब्यात घेतलंय आणि कोरोना विषाणूची लक्षणं असलेल्या व्यक्तींची तिथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे.

पण शहरातील इतर ठिकाणीही डायलिसिस सेंटर्स आणि किडनीविकारानं त्रस्त रुग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे.

सुश्रूषा हॉस्पिटलसमधील रुग्णांचा प्रश्न

दादरच्या सुश्रूषा हॉस्पिटलमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तिथल्या नर्सेसना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आल्यावर पोलिसांनी रुग्णालय सील केलं. त्यामुळं तिथं डायलिसिस करून घेणाऱ्या 85 रुग्णांसमोर मोठा पेच निर्माण झाला.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही हा मुद्दा सोशल मीडियावर मांडला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांनी आपल्याशी संपर्क साधला, तसंच सुश्रूषातली डायलिसिस सेवा लवकरात लवकर सुरू केली जावी, अशी सूचना महापालिका आयुक्तांकडे केल्याची माहीतीही देशपांडे यांनी दिली.

पण एखादं सेंटर कोरोना व्हायरसमुळे बंद झालं तर ते लगेच सुरू करणं शक्य असतं का? याविषयी आम्ही सुश्रूषा रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. शिल्पा देशमुख यांना विचारलं. सुश्रूषामधलं डायलिसिस सेंटर पुन्हा सुरू करणं ही आपली प्राथमिकता असून त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

"आमची टीम अहोरात्र काम करते आहे. पण अशा परिस्थितीत सेंटर पुन्हा उघडण्यासाठी काही नियम आहेत. आम्ही सर्वांत आधी डायलिसिस करणाऱ्या नर्सेस आणि तंत्रज्ञांची तपासणी केली. ती सुदैवानं निगेटिव्ह आली आहे. इथं येणाऱ्या नेहमीच्या रुग्णांनाही ते त्यांची तपासणी कुठे करून घेऊ शकतात, हे सांगितलं आहे. अख्ख्या इमारतीचं आज (13 एप्रिल) निर्जंतुकीकरण केलं आहे."

डायलिसिस प्रक्रियेदरम्यान आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्याची पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय सेंटर सुरू करू शकत नाही, असंही डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केलं.

"आमचे अनेक कर्मचारी अजून विलगीकरणात आहेत. इथला ICU अजून बंद आहे. त्यामुळं डायलिसिसदरम्यान रुग्णांना कसला त्रास झाला तर कुठे न्यायचं? अँब्युलन्स ड्रायव्हर येऊ शकत नसल्यानं रुग्ण इथे कसे आणायचे? त्यांना लागणारी औषधं जमा करायची अशा गोष्टींची आखणी आम्ही करतो आहोत."

कोरोना विषाणूचा प्रसार पाहता, यापुढच्या काळात अशा समस्या वारंवार निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. "जे सुश्रूषामध्ये झालं, ते इतर कुठल्याही रुग्णालयात होऊ शकतं. अचानक एखादं रुग्णालय सील होऊ शकतं. त्यामुळं रुग्णांनीही आधीच आपली तब्येत जास्त बिघडणार नाही, यासाठी आहाराकडे लक्ष द्यायला हवं. तसंच डायलिसिस वगळता घराबाहेर पडणं पूर्णतः टाळावं."

डायलिसिस का गरजेचं?

एरवी किडनी किंवा मूत्रपिंड रक्तातील टाकाऊ घटक वेगळे करण्याचं काम करतात. युरियासारखे हे टाकाऊ घटक मग मूत्रावाटे शरीराबाहेर टाकले जातात. ते पदार्थ रक्तातच साठून राहिले तर शरीराला सूज येऊ शकते, इतर अवयवांच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो आणि रुग्णाला जीवही गमवावा लागू शकतो.

किडनी नीट काम करत नसेल, तर अशा व्यक्तींना मग डायलिसिसचा आधार घ्यावा लागतो. म्हणजे यंत्रावाटे त्यांच्या शरीरातलं रक्त शुद्ध केलं जातं. आठवड्यातून किमान तीनदा ही प्रक्रिया करावी लागते आणि त्यासाठी तीन-चार तास हॉस्पिटल किंवा डायलिसिस सेंटरमध्ये थांबावं लागतं. ज्यांच्या किडन्या पूर्णतः निकामी झाल्या आहेत, अशा व्यक्तींना किडनीदाता मिळत नसेल, तर ते पूर्णतः डायलिसिसवर अवलंबून असतात.

भारतात किडनी विकारानं त्रस्त लोकांचं नेमकं प्रमाण सध्या किती आहे, याची आकडेवारी उपलब्ध नाही. पण इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन (IHME) या अहवालानुसार भारतातील ज्या पंधरा आजारांमुळे भारतात सर्वाधिक मृत्यू होतात, त्यात किडनीच्या विकारांचाही समावेश आहे. मुंबईचा विचार केला, तर शहरात सध्या पन्नास ते साठ हजार व्यक्तींना डायलिसिसची गरज असल्याचं या क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ सांगतात.

त्यातील अनेक व्यक्तींना मधुमेहाचा किंवा हृदयविकाराचाही त्रास असतो. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अशा व्यक्तींनी जास्त काळजी घ्यायला हवी, असं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण ही साथ, त्यासाठी झालेलं लॉकडाऊन आणि डायलिसिस केंद्र बंद होणं किंवा तिथे प्रवेश नाकारला जाणं, अशा तिहेरी समस्येचा त्यांना सामना करावा लागतो आहे.

रुग्णांसमोर अनेक प्रश्न

45 वर्षांच्या ज्योती वर्षभरापासून डायलिसिसवर आहेत. त्या सांगतात, "मी चारकोप भागात राहते आणि आठवड्यातून दोनदा डायलिसिस घेते. तेवढ्याचसाठी फक्त दोनदा घरातून बाहेर पडते. लॉकडाऊननंतर कसं जायचं हा प्रश्न होता. पण माझे पती बाईकवरून मला डायलिसिससाठी नेतात. आम्हाला एक ओळखपत्रही बनवून देण्यात आलं आहे, त्यामुळं पोलीस अडवत नाहीत."

पण असेही अनेक रुग्ण आहेत, ज्यांना डायलिसिस सेंटरपर्यंत जाण्यातही अडचणी येत आहेत, असं 'द रीनल प्रोजेक्ट' या उपक्रमाचे संस्थापक शशांक मोडिया सांगतात. या उपक्रमातून शहरातल्या आणि दूरच्या भागात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या भागातच डायलिसिसच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो आहे.

"सध्याच्या परिस्थिती आम्ही रुग्णांसाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न केला.पण ते शक्य झालेलं नाही. पूर्ण खबरदारी घेतल्याशिवाय आम्ही नव्या किंवा बाहेरच्या पेशंट्सना घेऊ शकत नाही. त्यामुळं आम्ही अशा रुग्णांना कोव्हिड- 19 ची तपासणी करून घ्यायला सांगतो आहोत. पण कोव्हिडची लक्षणं नसतील आणि परदेश प्रवास केला नसेल तर काही प्रयोगशाळा तपासणी करत नाहीत."

खासगी प्रयोगशाळांमध्ये अशा तपासणीसाठी साडेचार हजार रुपये मोजावे लागतात, जे अनेकांना परवडत नाही, याकडेही शशांक लक्ष वेधून घेतात.

डायलिसिस रुग्णांसाठी विशेष व्यवस्था

कोरोना विषाणूचा संसर्ग डायलिसिस यंत्राच्या माध्यमातून इतर व्यक्तींना होऊ शकतो, हे लक्षात घेत महापालिकेनं शुक्रवारीच 'कोविड-19' बाधित रुग्णांसाठी डायलिसिसची स्वतंत्र व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते.

तसंच रुग्णांचे डायलिसिस करण्यापूर्वी त्यांची प्राथमिक तपासणी करण्याचे आदेशही डायलिसिस सेंटर्सना दिले आहेत. अशा तपासणीदरम्यान रुग्णांमध्ये कोव्हिड-19. ची लक्षणं आढळून आली, तर कोरोना बाधितांसाठी स्वतंत्र डायलिसिस व्यवस्था असणाऱ्या रुग्णालय किंवा केंद्रामध्ये उपचारासाठी पाठण्याचा आदेश महापालिकेनं दिला आहे.

मिल्लत रुग्णालयातल्या केंद्राशिवाय शहरातील पाच हॉस्पिटल्समध्येही अशा रुग्णांच्या डायलिसिसची सेवा आधीच उपलब्ध आहे. त्यात कस्तुरबा गांधी, केईएम, सेव्हन हिल्स, सैफी आणि नानावटी रुग्णालयांचा समावेश आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)