You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : लॉकडाऊन असतानाही वाधवान कुटुंबीय नोकराचाकरांसह असे पोहोचले महाबळेश्वरमध्ये
- Author, स्वाती पाटील
- Role, बीबीसी मराठीसाठी
देशात लॉकडाऊन असताना महाबळेश्वरमध्ये 8 एप्रिलला संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान अचानक 5 गाड्या आल्या. तीन गाड्या मुंबई आणि 2 गाड्या कल्याण पासिंगच्या होत्या. जिल्ह्याबाहेरचं कुणीतरी महाबळेश्वरात आल्याचं लगेचच स्थानिक यंत्रणांच्या लक्षात आलं.
पचगणीतल्या गणेश नगर सोसायटीमध्ये दिवाण व्हीला नावाचा बंगला आहे. या बंगल्यात या पाच गाड्यांमधून आलेली 23 माणसं उतरल्याचंही स्थानिक यंत्रणांना कळालं.
ही माहिती मिळताच महाबळेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अमिता पाटील यांनी लगेचच याबाबतची माहिती तहसिलदार सुषमा पाटील यांना दिली. त्यांनी पुढे त्यांच्या वरिष्ठांना कळवलं.
- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?
त्यानंतर प्रांत अधिकारी संगीता राजापूरकर यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंग आणि पोलिसांना याबाबतची माहिती दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकदम 23 माणसं बाहेरून आल्याचं कळताच सरकारी यंत्रणा लगेचच सजग झाली.
त्यातच अशा प्रकारे कुणी जिल्ह्यात येणार असल्याचंही वरून कळवण्यात आलं नव्हतं. परिणामी प्रशासनानं आलेल्या माणसांची चौकशी सुरू केली. त्यात हे सर्वजण विशेष प्रधान गृह सचिव अमिताभ गुप्ता यांचं प्रवासाची मुभा देणारं पत्र घेऊन इथंपर्यंत पोहोचल्याचं लक्षात आलं.
या पत्रात वाधवान कुटुंबाकडे 'फॅमिली इमर्जन्सी' म्हणजेच कौटुंबिक आणीबाणी असल्याचं म्हटलंय होतं.
"चौकशीत या कुटुंबाकडे अत्यावश्यक गरज म्हणून येण्याबाबत कोणतीही माहिती नव्हती. महाबळेश्वरमध्ये वाधवान कुटुंबीयांचा स्वतःचा बंगला आहे. पण सध्य परिस्थितीत जिल्ह्यात कुणीही बाहेरून प्रवेश करायचा असल्यास स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणं गरजेचं आहे," असं प्रांत अधिकारी संगीता राजापूरकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
"आपत्कालिन स्थितीत केवळ पतीपत्नी आणि मुलांनाच अशाप्रकारे प्रवेश दिला जाऊ शकतो. असं असताना वाधवान कुटुंबीयांनी 23 लोकांसह महाबळेश्वरमध्ये बेकायदेशीर प्रवेश केला. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे जिल्ह्यात प्रवेश करणं हे इतरांच्या जीविताला धोका निर्माण करण्याची शक्यता आहे त्यामुळे या कुटुंबाने हयगय केल्याचा ठपका प्रशासनाने ठेवला आहे. या सर्वांना पाचगणीच्या शासकीय इमारतीत असलेल्या सेंटरमध्ये संस्थात्मक अलगीकरणासाठी ठेवण्यात आलं आहे," राजापूरकर यांनी पुढे सांगितलं.
या 23 जणांच्या विरुद्ध कलम 188, 269,270 आणि ५१ खाली प्रांत अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर या सगळ्यांच्या गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत.
सातऱ्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ही माहिती दिली आहे.
अशी मिळाली प्रवासाची परवानगी
DHFL चे प्रमुख असणाऱ्या वाधवान कुटुंबातील धीरज आणि कपिल या बंधूंसह वाधवान कुटुंबीय आणि त्यांचे काही कर्मचारी असे 23 जण बुधवारी (8 एप्रिल) रात्री पाचगणीला गेले. अमिताभ गुप्ता यांनी त्यांच्या 5 गाड्यांच्या ताफ्यासाठीची परवानगी दिली.
या सगळ्या व्यक्तींना आपण ओळखत असून ते आपले 'फॅमिली फ्रेंड' असल्याचं अमिताभ गुप्तांच्या लेटरहेड आणि सहीच्या या पत्रात म्हटलंय. यासोबतच यामध्ये प्रवास करणाऱ्या 23 जणांची नावं आणि ते प्रवास करत असलेल्या 5 गाड्यांचा तपशील आहे.
'फॅमिली इमर्जन्सी' म्हणजेच कौटुंबिक आणीबाणीमुळे हे सगळेजण खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास करत असून त्यांना या प्रवासासाठी सहाय्य करावं असं या पत्रात म्हटलंय.
गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
सध्याच्या घडीला कोणालाही प्रवासाची परवानगी नाही. फक्त इमर्जन्सीच्या वेळी पोलिसांच्या परवानगीने प्रवास करता येऊ शकतो. अशामध्ये वाधवान कुटुंबातल्या 23 जणांना खंडाळा ते महाबळेश्वर जाण्याची परवानगी कशी मिळाली याची चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय.
गृहखात्याचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या पत्राच्या मदतीने कपिल आणि धीरज वाधवान यांनी मुंबई ते पाचगणीचा पल्ला पार केल्याचं उघडकीला आलंय.
हे पत्र समोर आल्यानंतर अमिताभ गुप्ता यांना ताबडतोब सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. तर तर केंद्रीय यंत्रणांपैकी सीबीआय आणि ईडीने महाराष्ट्र पोलिसांशी यासंदर्भात संपर्क केला आहे.
'सक्तीची रजा ही धूळफेक'
अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवणं ही फक्त धूळफेक आहे, असं मत प्रशासकीय अधिकारी अशोक खेमका यांनी व्यक्त केलं आहे.
गुप्ता यांच्यावर कोणत्या नियमांतर्गत कारवाई करता येते हे सुद्धा खेमका यांनी अनिल देशमुख यांना ट्विटरवर दिलेल्या प्रत्युत्तरात सांगितलं आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. हे नक्की कोणाच्या आदेशानुसार झाले, याचं उत्तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी द्यावे असे त्यांनी म्हटलं आहे.
वाधवान बंधूंवर गैरव्यवहाराचे आरोप
फाळणीनंतर भारतात आलेल्या दिवाण कुलदीप सिंह वाधवान यांनी भारतामध्ये बांधकाम आणि वित्त व्यवसायाला सुरुवात केली. राजेश आणि राकेश ही त्यांची दोन मुलं. यापैकी राजेश वाधवान यांची मुलं - कपिल आणि धीरज ही DHFL शी संबंधित आहेत.
तर राकेश वाधवान आणि त्यांचा मुलगा सारंग वाधवान HDIL कंपनीचा कारभार पाहतात.
सध्या या दोन्ही कंपन्या आणि एकूणच वाधवान कुटुंब वेगवेगळ्या गैरव्यवहारांमध्ये सापडलेलं आहे.
मनीकंट्रोलने दिलेल्या बातमीनुसार ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) 16 मार्च रोजी वाधवान बंधूंना समन्स बजावलं होतं.
येस बँक घोटाळा प्रकरणी हे दोघंही आरोपी आहेत. 17 मार्चपूर्वी चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश या दोघांना देण्यात आले होते. पण सध्याच्या संसर्गजन्य परिस्थितीचं कारण देत या दोघांनी हजर होणं टाळलं.
7 मार्चला ईडीने येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर, वाधवान बंधू, RKW डेव्हलपर्स, आणि कपूर यांच्या मुलींच्या कंपन्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
PMC बँक घोटाळा प्रकरणी ज्या राकेश वाधवान यांच्यावर आरोप आहेत, ते कपिल आणि धीरज वाधवान यांचे काका आहेत.
राकेश वाधवान हे HDILचे प्रमोटर आहेत. 4355 कोटीच्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑप बँक (PMC) प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने राकेश वाधवान आणि त्यांचा मुलगा सारंग वाधवान यांना अटक केली होती.
PMC बँकेचे माजी अध्यक्ष वर्यम सिंग हे देखील या कुटुंबाच्या कंपन्यांशी संबंधित आहेत.
यापूर्वी HDIL कंपनीने मुंबईतल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी केलेला करारही वादग्रस्त ठरला होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)