कोरोना व्हायरस : दिल्लीतल्या निजामुद्दिनच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातले १०० पेक्षा जास्त लोक सहभागी - #5मोठ्याबातम्या

विविध वर्तमानपत्र आणि माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या पाच महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला संक्षिप्त आढावा.

1. दिल्लीच्या 'त्या' कार्यक्रमात महाराष्ट्रातील शंभरपेक्षा जास्त सहभागी

दिल्लीतल्या निजामुद्दीन इथली मुस्लिम संस्था तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात हजारो लोक सहभागी झाले होते. महाराष्ट्रातूनही या कार्य्रकमाला अनेकजण उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे.

एबीपी माझाच्या वृत्तानुसार महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील अनेकजण या कार्य्रकमाला उपस्थित होते. पोलीस आणि आरोग्य यंत्रणांतर्फे त्यांचा शोध घेतला जात आहे. दिल्लीच्या कार्यक्रमात सहभागी झालेले औरंगाबादचे 47 जण शहरात परतले आहेत. त्यातील 40 जणांची तपासणी करण्यात आली आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड मिळून 136 जण या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या सगळ्यांचा शोध घेऊन पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत.

याव्यतिरिक्त सोलापूर जिल्ह्यातील 16, नांदेड जिल्ह्यातील 13 तर परभणी जिल्ह्यातील तीन जण, अकोला जिल्ह्यातील 10 आणि चंद्रपूरच्या एकाचा यात सहभाग होता असं या वृत्तात म्हटलं आहे.

2. कस्तूरबा हॉस्पिटलची सफाई कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह

मुंबईतील कस्तूरबा रुग्णालयातील तीस वर्षीय महिला सफाई कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आढळली असल्याची बातमी इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे.

मुंबईतील याच हॉस्पीटलमध्ये कोव्हीड-19च्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकीकडे हॉस्पिटलचा स्टाफ योग्य साधन सामुग्री उपलब्ध नसल्याच्या तक्रारी करत असताना सफाई कर्मचाऱ्यांना साधे मास्क दिले जात आहेत.

कोरोना पॉझिटीव्ह आढळलेली सफाई कर्मचारी ही टिटवाळा येथील रहिवासी आहे. घरी जाऊ शकत नसल्याने ही कर्मचारी लहान मुलांसाठी असलेल्या 13 क्रमांकाच्या वार्डात तीन दिवसांपासून झोपत होती.

तिच्यात आजाराची लक्षण दिसल्यावर थ्रोट स्वॅब तपासणी करण्यात आली. त्यात ती पॉझिटीव्ह आढळून आली. याबाबत हॉस्पिटल सुपरीटेंडंट डॉ. चंद्रकांत पवार यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही तर आरोग्य खात्याने या प्रकरणाबाबत माहिती नसल्याचं सांगितलं, असं या बातमीत म्हटलं आहे.

राज्यात आत्तापर्यंत करोनाच्या ६ हजार ३२३ चाचण्या झाल्या आहेत त्यापैकी ५ हजार १११ जणांचे नमुने हे निगेटिव्ह आले आहेत, ही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. इतकंच नाही राज्यातल्या १३ शासकीय आणि ८ खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून आपण दररोज करोनाच्या ५ हजार ५०० चाचण्या करु शकतो अशीही माहिती राजेश टोपे यांनी दिली.

3. महाराष्ट्रात दररोज 5,500 चाचण्या शक्य - राजेश टोपे

महाराष्ट्रातील प्रयोगशाळांची संख्या वाढल्याने आता कोरोना व्हायरसशी संबधित चाचण्या कऱण्याचा वेगही वाढणार आहे. महाराष्ट्रात दररोज साडेपाच हजार चाचण्या करणं शक्य होणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

लोकसत्ताने दिलेल्या बातमीनुसार, सध्या राज्यात १३ शासकीय प्रयोगशाळांच्या माध्यमातून करोनाची चाचणी केली जात आहे.

त्याद्वारे दररोज २ हजार ३०० चाचण्या केल्या जाण्याची क्षमता आहे. आता त्यामध्ये अजून ३ शासकीय प्रयोगशाळांना मान्यता देण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यात शासकीय प्रयोगशाळांची संख्या १६ होईल, असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

राज्यात सध्या ८ खासगी प्रयोगशाळांमधून चाचण्या केल्या जात असून त्याद्वारे दररोज सुमारे २ हजार ८०० चाचण्या केल्या जाऊ शकतात.

मात्र सध्या तरी राज्यात मोठ्या प्रमाणावर चाचण्या करण्याची आवश्यकता नसून करोना उपचाराच्या प्रोटोकॉलनुसार चाचण्या केल्या जात असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

4. म्हणून मुख्यमंत्री सहाय्यताला निधी दिला नाही - देवेंद्र फडणवीस

पीएम फंड किंवा सीएम फंड असा कोणताही भेद आम्ही करत नाही. आमच्या आमदारांचे पैसे आहेत, ते भाजपच्या आपदा निधीला आम्ही दिले, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, फडणवीस यांना भाजपच्या आपदानिधीसंदर्भात विचारण्यात आलं असता ते म्हणाले, ज्यावेळी तीन जिल्ह्यांमध्ये पूर आला, त्यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने स्वतंत्रपणे आपले निधी तयार केले. त्यांनी पैसे घेतले आणि त्यातून लोकांची सेवा केली. शेवटी जनतेची कामं होणं महत्त्वाचं.

जर कोणाला सीएम फंडला मदत करायची असल्यास त्यांनी ती जरूर करावी, असं मी जनतेला आवाहन करतो. आतापर्यंत जे काही पॅकेजेस आले आहेत, ते सगळे केंद्राने दिले आहे, राज्याचा अद्याप एकही नाही. केंद्राकडेही पैशांचं झाड नाही, राज्य सरकारकडेही पैशाचं झाड नाही, त्यामुळे असा कुठल्या प्रकारचा भेदभाव नाही.

5. तीन महिन्यांचे धान्य एकत्र मिळणार

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार रेशन दुकानांवर लोंकांना अन्नधान्य वितरीत केले जाणार आहे.

सामनाने दिलेल्या वृत्तानुसार, एप्रील, मे आणि जून या तीन महिन्यांचे एकत्रित आगाऊ धान्य अंत्योदय आणि अन्नसुरक्षा योजनेच्या रेशनकार्डधारकांना पुरविण्यात येणार आहे.

या धान्याचे वाटप रेशनकार्डावर आजपासून सुरू करण्यात येईल. हे धान्य फक्त संबधित योजनेतील रेशनकार्डधारकांनाच पुरवण्यात येईल.

रेशन दुकानांदारांना कार्डधारकांसाठी वेळापत्रक तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. निर्धारित वेळेत फक्त 10 कार्डधारक धान्य घेण्यासाठी येतील.

हे नक्की वाचा

हे आवर्जून पाहा

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)