कोरोना: व्हायरसमुळे नव्हे रस्ते अपघातात स्थलांतरित कामगार गमावत आहेत जीव

    • Author, शादाब नाझमी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

कोरोना व्हायरस नव्हे तर रस्ते अपघातात स्थलांतरित कामगार बळी पडत आहेत. त्यांच्या या प्रवासाकडे आता अधिक गांभीर्याने पाहाण्याची गरज आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 24 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. या निर्णयामुळे जीवनावश्यक सेवा वगळून बाकी सगळी आस्थापनं बंद झाली. नागरिकांनीही अगदीच आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असा सल्ला सरकारने दिला. मात्र या निर्णयामुळे हातावर पोट घेऊन जगणाऱ्या स्थलांतरित कामगारांसमोर जगण्याचा आणि पर्यायाने अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला.

लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही, काम नाही त्यामुळे पैसा मिळणार नाही हे अटळ दिसत असल्याने देशभरात स्थलांतरितांनी घरची वाट धरली. दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत सगळीकडून कुटुंबकबिल्यासह विनाअन्नपाणी गावी निघालेल्या स्थलांतरितांचे तांडे टीव्हीच्या माध्यमातून दिसले.

शहरात जगण्याचा संघर्ष कठीण होईल या विचारातून हजारो स्थलांतरितांचे तांडे गावाकडे निघाले. वाहतुकीच्या सगळ्याच यंत्रणा बंद असल्याने काहींनी शेकडो-हजारो किलोमीटर दूर असलेल्या गावाकडे पायी कूच केलं.

लॉकडाऊनच्या घोषणेनंतर गावाच्या दिशेने निघालेले काही स्थलांतरित कामगार अपघातात सापडले असल्याचं स्पष्ट होतं आहे. देशभरात सर्वसाधारण दररोज रस्ते अपघातात 17 माणसं जीव गमावतात. परंतु लॉकडाऊन लागू झाल्यानंतर रस्ते अपघातात बळी जाणारी माणसं ही स्थलांतरित आहेत.

कारण लॉकडाऊनमुळे नागरी वाहतूक म्हणजेच प्रवासी वाहतूक बंद आहे. सरकारी तसंच खाजगी वाहतूक व्यवस्था बंद आहे. त्यामुळे रस्त्यावर होणारे अपघात स्थलांतरित कामगारांच्या शेवटाला कारणीभूत ठरत आहेत.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना घरात राहण्याचं तसंच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन केलं. मात्र समाजातल्या सगळ्या स्तरातील माणसं याचं पालन करू शकली नाहीत. हजारोंच्या संख्येतील स्थलांतरितांचे तांडे बस स्टँड परिसरात जमले.

29 मार्च 2020पर्यंत कोरोना व्हायरसमुळे 25 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे ही माहिती देण्यात आली. दुसरीकडे लॉकडाऊन काळात रस्ते अपघात आणि वैद्यकीय आपात्कालीन प्रसंगामुळे 20 जणांचा जीव गेला आहे.

बीबीसीने केलेल्या विश्लेषणानुसार, रस्ते अपघाताच्या चार प्रकारांची नोंद झाली आहे. प्रचंड अंतर पायी चालल्याने दोन ठिकाणी वैद्यकीय आपात्कालीन परिस्थिती उद्धली. अन्य एक प्रकारही घडला.

रस्ते अपघात

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, हैदराबादजवळ पेड्डा गोळकोंडा इथं 27 मार्च झालेल्या रस्ते अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये स्थलांतरित कामगारांसह दोन लहान मुलांचा समावेश होता. उघड्या ट्रकमधून ते प्रवास करत होते. कर्नाटकात गावी परतत असताना ते जात असलेल्या ट्रक आणि लॉरीची टक्कर झाली.

तेलंगणातही प्रचंड संख्येने स्थलांतरित कामगार जत्थ्याने उभे असल्याचं चित्र आहे. दोन अन्य घटनांमध्ये गुजरातमध्ये सहा स्थलांतरित कामगारांचा मृत्यू झाला आहे.

28 मार्च रोजी, मुंबई-अहमदाबाद हायवेवर पालघरजवळ वेगवान ट्रकने चार स्थलांतरितांना उडवलं. त्याच दिवशी गुजरातमध्ये वलसाड जिल्ह्यात दोन मजुरांचा मृत्यू झाला. ते रेल्वे पुलावरून जात होते, त्यावेळी मालगाडीने त्यांना उडवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही महिला होत्या. लॉकडाऊनमुळे आपल्या गावी परतत होत्या.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, कुंडली-मानेसर-पलवल एक्स्प्रेसवेवर एका गाडीने चारजणांना उडवलं. हे चारही जण चालत आपल्या गावी निघाले होते.

वैद्यकीय आपात्कालीन परिस्थिती

26 मार्च रोजी, 39 वर्षीय माणूस उत्तर प्रदेशात मोरेना जिल्ह्यात मृत्यूमुखी पडला. रणवीर सिंग असं त्याचं नाव असून तो दिल्लीत फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. तो आपल्या गावी परतत होता. दिल्लीपासून त्याचं गाव साधारण 300 किलोमीटर आहे. आग्र्यानजीक चालताना तो कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.

27 मार्च रोजी गुजरातमधील सुरत इथं 62 वर्षीय गंगाराम नावाच्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. गंगाराम हॉस्पिटलमधून घरी चालले होते. 8 किलोमीटर चालल्यानंतरही त्यांना घरी जाण्याकरता कोणतंही वाहन मिळालं नाही. ते त्यांच्या घराजवळच्या पांडेलापा इथं बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना हॉस्पिटलात भरती करण्यात आलं. तिथे त्यांचा मृत्यू घोषित करण्यात आला.

प्रत्येक अपघातासंदर्भात किमान दोन वेगवेगळ्या बातम्यांनुसार शहानिशा करण्यात आली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)