You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुपर-30 चे आनंद कुमार विद्यार्थ्यांची यादी का जाहीर करत नाही?
बिहारमधील सुपर-30 क्लासेसचे प्रमुख आनंद कुमार यांच्यावर आधारित एक चित्रपट प्रदर्शित होत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून ते वादातही सापडले आहेत.
निकालापूर्वी ते सुपर-30मधील विद्यार्थ्यांची यादी जाहीर करत नाही, असा त्यांच्यावर आरोप केला जातो.
बीबीसी प्रतिनिधी सरोज सिंह यांनी आनंद कुमार यांना फेसबुक लाईव्हमध्ये असे अनेक प्रश्न विचारले.
तुम्ही निकालापूर्वी विद्यार्थ्यांची यादी का जाहीर करत नाही, यावर त्यांनी सांगितलं, "हे चूक आहे. 2010, 2015 आणि जेव्हा केव्हा अशी चर्चा झाली तेव्हा आम्ही परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली आहे. बऱ्याच वेळा असं होतं की, त्या काळात विद्यार्थ्यांची खरेदी-विक्री सुरू केली जाते आणि आम्हाला अडचणींचा सामना करावा लागतो.
"आजही आम्ही शिकवलेले विद्यार्थी अमेरिका, जपान आणि भारतातील प्रत्येक ठिकाणी आहेत. यातल्या अनेक मुलांचे फोटो सुपर-30मध्ये यायच्या आधी आणि नंतरचे फोटो फेसबुकवर टाकून त्यांच्यावर लिहितो. यावर्षीही निकाल लागायच्या आत विद्यार्थ्यांची यादी मी बीबीसी आणि काही इतर लोकांना नक्की देईल."
बीबीसीसोबत यापूर्वी बोलतानाही त्यांनी सुपर-30मधील विद्यार्थ्यांची यादी देऊ, असं म्हटलं होतं. पण आजपर्यंत त्यांनी यादी दिलेली नाही.
परीक्षेपूर्वी यादी जाहीर का नाही करत?
IIT ची तयारी करण्यासाठी खूप वेळ लागतो. यात आनंद कुमार विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यासाठी नेहमी निकालाची तारीख येईपर्यंत वाट का पाहतात?
यावर ते सांगतात, "आजपर्यंत आम्ही कुणाकडूनही देणगी घेतली नाही. ना बिहार सरकारकडून ना केंद्र सरकारकडून. असं असतानाही आम्ही गरीब मुलांना मदत केली. आमच्या भावावर हल्ला झाला. त्याचा पाय तुटला आहे. लोकांनी त्याच्यावर ट्रक चालवला. आमच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. बिहार सरकारमध्ये अशा अनेक घटना नोंदवल्या गेल्या आहेत. त्यामुळे कुणाचं जीवन संकटात येवो, असं आम्हाला वाटत नाही. विद्यार्थ्यांची नावं परीक्षेपूर्वी जाहीर करण्यानं हे संकट ओढवू शकतं. शेवटी ते तीन-चार लोक कोण आहेत? जे वारंवार हा आरोप लावतात."
ते पुढे सांगतात, "मी काही गुन्हा केला आहे की सीबीआय चौकशी करेल. उत्तर देण्यासाठी आम्ही कुणाप्रती जबाबदार नाही आहोत. परीक्षा झाली आणि निकाल येणार असेल तर सर्व विद्यार्थ्यांना समोर घेऊन येईल. आमचे विद्यार्थी संघर्ष करतात. यासारख्या चर्चांमुळे आम्हाला दु:ख होतं. आजपर्यंत आम्ही जे केलं त्यामुळे बिहारचं नाव झालं आहे."
सुपर-30मध्ये रामानुजन क्लासेसमधील निवडक विद्यार्थीही असतात, असा आनंद कुमार यांच्यावर आरोप होतो.
यावर ते सांगतात, "परीक्षेपूर्वी यादी जाहीर करण्याची चर्चा करून काही लोकांना आरोप-प्रत्यारोपांची सुरुवात करायची असते. 2007मधील गोष्ट आहे. आमच्या मुलांना दुसऱ्या कोचिंग क्लासेस वाल्यांनी खरेदी केलं. डिस्कव्हरी चॅनेलनं ही बाब कव्हर केली. ज्यांना विश्वास ठेवायचा आहे त्यांनी ठेवावा, ज्यांना नाही ठेवायचा त्यांनी ठेवू नये. आमचं जे काम आहे ते आम्ही करत राहू. आमच्या अटी आणि सुविधांनुसार ते काम पुढे चालवत राहू. जेव्हा आमची इच्छा होईल, चांगलं वातावरण असेल तेव्हा आम्ही विद्यार्थ्यांची यादी जाहीर करू."
रामानुजन क्लासेस बद्द्ल काय म्हणतात आनंद कुमार?
आनंद कुमार सुपर-30 शिवाय रामानुजन क्लासेससुद्धा चालवतात.
आनंद सांगतात, "रामानुजन क्लास चालवून काही पैसे कमवावे ही आमची कल्पना होती. या पैशांवर सुपर-30 चे विद्यार्थी, शिक्षक आणि घरखर्च चालतो. रामानुजन क्लासेसमध्ये 300 ते 400 विद्यार्थी असतात. दीड वर्षांसाठी 27 हजार फी घेतो. जे फी नाही देऊ शकत त्यांना फ्रीमध्ये शिकवलं जातं."
आनंद कुमार असं म्हणत असताना बीबीसीच्या एका प्रेक्षकानं कमेंट केली की, "रामानुजन क्लासेसमध्ये 1500 विद्यार्थी शिकतात आणि प्रत्येकाकडून 33 हजार रुपये घेतले जातात. तुम्हाला अधिक पैशांची काय गरज आहे?"
33 हजार रुपयांत जीएसटीसुद्धा असतो. 1500 विद्यार्थी नाहीत. नुसतं म्हणायचं म्हणून अनेक लोक म्हणतात, "तुमसे दिल लगाकर बड़ा मुश्किल है मुस्कुराना, मरने न दे मुहब्बत, जीने न दे ज़माना.''
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)