शिक्षक भरती : अमोल इंद्राळेची लातूर महापालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून निवड

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी

लातूरचा अमोल इंद्राळे आतापर्यंत चार वेळा शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. गेल्या 5 वर्षांपासून तो शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत होता. शुक्रवारी (09 ऑगस्ट) शिक्षक भरतीचा निकाल लागला आणि अमोलची लातूर महापालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून निवड झाली. बीबीसी मराठीनं 11 फेब्रुवारी 2018ला त्याच्या मागणीला वाचा फोडली होती.

"शिक्षक भरती व्हावी यासाठी बीबीसी मराठी पहिल्यापासून आमच्या पाठीशी राहिली, त्यामुळे बीबीसी मराठीचे आभार," अशा शब्दांत अमोलनं भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, राज्य सरकारनं 12 हजार पदांसाठी शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे.

अमोलचा प्रवास

अमोल आणि त्याच्यासारखे जवळपास 55 हजार पात्र उमेदवार 2010पासून शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत होते. बीबीसी मराठीनं अमोलशी संपर्क साधून त्याची कैफियत मांडली होती.

"महिन्याची एक तारीख आली की, तो मला आयुष्यातला सर्वात लाजिरवाणा दिवस वाटतो, कारण त्या दिवशी घरी रूम भाडं आणि मेससाठी पैसे मागावे लागतात," 2013पासून शिक्षक भरतीची वाट पाहणारा अमोल इंद्राळे त्वेषानं सांगत होता.

अमोल मूळचा लातूर जिल्ह्यातील नागेशवाडी गावचा. आईवडिलांचा मुख्य व्यवसाय शेती. लवकर नोकरी लागेल आणि घर चालवायला हातभार लावता येईल म्हणून अमोलनं डी. एड. केलं.

2013साली तो डी.एड पास झाला. त्याच वर्षीपासून राज्य सरकारनं शिक्षक पात्रता परीक्षा (TET) घेण्याचं धोरणं स्वीकारलं. कारण केंद्र सरकारनं 'राईट टू एज्युकेशन' कायद्याअंतर्गत शिक्षक म्हणून नोकरी करायची असल्यास TET उत्तीर्ण असणं बंधनकारक केलं. मग या परीक्षेची तयारी करण्यासाठी अमोल लातूरला आला.

2013ला झालेली TET तो उत्तीर्ण झाला. पात्रतेसाठी आवश्यक असणाऱ्या 55 टक्क्यांपेक्षा 7 टक्के अधिक म्हणजेच 62.42 टक्के गुण त्याने मिळवले.

"15 डिसेंबर 2013 रोजी झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत प्राप्त गुणांनुसार अमोल संजीव इंद्राळे यांनी 1ली ते 5वी करिता शिक्षक पात्रता धारण केली आहे," असा स्पष्ट उल्लेख परीक्षेनंतर अमोलला मिळालेल्या प्रमाणपत्रात करण्यात आला.

"2013 सालची परीक्षा पास झालो तेव्हा वाटलं शिक्षक भरती होईल. पण ना भरती झाली ना नोकरी मिळाली. नोकरीच्या नावाखाली परीक्षेवर परीक्षा माथ्यावर मारण्यात आल्या," असं अमोल सांगतो.

परीक्षांवर परीक्षा

त्यानंतर 2015साली शासनानं पुन्हा TET परीक्षा घेण्याचं जाहीर केलं. अमोलनं तोपर्यंत बी. ए.ची पदवी घेतली होती. त्यामुळे त्याला TETचा पेपर क्रमांक दोन देता येणार होता.

2015 सालची TET अमोल 61.90 टक्के मिळवून उत्तीर्ण झाला. "प्रमाणित करण्यात येते की, अमोल संजीव इंद्राळे यांनी 6वी ते 8वी (उच्च प्राथमिक स्तर) करिता महाराष्ट्र शिक्षक पात्रता धारण केली आहे," अशा आशयाचं प्रमाणपत्र परीक्षेनंतर त्याला देण्यात आलं.

"2013ला मी प्राथमिक स्तरावरची आणि 2015ला उच्च प्राथमिक स्तरावरची TET पास झालो. यावेळेस तरी शिक्षक भरती होईल आणि नोकरी मिळेल अशी आशा होती, ती साफ धुळीस मिळाली," अमोल हताश होऊन सांगतो.

अमोलने लातूरला शिक्षक भरतीसोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली होती. रूमचं भाडं, मेस, क्लासची फी आणि विविध परीक्षा असं मिळून 2013 ते 2016 या काळात 2.5 लाख रुपये खर्च झाल्याचे तो सांगतो.

यानंतर फेब्रुवारी 2016ला केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या 'केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षे'मध्ये (C-TET) अमोलने 60 टक्के गुण मिळवले..

'जागा जाहीर न करताच परीक्षा'

यानंतर इतर परीक्षांची तयारी करण्यासाठी अमोलने पुणे गाठलं. 2017साली राज्य सरकारनं शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी' (TAIT) ही परीक्षा घेतली.

TET पास झालेल्या विद्यार्थ्यांनाच ही परीक्षा देता येणार होती. "किती जागांसाठी ही परीक्षा घेतली जात आहे, हे जाहीर न करताच परीक्षा घेतली गेली. असा प्रकार मी पहिल्यांदाच अनुभवत होतो," असं अमोल या परीक्षेविषयी सांगितलं होतं.

12 ते 21 डिसेंबर 2017च्या कालावधीत ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात आली.

"200 गुणांची ही परीक्षा मी 151 मार्क घेऊन पास झालो. परीक्षा झाल्याझाल्या स्क्रीनवर मार्क दिसत होते. पण हेल्पलाईनवर वारंवार विचारणा करूनसुद्धा परीक्षेचं प्रमाणपत्र मिळालेलं नाही. निकाल आठवड्याभरात येईल, असं उत्तर मात्र दिलं जातं," अशा शब्दांमध्ये अमोलनं खंत व्यक्त केली होती.

वेगवेगळ्या परीक्षांच्या तयारीसाठी आतापर्यंत 4 लाख रुपये खर्च झाले असल्याची माहिती त्यानं दिली होती.

"सरकारनं शिक्षक भरती घेतली तर माझा नंबर 100 टक्के लागेल. कारण अभियोग्यता चाचणीत मला 151 मार्क्स मिळाले आहेत. नाहीतर मी केलेल्या अभ्यासाची, मिळवलेल्या मार्कांची किंमत शून्य असेल," असं तो म्हणाला होता.

"सरकार पकोडे तळायला रोजगार म्हणत आहे. पण हेच जर त्यांनी चार वर्षांपूर्वी म्हटलं असतं तर यांची मानसिकता तेव्हाच कळाली असती. यांच्यासाठी पकोडे मनोरंजनाचा विषय असेल पण शिक्षक भरती माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे," अमोलनं सांगितलं होतं.

"गावाकडं गेल्यावर गावाकडची माणसं टोमणे मारतात. घरच्यांना बातम्यांतून कळतं की 23 हजार शिक्षकांच्या जागा रिकाम्या आहेत. मग ते सारखे-सारखे फोन लावून विचारतात, निकाल आला, पास झाला मग नंबर कसा काय लागत नाही? याच प्रश्नाचा जाब सरकारला विचारण्यासाठी आम्ही 20 फेब्रुवारीला मुंबईत शिक्षकभरतीच्या मागणीसाठी मोर्चा काढणार आहोत. पण आम्हाला मोर्चासाठी परवानगी दिली जात नाही. सगळ्याच बाबतीत आमची गोची झालीय. कुणीतरी ऐकायला हवं आमचं." अशा कळकळीच्या शब्दांमध्ये त्यानं आपलं म्हणणं मांडलं होतं.

शिक्षक भरती प्रकरण नक्की काय?

केंद्र सरकारच्या 'राईट टू एज्युकेशन' कायद्याची अंमलबजावणी राज्यात 1 एप्रिल 2010पासून सुरू झाली.

या कायदयातील कलम 23नुसार शिक्षक म्हणून नोकरी मिळण्याकरता शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET उत्तीर्ण होणं अनिवार्य करण्यात आलं.

त्यासाठी महाराष्ट्र सरकारनं 2013 साली सर्वप्रथम TETची परीक्षा घेतली. 2013 नंतर 2014, 2015 आणि 2017 अशी चार वर्षं ही परीक्षा घेण्यात आली.

आजपर्यंत अमोलसारखे एकूण 55 हजार विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. आता मात्र हे सर्व विद्यार्थी शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत.

एवढ्या मोठ्या संख्येनं प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांबद्दल विचारल्यावर अमोल सांगतो, "दरवर्षी 3 लाख विद्यार्थी TETच्या परीक्षेसाठी अर्ज करतात. यासाठी पेपर एक साठी 500 रुपये आणि पेपर दोन साठी 800 रुपये परीक्षा फी आकारली जाते. गेल्या चार वर्षांपासून सरकार परीक्षेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमवत आहे. सरकार फक्त पात्रता परीक्षाच घेत आहे. प्रत्यक्षात शिक्षक भरती मात्र घेत नाही."

शिक्षक भरती का नाही?

"महाराष्ट्रात एकूण 7 लाख शिक्षक आहेत. दरवर्षी यातले दीड टक्के शिक्षक निवृत्त होतात. म्हणजे जवळपास 7 हजार शिक्षकांच्या जागा दरवर्षी रिक्त होतात. या जागा सरकार भरत नाही कारण, एका शिक्षकाचा 25 हजार रुपये पगार पकडला तर 7 हजार शिक्षकांच्या दर महिन्याच्या पगारापोटी द्यावे लागणारे 18 कोटी रुपये सरकारला वाचवायचे असतात. त्यासाठी मग कधी संचमान्यतेचं तर कधी वेगवेगळ्या परीक्षांचं कारण सरकारकडून दिलं जातं आणि शिक्षक भरती लांबतच जाते," असं शिक्षण क्षेत्रात सक्रिय असलेले हेरंब कुलकर्णी सांगतात.

"शिवाय सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वय 58वरून 60 करण्याचा सरकारचा मानस आहे. तसं जर झालं तर शिक्षक भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची संधी कायमची संपून जाईल," असं कुलकर्णी पुढे सांगतात.

"आज शिक्षण खात्यात दीड लाख पदं रिक्त आहेत. असं असतानाही हे सरकार असलेली पदं कमी करत आहे, आहेत त्या शिक्षकांना सरप्लस (अतिरिक्त) ठरवून मोकळं होत आहे. शिक्षण सचिवांच्या वक्तव्यानुसार 80 हजार शाळा बंद करण्याचा सरकारचा विचार आहे. भारतीय जनता पक्षाचं सरकार शिक्षणविरोधी असल्यामुळे त्यांनी शिक्षक भरती पूर्णपणे बंद केली आहे," असं कारण शिक्षक भरती न घेण्यामागे असल्याचं शिक्षक भारती संघटनेचे आमदार कपिल पाटील सांगतात.

'सरकारी पातळीवर संभ्रम'

शिक्षक भरतीबद्दल राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नवीन शिक्षक भरतीची गरज नसल्याचं सांगितलं होतं. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "आधी गरजेपेक्षा जास्त शिक्षकांची पदे भरण्यात आली आहेत. शिवाय खासगी शाळांकडे मुलांचा कल वाढला आहे. त्यामुळे नव्याने शिक्षक भरतीची गरज नाही. जेव्हा गरज भासेल त्यावेळेस भरती घेण्यात येईल."

पण राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी याच दिवशी दुपारी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत येत्या 6 महिन्यांत शिक्षकांच्या 24 हजार जागा भरू असं सांगितलं होतं.

एकीकडे शिक्षण सचिव शिक्षक भरतीची गरज नसल्याचं सांगत आहेत तर दुसरीकडे शिक्षणमंत्री शिक्षक भरती करण्याचं आश्वासन देत आहे. यामुळे सरकारी पातळीवरच शिक्षक भरतीविषयी संभ्रम असल्याचं समोर येत आहे.

तावडेंच्या आश्वासनाविषयी डी.एड. बी.एड विद्यार्थी संघटने'चे प्रमुख संतोष मगर यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, "महिन्याभरात 12 हजार जागा भरू असं आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी वर्षभरापूर्वी दिलं होतं आणि आता सहा महिन्यांत 24 हजार जागा भरू असं ते म्हणत आहेत. पण पूर्वानुभव लक्षात घेता आमचा त्यांच्या घोषणेवर विश्वास नाही. तातडीने शिक्षक भरती करण्यात यावी, या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम आहोत."

"24 हजार जागा भरायला शिक्षणमंत्र्यांना सहा महिने कशाला लागतात? TAITमध्ये पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी सरकारकडे उपलब्ध आहे. त्याआधारे पात्र विद्यार्थ्यांना सरकारनं महिन्याभरात नियुक्त्या द्याव्यात. अन्यथा यापुढील TET आणि TAIT परीक्षांना न बसण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे," असं मगर यांनी पुढे सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)