You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ती कौमार्य चाचणीत नापास झाली तेव्हा...
- Author, प्राजक्ता धुळप
- Role, बीबीसी मराठी
नवविवाहित महिलांची कौमार्य चाचणी करणाऱ्या 'अमानुष' प्रथेला कंजारभाट समाजातले तरुण विरोध करू लागले आहेत. ही प्रथा संपवण्याच्या उद्देशाने "stop the V ritual" हे अभियानही तीन महिन्यांपूर्वी सुरू झालं आहे. पण या प्रथेच्या बळी पडलेल्या अनीतासारख्या अनेकजणी जिवंतपणीच मरणयातना भोगत आहेत.
अनीताचं लग्न झालं तेव्हा तिचं वय होतं 22 वर्ष. आज तिच्या लग्नाला दोन वर्ष झाली आहेत. लग्नानंतर दुसऱ्या दिवशी पार पडलेला कौमार्य चाचणीचा तो प्रसंग आठवला की अनीताचे अश्रू आजही थांबत नाहीत.
कंजारभाट समाजातील नवविवाहित महिलांना या कौमार्य चाचणीचा सामना करावा लागतो. कंजारभाट या भटक्या-विमुक्त जमातीत मोडणाऱ्या समाजाची लोकसंख्या दोन लाखांच्या आसपास आहे. नवरी मुलगी 'खरी' आहे की 'खोटी' हे ठरवण्यासाठी 'गुणपद्धत' ही प्रथा या जातीत आहे. जातीची स्वतंत्र घटना आहे. ती पाळणं जातीतल्या सर्वांना बंधनकारक असते आणि जात-पंचायत त्याविषयीचा न्यायनिवाडा करते.
लग्नाच्या विधीचाच एक भाग म्हणून कौमार्य चाचणी घेतली जाते. त्याशिवाय लग्न ग्राह्य धरलं जात नाही. त्यावर शिक्कामोर्तब करण्याचा अधिकार कंजारभाट समाजाच्या पंचांकडे म्हणजेच जात-पंचायतीकडे असतो.
नवविवाहित जोडप्याला लग्नाच्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी एका खोलीत पाठवलं जातं. गादीवर सफेद चादर किंवा सफेद कपडा अंथरला जातो. यावेळी खोलीबाहेर दोन्हीकडचे नातेवाईक आणि पंच उपस्थित असतात. शारीरिक संबंध करताना रक्तस्त्राव झाला तर नवरी मुलगी 'खरी' म्हणजेच कौमार्य शाबूत होतं, असं समजलं जातं. जर चादरीवर रक्त आढळलं नाही तर त्याचे परिणाम नवऱ्यामुलीला भोगावे लागतात. तिला चारित्र्यहीन म्हणून हिणवलं जातं.
चप्पलेने मारण्याची प्रथा!
बायकोचं चारित्र्य सिद्ध झालं नाही तर या समाजातल्या पुरुषांना लग्न मोडायचा अधिकार असतो. खोलीतून बाहेर आल्यावर जमलेल्या सर्वांसमोर नवऱ्यामुलाला प्रश्न विचारला जातो, 'तुझी पत्नी खरी आहे की खोटी.' नवऱ्यामुलाने खोटी आहे, असं उत्तर दिलं तर तिला चप्पलेने मारण्याची प्रथाही आहे.
पहिल्या रात्री स्त्रीला रक्तस्त्राव होतो, हा प्रचलित समज आतापर्यंत अनेक तज्ज्ञांनी चुकीचा ठरवला आहे.
"पहिल्यांदा शरीरसंबंध होताना रक्तस्त्राव न होण्याची अनेक कारणं आहेत," असं दिल्लीस्थित स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सोनिया नाईक सांगतात.
"खेळात सक्रिय असणाऱ्या मुलींच्या बाबतीत किंवा हस्तमैथून केलं असेल तर हायमन (पडदा) नसू शकतं. अशा स्थितीत पहिल्या वेळी रक्तस्त्राव होण्याची शक्यता नसते. तसंच समंजस जोडीदार पहिल्या वेळी कोणताही रक्तस्त्राव होऊ न देता संभोग करू शकतो. समाजात पहिल्या रात्रीविषयी चुकीचे समज आहेत," असं त्या म्हणाल्या.
कौमार्य चाचणीत नापास झालं तर काय होतं, हे अनीताने बालपणापासून पाहिलं होतं. लग्नाआधीच अनीताचे होणाऱ्या नवऱ्यासोबत संबंध होते. पण पुढे काय वाढून ठेवलंय, याची तिला पुसटशीही कल्पना नव्हती.
"मला वाटलं होतं जात-पंचायतीसमोर माझा नवरा माझ्या बाजूनं उभा राहील. पंचांनी त्याला मी खरी आहे की खोटी असं जेव्हा विचारलं, तेव्हा त्याने स्वच्छ, कोरी चादर दाखवली. रक्ताचा एकही डाग नव्हता. त्याने मला खोटं ठरवलं," असं ती म्हणाली.
"मला धक्का बसला. लग्नाआधी सहा महिन्यापांसून ज्याला मी ओळखते तो माझा नवरा असा का वागला? हा प्रश्न मला अजूनही सतावतो," ती सांगते.
"पंच मला खोटं म्हणाले आणि निघून गेले. मी एकटी पडले. माझं रडणं थांबत नव्हतं," ती म्हणाली.
अनीताच्या नवऱ्याला हे लग्न मान्य नव्हतं. पण सामाजिक कार्यकर्त्यांच्या दबावामुळे त्याच्यावर दडपण आलं. कौमार्य चाचणीच्या त्या घटनेची माहिती काही सामजिक कार्यकर्त्यांना लागली आणि त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.
अनीता सासरी गेली पण तिच्या यातना काही थांबल्या नाहीत. "खोटी ठरले म्हणून सततची मारहाण आणि छळ सुरू झाला," अनीता सांगत होती.
कुटुंबाला वाळीत टाकलं!
जात-पंचायतीने या जोडप्याला 'खोटं' ठरवल्याने दोन्हीकडील कुटुंबांना कंजारभाट समाजाने वाळीत टाकलं. त्यांना कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेण्यास मज्जाव करण्यात आला. "मी गरोदर राहिल्यानंतर परिस्थिती सुधारेल असं मला वाटलं होतं. पण उलट माझा त्रास वाढला. माझा नवरा मला सतत विचारायचा की हे मूल कोणाचं आहे. हाच प्रश्न जात पंचायत त्याला आजही विचारते," ती म्हणाली.
गेल्या वर्षी तिला नवऱ्याने सहा महिन्यांच्या बाळासह घराबाहेर काढलं. आता ती आपल्या आई-वडिलांसोबत राहातेय. ती म्हणते कौमार्य चाचणीत नापास झाल्याचा परिणाम तिलाच नाही, तर सगळ्या कुटुंबालाच भोगावा लागतोय. तिच्यापेक्षा लहान असलेल्या दोन बहिणींना लग्नासाठी स्थळं येत नाहीत.
विवेक तमाईचीकर यांनी कौमार्य चाचणीच्या या प्रथेच्या विरोधात पाऊल टाकलंय. 25 वर्षांचे विवेक यांनी कंजारभाट समाजातील तरुण मुलं आणि मुलींना घेऊन अभियान सुरू केलंय. ही 'मागासलेली' प्रथा पूर्ण संपली पाहिजे, यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
"ही प्रथा म्हणजे नवविवाहित जोडप्याच्या खासगीपणाच्या हक्काचा भंग आहे आणि ज्या पद्धतीने कौमार्य चाचणीची प्रक्रिया पार पडते ती अत्यंद अपमानास्पद, घृणास्पद आणि अमानुष आहे," असं विवेक सांगतात.
विवेकना पहिल्यांदा या प्रथेबद्दल कळलं तेव्हा ते सातवीत शिकत होते. कौमार्य चाचणीत खोटी ठरलेल्या एका नवविवाहित मुलीला चप्पल आणि बुटांनी मारहाण करण्यात आली. "काय सुरू आहे हे मला काहीच कळत नव्हतं नंतर मोठा झालो तेव्हा खरा प्रकार कळला.''
विवेक यांचा कंजारभाट समाजातीलच मुलीसोबत साखरपुडा झालाय. विवेक आणि त्यांच्या पत्नीने लग्नानंतर कौमार्य चाचणी करायची नाही असा निर्णय घेतलाय. तसं जात पंचायतीलाही सांगितलंय. पण त्यापुढे जाऊन विवेक यांनी समाजातल्या तरुणांच्या मनातल्या प्रश्नालाही वाचा फोडली आहे.
कौमार्य चाचणीला विरोध करणारी कंजारभाट समाजातील अनेक तरुण मंडळी आता एकत्र आली आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वी "stop the V ritual" नावाचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. साठ जणांच्या या ग्रुपमध्ये साधारण निम्म्या मुली आहेत. कंजारभाट समाजातील या प्रथेला संपवण्यासाठी हे सर्वजण लोकांशी संवाद साधत आहेत.
पण जातीच्या विरोधात गेल्याने या ग्रुपमधल्या तरुणांना मोठी किंमत मोजावी लागत आहे.
पुण्यात कंजारभाट समाजाच्या एका लग्नात पाहुणे म्हणून गेलेल्या तीन तरुणांवर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला. हे तीघेही "stop the V ritual"च्या अभियानात सहभागी आहेत. काहींच्या पालकांना जात-पंचायतीने सामाजिक बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे.
'जात पंचायतीने मला 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे. मी माझं अभियान मागे घेतलं नाही तर माझ्यावर महाराष्ट्रात ठिकठिकाणी मानहानीचे दावे केले दाखल केले जातील असं सांगण्यात आलं आहे.' पण विवेक यांनी आपलं अभियान सुरूच ठेवायचं असं ठरवलं आहे.
विवेक यांना आशा आहे की, कंजारभाट समाजातल्या कौमार्य चाचणीविषयी जाहीरपणे चर्चा झाल्याने ही प्रथा कायमची बंद होईल.
हे वाचलंत का?
हे पाहिलं आहे का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)