भारतात सरकारी नोकरीसाठी इतकी मारामारी का?

    • Author, निखिल हेमराजानी
    • Role, बीबीसी कॅपिटल

अनीश तोमर यांनी भारत सरकारकडे नोकरीसाठी अर्ज केलाय. ही सगळी प्रक्रिया त्यांना चांगलीच माहीत आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचा त्यांचा हा तब्बल सातवा प्रयत्न आहे. नेहमीप्रमाणे, यंदाही कठीण स्पर्धा तर आहेच, पण विशेष म्हणजे यावेळी त्यांना थेट त्यांच्या पत्नीशीच स्पर्धा करावी लागणार आहे.

भारतीय रेल्वेतील मेडिकल (वैद्यकीय) ऑर्डर्ली या पदासाठी अर्ज करणाऱ्यांत तोमर पतीपत्नीही आहेत.

हे काम तुलनेने खालच्या पदावरचे आहे, पण अगदी हजारो जरी नाही, तरी किमान शेकडो अर्ज तरी यासाठी नक्कीच आले आहेत. सरकारी नोकरीसाठी तोमर यांनी यापूर्वी केलेल्या प्रयत्नांच्या वेळीसुद्धा हीच परिस्थिती होती. ते अतिचिकित्सक मुळीच नाहीत. त्यांनी यापूर्वी त्यांनी शिक्षक आणि वन रक्षक या पदांसाठीही अर्ज केले होते. पण दोन्ही वेळा त्यांच्या पदरी अपयश आले.

"वन विभागाने घेतलेल्या शारीरिक चाचणीत मी अपयशी ठरलो," अठ्ठावीस वर्षीय तोमर सांगतात.

कापड उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या राजस्थानातील भिलवाडा या शहरात सध्या आरोग्यसेवा देणाऱ्या खासगी कंपनीत ते मार्केटींग एक्झिक्युटीव्ह आहेत. त्यांना दरमहा २५,००० रुपये पगार मिळतो. ही नोकरी म्हणजे काम जास्त आणि पगार कमी असल्याचं ते सांगतात.

भारतातील छोट्या शहरांमध्ये रहाणाऱ्या तोमर यांच्यासारख्यांसाठी सरकारी नोकरीची संधी मिळणं हा एका अर्थाने संघर्षच असतो. ही नोकरी सुरक्षा, डोक्यावर छप्पर आणि कुटुंबासाठी मोफत वैद्यकीय सहाय्य यांची हमी देईल, असं त्यांना वाटतं. त्याशिवाय कर्मचाऱ्याच्या संपूर्ण कुटुंबासाठी प्रवासाचे पास सारख्या इतर सुविधाही असतात.

२००६च्या व्यापक अशा नागरी सेवा वेतन आढाव्यानंतर, सरकारी नोकरीतील पगार हे खासगी क्षेत्राशी स्पर्धा करणारे आहेत. जर तोमर यांना हवी असलेली नोकरी मिळाली तर त्यांना भारतीय रेल्वेतर्फे त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयात काम करावे लागेल. या नोकरीत त्यांना दरमहा ३५,००० रुपये वेतन मिळविण्यापर्यंत प्रगती करू शकतात.

त्यामुळेच रेल्वे किंवा राज्य पोलीस यांसारखे विभाग जेव्हा भरती प्रक्रिया सुरू करतात, तेव्हा त्यांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद हा आश्चर्यकारक नसतो. उपलब्ध जागांसाठी येणारे अर्ज बऱ्याच फार जास्त असतात.

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी तोमरला थोडी नशिबाची साथही लागणार आहे. कारण प्रत्येक पदासाठी सरासरी दोनशेहून जास्त अर्जदार आहेत. मार्चमध्ये रेल्वे भरती बोर्डाने १ लाख जागांसाठी देशभरात जाहिरात दिली. यात ट्रॅकमन, पोर्टर्स आणि इलेक्ट्रीशियन्स अशा पदांचा समावेश होता. 2 कोटी 30 लाखापेक्षा जास्त लोकांनी यासाठी अर्ज केले.

हा प्रचंड प्रतिसाद अस्वाभाविक नव्हता. काही महिन्यांपूर्वी मुंबई पोलीस दलातील हवालदार या सर्वांत कनिष्ठ पदासाठी अर्ज मागवण्यात आले होते. या पदाच्या १,१३७ जागांसाठी मुंबईतील २ लाख रहिवाशांनी अर्ज केले. तर २०१५मध्ये उत्तर प्रदेशातील स्थानिक सरकारी सचिवालयातील ३६८ कारकुनी नोकऱ्यांसाठी २३ लाख अर्ज आले.

हा आकडाच इतका प्रचंड होता, की राज्यातील अधिकाऱ्यांनी ही भरती मोहीम रद्द केली. कारण या सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी त्यांना चार वर्षांहून जास्त काळ लागला असता.

अनेक वेळा या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही गरजेपेक्षा कितीतरी जास्त असते. अर्ज करणाऱ्यांत अभियांत्रिकी किंवा व्यवसायिक पदवीधरांचे प्रमाण मोठे असते. यातील काही पदांसाठी सायकल चालवता येणं आणि दहावीपर्यंत शिक्षण एवढीच पात्रता आवश्यक होती. रेल्वेमध्ये १ लाख नोकऱ्यांपैकी कुठल्याही नोकरीसाठी माध्यमिक शाळेपर्यंत शिक्षण इतकीच पात्रता आवश्यक होती.

असे काय आहे, ज्यामुळे अधिक पात्रता असलेले लोकसुद्धा मोठ्या प्रमाणात या कनिष्ठ नोकऱ्यांकडे आकर्षित होतात? त्यामागे चांगला पगार आणि इतर लाभ याव्यतिरिक्त इतर कारणंही नक्कीच असतील.

सरकारी नोकरी मिळणं म्हणजे लग्नाच्या बाजारातील वधारणारं मूल्य. २०१७ला भारतातर्फे ऑस्करसाठी पाठवलेल्या न्यूटन या चित्रपटातून हीच परिस्थिती दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेता राजकुमार रावने साकारलेल्या मध्यवर्ती पात्राला जोडीदाराचा शोध घेताना त्याची सरकारी नोकरी लाभदायक ठरते.

"तिचे वडील कंत्राटदार आहेत आणि तू सरकारी अधिकारी आहेस. म्हणजे आयुष्य अगदी निवांत," न्यूटनचे वडील म्हणतात. तर यात भर घालताना त्याची आई म्हणते,"त्यांनी दहा लाख रुपये हुंडा आणि मोटारसायकल देऊ केली आहे."

रेल्वेला भारतात मोठं महत्त्व आहे. अमेरिकेत प्रवास करण्याचा विचार केला तर मनात रोड-ट्रीप्स येतात. भारतासाठी मात्र हा प्रवास रेल्वेचा असतो.

उत्तर प्रदेशातील गोरखपूर आणि झांसी आणि दक्षिणेकडे आणखी पुढे जात मध्य प्रदेशातील इटारसी, यांसारख्या शहरांच्या विकासाचे श्रेय तर त्यांच्या रेल्वेलाच द्यावे लागेल. भारतातील दुर्गम भागात सरकारी सेवांची प्रशंसा केली जाते.

"हे प्रदेश मुळात कृषिप्रधान आणि सरंजामाशाही असलेले समाज होते. इथं सरकारी कर्मचारी असणं ही सामाजिक प्रतिष्ठेची बाब होती. हीच मानसिकता आजही कायम आहे," रेल्वे भरती बोर्डाचे कार्यकारी संचालक अमिताभ खरे सांगतात.

भारतीय नागरी सेवेतील इंडीयन अॅडमिनिस्ट्रेटीव्ह सर्व्हिस (आयएएस) अशा सेवांकडे पाहिलं तर हीच गोष्ट सिद्ध होते. भारतातील केंद्रशासित प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार अशी राज्ये देशाला सर्वाधिक आयएएस अधिकारी देतात.

एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, दरवर्षी रेल्वेच्या सेवेतील सरासरी १५,००० कर्मचारी आपल्या मूळ गावी नेमणुकीसाठी अर्ज करतात. "यापैकी बहुतेक अर्ज हे उत्तर प्रदेश आणि बिहारमधील बदल्यांसाठी असतात," ते म्हणाले.

तरीही गंगेच्या किनाऱ्यावरील या भागांत गरिबी आणि निरक्षरता यांचा दर सर्वाधिक आहे. सरकारी नोकरी करताना लोकांना इतरत्र काम करत राहण्याऐवजी जिथे ते लहानाचे मोठे झाले अशा ठिकाणी बदली होण्याची संधी मिळू शकते.

लोकसंख्येचा स्फोट आणि नोकऱ्यांची कमतरता यांचा विचार केला तर लोकांकडून कुठल्याही सरकारी नोकरीसाठी बेभान आणि जवळजवळ पछाडणारा संघर्ष का सुरू होतो हे कळतं.

रेल्वे सुरक्षा दलाचे हवालदार डी. टी. यांनी ही नोकरी मिळवण्यासाठी 25 वेळा प्रयत्न केले होते.

त्यांचे सहकारी असलेले हवालदार जे. एस. यांनी उत्तर प्रदेश राज्य पोलीस आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) यांसह विविध विभागांकडे अर्ज करण्यात चार वर्षे घालवली होती.

या परिघाच्या दुसऱ्या टोकावर या वर्षीच्या आयएएस परीक्षेत अव्वल आलेले गुगलचे माजी कर्मचारी २८ वर्षांचे अनुदीप दुरिशेट्टी आहेत. दुरिशेट्टी यांनी काही वेळा भारताच्या नागरी सेवेसाठी परीक्षा दिली होती.

भारतात सरकारी नोकरीसाठी अर्ज करणे हा एक कौटुंबिक मामलाही असू शकतो. हवालदार जे. एस. यांची पत्नी सध्या उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे सरकारी शाळेत शिक्षिका होण्यासाठी अभ्यास करत आहे. गाझियाबादमध्येच हे पतीपत्नी लहानाचे मोठे झाले. "मी आणखी वर्षभर बदलीसाठी अर्ज करेन. तो पर्यंत तिला नोकरी मिळेल," असं ते सांगतात.

आणि मग अनीश तोमरची बायको प्रियाचे काय, जिने रेल्वेतील मेडीकल (वैद्यकीय) ऑर्डलीच्या पदासाठी रिंगणात उडी घेतली आहे? नवऱ्याबरोबरची स्पर्धा म्हणून याकडे पहाण्यापेक्षा, कुटुंबातल्याच कोणाला तरी प्रतिष्ठीत सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता ती वाढवत आहे.

"सुरुवातीचा पगार खूपच चांगला आहे आणि ही नोकरी माझ्या कुटुंबाला प्रतिष्ठा आणि सन्मान मिळवून देईल," असं त्या सांगतात.

(डी. टी. आणि जे. एस. यांनी त्यांच पूर्ण नाव सांगायच नाही.)

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)