You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मराठा आरक्षणासाठी थांबलेल्या मेगा भरतीविषयी सर्व काही इथे वाचा
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"मराठा आरक्षणासाठी स्थगित करण्यात आलेली मेगा भरती आता पुन्हा सुरू होणार आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सांगितलं.
या मेगा भरतीसाठी राज्य सरकारनं मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. या समितीच्या मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या एका प्रसिद्धीपत्रकानुसार राज्य शासनातर्फे कृषी, महसूल, ग्रामविकास, आरोग्य, वने या विभागांची क्षेत्रिय स्तरावरील सुमारे 72 हजार पदे भरण्यासाठी आवश्यक कार्यवाहीकरिता मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात दररोज सचिव गटाची बैठक होत आहे.
"मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर पदभरतीच्या प्रक्रियेसाठी गती आली आहे. सध्या बिंदूनामावली तपासणीचे काम सुरू असून त्यानंतर या पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील," असं या पत्रकात नमूद केलं आहे.
जैन यांच्या अध्यक्षतेखालील समितीत सामान्य प्रशासन, आरोग्य, ग्रामविकास, माहिती तंत्रज्ञान, महसूल, पाणीपुरवठा, वने या विभागाचे सचिव सदस्य आहेत. यातील एक सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी दौंड यांनी याविषयी आम्हाला अधिक माहिती दिली -
कधी होणार मेगा भरती?
सर्व विभागांच्या सचिवांकडून क्षेत्रीय स्तरावरील वेगवेगळ्या विभागांमध्ये किती पदं रिक्त आहेत, याची माहिती मागवण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे येत्या 15 ते 20 दिवसांत संबंधित विभागाकडून जागा आणि पद यांची जाहिरात काढली जाईल आणि त्यानंतर पदभरती सुरू होईल.
किती पदांसाठी भरती होणार?
राज्य सरकारच्या क्षेत्रीय स्तरावरील कृषी, महसूल, ग्रामविकास, आरोग्य, वने या विभागांमध्ये जी पदं रिक्त आहेत त्यांच्यासाठी ही भरती होणार आहे. जुलै महिन्यात आम्ही 34,000 रिक्त जागांसाठी जाहिरात देण्याची तयारी केली होती. आता यामध्ये अधिकच्या पदांचा समावेश करण्यात येईल. हा आकडा 72, 000च्या आसपास असेल.
येत्या 5 ते 7 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर जाहिरातीची प्रक्रिया सुरू होईल.
कोणत्या विभागात किती पदं रिक्त?
सध्या यावर काम सुरू असून यासंबंधीची माहिती संकलित केली जात आहे. येत्या दोन दिवसांत ही माहिती उपलब्ध करून देण्यात येईल.
मेगा भरती इतक्या दिवस का खोळंबली?
मेगा भरती खोळंबली, असं म्हणता येणार नाही. मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित होता. तो आता मार्गी लागला आहे, त्यामुळे भरतीची प्रक्रियाही जलदगतीनं सुरू झाली आहे.
मराठा तरुणांना भरती प्रक्रियेत आरक्षणाचा लाभ मिळेल काय?
मेगा भरती प्रक्रियेत मराठा तरुणांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनीही आधीच तसं स्पष्ट केलं आहे.
येणाऱ्या निवडणुकीवर डोळा ठेवून मेगा भरती केली जात आहे, असंही म्हटलं जात आहे...
यात काही तथ्य नाही. कारण जी पदं रिक्त आहेत ती भरणं शासनाचं कर्तव्य आहे. त्यामुळे निवडणुकीवर डोळा ठेवून पदभरती केली जात आहे, अशा दृष्टिकोनातून याकडे बघायला नको.
पदभरती कशी होणार?
एकदा क्षेत्रनिहाय विभागांतील पदं निश्चित झाली की त्यासंबंधीची जाहिरात काढण्यात येईल. यानंतर संबंधित विभागासाठी नियुक्त करण्यात आलेल्या नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे भरतीचे अधिकार असतील.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)