पायलट होण्याचं स्वप्न पाहा, भविष्यात 2.4 लाख नोकऱ्या आहेत

    • Author, लेईश सांतोरेल्ली
    • Role, बीबीसी व्यापार प्रतिनिधी

येत्या काही वर्षांत तुम्हाला हमखास नोकरी पाहिजे असेल तर पायलट व्हा आणि चीनला जा.

पुढच्या 20 वर्षांत आशिया-पॅसिफिक भागात सगळ्यांत जास्त पायलट, कॅबिन क्रू स्टाफ आणि तांत्रिक कामगारांची गरज भासणार आहे, असा अंदाज बोईंग कंपनीने व्यक्त केला आहे.

झपाट्यानं आर्थिक वाढीस लागलेल्या आशियामध्ये तेवढ्याच गतीने लोकांकडील पैसा आणि त्यामुळे हवाई दळणवळण वाढणार आहे.

2037 पर्यंत आणखी दोन लाख 40 हजार पायलट आणि तीन लाख 17 हजार कॅबीन क्रूची गरज भासणार आहे. यापैकी निम्मे कर्मचारी हे एकट्या चीनमध्ये लागणार आहेत.

आधीच पायलटांचा दुष्काळ आणि ट्रेनिंगचा अभाव असलेल्या या क्षेत्रात नवीन कर्मचाऱ्यांचा ताण वाढणार आहे.

सध्या कार्यरत असलेले वरिष्ठ पायलट या दशकाच्या अखेरीस निवृत्त होणार आहेत. तर नव्या व्यावसायिक हवाई सेवा उदाहरणार्थ, हेलिकॉप्टर पर्यटन आणि खासगी जेट सेवा याची मागणी वाढणार आहे.

बोईंगच्या अंदाजानुसार चीनमध्ये 1,28,500 पायलट दक्षिण-पूर्व आशियामध्ये 48,500 पायलट आणि दक्षिण आशियात 42,750 पायलटांची गरज भासणार आहे. तसंच येत्या काळात आशिया-पॅसिफिकमध्ये नवीन विमानांची खरेदीही वाढणार आहे.

अमेरिकेतल्या विमान कंपन्यांच्या अंदाजानुसार नवीन विमानांपैकी 40% विमानं ही आशिया-पॅसिफिकमध्ये विकली जाणार आहेत.

'कुर्सी की पेटीबाँध ले'

बोइंगने पायलट ट्रेनिंगच्या उपक्रमाला गती दिली आहे. पण त्यानंतरही पायलटचा तुटवडा भासणार आहे.

"या भागात पायलटचा मोठा तुटवडा भासणार आहे आणि तो आणखी काही वर्षं तसाच राहणार आहे," असं बोइंग ग्लोबल सर्विसेसच्या ट्रेनिंग आणि व्यावसायिक सेवेचे अधिकारी क्येथ कुपर यांचं म्हणणं आहे.

अशा परिस्थितीमुळे हवाईसेवा क्षेत्राच्या वाढीवर विपरित परिणाम होऊ शकतो, असा इशारा जाणकारांनी दिला आहे.

पुरेसे पायलट नसल्यास विमान जागीच पडून राहतील. पायलटांनी अधिक पगारीची मागणी केल्यास विमान कंपन्यांचा नफ्यातही घट होणार आहे.

पेचप्रसंगात आणखी वाढ होणार?

इंग्लड, फ्रान्स सारख्या देशात मजबूत कामगार संघटना आहेत. तिथे वाढीव पगार आणि भत्त्यासाठी वारंवार बंद पुकारले जातात, ज्यामुळे विमानसेवा ठप्प पडण्याची भीती असते.

जागतिक ट्रेड वॉरची झळ हवाईसेवा क्षेत्रालाही लागली आहे.

अमेरिका-चीन व्यापारी युद्धामुळे विमान निर्मितीचा खर्च वाढणार आहे, असं मत बोइंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेनिस म्युलनबर्ग यांनी व्यक्त केलं आहे.

"मुक्त आणि खुल्या व्यापारावर हवाई सेवेची वाढ अवलंबून असते," असं म्युलनबर्ग यांचं म्हणणं आहे.

"विमानाच्या सुट्या भागांच्या पुरवठ्यावर याचा परिणाम होऊ शकतो. हा पुरवठ्याचा परिणाम दोन्ही बाजूंनी (अमेरिका आणि चीन) होणार आहे. जगभरात पसरलेलं हे एक गुंतागुंतीच जाळं आहे," असं ते म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)