You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एक असं गॅरेज जिथे फक्त विकलांग मुलं तुमच्या गाड्या दुरुस्त करतात
- Author, राहुल रणसुभे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
कोल्हापुरातील फुलेवाडीच्या मुख्य रस्त्यावरील एका गॅरेज आहे. कुठल्याही इतर गॅरेजसारखंच दिसणारं हे गॅरेज सामान्य नाही. कारण इथं काम करणारी 11 मुलं खास आहेत आणि त्यांच्यामुळे हे गॅरेज चांगलंच प्रसिध्द झालं आहे.
कारण या 11 मुलांपैकी 6 जण गतिमंद आहेत, तिघे मूकबधीर आहेत, एका दृष्टिहीन आहे आणि एकाला अर्धांगवायू झाला आहे. आणि या सर्वांना एकत्र आणून हे गॅरेज चालवत आहेत महेश सुतार.
जेव्हा आम्ही या गॅरेजबद्दल ऐकलं तेव्हा हे खरंच आहे का, हे पाहण्यासाठी आम्ही कोल्हापूर गाठलं. फुलेवाडीत गेल्यानंतर अनेक गॅरेज डोळ्यासमोरून गेली.
इथे पोहोचलो तेव्हा काही असं वेगळं दिसलं नाही. एखाद्या गॅरेजवर जसं काम चालतं तसंच काम या गॅरेजवरसुध्दा सुरू होतं. ही सर्व मुलं विकलांग असूनदेखील एखाद्या सराईत मॅकेनिकप्रमाणे ती काम करत होती. म्हणजे केवळ चाकात हवा भरणं किंवा बाईक-कार धुणे, एवढंच नाही तर गाड्यांची सर्व्हिसिंग करणे, पंक्चर काढणे, अशी अवघड वाटणारी कामंसुध्दा ही मुलं कुणाच्याही मदतीविना करत होती.
'...आपणच यांच्यासाठी काहीतरी करावं'
या आगळ्यावेगळ्या प्रयोगाबद्दल आम्ही या गॅरेजचे मालक महेश सुतार यांच्याशी बोललो. महेश यांचं M. A. B. P. Ed. पर्यंतचं शिक्षण झालं आहे. मग उच्चशिक्षित असूनही त्यांनी गॅरेज सुरू करण्याचा निर्णय का घेतला?
"मी छोटा जॉब करत होतो मुंबईमध्ये. जॉब करताकरता मला अनुभव आला की, माझा एक भाऊ आहे जो मतिमंद आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. मग मी त्याला कुठेतरी जॉब मिळावा या हेतूने काही लोकांशी संपर्क साधला. सगळ्या लोकांनी मला नकारात्मक उत्तर दिलं. मग मी ठरवलं, आपणच या मुलांसाठी काहीतरी करूया. या हेतूने मी हे गॅरेज सुरू केलं."
जेव्हा महेश यांनी ही कल्पना सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना अनेक अडचणी आल्या.
सगळ्यांत पहिली अडचण म्हणजे अशी मुलं मिळतील कुठे आणि त्यांना गॅरेजपर्यंत आणायचं कसं?
महेश यांनी त्यांच्या आसपासच्या 'स्पेशल'मुलांचा सर्व्हे केला. त्यानंतर त्यांनी मुलांच्या पालकांशी संपर्क साधला. तरीही निराशाच पदरी पडत होती.
"मी या पालकांच्या घरी गेलो आणि त्यांना माझ्या गॅरेजविषयी सांगितलं. तुमच्या मुलांना तिथं शिकण्यासाठी पाठवा अशी त्यांना विनंती केली. सुरुवातीला कोणताही पालक आपल्या मुलाला पाठवण्यासाठी तयार झाला नाही. अनेक जण तर म्हणाले, की आम्हाला पैशांची कमी नाही. आमच्या मुलानं कशाला काम करायचं. उलट तुम्हाला पैसे हवे तर आम्ही देतो अशाही प्रतिक्रिया आल्या. हे सर्व ऐकून माझं मन नाराज झालं. मात्र मी खचलो नाही," ते सांगतात.
"या दरम्यान माझ्याकडे एक मुलगा आला. त्याला मी शिकवलं, त्याच्यात मला बदल दिसू लागला. त्यानंतर त्या मुलाला घेऊन मी परत या सर्व पालकांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं, 'आज जसं या मुलात झालेला बदल तुम्हाला दिसतोय, तसाच बदल तुमच्या मुलामध्येही होऊ शकतो. तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो.' असं समाजावून सांगितल्यावर एक-एक पालक तयार होत गेले आणि माझ्या गॅरेजमध्ये मुलांची संख्या वाढली."
पालकांचं मन वळवण्याचा प्रयत्न
कोल्हापुरातील व्यावसायिक किरण फाटक यांचा मुलगा अजिंक्य या गॅरेजमध्ये आता काम करतो.
अजिंक्यचं बॉर्डरलाईन रिटार्डेशन आहे. ही गोष्ट जेव्हा त्याच्या पालकांना समजली तेव्हा काय करावं, हे सुचत नव्हतं. त्या दिवसांबद्दल सांगताना किरण फाटक भावनिक होतात.
"माझा मुलगा जरासा मतिमंद आहे आणि त्याचं बॉर्डरलाईन रिटार्डेशन आहे. ज्यावेळेस ही गोष्ट लक्षात आली, तेव्हा आम्ही या गोष्टीमुळे खूपच चिंतातूर झालो आणि हादरून गेलो. तो शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे. मात्र बुद्धीतून त्याला चालना मिळत नाहीये. यासाठी त्याला आम्ही वेगळ्याप्रकारे शिक्षण द्यायचा प्रयत्न केला."
त्यांनी कोल्हापूरच्या एका नामांकित वर्कशॉपमध्ये त्याला दाखल केलं. तिथं तो पक्ष्यांची घरटी बनवणं, मुर्ती बनवणं, अशी कामं करू लागला.
"मात्र त्याला व्यावसायिक काही तरी शिक्षण हवं, या हेतूने आम्ही त्याला इथे सर्व्हिस सेंटरला आणलं होतं, जेणेकरून तो स्वतःच्या पायावर उभा राहील. त्याची ग्रास्पिंग पॉवर चांगली असल्यानं तो पटकन शिकेल, असा अंदाज माझा आहे," ते सांगतात.
सुतार यांनी पालकांची मनं वळवली. पण अशा मुलांच्या गॅरेजमध्ये गिऱ्हाईक येणार कोण? कारण एखाद्या मुलानं गाडी पाडली अथवा चांगलं काम केलं नाही तर काय? ही भीती साहजिकच ग्राहकांच्या मनात होती.
त्याबद्दल सुतार सांगतात की, "सुरुवातीला ज्यावेळी मी हे काम सुरू केलं त्यावेळी ग्राहक माझ्याकडे येताना बिचकायचे. मग ग्राहकांना मी विश्वासात घेऊन सांगितलं, तुमचं काहीही नुकसान होणार नाही. जर नुकसान झालं तर मी नुकसान भरपाई देतो. असं सांगून ग्राहकांचीही मनं मी वळवली. आज असा ग्राहकवर्ग आहे, जो या मुलांशिवाय काम करत नाही."
बबन सुतार हे या गॅरेजचे नियमित ग्राहक आहेत. त्यांच्याकडे कार आणि बाईक आहे. त्यांच्या कुटुंबातील सर्व गाड्या ते याच गॅरेजवर सर्व्हिसिंगसाठी आणतात.
ते सांगतात "आता मी इतके वर्षं झाले इथेच गाडीची सर्व्हिसिंग करतोय. पण मला यांच्याबद्दल काही भीती वाटत नाही. गाडी पडली, व्यवस्थित गाडी धुवत नाहीत, असं काही यांच्या हातून झालं नाही."
या गॅरेजवर काम करणारा सनी साळुंखे गतिमंद आहे. मात्र तो या गॅरेजमधल्या इतर काम करणाऱ्या मुलांच्या कामावर बारीक नजर ठेवतो. तो त्यांचा सुपरवायझरच बनला आहे. याबद्दल तो आम्हाला अभिमानाने सांगतो.
"ही मुलं माझ्या हाताखाली काम करतात. त्यात काही मूकबधीर तर काही गतिमंद आहेत. मी आता इथे आल्यापासून ऑईल बदली करतो, पंक्चर काढतो, सर्व्हिसिंग करतो आणि ब्रशने टायर घासतो. इथे मला खूप छान वाटतं," सनी सांगतो.
या मुलांच्या भविष्यासाठी त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आपण काही तरी करावं, असं महेश सुतार यांना सारखं वाटतं.
पण सध्या असलेली जागा ही त्यांना अपुरी पडत आहे. मोठी जागा असली की आणखी विकलांग मुलांनाही प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार देता येईल, असं त्यांना वाटतं.
तसंच सरकारनंही या मुलांच्या भविष्याबद्दल काही तरी विशेष योजना आखावी, असे ते सांगतात.
ते म्हणाले की, "मला सरकारला एक मुद्दा असा सांगावासा वाटतोय की कोणताही व्यवसाय सुरू करताना त्याचा परवाना काढावा लागतो. त्या परवान्यामध्ये जर असं नमूद केलं की, प्रत्येकानं एक मतिमंद अथवा अपंग मुलाला रोजगार दिला तर या मुलांच्या रोजगाराचा प्रश्न पूर्णपणे सुटून जाईल."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)