इस्रायल-हमास संघर्ष : 'गाझा म्हणजे शहरभर पसरलेली स्मशानभूमी बनलंय', भयावह आकडेवारीचं वास्तव

गाझा
    • Author, अमिरा म्हाधबी
    • Role, बीबीसी न्यूज अरेबिक

हमासनं 7 ऑक्टोबर 2023 ला दक्षिण इस्रायलवर अभूतपूर्व हल्ला केला. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडणारे बहुतांश सामान्य नागरिक होते. हल्ल्यानंतर 251 हून अधिक इस्रायलींना ओलीस ठेवण्यात आलं.

हमासच्या या हल्ल्यामुळं इस्रायल आणि हमासमध्ये पूर्ण युद्धाचा भडका उडाला. हे युद्ध या भागातील अलीकडच्या इतिहासातील सर्वात प्राणघातक, भीषण युद्ध ठरलं आहे.

हे युद्ध सुरू झाल्यापासून बीबीसी न्यूज माहिती गोळा करतं आहे.

युद्धाच्या तडाख्यात सापडलेल्या लोकांपैकी काहींशी बोलत आहे. युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या लोकांच्या आकडेवारी पलीकडील कहाण्या, वास्तव समोर आणण्याचा बीबीसीचा प्रयत्न आहे.

फातमा एडाम आणि तिचं कुटुंब उत्तर गाझाचे रहिवासी आहेत. मागील काही महिन्यांपासून त्यांनी गाझामध्ये होणारा विनाश, मारली जाणारी माणसं आणि उपासमार पाहिली आहे.

सद्य परिस्थितीतील स्वत:च्या जगण्याचं वर्णन फातमा, "अपमानजनक आणि लज्जास्पद" असं करतात.

ग्राफिक्स

त्यांना वाटतं की, त्या जणूकाही एक वर्षापासून कोमामध्ये आहेत आणि एक दिवस त्या कोमातून पुन्हा शुद्धीत येतील. आणि त्यानंतर कधीकाळी त्यांनी आधी पाहिलेलं "सुंदर आणि जगण्याच्या उर्मीनं भरलेलं" गाझा त्यांना दिसेल.

फातमा आशावादी आहेत. एवढा मोठा संहार झाल्यानंतरही त्या खचलेल्या नाहीत. त्या निर्धारानं म्हणतात, "आम्ही हे सर्व पुन्हा बांधू आणि आयुष्य पुन्हा उभारू."

गाझा शहरावर आक्रम होण्यापूर्वी आणि आक्रमण झाल्यानंतरची परिस्थिती दाखवणारा फोटो.

गाझामधील जीवन आणि मृत्यू

या युद्धामुळे अश्रफ अल अत्तार यांचं आयुष्य कायमचं बदललं आहे.

खान युनिस या गाझाच्या दक्षिणेला असलेल्या शहरातील युरोपियन हॉस्पिटलमध्ये ते आरोग्य सेवकाचं काम करतात.

त्यांनी बीबीसीला सांगितलं की, इस्रायलनं मध्य गाझा मधील दिएर अल बलाहवर केलेल्या हवाई हल्ल्यात त्यांची पत्नी आणि सहा मुलं मारले गेले. "हे सर्व एकाचवेळी फक्त काही सेंकदांमध्ये झालं," असं ते सांगतात.

ग्राफिक्स

अश्रफ यांची पत्नी हाला युनाटडेड नेशन्स रीलिफ अँड वर्क्स एजन्सी (UNRWA)च्या कर्मचारी होत्या.

त्यांचा मोठा मुलगा इहसेन 15 वर्षांचा होता तर फक्त 20 महिन्यांची मुलगी, वतीन त्यांचं सर्वात धाकटं अपत्य होतं.

अश्रफ आणि हाला यांना एकाच वेळी चार बाळं झाली होती, त्यातील दोन मुलं आणि दोन मुली होत्या. ती 10 वर्षांची होती. अश्रफ आणि हाला या मुलांना "देवानं दिलेली भेट" मानत असत.

आश्रफ यांची पत्नी हाला त्यांच्या मुलांसोबत
फोटो कॅप्शन, आश्रफ यांची पत्नी हाला त्यांच्या मुलांसोबत
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

एखाद्या विशिष्ट हल्ल्यावर किंवा प्रत्येक हल्ल्यावर इस्रायली सैन्याकडून क्वचितच भाष्य केलं जातं. त्यामुळंच 18 ऑगस्टच्या पहाटे झालेल्या ज्या हल्ल्यात अश्रफ यांचं कुटुंब मारलं गेलं, त्या हल्ल्याबद्दल त्यांनी लगेचच कोणतीही माहिती दिली नाही.

एक दिवसानंतर इस्रायली सैन्यानं एक वक्तव्यं जाहीर केलं, त्यात म्हटलं होतं की इस्रायली लष्करानं दिएर अल-बलाहच्या बाहेरील भागात एक कारवाई केली. "दहशतवाद्यांना मारणं आणि जमिनीवर आणि जमिनीखाली असलेल्या त्यांच्या तळांना नष्ट करणं हा या कारवाईमागचा उद्देश होता."

गाझामध्ये युद्धाची सुरूवात झाल्यापासून 40,000 हून अधिक पॅलेस्टिनी लोक मारले गेले. त्यामध्ये हाला आणि त्यांची सहा मुलं होती.

7 ऑक्टोबरला हमासनं केलेल्या हल्ल्यानंतर ताब्यात घेतलेल्या वेस्ट बॅंकमध्ये देखील हिंसाचारात वाढ झाली आहे.

23 सप्टेंबर 2024 पर्यंत, संयुक्त राष्ट्रसंघाचं म्हणणं आहे की पूर्व जेरुसलेमसह ताब्यात घेतलेल्या वेस्ट बॅंकमध्ये 693 पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. यात इस्रायली सैन्याकडून 676 लोक मारले गेले आहेत आणि इस्रायली सेटलर्सकडून 12 जण मारले गेले आहेत.

(इस्रायली सेटलर्स म्हणजे पॅलेस्टिनी भागात अतिक्रमण करून जबरदस्तीनं राहू पाहणारे नागरिक)

इस्रायली सैन्याचं म्हणणं आहे की इस्रायल आणि वेस्ट बॅंकमध्ये, इस्रायली नागरिकांवर होणारे पॅलेस्टिनी हल्ले रोखणं हा वेस्ट बॅंकवर करण्यात आलेले हल्ल्यांचा उद्देश आहे. सध्या इस्रायली सरकारनं वेस्ट बॅंक मधील बेकायदेशीर वसाहतींच्या विस्तारावर लक्ष ठेवलं आहे.

इस्रायलचं उजव्या विचारसरणीच्या सरकारला वेस्ट बॅंक मधील बेकायदेशीर वसाहती किंवा अतिक्रमणं हटवायची नाहीत आणि ती तशीच राहू द्यायची आहेत, अशी भीती पॅलेस्टिनींना वाटते आहे.

ग्राफिक्स

इस्रायलमधील परिस्थिती

हमासनं 7 ऑक्टोबरला केलेला हल्ला हा इस्रायलच्या इतिहासातील सर्वात भयानक हल्ला होता, असं मानलं जातं.

नोव्हेंबर 2023 च्या सुरूवातीला इस्रायली अधिकाऱ्यांनी दिलेल्या दिलेल्या आकडेवारीनुसार, या हल्ल्यात 1,200 हून अधिक इस्रायली नागरिक मारले गेले.

ग्राफिक्स

नोव्हेंबर 2023 मध्ये बीबीसीनं या हल्ल्यासंदर्भात पुरावे गोळा केले. त्यामधून असं दिसून येतं की, 7 ऑक्टोबरला हमासनं केलेल्या हल्ल्यामध्ये हमाससह पाच सशस्त्र पॅलेस्टिनी गट सहभागी झाले होते. त्यांनी 2020 नंतर एकत्रितरित्या लष्करी पद्धतीचं प्रशिक्षण घेतलं होतं.

त्याच दिवशी (7 ऑक्टोबर) हमास आणि त्यांच्या सहकारी गटांनी 251 इस्रायली नागरिकांना गाझामध्ये ओलीस ठेवलं होतं.

ग्राफिक्स

मागील वर्षभरात त्यातील काही ओलिसांची सुटका करण्यात आली आहे. यातील काही सुटका दोन्ही बाजुंच्या आपसांतील वाटाघाटींनी झाल्या आहेत तर काही सुटका लष्करी कारवाईतून झाल्या आहेत.

या हल्ल्याच्या वेळी हमासनं ताब्यात घेऊन ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांमध्ये 34 वर्षांचे यार्डन बिबास, त्यांची पत्नी शिरी आणि त्यांची दोन मुलं यांचा समावेश होता.

यार्देन
फोटो कॅप्शन, यार्देन

29 नोव्हेंबर 2023 ला हमासनं दावा केला होता की शिरी आणि त्यांच्या दोन मुलांचा हमासच्या ताब्यात असतानाच इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये मृत्यू झाला होता. हमासचा दावा तपासत असल्याचं इस्रायली सरकारनं म्हटलं आहे.

ऑर्फी बिबास लेव्ही या यार्डन बिबास यांच्या बहीण आहेत. भाऊ आणि भावाच्या कुटुंबाच्या भवितव्याविषयी त्या व्यथित आहेत. त्यांना चिंता वाटते. मात्र तरीही ते अद्याप जिवंत असल्याची त्यांना आशा आहे.

त्या म्हणतात, कैदेत ते किती काळ तग धरतील याबद्दल त्यांना खात्री वाटत नाही. या पद्धतीनं लोकांना ओलीस ठेवणं, विशेष करून लहान मुलांना ओलीस ठेवणं हे 'अमानवीय कृत्य' असल्याचं त्या म्हणतात.

ऑर्फी यांनी बीबीसीला सांगितलं की "त्यांचा विश्वास डळमळीत होतो आहे."

ग्राफिक्स

75 वर्षांच्या अदा सागी या शांततेसाठी काम करणाऱ्या इस्रायली कार्यकर्ती आहेत. 7 ऑक्टोबरला हमासनं त्यांना निर ओझ किबुत्झमधील त्यांच्या घरातून ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्या गाझा मध्ये 53 दिवस ओलीस होत्या.

24 नोव्हेंबर 2023 पासून आठवडाभर झालेल्या युद्धविरामा दरम्यान सोडण्यात आलेल्या 105 इस्रायली ओलिसांपैकी त्या एक होत्या.

या इस्रायली नागरिकांच्या बदल्यात इस्रायलच्या तुरुंगात असणाऱ्या 240 पॅलेस्टिनी लोकांची सुटका करण्यात आली होती.

"माझा आता शांततेवर विश्वास राहिलेला नाही," असं त्या म्हणतात.

गाझामध्ये सुरू असलेलं युद्ध थांबवण्यासाठी च्या आतापर्यंतच्या राजनयिक प्रयत्नांना यश आलेलं नाही.

ग्राफिक्स
लाल रेष

इस्रायल-हमास संघर्षाबाबत इतर काही महत्त्वाच्या बातम्या :

लाल रेष

'जाण्यासाठी कोणतीच जागा सुरक्षित नाही'

30 सप्टेंबर 2024 पर्यंत, संयुक्त राष्ट्रसंघाचा अंदाज आहे की गाझा ची लोकसंख्या जवळपास 21 लाख आहे. त्यातील नव्वद टक्के लोक विस्थापित झाले आहेत.

वर्षभर सुरू असलेल्या या युद्धादरम्यान इस्रायली सैन्यानं पॅलेस्टिनी लोकांना जागा खाली करण्याचे आदेश दिले आहेत. गाझावर हल्ला करत असताना त्यांनी पॅलेस्टिनी लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना केल्या आहेत.

युनिसेफ (UNICEF) च्या ऑगस्ट 2024 मधील एका अहवालात म्हटलं आहे की गाझामधील 17 लाख लोकांना 48 चौ. किलोमीटर क्षेत्रामध्ये जाण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

ग्राफिक्स

यामुळे या सुरक्षित भागात विस्थापितांची मोठी गर्दी झाली होती. परिणामी या भागात लोकसंख्येची घनता 35 हजार लोक प्रति चौ. किलोमीटर इतकी झाली आहे.

गाझा मधून अंदाजे 19 लाख लोक विस्थापित झाले आहेत. 31 वर्षांचे नजौद अबू कालूब या त्यापैकी एक आहेत.

नजौद आणि त्यांच्या चार मुलांना इस्रायली हल्ल्यांमुळे 11 वेळा जागा बदलत दुसरीकडं जावं लागलं आहे.

एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना काही वेळा त्यांना गर्दी आणि आजारांना तोंड द्यावं लागलं.

ग्राफिक्स

आता त्या अल-मवासी मध्ये तात्पुरत्या स्वरुपाच्या तंबूत राहत आहेत. ही जागा खान युनिसमधील वाळवंटात आहे.

आधी इस्रायली सैन्यानं या जागेला सुरक्षित जागा म्हणून घोषीत केलं होतं. मात्र नंतर त्यांनी इथे हल्ला केला होता. इथून पुन्हा इतरत्र हलण्याची नजौद यांची इच्छा नाही.

ग्राफिक्स

गाझामधील असंख्य विस्थापितांप्रमाणेच, हे युद्ध संपल्यावर परत जाण्यासाठी नजौद अबू कालूब यांच्याकडेही कोणतीही जागा नसेल.

कारण गाझातील बहुतांश वस्त्या, शहरं या युद्धात नष्ट झाली आहेत.

यावर्षी मार्च महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघाचे तज्ज्ञ म्हणाले होते की या युद्धामध्ये गाझा मधील 70 टक्क्यांहून अधिक घरं नष्ट झाली आहेत किंवा त्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

युद्धाच्या पहिल्या सहा दिवसांतच इस्रायली हवाई दलानं गाझा मध्ये 6,000 हून अधिक बॉम्ब टाकले होते.

इस्रायली सैन्याची गाझामधील कारवाई गाझा पट्टीच्या उत्तरेकडच्या भागातून सुरू झाली होती. त्यानंतर ही कारवाई दक्षिणेच्या दिशेनं पुढे सरकत गेली आणि थेट इजिप्तच्या सीमेवरील रफाहपर्यंत ही कारवाई पोहोचली.

इस्रायली सैन्याच्या कारवाईमुळे गाझापट्टीमध्ये सर्वत्र प्रचंड विध्वंस झाला.

ग्राफिक्स

जुलै 2024 च्या सुरुवातीला, संयुक्त राष्ट्रसंघानं अंदाज व्यक्त केला होता की गाझामधील घरांच्या विध्वसांतून 4 कोटी टनांहून अधिक ढिगारा जमा झाला आहे.

यानुसार गाझा मधील प्रत्येक चौ. मीटर जागेमध्ये 115 किलो ढिगारा पसरला आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाचा अंदाज आहे की गाझामधील लोकांसाठी घातक ठरणारा हा ढिगारा साफ करण्यासाठी 15 वर्षे लागतील आणि त्यासाठी 50 कोटी डॉलर्सहून अधिकचा खर्च येईल. कारण या ढिगाऱ्यांमध्ये हानिकारक पदार्थ आणि स्फोट न झालेली स्फोटकं असू शकतात.

ग्राफिक्स

"या युद्धात पूर्णपणे नष्ट झालेली घरं पुन्हा उभारण्यासाठी किमान 2040 साल उजाडेल," हा अंदाज देखील खूपच आशावादी परिस्थिती लक्षात घेऊन करण्यात आलेला आहे.

मे 2024 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास कार्यक्रमानं गाझातील परिस्थितीचं मूल्यांकन करून दिलेल्या अहवालात तो व्यक्त करण्यात आला होता.

ग्राफिक्स

या युद्धात असील यांनी त्यांचा भाऊ गमावला. त्यांच्या आईला कर्करोग आहे. उपचारासाठी त्यांना गाझाबाहेर पाठवण्याच्या त्यांच्या कुटुंबाच्या प्रयत्नांना यश आलं नाही.

त्यांच्या वडिलांच्या मूत्रपिंडाची स्थिती गंभीर आहे.

त्यांनी बीबीसीला सांगितलं की , कठीण दिवसांमध्ये त्यांना वाटतं की जगण्यासाठी त्यांच्याकडे काहीच राहिलेलं नाही.

तर आशादायी दिवसांमध्ये असील म्हणाल्या की त्यांच्या आई आणि वडिलांवर उपचार व्हावेत अशी त्यांची इच्छा आहे. तसंच युद्ध संपल्यानंतर गाझा सोडून त्यांच्या वागदत्त पतीला (भावी पती) सायप्रस मध्ये भेटण्याची त्यांची इच्छा आहे.

या युद्धामुळे मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या उदध्वस्त झालेल्यांना जरी प्रचंड आशा वाटत असली तरी कायमस्वरुपी युद्धबंदीसह हे युद्ध संपवण्यासाठी मार्ग काढणं, दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे.

त्याउलट परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची होत चालली आहे आणि हिंसाचार वेगाने वाढतो आहे. आता हा संघर्ष आणि त्यातून होणाऱ्या हिंसाचाराचा गाझाबाहेर विस्तार होत तो मध्यपूर्वेत पसरतो आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.