इस्रायल-हमास संघर्ष : जखमांनी जर्जर शरीर, आई-वडिलांचं हरवलेलं छत्र आणि आयुष्यभरासाठीचा मानसिक आघात

आपला पती अजून जिवंत आहे की नाही, हेच बतशेवाला अजून माहिती नाही. आता कुठे पौगंडावस्थेत पदार्पण करत असलेला अब्दुल्लाह अनाथ झालाय, तर क्रिस्टिना आणि अब्दुल रहमान कधीतरी आपल्याला स्वतःच्या पायांवर उभा राहता येईल, हा आशेवर कसेबसे तग धरून आहेत.
युद्धाची दाहकता प्रत्यक्षात अनुभवलेल्या इस्त्रायल, गाझा, लेबनॉन आणि वेस्ट बँकमधील पीडितांनी बीबीसीसोबत बोलताना या मरणयातनांना वाचा फोडली.
7 ऑक्टोबर 2023 च्या त्या काळरात्रीनंतर जे भीषण युद्ध या प्रदेशात सुरू झालंय, ते अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीय. किंबहुना, हा युद्धज्वर वरचेवर आणखी तापतच चालला आहे.
या मागच्या एका वर्षात युद्धामुळे इथल्या लोकांना काय काय सहन करावं लागलं आणि त्यांचं आयुष्य कसं कायमसाठी उद्ध्वस्त झालंय, याची ही हृदयद्रावक कहाणी.
गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरला हमासने इस्त्रायलवर हल्ला चढवला होता. या हल्ल्यात 1200 इस्त्रायलींचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलने केला, तसंच 251 इस्त्रायली लोकांना हमासने बंदी बनवून ताब्यात घेतल्याचाही दावा करण्यात आला होता.
या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायलनं मग गाझावर प्रतिहल्ला चढवला. गाझात जमिनीवरील सैन्याच्या कारवाया आणि आकाशातून बॉम्बचा वर्षाव सुरू झाला जो आजतागायत सुरू आहे. इस्त्रायलच्या प्रत्युत्तराची सुरुवात गाझापासून झाली, ती नंतर वेस्ट बँक, लेबनॉन आणि आता इराणपर्यंत जाऊन पोहचलेली आहे.
हमासच्या प्रशासनाखाली असलेल्या या प्रदेशातील आरोग्य मंत्रायलयानं दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रायलच्या या आक्रमणात फक्त गाझामध्ये मागच्या वर्षभरात 41 हजारपेक्षा जास्त लोक मारले गेलेले आहेत. हा आकडा रोज वाढतोच आहे.
7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर पेटलेलं हे युद्ध आता संपूर्ण पॅलेस्टाईन, इस्त्रायल, लेबनॉन आणि इराणपर्यंत पोहोचलेलं आहे. मागच्या वर्षभरापासून हा युद्धात अभूतपूर्व हिंसा रोज घडत आहे.
'ते जिवंत आहेत की नाहीत ? या अनिश्चततेनं जीव कासावीस होतो'
7 ऑक्टोबरच्या आदल्याच दिवशी ओहाद यहलोमी आपल्या याईल या 10 वर्षाच्या मुलीला जवळच्या शेतात प्राणी बघायला घेऊन गेला होता. ओहादचा मोठा मुलगा आणि याईलचा भाऊ 12 वर्षीय ऐतान हा नुकताच आपल्या मित्रांसोबत फुटबॉल खेळून घरी परतत होता. ओहादची बायको बतशेवा आपल्या अजून दोन वर्षेही पूर्ण न झालेल्या सर्वात लहान मुलीचा घरीच सांभाळ करत होती.
इस्त्रायलच्या दक्षिण टोकावरील निर ओझ प्रांतातला तो दिवस रोजच्यासारखाच साधारण आणि शांत भासत होता. या प्रांतात किबूत्झ वंशाचे लोक राहतात. 400 पेक्षा कमी लोकसंख्येचा हा समुदाय या एकाच भागात एकवटलेला आहे. ओहान आणि त्याचं कुटुंबीय याच समुदायाचा भाग होते. गाझा सीमेपासून अगदी काही किलोमीटर उत्तरेकडे हा भाग वसलेला आहे.

फोटो स्रोत, Batsheva Yahalomi
“या प्रांतात आमचा समुदाय अतिशय शांततेने आणि मिळून मिसळून राहत होता. आमच्यापुरतं तरी हे आमचं पृथ्वीवरील स्वर्गच होतं. फार सुबत्ता नसली तरी अतिशय सुखात आणि कोणत्याही अडचणींशिवाय आमचं आयुष्य सुरळीत चालू होतं. पण आमच्या पुढ्यात आता काय वाढून ठेवलंय याची आम्हाला सुतरामही कल्पना नव्हती,” 45 वर्षांची बतशेवा आम्हाला सांगत होती.
दुसऱ्या दिवशी दिवस उजाडला ती जोरजोरात वाजणाऱ्या भोंग्याच्या आवाजाने. यहलोमी कुटुंबाला जाग या भोंग्यामुळेच आली. या आवाजाचा अर्थ त्यांना समजला होता. हल्ल्याची ती पूर्वसूचना होती. गाझामधून केले जाणारे रॉकेट हल्ले इथल्या लोकांसाठी नवीन नव्हते.
पण पुढच्या काही मिनिटातच त्यांना कळून चुकलं की, हा हल्ला नेहमीसारखा नाही. यावेळी फक्त रॉकेटने बॉम्ब टाकले जात नव्हते. अल्लाहू अकबरचे नारे लगावत आणि अंदाधुंद गोळीबार करत गाझामधील अतिरेकी आता त्यांच्या वस्तीत घुसले होते.

फोटो स्रोत, Batsheva Yahalomi
यहलोमी कुटुंबीय घाबरून घराच्या तळाशी असलेल्या सुरक्षा खोलीत लपून बसलं. गाझा सीमेला लागून असलेल्या या भागातील प्रत्येक घरामध्ये आपत्कालीन सुरक्षा खोली असते. पुढचे काही तास ते सगळे जीव मुठीत धरून याच खोलीत बसून राहिले. पण बंदुकधाऱ्या हमासच्या सैनिकांनी घराला चारी बाजूंनी घेरलंय आणि लवकरच ते आपला शोध घेत तळघरात पोहोचतील, याचा अंदाज आता ओहादला आला होता. लपून बसलेलो पकडले गेलो तर हे हमासचे सैनिक आपल्या सगळ्यांनाच मारून टाकतील हे ओहादला कळून चुकलं होतं. त्यामुळे मुलांचा आणि बायकोचा जीव वाचवण्यासाठी स्वत: एकटा बाहेर पडून हमासच्या सैनिकांना शरण जाणं, हाच एक चांगला उपाय आहे, हे ओहादनं हेरलं. किमान आपली बायको आणि मुलं बाळं तरी वाचतील, ही आशा त्याला होती.
आपलं कुटुंब हमासच्या हाती लागू नये, हेच आता ओहादचं धोरण होतं. त्यानं मनाची तयारी केली. पत्नी आणि मुलांना समजावलं. आपल्या जवळच्या मित्रांनाही मोबाईलवर संदेश पाठवला. “आता हे माझे अखेरचे क्षण आहेत.”
“शरण जाण्याची वेळ जवळ येत होती तसं दर काही मिनिटांनी ते माझं तुमच्यावर किती प्रेम आहे, हे सांगत होते,” आपल्या पतीसोबतचे अखेरचे क्षण कसे होते याचं वर्णन बतशेवा आमच्याशी बोलताना करत होती.
“हातात कलश्निकोव्ह रायफल, कंबरेवर ग्रेनेड्स आणि अंगावर सुरक्षाकवच अशा सुसज्ज सैनिकी वेशात संपूर्ण तयारीनिशी हे हमासचे हल्लेखोर आले होते. घरातला दरवाजा तोडून ते आत शिरले आणि ओहादवर गोळी चालवली. नंतर त्यांना सुरक्षा खोलीही सापडली. आमच्या दिशेने रायफल रोखून इंग्रजीत ते आम्हाला म्हणाले की ‘गाझाला चला’. त्यांना काय हवंय हे मला समजलं होतं. कैदी म्हणून ते आम्हाला युद्धातील बंदी बनवणार होते,” बतशेवानं घडलेला सगळा वृत्तांत आमच्यासमोर नमूद केला.

बतशेवा आणि तिच्या दोन मुलींना एका दुचाकीवर तर मुलगा ऐतान व त्यासोबत आणखी एका कैद्याला दुसऱ्या दुचाकीवर बसवून ते गाझाच्या दिशेने निघाले. पहिली दुचाकी वाटेतच बंद पडल्याने बतशेवा आणि तिच्या मुलींची कशीबशी सुटका झाली. मुलगा ऐतान व पती ओहादला मात्र त्यांनी बंदी बनवून गाझामध्ये नेलं.
पुढचे 52 दिवस ऐतान गाझामध्ये हमासचा बंदी बनून राहिला.
बतशेवा सांगतात की, "हमासच्या सैनिकांनी तिच्या 12 वर्षांच्या मुलाला हिंसा आणि रक्तपाताचे अतिशय आक्षेपार्ह व्हिडिओ वारंवार दाखवले. 7 ऑक्टोबर रोजी जो नरसंहार त्यांनी केला होता त्याच्या या चित्रफिती होत्या."
“लोकांना, स्त्रियांना आणि अगदी लहान मुलांना हालाहाल करून मारलं जात असल्याचे व्हिडिओ माझ्या मुलानं पाहिले आहेत,” बतशेवा म्हणाल्या.
युद्धात बंदी बनवल्या गेलेल्या दोन्ही बाजूंच्या मोजक्या कैद्यांना मुक्त करण्याचा जो करार इस्त्रायल आणि हमासमध्ये झाला त्यानुसार नोव्हेंबरमध्ये ऐतानची मुक्तता झाली. या कराराचं पालन दोन्ही बाजूंनी नीट न केलं गेल्यामुळे मध्येच तो बारगळला. त्यामुळे फक्त काही मोजक्या कैद्यांचीच मुक्तता झाली. बाकीचे बहुतांशी कैदी हे अजूनही बंदी म्हणून डांबले गेलेले आहेत. ऐतान मात्र नशिबवान निघाला. करार फिस्कटण्याआधीच तो बाहेर आला.
पॅलेस्टाईनमधील एका संघटनेनं जानेवारी महिन्यात ओहादचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. ज्यात तो जखमी होता पण जिवंत होता. नंतर या संघटनेचं जाहीर केलं की इस्त्रायलनं केलेल्या बॉम्ब वर्षावात ओहाद मारला गेला. ओहाद खरंच मारला गेलाय की अजून जिवंत आहे, याची पुष्टी अजून इस्त्रायलचं लष्कर करू शकलेलं नाही. हमासनंही नंतर ओहाद जिवंत किंवा मृत असल्याचा कुठला पुरावा वगैरे सादर केलेला नाही.

या बातम्याही वाचा :

7 ऑक्टोबरच्या हल्ल्याचा सर्वात मोठा फटका याच निर ओझ प्रदेशाला बसलाय. इथले कित्येक राहिवासी या हल्ल्यात मारले गेले. काही जण बंदी बनवले गेले. अजूनही बॉम्बवर्षावाने बेचिराख झालेली इथली घरं तशीच ओसाड आणि जळालेल्या अवस्थेत आहेत. 7 ऑक्टोबरच्या त्या काळ बनून आलेल्या दिवसाची साक्ष बनून.
बतशेवा सांगतात की, त्यांची मुलं अजूनही त्या धक्क्यातून सावरू शकलेली नाहीत. त्यांना याचा मानसिक आघात बसला आहे. झोपेत त्यांची मुलं घाबरून उठतात आणि रडायला लागतात. एकटी राहायला आणि झोपायला घाबरतात. आमचे वडील कधी परत येणार आहेत? हा एकच प्रश्न ते आईला सारखा करत असतात. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून बतशेवा आपल्या मुलांना जवळ घेऊनच झोपते. जवळपास 2 महिने हमासचा छळ सोसलेल्या ऐतानची अवस्था तर अगदीच बिकट आहे. त्याला बसलेला मानसिक धक्का इतका भयानक आहे की अवघ्या 13 वर्षांच्या ऐतानची केस गळती सुरू होऊन त्याला चक्क टक्कल पडू लागलंय.
“पण सगळ्यात जास्त त्रास आम्हाला सत्य माहिती नसल्याचा होतो. ओहाद कुठे आणि कसा असेल? तो जिवंत तरी आहे काय? हे सवाल मनाला भंडावून सोडतात. हे अनिश्चितेचं जगणं आता मला सहन होत नाही. माझा जीव अक्षरशः कासावीस होतो,” बतशेवाने आपल्या व्यथेला वाचा फोडली.
‘असं जर्जर राहून जगण्यापेक्षा मी शहीद झालो असतो तर बरं झालं असतं’
7 ऑक्टोबरला हमासनं इस्त्रायलवर हल्ला चढवला तेव्हा अब्दुल्लाहच्या 13 वा वाढदिवस साजरा करण्याची लगबग सुरू होती. गाझाच्या उत्तरेकडील अल - तवम भागात तोपर्यंत त्याचं आयुष्य कुठल्याही साधारण लहान मुलाप्रमाणे अगदी मजेत चाललं होतं. शाळेला जाणे, मित्रांसोबत फूटबॉल खेळणे, कधी समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जाणे, आई - वडिल, भाऊ आणि दोन बहिंणीसोबत गप्पा, खेळ तर कधी रुसवे फुगवे, असं त्याचं आयुष्य अगदी मजेत चाललं होतं. दोन दिवसांवर आलेल्या वाढदिवसाची तयारी आणि उत्साहाने त्याने घर डोक्यावर घेतलं होतं.
पण वाढदिवसाच्या एक दिवस आधीच अचानक सगळीकडे दवंडी पिटण्यात आली. आकाशातून आलेल्या विमानांमधून राहिवाशांना तात्काळ इथून निघत दक्षिणेकडे पळून जाण्याच्या सूचना दिल्या गेल्या. येणाऱ्या आपत्तीची ही पूर्वसूचना होती. इस्त्रायलच्या लष्करानंच दहशवाद्यांवर कारवाई म्हणून इथे प्रतिहल्ला केला जाणार असून सामान्य नागरिकांनी ही जागा रिकामी करावी, असे आदेश या वैमानिकांद्वारे धाडले होते.
अब्दुलाहच्या कुटुंबाने घाईघाईत गरजेचं सामान बांधलं आणि सालाह अल - दिन रस्ताने ते दक्षिणेकडे निघाले. इस्त्रायलच्या लष्करानेच या सुरक्षित रस्त्याने दक्षिणेकडे जाण्याची सूचना केली होती. त्यानुसारच हे कुटुंब निघालं होतं. हा रस्ता सामान्य नागरिकांसाठी सुरक्षित राहणार असल्याचं खुद्द इस्त्रायलनंच कळवलं होतं.
मी आणि माझा मोठा भाऊ अहमद गाडीने या रस्त्यावरून निघालेलो असतानाच इस्त्रायलच्या सैन्याने आमच्यावर हवाई हल्ला केल्याचं अब्दुलाह सांगतो. हा विस्फोट इतका मोठा होता की अब्दुलाह आणि त्याचा भाऊ अहमद गाडीबाहेर फेकले गेले.
अहमद तेव्हा अवघ्या 16 वर्षांचा होता. हा बॉम्ब निशाणा साधून त्यांच्या गाडीवर डागण्यात आला होता. अहमद या स्फोटात गंभीर जखमी झाला. त्याचा एक पाय तर पूर्णच निकामी झालाय. डॉक्टरांना त्याचा एक पायच कापावा लागला. दुसऱ्या पायात मेटल प्लेट्स टाकून तो कसाबसा जोडला गेलाय. बाकी शरीर तर सगळीकडे जखमांनी भरलंय.

बॉम्बस्फोटात अब्दुलाहच्या हात, डोकं, पाठ आणि चेहऱ्यातदेखील अणकुचीदार वस्तू घुसल्यात. पूर्ण शरीर जखमांनी माखलेलं आहे. शरीरभर शंभर ठिकाणी टाके आहेत. शर्ट वर करून त्यानं आम्हाला पोटावर पडलेल्या दोन चिरा दाखवल्या. असा शरीराचा कुठला भाग नाही जो कापला गेला नाही.
या दोन भावांच्या वडील, आई आणि काकांचे छिन्नविछिन्न मृतदेह नंतर जळालेल्या अवस्थेत रस्त्यावर ढिगाऱ्यांखाली मिळाल्याचं एका नातेवाईकाने बीबीसीला सांगितलं.
इस्त्रायली वैमानिकाने ठरवून लक्ष्य करून ड्रोनने ही मिसाईल गाडीवर डागली गेली होती. हा काही चुकून अथवा अनावधानाने झालेला अपघात नव्हता. अब्दुलाह व त्याचं कुटुंबीय आणि या स्थळी उपस्थित असलेले लोक या घटनेचे साक्षीदार आहेत.
इस्त्रायल सैन्यानं आधी लोकांना कारवाई करणार असल्याचं म्हणत एका ठिकाणावरून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी जायला सांगितलं. सुरक्षित ठिकण कोणतं असेल हे इस्त्रायली सैन्यानं कळवलं होतं. नंतर धोकादायक ठिकाणावरून सुरक्षित स्थळी जात असलेल्या आणि जाऊन पोहचलेल्या सामान्य नागरिकांच्या ताफ्यावरच इस्त्रायली सैन्यानं हल्ला चढवल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेकांनी असे आरोप केले आहेत. काही जण स्वतः अशा घटनांची शिकार बनलेले आहेत. तसेच अनेक साक्षीदारही आहे. मात्र इस्त्रायलच्या लष्करानं हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. आमच्या कारावाईत फक्त दहशतवाद्यांनाच ठरवून लक्ष्य केलं जात असल्याचा दावा इस्त्रायलनं केलाय.
“आम्ही समिती नेमून एक सखोल चौकशी पार पाडली. सदरील घटनेत इस्त्रायल लष्कराची कुठलीही भूमिका नाही. आयडीएफने (इस्त्रायल डिफेन्स फोर्सेस) सदरील सांगितलं जाणाऱ्या ठिकाणावर कधी कुठली कारवाई केलीच नाही. त्यामुळे हा हल्ला आम्ही केलाय आणि ठरवून निर्दोष नागरिकांना लक्ष्य केलंय या आरोपांमध्ये कुठलंही तथ्य नाही,” असं आयडीएफचे प्रवक्ते बीबीसीशी बोलताना म्हणाले.
दवाखान्यात उपचार सुरू असताना अब्दुल्लाह सतत आजूबाजूच्या लोकांना आपल्या आई - वडिलांविषयी विचारत असे. शेवटी त्याचा चुलत भाऊ आणि आजीने त्याला सांगितलं की त्याचे आई - वडिल इस्त्रायलनं केलेल्या कारवाईत मारले गेलेत.
अब्दुलाह आम्हाला सांगत होता, “कोणीही मला काहीही सांगत नव्हतं तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. काहीतरी भयानक घडलंय, याचा अंदाज मला आला होता. आजूबाजूचे लोक टाळत असलेले सवाल आणि तिथली शांतता माझे आई - वडिल आता या जगात नसल्याची पूर्वसूचना होती. मनातल्या मनात का होईना मला ते आधीच माहिती होतं. पण तरीही माणसाला अंधुक आशा असतेच. माझ्या आई - वडिलांसोबत ती आशा सुद्धा संपली. त्यांच्यासोबत मी ही मेलो असतो तर बरं झालं असतं. अशा जर्जर अवस्थेत इतकी वेदना सहन करत जगत राहण्यापेक्षा मृत्यू काय वाईट?”
वेदनेनं विव्हळत असलेला अब्दुलाह अगदी असहाय्य होऊन बोलत होता.

फोटो स्रोत, Handout
अब्दुलाच्या डाव्या हातावर मोठा खड्डाच पडलाय. अर्धा हात जणू अस्तित्वाच नाही असं वाटावं इतकी वाईट अवस्था होती. “मला हातच नाहीत असं वाटतं. डॉक्टरांंनी बरेच प्रयत्न केले. अजूनही करत आहेत. पण कशाचाच फायदा नाही,” वेदनेमुळे त्याला नीट बोलताही येत नव्हतं.
अब्दुलाह आता दक्षिण गाझाच्या खान युनिस भागात त्याच्या आजीकडे राहतो. सोबत जिवंत वाचलेल्या मिन्ना आणि हाला या बहिणी देखील आहेत. मिन्ना 18 तर हाला 11 वर्षांची आहे. ज्या दिवशी त्यांचे आई-वडील मारले गेले त्या दिवशी या दोन्ही मुली असुरक्षित अशा उत्तर गाझामध्येच मागे राहिल्या होत्या. त्यांच्यासाठी गाडीत जागा नसल्याने त्यांना घरीच ठेवून अब्दुलाह आणि अहमद इस्त्रायलने सांगितलेल्या ‘सुरक्षित’ रस्त्याने दक्षिणेकडे निघाले होते. दैवदुर्विलास म्हणा अथवा नियतीचा खेळ या दोन बहिणी सुरक्षित जिवंत राहिल्या आणि अब्दुलाह व अहमदवर जीवघेणा हल्ला झाला. अहमदवर अजूनही कतारमध्ये उपचार सुरू आहेत.
आपले आई, वडील आणि काकांना गमावलेल्या अब्दुलाहला अजूनही दु:ख आवरत नव्हतं. जणू त्याच्या पायाखालची जमीनच हादरली होती. हसत खेळत जगणारं हे एकत्र कुटुंब क्षणाधार्थ उद्धस्त झालं. अब्दुल्लाह आता अनाथ झालाय. आई, वडिल आणि काकांशिवाय जगायचं तरी कसं ? असा प्रश्न आता 14 वर्षांच्या अब्दुलाह समोर आहे. ‘त्यांच्यासोबत मी सुद्धा मेलो असतो तर बरं झालं असतं,’ असं तो सारखं बडबडत होता. शाळेला जाणं, मित्रांसोबत खेळणं, आई - वडिलांकडून लाड करून घेणं असं त्याचं रम्य बालपण युद्धानं एका क्षणात हिरावून घेतलंय. उत्तर गाझातील त्याच्या अनेक मित्रांचा संपर्क तुटलाय. तर काही मित्र युद्धात मारले गेलेत.
“आमचं गाझा किती रम्य आणि सुंदर होतं. इस्त्रायलनं एका क्षणात सगळं होत्याचं नव्हतं करून टाकलं. माझे आई - वडिल, माझे काका, माझं शिक्षण, माझं बालपण इतकंच काय माझं निरोगी शरीरही इस्त्रायलनं हिरावून घेतलंय. ते सुद्धा माझा काही एक दोष नसताना,” अब्दुलाहची असहाय्यता त्याच्या बोलण्यातून पदोपदी जाणवत होती.
शुद्ध आल्यावर सुटकेचा निःश्वास टाकला, ‘पाय गेलाय, जीव नाही’
“एक उदयोन्मुख फोटो पत्रकार म्हणून असलेली माझी ओळख एका क्षणात युद्धातील हिंसेची शिकार बनलेली पीडित अशी बनून गेली आहे,” क्रिस्टिना म्हणाली.
क्रिस्टिना एएफपी (Agence France-Presse) या फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय माध्यम संस्थेत फोटो पत्रकार म्हणून काम करत होती. लेबनॉनच्या दक्षिण सीमेवर सुरू असलेल्या युद्धाचं वार्तांकन करणार का अशी विचारणा तिला केली गेली तेव्हा तिने अतिशय उत्साहाने होकार दिला होता. या उत्साहामागे कामाबरोबरच घरी परतण्याची ओढ देखील होती. क्रिस्टिना मूळची लेबनॉनचीच राहिवासी आहे.
7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू झालेलं युद्ध आखाती प्रदेशात पसरून लेबनॉनपर्यंत पोहचलं. इस्त्रायलला प्रतिकार म्हणून लेबनॉनस्थित हिजबुल्लाह या सशस्त्र संघटनेनं इस्त्रायलवर रॉकेट्सचा मारा सुरु केला. या सशस्त्र गटाला इस्त्रायल आणि तिचे पाश्चात्य मित्र देश अतिरेकी संघटना मानतात.
इस्त्रायल आणि हिजबुल्लाहमधील संघर्ष मागच्या एका वर्षात वरचेवर आणखी तीव्र बनत चाललाय. इस्त्रायलनं हिजबुल्लाहचे प्रमुख हसन नसरल्लाह यांची एका कारवाईत हत्या केली. त्याचा बदला घेण्यासाठी मग इराणही युद्धात उडी घेत इस्त्रायलवर रॉकेट्सचे हल्ले केले. त्यामुळे या भागात विनाशकारी युद्ध सुरू झालंय. लेबनॉन हा देश आता जणू युद्धभूमीच बनलाय.
13 ऑक्टोबर 2023 रोजी एक पत्रकारांचा समूह इस्त्रायलच्या सीमेपासून अवघ्या 1 किलोमीटरवर असलेल्या लेबनॉनच्या दक्षिण टोकावरील एका गावाकडे चालला होता. तेव्हा या गावात घमासान युद्ध सुरू होतं. या युद्धाचं वार्तांकन करायला हे पत्रकार निघाले होते. फोटो पत्रकार म्हणून क्रिस्टिना देखील सोबत होती.
29 वर्षीय क्रिस्टिना सांगते की आम्ही सगळ्यांनी जॅकेट आणि हेल्मेट परिधान केलेलं होतं ज्यावर मोठ्या अक्षरात ‘प्रेस’ (पत्रकार) असं लिहिलेलं होतं. त्यांच्या गाडीच्या बोनोटवर भल्या मोठ्या अक्षरात स्पष्टपणे आत पत्रकार असल्याचं नमूद केलेलं होतं.
“युद्धाचं वार्तांकन करायला आलेले एका मोठ्या माध्यम समूहाचे पत्रकार असल्यामुळे आपण सुरक्षित आहोत, अशा भ्रमात आम्ही होतो,” क्रिस्टिना सांगत होती.

फोटो स्रोत, Handout
पण अचानक तिथे बॉम्बफेक आणि अंदाधुंद गोळीबार सुरू झाला. या पत्रकारांच्या गाडीवरही बॉम्ब फेकले गेले. गोळ्या चालवल्या गेल्या. या हल्ल्यात त्यांची गाडी पलटली. क्रिस्टिना जखमी होऊन तिथेच रस्त्यावर बेशुद्ध झाली. थोड्या वेळाने जाग आल्यावर जवळच असलेली आणखी एक गाडी पेट घेत असल्याचं तिला दिसलं. तिने उठून लांब पळण्याचा प्रयत्न केला. पण अंगावरचं जड वजनदार बुलेटप्रुफ जॅकेट आणि खांद्यावर लटकलेल्या कॅमेरामुळे तिला अशा जखमी अवस्थेत हलता येत नव्हतं.
“माझ्या पायाला जखमी झालेला आहे आणि त्यातून भळाभळा रक्त येतंय, हे मला दिसत होतं. जवळच्या पेट घेतलेल्या गाडीचा विस्फोट होऊ शकतो. आपण उठून लांब जायला हवं हे मला कळत होतं. पण मला उठताच येईना. उठण्याचा अपयशी प्रयत्न करता करता मी बहुतेक पुन्हा तिथेच बेशुद्ध होऊन पडले,” क्रिस्टिना तिच्यावर ओढावलेल्या या भयानक प्रसंगाचं वर्णन करत होती.
त्यानंतर 12 दिवसांनी हॉस्पिटलमध्ये असताना क्रिस्टिनाला जाग आली. “खरं सांगायाचं झालं तर शुद्धीवर आल्यावर मला दु:ख होण्याऐवजी मी चला एक पाय तरी वाचला असं स्वतःला सांगत सुटकेचा निःश्वास टाकला,” क्रिस्टिना आम्हाला म्हणाली. इतक्या भयाण हल्ल्यातून आपण जिवंत वाचलो यावर तिचाच विश्वास बसत नव्हता. शुद्ध जाण्या आधीसुद्धा तिच्या पायांमधून भळाभळा रक्त वाहत होतं. आपले दोन्ही पाय निकामेच झाले असतील हा पहिला विचार शुद्धीत आल्यावर क्रिस्टिनाच्या मनात आला. पण एकच पाय निकामी झालेला आहे. दुसरा व्यवस्थित आहे हे कळाल्यावर तिला थोडं हायसं वाटलं.
पण रॉयटर्स या वृत्तसंस्थेचा पत्रकार इस्साम अब्दलाह क्रिस्टिनाइतका नशीबवान नव्हता. तो या हल्ल्यात मृत्युमुखी पडला. इस्साम 37 वर्षांचा होता. या हल्ल्यात क्रिस्टिना व्यक्तिरिक्त आणखी 6 पत्रकार गंभीर जखमी झाले होते.
“इस्साम मारला गेल्याचं मला शुद्ध आल्यावर टीव्हीवरील बातमी बघूनच समजलं. सुरुवातीला तर माझा विश्वासच बसला नाही,” क्रिस्टिना म्हणाली.
अब्दलाहच्या हत्येनंतर जगभरातील माध्यमसंस्थांंनी इस्त्रायली लष्कराचा निषेध केला. लेबनॉन सरकारपासून ते घटनास्थळी हजर असलेल्या आणि हल्ल्यात जखमी झालेल्या पत्रकारांनी इस्त्रायली सैन्यानं ठरवू़न हेतूपुरस्सर टॅंक फायरमधून पत्रकारांचा ताफा असलेल्या गाड्यांना लक्ष्य केल्याचा आरोप केलाय. या गाडीत पत्रकार आहेत, असं स्पष्ट लिहिलेलं होतं. ते माहिती असूनही आयडीएफने ही गाडी उडवून लावली.
युद्धाचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर हल्ला करणं हा आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.
लेबनॉननं आंतरराष्ट्रीय महासंघाच्या सुरक्षा समितीत अधिकृतरित्या याची तक्रार दाखल केली. आयडीएफने याबद्दल माफी मागितली असली तर हल्ला मुद्दाम पत्रकारांना लक्ष्य बनवून केला गेल्याच्या आरोपांना नकार दिलाय.
जगभरातील मानवाधिकार संघटनांनी देखील आयडीएफचा तीव्र निषेध करत युद्धातील अमानवी क्रौर्याचा गुन्हा आंतरराष्ट्रीय कोर्टात आयडीएफवर दाखल केला जावा, अशी मागणी केली आहे. इस्साम अब्दलाहच्या हत्येनं आयडीएफच्या युद्धनीती आणि हेतूविषयीच मोठा सवाल मोठा सवाल उपस्थित झाला. जगभरातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली.
यावर बीबीसीला स्पष्टीकरण देताना आयडीएफने म्हटलं की, “त्यावेळी तिथून दहशतवादी इस्त्रायलमध्ये घुसखोरी करत असल्याची माहिती आमच्या सैनिकांना मिळाली होती. ही घुसखोरी रोखण्यासाठी टॅंकचा आणि गोळ्यांचा मारा करण्यात आला. तरी चुकीच्या माहितीमुळे उद्भवलेल्या या दुर्घटनेची आम्ही सखोल चौकशी करत आहोत.”
या दुर्घटनेला आता एक वर्ष होत आलंय. क्रिस्टिना अजूनही त्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करते आहे. या घटनेमुळे ती मुळापासून हादरलेल्या क्रिस्टिनाला हे कटू वास्तव स्वीकारणं अजूनही जड जातंय.

फोटो स्रोत, Family photo
“अशा घटनांमुळे आपला व्यवस्थेवरील विश्वासालाच हादरा बसतो. सहकारी पत्रकाराचा मृत्यू होणं किंवा मी जखमी होणं इतक्या पुरती ही गोष्ट मर्यादीत नाही. युद्धाचं वार्तांकन करणारे पत्रकार सुरक्षित असतात. त्यांना कोणी हात लावू शकत नाही, असा आमचा समज होता. पण जे घडलं त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायदे आणि न्यायव्यवस्थेवरचा माझा विश्वासच उडालाय,” क्रिस्टिना पोटतिडकीने आपली व्यथा मांडत होती.
क्रिस्टिनावर अजूनही उपचार सुरूच आहे. तिच्या तब्येतीत सुधारणा होत असली तरी ती अजून चालू शकत नाही.
या घटनेमुळे जगभरातील पत्रकार एकवटले. पत्रकारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला. नुकत्याच पार पडलेल्या ऑलिम्पिकमध्ये व्हीलचेअरवर बसून क्रिस्टिनानं ज्योत वाहिली. लेबनॉन हल्ल्यात आणि जगभरात विविध घटनांमध्ये मारल्या गेलेल्या आणि जखमी झालेल्या पत्रकारांचं स्मरण करून आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही ज्योत ऑलिम्पिकमध्ये वाहिली गेली.
इतके सगळे आघात झेलूनही स्वतःला सावरत तितक्यात तडफेनं पुन्हा एकदा पत्रकारितेत उतरण्याची जिद्द क्रिस्टिना बाळगून आहे.
“ज्या दिवशी मी स्वतःच्या पायावर उभा राहून चालू शकेल, कॅमेरा हातात धरू शकेल त्या दिवशी मी लगेच पुन्हा कामावर रुजू होईल. कारण पत्रकारिता हाच माझा प्राण आहे. अशा भ्याड हल्ल्यांना घाबरून पत्रकारिता सोडणं ही माझी व मी विश्वास ठेवत असलेल्या मूल्यव्यवस्थेची हार असेल. आणि तसं मी होऊ देणार नाही,” इतकं सगळं होऊन गेल्यानंतरही क्रिस्टिनाची जिद्द आणि आशावाद अजूनही तितकाच मजबूत आहे याची जाणीव तिच्या बोलण्यातून होत होती.
‘मी किंचाळत होतो, पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही’
एक सप्टेंबरच्या त्या काळरात्रीची आठवण आली की, अब्दुलचा अजूनही तितकाच थरकाप उडतो. 18 वर्षांचा अब्दुल रहमान अल अश्कर सांगतो की, “संध्याकाळची वेळ होती. दिवसभर मका विकून झाल्यानंतर तो व त्याचा मित्र लेथ शावहनेह गप्पा मारत आणि धूम्रपान करत रस्तावरून सोबत चालले होते. रोजच्यासारखाच हाही दिवस निवांत चालू आहे असं वाटतं असताना अचानक कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय थेट आमच्याजवळ बॉम्बच पडला. वरून रॉकेट आल्यासारखं वाटलं आणि काही कळायच्या आत बॉम्बचा वर्षाव सुरू झाला. मला हलायची सुद्धा संधी मिळाली. मी खाली पडलो. बाजूलाच लेथही पडलेला होता. मी त्याला कितीदा हाक मारली. किंचाळलो. पण त्याने काही प्रतिसाद दिला नाही. त्याचा जागीच मृत्यू झाला होता. मीही लगेच तिथेच बेशुद्ध पडलो.”
हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायलनं गाझाबरोबरच वेस्ट बॅंकेवरही लागलीच बॉम्बचा वर्षाव सुरू केला होता. इस्त्रायलनं केलेल्या या अमानुष बॉम्बफेकीत हजारो पॅलेस्टेनियन नागरिक मारले गेलेले आहेत. आयडीएफ सांगतं की पॅलेस्टाईनमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून इस्त्रायलवरील संभाव्य दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी केलेल्या कारवाईचा हा भाग आहे. यातले बहुतांश लोक हे हमासचे अतिरेकी किंवा सहानुभूतीदार असल्याचं इस्त्रायलचं म्हणणं आहे.
एक सप्टेंबरच्या त्या थरकाप उडवणाऱ्या रॉकेट हल्ल्यात 16 वर्षांचा लेथ जागीच ठार झाला. अब्दुल रेहमान गंभीर जखमी झालाय. त्याचे दोन्ही पाय कापावे लागले. तो आता दोन्ही पायांनी पूर्ण निकामा आहे. गंभीर जखमी अवस्थेतील अब्दुल रेहमानला फार प्रयत्नानंतर वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं. हल्ल्यानंतर पुढचे तब्बल 10 दिवस त्याला शुद्ध नव्हती. या दरम्यान तीन वेळेस त्याचं हृदय बंद पडलं होतं. बॉम्बचा इतक्या जवळ स्फोट झाल्यानंतरही अब्दुल आज जिवंत आहे, हा एक चमत्कारच म्हणावा लागेल.
पण जिवंत असला तरी अब्दुलची अवस्था अजूनही फारच बिकट आणि केविलवाणी आहे. त्यांच्या शरिराला झालेल्या जखमांची यादी न संपणारी आहे. दोन्ही पाय तर पूर्णपणे कापले गेलेलेच आहेत. तुटलेल्या एका हातात मेटल प्लेट टाकून तो कसाबसा जागेवर बसवला गेलाय. हातांची 2 बोटं अक्षरक्ष: छिन्नविछिन्न होऊन नसल्यात जमा आहेत. शरीरावर कित्येक शस्त्रक्रिया मागच्या वर्षभरात करण्यात आल्यात म्हणून तो कसाबसा जिवंत आहे. शस्त्रक्रियांमुळे त्याचं पूर्ण शरीरच जणू टाक्यांनी जोडलं गेलंय, असं वाटतं. सतत तो वेदनेनं विव्हळत असतो. अजूनही हॉस्पिटलमध्ये उपचार सुरूच आहेत. असहाय्य वेदनांशी झगडत त्याची जीवन मरणाची लढाई एक वर्ष होत आलं तरी सुरूच आहे.
कधीकाळी अगदी साधारण आणि निवांत आयुष्य जगणारा अब्दुल रेहमान आता हॉस्पिटलच्या बेडवर असहाय्यरित्या शून्यात नजर लावून पडून आहे. सकाळी उठून नमाज पडणे, नंतर मित्रांसोबत नाष्टा करणे, दुपारपर्यंत वडिलांना कामात मदत करणे व दुपारनंतर अंधार होईपर्यंत मका विकणे असं सामान्य दिनक्रम असलेलं वर्षभरापूर्वी पर्यंतचं त्याचं आयुष्य जणू काही आता मागच्या जन्मातील गोष्ट भासते. काही क्षणात त्याचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय. आता आंघोळीला किंवा शौचास जाण्यासाठी सुद्धा त्याला भावाची मदत घ्यावी लागते. जेवणापासून प्रातर्विधीपर्यंतच्या साध्या साध्या गोष्टी स्वत:हून करणं त्याला आता अशक्य आहे. त्याची आई त्याला जेवण भरवते.

फोटो स्रोत, Family photo
या हल्ल्याबाबत स्पष्टीकरण मागण्यासाठी बीबीसीने आयडीएफशी संपर्क साधला. आयडीएफचं असं म्हणणं होतं की जेनिन भागात त्यांच्या सैन्याच्या मेनाशे तुकडीवर ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला ते दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणाचा आयडीएफला सुगावा लागला होता. म्हणून मग त्या लपून बसलेल्या दहशतवाद्यांचे तळ विमानातून रॉकेट बॉम्ब फेकून उद्धवस्त केले गेले. थोडक्यात ज्या बॉम्बस्फोटात लेथ मारला गेला आणि अब्दुल मरता मरता वाचला ते बॉम्ब लपून बसलेल्या दहशतवाद्यांसाठी होते, असा आयडीएफचा दावा आहे.
म्हणून मग आम्ही परत अब्दुल रेहमानला विचारलं की हे बॉम्ब पडले तेव्हा तो किंवा त्याचा मित्र कोणती शस्त्र बाळगून होते का? आमच्या या प्रश्नानं अब्दुल थोडा आश्चर्यचकित होऊन म्हणाला, शस्त्र आणि आमच्याजवळ? आम्ही शस्त्रास्त्रे बाळगण्याचा संबंधच काय? आम्ही सामान्य नागरिक आहोत. संध्याकाळी कामं आटोपून सोबत रस्त्याने घराकडे गप्पा मारत चाललो होतो. दहशतवादी वाटावं असा ना आमचा वेश होता ना कुठली शस्त्रे आमच्याजवळ मोती. रोजचा पांढरा कुर्ता आणि पायजमा घालून आम्ही फक्त रस्त्याने चालत होतो.” शस्त्रास्त्रे आणि दहशतवादी वगैरे चौकशीने तो थोडासा वैतागलेला आणि तितकाच हतबलही झालेला दिसला.
मित्रांसोबत खोड्या करणारा, वडिलांना कामात मदत करणारा, थोडे पैसे मिळावेत म्हणून कधी रस्त्यावर हातगाडा लावून मका विकणारा तो एक साधा गरिब मुलगा होता. त्याची स्वप्नही त्याच्या आयुष्याप्रमाणे तितकीच साधी होती. 18 वर्षांच्या अब्दुलला चालकाचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) घ्यायचे वेध लागले होते. गाडी चालवायला शिकून कधीतरी आपली स्वतःच्या मालकीची कार विकत घ्यावी, हे त्याचं स्वप्न होतं. एक सप्टेंबरला खिजगणतीतही नसताना पडलेला तो रॉकेट बॉम्ब त्याची ही सगळी स्वप्न आणि आयुष्यच उद्ध्वस्त करून गेला.
“आता काही फारशी आशाही उरलेली नाही. स्वत:च्या पायांवर कधी उभा राहू शकलो, चालू शकलं तरी पुरेसं आहे,” अब्दुल म्हणाला. पण त्याची अवस्था बघता हे स्वप्नही अशक्यप्रायच भासत होतं.











