इराणच्या हल्ल्यावर इस्रायल कसं प्रत्युत्तर देईल? त्यानंतर इराण काय करेल?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, फ्रँक गार्डनर
- Role, सुरक्षा प्रतिनिधी, बीबीसी न्यूज
मध्य पूर्व भाग आता पुन्हा एकदा युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. कारण या भागातील दोन मुख्य पात्रं एकमेकांविरोधात गेल्या 45 वर्षांपासून संघर्ष करत आहेत. तो संघर्ष आता आणखी तीव्र झाला आहे. या भागासाठी आता अत्यंत धोकादायक क्षण आला आहे.
1979 साली मोहम्मद रझा शाह यांची सत्ता उलटवून इस्लामिक देश म्हणून उदयाला आला. त्यांनी तेव्हापासूनच इस्रायलचा नायनाट करण्याची प्रतिज्ञा केली होती.
इराण इस्रायलचा उल्लेख ‘ज्यूवादी राष्ट्र’ असं करायचे. इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने त्यांच्या मित्र संघटनांच्या माध्यमातून मध्य पूर्व भागात हिंसाचार पसरवल्याचा आरोप इस्रायलने केला आहे. अरब भागातील अनेक सरकारांचंही हेच मत आहे.
इराणने मंगळवारी केलेल्या मिसाईल हल्ल्यात इस्रायलच्या हवाई सुरक्षा भागातही बॅलिस्टिक मिसाईल कोसळले. या हल्ल्याला योग्य प्रत्युत्तर देण्याचा निर्धार इस्रायलने केला आहे.
हमासचे नेते इस्माईल हानिये यांची तेहरानमध्ये तर बैरुतमध्ये हसन नसरल्लाह यांची हत्या केली म्हणून हा हल्ला केल्याचं इराणचं म्हणणं आहे.
मग आता पुढे काय होणार?
इस्रायल आणि त्यांचा जवळचा सहकारी अमेरिका यांनी इराणला या हल्ल्याबद्दल चांगलाच धडा शिकवण्याची प्रतिज्ञा केली आहे. त्यांना या हल्ल्याची चांगलीच किंमत मोजावी लागेल असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे.
एप्रिल महिन्यात जेव्हा अशी परिस्थिती उद्भवली होती तेव्हा इस्रायलच्या मित्र देशांनी त्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला होता. यावेळी मात्र इस्रायल असा सल्ला ऐकण्याच्या मन:स्थितीत दिसत नाही. लेबनॉन, गाझा, येमेन आणि सीरिया या सर्व शत्रूंचा नायनाट करण्याचा इस्रायलचा निश्चय बघता, नेतन्याहू सरकार अजिबातच माघार घेण्याच्या मन:स्थितीत नाही.
त्यामुळे इस्रायलचे नियोजनकार इराणवर कधी हल्ला करायचा, आणि किती तीव्र करायचा यावरच चर्चा करत असावेत.
अमेरिकेतील युएस सॅटलाइट इंटेलिजन्स आणि मोसाद ही इस्रायलच्या गुप्तहेर संस्थेचे इराणमधील गुप्तहेर सध्या इस्रायलला मदत करत आहेत.
त्यामुळे इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) ला अनेक लक्ष्यांपैकी एकाची निवड करावी लागेल. त्यांचं वर्गीकरण पुढील तीन प्रकारात करता येईल.

फोटो स्रोत, Getty Images
- पारंपरिक लष्करी तळ- इराणने ज्या लष्करी तळावरून बॅलिस्टिक मिसाईल सोडले ते लष्करी तळ हे अत्यंत स्वाभाविक लक्ष्य असू शकतं. म्हणजे लाँच पॅड, कमांड अँड कंट्रोल सेंटर्स, बंकर्स आणि रिफ्युएलिंग टँक्स यांचा त्यात समावेश असू शकतो. याच श्रृंखलेत पुढे सांगायचं झालं तर IRGC च्या ताब्यात असलेले तळ, तसंच मिसाईल बॅटरीज, आणि हवाई सुरक्षा तळांवर इस्रायल हल्ले करू शकतं. इराणच्या बॅलिस्टिक मिसाईल योजनेत सहभागी असलेल्या महत्त्वाच्या लोकांची हत्यासुद्धा इस्रायल करू शकतं.
- आर्थिक – इराणच्या महत्त्वाच्या मालमत्तांवर हल्ले होऊ शकतात. त्यात पेट्रोकेमिकल प्लांट, वीजनिर्मिती केंद्रं, आणि कदाचित जहाजांचाही त्यात समावेश असू शकतो. इस्रायलने हे पाऊल उचललं तर ते अत्यंत धोकादायक ठरेल कारण त्याचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर त्याचा प्रचंड परिणाम होईल. लष्करावर केलेल्या हल्ल्यापेक्षा हा हल्ला अधिक जीवघेणा आणि धोकादायक ठरेल.
- आण्विक- हा तर इस्रायलसाठी सर्वांत मोठा मुद्दा आहे. संयुक्त राष्ट्रांची International Atomic Energy Agency ही संस्था आण्विक धोरणांवर लक्ष ठेवणारी संस्था आहे. या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार इराण आण्विक ऊर्जा वापरून वीजनिर्मितीसाठी जितकं युरेनियम लागतं 20 टक्के जास्त निर्मिती इराण करत आहे. इस्रायल आणि इतरांना असा संशय आहे की इराण आता एका ‘ब्रेकआऊट पॉईंटवर’ आहे आणि अगदी थोड्या कालावधीतच ते आण्विक बॉम्ब तयार करू शकतील. इस्रायल ज्या जागांवर हल्ला करू शकतो त्यात इराणच्या आण्विक कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी असलेला पार्चिन, तेहरान, बोनाब आणि रामसार येथील रिसर्च रिअॅक्टर्स, तसंच बुशेहर, नातांझ, इस्फाहान आणि फार्दो येथील केंद्र यांचा समावेश असू शकतो.
त्याचप्रमाणे इस्रायलने असा हल्ला केला तर इराण त्याला कसं प्रत्युत्तर देईल आणि इस्रायलच्या वतीने कसं तोंड द्यायचं याचाही विचार इस्रायल करेल. इस्रायलच्या लष्करी तळांवर हल्ला केल्यावर खरंतर हिशोब चुकते केल्याची इराणची भूमिका आहे. मात्र इस्रायलने पुन्हा हल्ला केला तर इराणही हल्ला करेल हा गर्भित इशारासुद्धा इराणने दिला आहे.
“आम्ही आमच्या क्षमतेची फक्त चुणूक दाखवली आहे,” असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्किअन यांनी म्हटलं आहे. तर IRGC ने सुद्धा याच संदेशाला दुजोरा दिला आहे. “जर या ज्यूवादी राजवटीने इराणच्या मोहिमेला प्रत्युत्तर दिलं तर त्यांना भीषण हल्ल्यांना तोंड द्यावं लागेल,” असं ते म्हणाले.
इराण इस्रायलच्या लष्करी पातळीवर पराभव करू शकत नाही. इराणचं हवाई दल जुनं आणि जीर्ण आहे. त्यांची हवाई सुरक्षा अतिशय पोकळ आहे. त्यांना अनेक वर्षं पाश्चिमात्य देशांच्या बंधनांचा सामना करावा लागला आहे.
असं असलं तरी त्यांच्याकडे विपुल प्रमाणात बॅलिस्टिक मिसाईल्स असं स्फोटकांनी भरलेले ड्रोन्स आहेत. त्यांच्या जोडीला मध्य पूर्वेत लोकसेना (लष्करी प्रशिक्षण घेतलेले सामान्य नागरिक) आहेत.
त्यांचे मिसाईल्स आता लष्करी तळाऐवजी नागरी भागांवर हल्ला करू शकतात. इराणने पाठिंबा दिलेल्या लोकसेनेने सौदी अरेबियाच्या काही केंद्रावर 2019 मध्ये हल्ला केला होता. यावरून त्यांचे शेजारी देश हल्ला करायचा असेल तर ते किती असुरक्षित आहेत हे दिसून आलं.


आखाती देशांमध्ये कार्यरत असलेल्या IRGC नौदलाकडे छोट्या बोटी आहेत. ज्या वेगवान मिसाईल हल्ला करू शकतात. तसंच अमेरिकन नौदलाच्या फिफ्थ फ्लिट या युद्धनौकेवर हल्ला करून त्यांना नेस्तानाबूत करू शकतात. जर ज्यांना असं करण्याचा आदेश मिळाला तर ते होर्मुझच्या सामुद्रधुनीत सुरुंग पेरू शकतात. त्यामुळे जगभर होणारी तेलाची निर्यात 20 टक्के प्रभावित होईल. त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल.
त्यात भरीस भर मध्ये अमेरिकेचे लष्करी तळ आहेत. ते आखातातील अरब भागातील वरच्या आणि खालच्या भागात म्हणजे कुवैत ते ओमानमध्ये आहेत. इराणने इशारा दिला आहे की जर त्यांच्यावर हल्ला झाला तर ते फक्त इस्रायलवरच हल्ला करणार नाहीत पण इराणवर हल्ला करणाऱ्या देशाला एखादा देश पाठिंबा देत आहेत असं जर इराणला वाटलं तर इराण त्यांच्यावरही हल्ला करेल.
तेल अवीव आणि वॉशिंग्टनमधील सुरक्षा नियोजनकार या वर उल्लेख केलेल्या काही निवडक परिस्थितीचा विचार करत असतील.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)










