भागवत कथा ऐकण्यासाठी गेलेल्या दलित तरुणीवर बलात्कार आणि निर्घृण हत्या; विवस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह

अयोध्येत दलित तरुणीची अमानुषपणे हत्या, छिन्नविछ्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह
    • Author, अरशद अफजल खान
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

उत्तर प्रदेशातील अयोध्येत 22 वर्षिय दलित तरुणीची बलात्कार करून अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे. या भयंकर घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

पीडितेचा विवस्त्र मृतदेह आढळला असून डोळे बाहेर काढण्यात आले होते. शरीरावर जखमा, हातपाय तोडले असून मृतदेह दोरीने बांधून फेकून देण्यात आला असल्याची माहिती मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी सांगितलं.

घटनेनंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

समाजवादी पक्षाचे नेते आणि फैजाबादचे लोकसभा खासदार अवधेश प्रसाद यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला.

घटनेवर व्यक्त होताना पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाले. मृत पीडितेला न्याय न मिळाल्यास आपल्या पदाचा राजीनामा देऊ, असं प्रसाद म्हणाले.

पोलिस काय म्हणाले?

ही घटना अयोध्या शहराजवळील आंबेडकर नगर रोडवर असलेल्या दलितबहुल गावात घडली आहे. पीडित तरुणी ही गुरुवार संध्याकाळपासून बेपत्ता होती.

समाजवादी पक्षाचे नेते व खासदार अवधेश प्रसाद यांना घटनेवर व्यक्त होताना अश्रू अनावर झाले

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, समाजवादी पक्षाचे नेते व खासदार अवधेश प्रसाद यांना घटनेवर व्यक्त होताना अश्रू अनावर झाले

तिच्या कुटुंबीयांनी सर्वत्र तिचा शोध घेतला मात्र तिचा कुठेच थांगपत्ता लागत नव्हता. यातच, शनिवारी (1 फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास एका नाल्यात तिचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला, असं अयोध्या पोलीस मंडल अधिकारी आशिष मिश्रा यांनी सांगितलं.

पीडितेच्या कुटुंबीयांना तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला होता. तर, शनिवारी सकाळी पीडितेचा मृतदेह सापडल्यानंतर पोलीस आता शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत.

शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं मिश्रा म्हणाले.

महिलेचा मृतदेह झाकून मृतदेह गावात घेऊन गेलेल्या ग्रामस्थांना पीडितेचा पाय मोडल्याचे दिसून आले. मृतदेहाची अवस्था इतकी विद्रुप होती की ते पाहताच मृत पीडितेची मोठी बहीण व इतर दोन महिला बेशुद्घ पडल्या, असं गावकऱ्यांनी सांगितलं.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

गुरुवारी (30 जानेवारी) रात्री 10 वाजता पीडिता एका धार्मिक कार्यक्रमात कथा ऐकण्यासाठी गेली होती. मात्र, बराच वेळ होऊनही ती परत न आल्याने आमची चिंता वाढली, असं मृत पीडितेच्या मोठ्या बहिणीने सांगितलं.

ती पुढे म्हणाली, "आम्ही तिचा सर्वत्र शोध घेतला पण ती सापडली नाही. त्यानंतर आम्ही शुक्रवारी तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली."

पोलिसांनी सक्रियपणे आपल्या बहिणीचा शोध घेतला नसल्याचा आरोप मृत पीडितेच्या बहिणीने केला आहे. पोलीस केवळ औपचारिकता पार पाडत असल्याचंही ती म्हणाली.

"शनिवारी सकाळी माझ्या पतीला माझ्या बहिणीचा मृतदेह गावाबाहेरील एका छोट्या नाल्यात आढळला, त्यानंतर त्यांनी कुटुंबीयांना माहिती दिली," असंही तिने सांगितलं.

विरोधी पक्ष आणि भाजपनं काय प्रतिक्रिया दिली

या घटनेवर विरोधी पक्षनेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर भाजप नेते म्हणाले की, ही घटना अतिशय क्रूर आणि दुःखद असून कुटुंबाला नक्कीच न्याय मिळेल.

या घटनेबाबत फैजाबादचे खासदार आणि सपा नेते अवधेश प्रसाद यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये घटनेबद्दल भावना व्यक्त करताना त्यांना रडू कोसळल्याचं दिसत आहे. ही अतिशय अमानुष घटना असून असून न्याय न मिळाल्यास आपण पदाचा राजीनामा देणार असल्याचं विधान त्यांनी केलं आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना प्रसाद म्हणाले, "मला दिल्ली लोकसभेत जाऊ द्या. मी हे प्रकरण पंतप्रधानांसमोर मांडणार आहे. आम्हाला न्याय मिळाला नाही तर मी पदाचा राजीनामा देईन."

दरम्यान, अवधेश प्रसाद यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला तसेच पीडितेच्या आपल्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करायला हवे, अशी भावना व्यक्त केली.

राहुल गांधी व अखिलेश यादव यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न उपस्थित केले.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राहुल गांधी व अखिलेश यादव यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न उपस्थित केले.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या घटनेवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्स अकाउंटवरून प्रतिक्रिया दिली आहे.

"अयोध्येतील दलित मुलीवर अत्याचार करून अमानुषपणे हत्या करण्यात आली. ही घटना अतिशय लज्जास्पद आणि हृदय पिळवटून टाकणारी आहे."

राहुल गांधी यांनी प्रशासनावर वेळीच लक्ष न दिल्याचा आरोप केला आहे. 'प्रशासनाने वेळीच लक्ष दिले असते तर कदाचित तरुणीचे प्राण वाचले असते', असं त्यांनी लिहिलं आहे.

त्यांनी उत्तर प्रदेश सरकारकडे या प्रकरणाची तत्काळ चौकशी करण्याची मागणी केली असून दोषीला कठोरात कठोर शिक्षा देण्यासोबतच हलगर्जीपणा केलेल्या पोलिसांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे.

प्रियांका गांधी यांनीही घटनेवर एक्स अकाउंटवरून प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, "अयोध्येत भागवत कथापाठ ऐकण्यासाठी गेलेल्या दलित तरुणीची अतिशय अमानुष आणि निर्घृणपणे हत्या करण्यात आली, ही घटना अंगावर काटा आणणारी आणि मानवतेला लाज आणणारी आहे. पीडिता तीन दिवसांपासून बेपत्ता होती परंतु पोलिसांनी तिला शोधण्यात हलगर्जीपणा केला, असं त्यांनी एक्स अकाउंटवरून म्हटलं आहे.

अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सरकारने कठोर पावले उचलली पाहिजेत, असे मत राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपाच्या प्रमुख मायावती यांनी व्यक्त केलं.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काय म्हणाले?

उत्तर प्रदेशचे श्रम आणि रोजगार मंत्री मनोहर लाल यांनी अयोध्येत जाऊन पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं.

ही घटना वेदनादायक आणि घृणास्पद असल्याचं ते म्हणाले. 'मुख्यमंत्र्यांना या प्रकरणाची जाणीव असून, दोषीला लवकरात लवकर पकडून त्यावर कठोर कारवाई केली जावी, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोषींना लवकरात लवकर शोधून काढण्याचे निर्देश दिले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोषींना लवकरात लवकर शोधून काढण्याचे निर्देश दिले आहेत.

उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या सदस्या प्रियांका मौर्या यांनी सांगितलं की, मुलीसोबत एक अमानुष आणि क्रूर घटना घडली आहे. पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. पोलिस प्रशासन कुटुंबाला मदत करत असून तपास सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.