'शिक्षक मुलांच्या मानेवरून, छातीवरून हात फिरवायचा' ; लैंगिक छळ प्रकरणी शिक्षक अटकेत

शाळेतल्या शिक्षकाला अटक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ( प्रतिकात्मक छायाचित्र)
    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

बदलापुरातल्या शाळेत मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेला एक महिना उलटत नाहीतर नागपुरात किशोरवयीन मुलांच्या लैंगिक, शारीरिक छळवणुकीची आणखी एक घटना समोर आली आहे.

नागपुरातल्या एका शाळेत शिक्षक नववी आणि दहावीच्या काही विद्यार्थ्यांचा लैंगिक, शारीरिक छळ करत असल्याचं समोर आलंय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षक विद्यार्थ्यांचा लैंगिक, शारीरिक छळ करायचा. त्यामुळे नववी, दहावीतल्या 11 मुलं आणि दोन मुलींनी हिम्मत करून 30 ऑगस्टला मुख्याध्यापकाकडे तक्रार दिली.

त्यानंतर मुख्याध्यापकांनी शाळेत एक तीन शिक्षकांची समिती तयार करून या घटनेची चौकशी केली. तसेच संबंधित शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. शिक्षकानं शिक्षक दिनाच्या दिवशी म्हणजेच 5 सप्टेंबरला त्यावर उत्तर सादर केलं.

चौकशी समिती आणि शाळा व्यवस्थापनाला हे स्पष्टीकरण देण्यात आलं. पण, यात चौकशी समितीला तथ्य वाटलं नाही. त्यानंतर मुख्याध्यापकांनी स्वतः पोलीस ठाणे गाठून 9 सप्टेंबरला तक्रार दिली.

संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर लगेच पॉक्सो कायद्याअंतर्गत कलम 11 आणि 12 अंतर्गत बालकाच्या शारीरिक, लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली.

त्याला कोर्टात हजर केलं असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असल्याचं संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष ठाकरे यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितलं.

शिक्षक विद्यार्थ्यांसोबत नेमकं काय करत होता?

विद्यार्थ्यांची शिक्षकाबद्दल नेमकी काय तक्रार होती? याबद्दल पोलीस निरीक्षक मनिष ठाकरे यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितलं, “संबंधित शिक्षक विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याच्या बहाण्यानं काऊन्सिलिंग रुममध्ये घेऊन गेला. मुलींना अभद्र भाषेत बोलत होता. तसेच मुलांच्या मानेवरून, छातीवरून हात फिरवत होता. मुलांना बॅड टच वाटला. त्यामुळे त्यांनी तक्रार केली. तसेच मुलांना पाण्याच्या बाटलीनं आणि डस्टरनं वर्गात मारहाण करत होता. मुलींना घाणेरड्या भाषेत बोलायचा.”

शिक्षकानं कारणे दाखवा नोटीसमध्ये काय स्पष्टीकरण दिलं होतं?

विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकाकडे तक्रार दिल्यावर शाळा व्यवस्थापनानं शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावली. यावर शिक्षकानं 5 सप्टेंबरला आपलं म्हणणं चौकशी समिती आणि शाळा व्यवस्थापनाकडे सादर केलं.

त्यानुसार संबंधित शिक्षकाला पाठिंबा देणारे विद्यार्थी, संबंधित शिक्षक आणि दुसऱ्या काही पालकांचं पाचपावली परिसरात भांडण झालं होतं. त्याचा बदला म्हणून आपल्याला फसवलं जात आहे, असं सांगून शिक्षकानं आरोप फेटाळून लावले होते, असं पोलिसांनी सांगितलं.

राज बालहक्क संरक्षण आयोगाचं म्हणणं काय आहे?

बदलापूरच्या घटनेनंतर नागपुरातल्या शाळेत अशी घटना घडली. त्यामुळे आम्ही राज्य बाल हक्क आयोगासोबत संपर्क साधला. यावेळी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शाह बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाल्या, “ही अत्यंत भंयकर घटना आहे. महाराष्ट्रात वारंवार अशा घटना घडणे ही भंयकर परिस्थिती आहे. या घटना पाहून फार वाईट वाटतं. अशा घटनांमध्ये लवकर गुन्हा दाखल केला नाहीतर असे प्रकरण आणखी वाढत जाणार. अशा नराधमांना वेळीच तुरुंगात नाही टाकलं पुढे जाऊन बलात्कार करायलाही मागे पुढे बघणार नाहीत. ही अमानवी मनोवृत्ती आहे. त्याला शासन, प्रशासन आणि पालक सगळ्यांनी एकत्र येऊन नक्की आळा घालायला पाहिजे.”

लाल रेष
लाल रेष

पालकांनाही ही विनंती आहे की अशा घटना आढळल्या आणि पोलिसांनी तक्रार घ्यायला उशीर केला तर थेट बालहक्क आयोगाला संपर्क करा. आम्ही पालकांना मदत करायला नेहमी तयार असतो, असं आवाहनही सुशीबेन शाह यांनी केलं.

( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन )