' मैं जिंदगीभर शागिर्द रहना चाहता हूं', असं झाकीर हुसैन बीबीसीच्या मुलाखतीत का म्हणाले होते ?

झाकीर हुसैन

फोटो स्रोत, Getty Images

प्रसिद्ध तबला वादक आणि ग्रॅमी अवॉर्ड विजेते उस्ताद झाकीर हुसैन यांचे अमेरिकेत निधन झाले आहे. ते 73 वर्षांचे होते.

1951 मध्ये जन्म झालेल्या झाकीर हुसैन यांचा जगातील महान तबला वादकांमध्ये समावेश होता. त्यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्म भूषण आणि 2023 मध्ये पद्म विभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

द बीटल्ससह अनेक पाश्चात्य संगीतकारांबरोबर त्यांनी सादरीकरण केलं होतं.

पंधरा वर्षांपूर्वी 2009 मध्ये त्यांना 'बेस्ट कंटेम्पररी वर्ल्ड म्युझिक अल्बम श्रेणी'त ग्रॅमी अवॉर्ड मिळाला होता.

2009 मध्ये बीबीसी हिंदीच्या 'एक मुलाकात' या विशेष कार्यक्रमात त्यांनी संगीत जगतातील त्यांच्या प्रवासाबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या.

ही मुलाखत बीबीसी हिंदीचे तत्कालीन संपादक संजीव श्रीवास्तव यांनी घेतली होती.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

सर्वात प्रथम ग्रॅमी अवॉर्ड मिळाल्याबद्दल तुमचे अभिनंदन. 17 वर्षांनंतर तुम्हाला पुन्हा एकदा हा पुरस्कार मिळाला आहे.

17 वर्षांपूर्वीही मला याच ग्रूपबरोबर ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता. परंतु, त्यावेळी आम्ही सहा जण होतो. यावेळी आम्ही फक्त दोघेच आहोत. मी आणि मिकी. आम्ही दोघांनी मिळून हे तयार केले आहे.

पण, जेव्हा एवढे पुरस्कार मिळतात तेव्हा ते रुटीनच होऊन जात नाही का?

मला वाटतं, कोणताही पुरस्कार कामानुसार मिळायला हवा. पुरस्कार मिळणे म्हणजे तुम्ही योग्य मार्गावर जात असल्याचे प्रमाण आहे. पुरस्कार हा आशीर्वादाप्रमाणे असतो. ग्रॅमी अवॉर्डच्या ज्युरीमध्ये सर्वच कलाकार आहेत. मला वाटतं जर मला 17 वर्षांनंतर हा पुरस्कार मिळाला असेल तर याचा अर्थ मी नव्या युगाबरोबर पुढं जात आहे. नसता या वयात 'जीवनगौरव पुरस्कार' मिळतात.

व्हीडिओ कॅप्शन, झाकीर हुसैन यांची मुलाखत, भारतीय संगीत जगभरात पोहोचवण्याबद्दल काय म्हणाले?

मी वयाबाबत बोलणारच आहे, परंतु त्यापूर्वी मला हे जाणून घ्यायचे आहे की परंपरा आणि आधुनिकतेची सांगड कशी घालता?

काही पिढ्यांचे वाढच अशी झालेली असते की, ते योग्य पद्धतीनेच पुढे जातात. मला कमी वयात मोठ्या लोकांबरोबर आणि गुरुजनांसोबत काम करण्याची संधी मिळाली.

त्यामुळे मी चांगल्या पद्धतीने शिकलो. बाहेर पडलो तेव्हा मी तरुण आणि उदार मनाचा झालो होतो.

मी मुंबईतच लहानाचा मोठा झालो. त्यामुळं मला प्रत्येक प्रकारचं संगीत ऐकण्यास मिळालं. माझे वडील जगभर फिरत असत आणि वेगवेगळ्या प्रकारचं संगीत मला ऐकवत.

कमी वयातच इतकं एक्सपोजर मिळाल्यामुळे मी केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील लोकांबरोबर काम करण्यास सक्षम झालो.

सध्याचे कलाकार 17-18 वर्षांचे होतात, तेव्हाच ते जागतिक कलाकार झालेले असतात. त्यांना पाश्चात्य संगीत आणि भारतीय संगीताचे ज्ञान असते.

झाकीर हुसैन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 4 फेब्रुवारी 2024 रोजी 66 व्या वेळी ग्रॅमी पुरस्कारादरम्यान, झाकीर हुसैन यांना 'पश्तो'साठी 'ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स' पुरस्कार मिळाला.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

तुम्हीही 17-18 वर्षांचे असताना खूप लोकप्रिय होता?

मला त्यावेळी चांगला एक्सपोजर मिळाला होता. याचं श्रेय मी वडिलांना देतो. त्यांच्यामुळे मला अनेक दिग्गजांना ऐकता आले, भेटता आले.

वयाच्या 12 व्या वर्षी मी बडे गुलाम अली, आमीर खान, ओंकारनाथ ठाकूर यांची साथसंगत करायचो. 16-17 वर्षांचा असताना पंडित रविशंकर, अली अकबर खान यांना साथ द्यायचो.

त्यानंतर मी पुढची पिढी हरिप्रसाद, शिवकुमार, अमजदभाई यांच्याबरोबर काम केलं. त्यानंतर आजची पिढी शाहीद परवेझ, राहुल शर्मा, अमान-अयान यांच्याबरोबरही मी काम करू शकलो.

तर सांगायचं म्हणजे, चार पिढ्यांबरोबर काम करण्याचा चांगला अनुभव मला मिळाला.

इतक्या लहान वयात मोठ्या लोकांबरोबर कामाचा अनुभव कसा होता?

खरंतर, मला तेव्हा माहिती नव्हतं की, मी कोणाबरोबर काम करत आहे. माझा पहिला व्यावसायिक कार्यक्रम वयाच्या 12 व्या वर्षी झाला. त्यावेळी मी अकबर अली खान यांच्याकडे शिकत होतो. पण मी कोणाबरोबर तबला वादन करत होतो याची जाणीव मला 10 वर्षांनंतर झाली.

अकबर अली खान यांनी मला कधीच ते एक दिग्गज कलाकार आहेत याची जाणीव करुन दिली नाही. हा त्यांचा मोठेपणा होता. त्यांच्यासारख्या मोठ्या कलाकाराबरोबर तबला वाजवत असल्याचं माझ्या लक्षातच आलं नाही.

झाकीर हुसैन

फोटो स्रोत, Getty Images

तुमचे वडील उस्ताद अल्ला रखा साहेब हे स्वतःच संगीताचे विद्यालय होते. तेच तुमचे प्रेरणास्थान होते का?

माझ्यावर सर्वाधिक प्रभाव हा वडिलांचा होता. सुरुवातीचे प्रशिक्षण मला वडिलांनीच दिले. कुठे आणि कशा पद्धतीने हात ठेवायचा, वाद्याशी समतोल कसा साधायचा, कोणत्या घराण्याची काय खासियत आहे हे समजावलं.

त्यानंतर मी वेगवेगळ्या ठिकाणी तबला वाजवू लागलो आणि दुसऱ्या तबला वादकांनाही ऐकू लागलो. तेव्हा त्यांच्यापासूनही मला प्रेरणा मिळाली.

चांगल्या गोष्टी शिकण्यापासून मला वडिलांनी कधीच रोखले नाही. त्यांनी माझा पाया भक्कम केला. त्याचबरोबर उस्ताद हबीबुद्दीन खान, खलिफा वाजीद हुसैन, कंठा महाराजजी, शांता प्रसाद यांचाही प्रभाव माझ्यावर पडला.

कधी तबला सोडून दुसरं वाद्य वाजवावं वाटलं का?

नाही, दुसरं वाद्य निवडण्याचा प्रश्नच कधी मनात आला नाही. लहानपणी अनेकवेळा रियाज केल्यानंतर मी झोपत असे तेव्हाही तबला माझ्याबरोबर असायचा.

दुसरं वाद्य वाजवावं असा विचार मनात कधीच आला नाही. माझ्या वडिलांनी काही दिवस मला पियानो शिकण्यासाठी पाठवलं होतं.

कदाचित पाश्चात्य संगीताबाबत मला थोडी माहिती व्हावी असा त्यांचा हेतू असावा. त्यामुळे मी पियानो आणि गिटारही वाजवली. सतारही वाजवून पाहिली.

कॅलिफोर्नियातील अली अकबर खान साहेब स्कूलमध्ये शिकत होतो. जेव्हा ते सरोदचा वर्ग घेत. त्यावेळी मीही पाठीमागे बसून काही टन-टन-टन वाजवायचो. पण माझा ओढा हा तबल्याकडे राहिला. दुसऱ्या कोणत्या वाद्याकडे माझं लक्ष गेलं नाही.

झाकीर हुसैन

फोटो स्रोत, Getty Images

तबला वाजवण्याबरोबर तुम्ही त्याला जो सेक्स अपील दिला आहे, त्याबद्दल काय सांगाल?

हे पाहा, जेव्हा आम्ही व्यासपीठावर जातो तेव्हा आम्ही आमचे केस अशा पद्धतीनेच असावेत, असेच कपडे घातले पाहिजेत, असा विचार करत नाही. मी 1960-70 च्या दशकाबाबत बोलत आहे

तेव्हा माध्यमांचाही इतका प्रभाव नव्हता. 20-25 वर्षांच्या मेहनतीनंतर थोडीफार ओळख निर्माण झाली होती. त्यापूर्वी तर मी रेल्वेच्या तिसऱ्या दर्जातून (थर्ड क्लास) प्रवास करतायचो.

मुंबईहून पाटणा, बनारस, कोलकाता जाण्यासाठी तीन-तीन दिवस लागत. कधी-कधी तर बसायलाही जागा मिळत नसे. वृत्तपत्र खाली टाकून त्यावर बसून प्रवास करायचो. तबला सरस्वती आहे, त्याला कोणाचा पाय लागला नाही पाहिजे, असा वडिलांचा आदेशच होता.

सुमारे 20-22 वर्षे असाच प्रवास सुरू होता. 1961-62 पासून मी तबला वाजवत होतो आणि सत्तरच्या दशकाच्या अखेरीस माझी स्वतंत्र ओळख निर्माण झाली.

सेक्स अपीलबद्दल बोलायचं म्हटलं तर मला सांगावसं वाटतं की, जेव्हा मी अमेरिकेला गेलो आणि तिथे अली अकबर खान यांच्याबरोबर विविध ठिकाणी कार्यक्रम केले. त्यानंतर माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला.

भारताच्या बाहेर राहिल्यानंतर मी एक गोष्ट शिकली की, मंचावर बसून श्रोत्यांकडून केवळ टाळ्या मिळवणे हे माझे उद्धिष्ट असता कामा नये. तबला वाजवण्याचा आनंद घेतला पाहिजे. मी तो आनंद घेतोय हे लोकांना दिसतंही.

मी लोकांकडे बघून हसतो, मला जे आवडतं त्याचं कौतुक करतो. कदाचित हीच गोष्ट मला इतर कलाकारांपेक्षा वेगळं करत असेल.

मला विश्वास आहे की, जर तुम्ही स्वतःला एखाद्या गोष्टीसाठी समर्पित केले आणि तुमची ती भावना इतरांना दिसत असेल तर ते तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे करते.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

तुमची ही हेअर स्टाइल कधीपासून आहे?

मी विचार करुन हेअर स्टाइल बनवलेली नाही. कदाचित एखाद्या वेळी असं झालं असेल की, मी आंघोळ करुन बाहेर पडलो आणि जाण्याची गडबड असल्यामुळे केस वाळवायची आणि भांग पाडण्याची संधीच मिळाली नसेल. त्यावेळी अमेरिकेत हिप्पी स्टाइल लोकप्रिय होती. लांब केस, लांब दाढी.

याकडे मी कधी लक्ष दिले नाही. मग त्यानंतर ताज चहाबरोबर माझा करारही झाला. त्यांनी करारात अट ठेवली की, मी माझे केस कापू शकत नाही. त्यामुळे माझा नाईलाज झाला.

एकेकाळी माझे केस खूप दाट होते. पण आता वाढत्या वयाबरोबर माझे केसही गळत आहेत.

मुली तुम्हाला पसंत करतात, यामुळे तुमचे कधी लक्ष विचलित होत नाही का?

हे तुमच्यावर अवलंबून आहे. माझं लक्ष लहानपणापासूनच संगीतावर राहिले आहे. मला नेहमी कार्यक्रमाची काळजी असते. मंचावर वाजवत असताना कुठेही कोणता अडथळा निर्माण होऊ नये हा माझा प्रयत्न असतो.

माझे काही नियम आहेत. उदाहरण द्यायचं झाल्यास, आजही जेव्हा मी कार्यक्रमासाठी जातो. तेव्हा माझे कपडे मी स्वतः इस्त्री करतो. तबला स्वतः तपासून पाहतो.

हे खूप खास आहे. आणखी काय नियम आहेत तुमचे?

तबला उघडून पाहतो. तबल्याबरोबर चर्चा करतो. काय अडचण आहे, कुठे काही गरज आहे का? हे पाहतो. वाद्यांबरोबर अशा पद्धतींची चर्चा होते.

मग त्यानंतर हे पाहतो की कोणाबरोबर वाजवायचं आहे, काय वाजवायचं आहे, अशा पद्धतीची सर्व तयारी मी करतो.

मी लहान वयापासूनच जगभर फिरत आहे. त्यात जेव्हा तुमच्याकडे एखादी वस्तू नसेल तर तुम्ही त्याकडे जास्त आकर्षित होता. माझी अनेकांशी मैत्री आहे, त्यामुळे लक्ष विचलित होण्याचा प्रकार माझ्यासोबत घडत नाही.

झाकीर हुसैन

फोटो स्रोत, Getty Images

तबल्याबरोबर राहणे, बोलणे. खरंच असं काही आहे?

हो, असं होतं. प्रत्येक साधनेला एक प्रेरणा असते, असं माझं मत आहे. माझ्या लहानपणीची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. मुंबईत मी पंडित किशन महाराज यांचा कार्यक्रम ऐकण्यास गेलो होतो. ते बिरजू महाराज यांच्याबरोबर वाजवत होते.

जेव्हा किशन महाराज मंचावर जात होते, तेव्हा मी त्यांना गुडलक म्हटलं. त्यावेळी त्यांचं त्यावर उत्तर होतं, 'आज वाद्यं काय म्हणणार आहेत, हे पाहू बेटा'

त्यांनी काय म्हटलं हे मला त्यावेळी समजलं नाही. परंतु, नंतर मला याची जाणीव झाली.

याचा अर्थ वादनालाही भाषा आणि आत्मा असतो. तो संवाद झाला नाही तर मी काहीही केले तरी काहीच होणार नाही.

संगीत सरस्वतीचे वरदान आहे, असे आम्ही मानतो. शिवजींचे डमरु, श्री गणेशाचे पखवाज असो किंवा श्रीकृष्णाची बासरी भारतावर या सर्वांचा आशीर्वाद आहे. म्हणजे यात आत्मा असणारच, हे स्वाभाविक आहे.

झाकीर साहेब, संगीताची भाषा इतकी धर्मनिरपेक्ष का आहे, इतर गोष्टींमध्ये ती का दिसत नाही?

कारण संगीत सर्वात पवित्र आहे. नाद ब्रह्म म्हणजे ध्वनी ईश्वर आहे. उस्ताद बडे गुलाम अली साहेब यांची एक मुलाखत आहे. त्यामध्ये त्यांना विचारण्यात आले की, तुम्ही हरिओम तत्सद... कसे म्हटले? का म्हणू शकत नाही, असा प्रतिसवाल त्यांनी केला.

हे देवाचे नाव आहे आणि आम्ही त्याचे कौतुक करतो. त्यामुळे संगीतात अशाप्रकारचा कोणताच संकोच अजिबात नाही.

ध्रुपद, प्रबंध गायकी, हवेली संगीत आणि सुफियाना कलाम यांची सांगड घालून खयालचा जन्म झाला. म्हणूनच तुम्ही पाहाल की पंडित जसराज 'मेरा अल्लाह मेहेरबान' गात आहेत आणि बडे गुलाम अली साहेब 'हरिओम तत्सद' गात आहेत.

तुमचे छंद काय आहेत?

मला आणि माझ्या पत्नीला हायकिंग आवडते. मला वाचनाचीही आवड आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या भागात आणि वेगवेगळ्या देशातील लोकसंगीत मला खूप आवडते.

लोकसंगीत यासाठी कारण यामुळे तुम्हाला तेथील लोकांचे राहणीमान आणि जीवनशैलीची माहिती होते.

झाकीर हुसैन

फोटो स्रोत, Getty Images

तुम्हाला चित्रपट पाहण्याची आवड आहे का?

चित्रपट किंवा थिएटर पाहून मला सुमारे 20 वर्षे झाले आहेत. कार्यक्रमांमुळे थिएटरमध्ये इतक्या वेळा जाणं होतं की, त्यानंतर थिएटरमध्ये जाण्याची इच्छाच होत नाही.

आणि तसं पाहिलं तर आता टेलिव्हिजनवर सर्व काही उपलब्ध आहे. हॉटेलमध्ये घुसल्यानंतर न्यूज चॅनेल लावतो. खेळ पाहण्याची आवड आहे. बास्केटबॉल, टेनिस, क्रिकेटचे सामने खूप आवडतात.

तुमचा आवडता क्रिकेटपटू कोण आहे?

शाळेत असताना मी विकेटकीपर होतो. फारुख इंजिनिअर हे माझे आवडते खेळाडू होते. त्याचबरोबर मला गुंडप्पा विश्वनाथ, दिलीप वेंगसरकर, अझहर, राहुल द्रविड यांना खेळताना पाहणे आवडत असे. सचिन तेंडुलकरचे स्ट्रोक शॉट मला खूप आवडायचे.

आता क्रिकेटमध्ये आक्रमकपणा आला आहे. टी-20 नंतर आता टी-10 पण येईल. पण मला कसोटी क्रिकेट सर्वाधिक पसंत आहे.

झाकीर हुसैन

फोटो स्रोत, Getty Images

तुमचे खूप चाहते आहेत, तुम्हीही कोणाचे तरी चाहते असाल?

नक्कीच, माझे वडील माझ्यासाठी देवासारखे होते. प्रत्येक गोष्टींची तुलना मी त्यांच्याशी करायचो. पंडित रविशंकर यांच्याकडून मी खूप काही शिकलो. मंचावर कशा पद्धतीने सादरीकरण करावे, याचे धडे रविशंकरजी यांनी तर भारतीय कलाकारांना दिले आहेत.

स्वातंत्र्यापूर्वी संगीत राजमहालांपुरते मर्यादित होते. मंचावर ते कसे सादर करावे याची माहिती कलाकारांना नव्हती. त्याबरोबर अली अकबर खान साहेब यांच्याकडून वाद्य वाजवणे, त्यांची देखरेख ठेवण्याची प्रेरणा मिळाली.

तुमचा आवडता अभिनेता कोण आहे?

दिलीपकुमार आणि अशोककुमार मला खूप आवडायचे. अशोककुमार यांचा अभिनय नैसर्गिक वाटायचा. ते खूप सहज अभिनय करायचे. मीनाकुमारी, मधुबाला यांचा पण मी चाहता होतो.

आजच्या पिढीतील गोविंदा मला खूप आवडतो. का आवडतो यामागचे कारण मला माहिती नाही. अमिताभ बच्चनही आवडतात.

राजेश खन्ना यांच्या अभिनयाचा आनंद मला घेता आला नाही. कारण त्यावेळी मी अमेरिकेत होतो. आजच्या कलाकारांमध्ये आमिर खान चांगला वाटतो. त्यांचा तारे जमीं पर हा सिनेमा मी नुकताच पाहिला.

अभिनेत्रींमध्ये तुम्हाला कोण आवडते?

मी आजही रेखाजींचा मोठा चाहता आहे. आजच्या अभिनेत्रींमध्ये मला आजही रेखासारख्या कलाकारांची प्रतिक्षा आहे. सध्या फॅशन परेड, डिस्कोथेकचा जमाना आहे.

मी तुम्हाला 8-10 वर्षांपूर्वीची एक घटना सांगतो. मी त्यावेळी चेन्नईमध्ये होतो. एक निर्माता-दिग्दर्शक माझ्या कार्यक्रमाला आले होते. त्यांनी मला त्यांच्या चित्रपटात अभिनय करण्याची ऑफर दिली. मला तमिळ येत नसल्याचे मी त्यांना सांगितले. भाषेची कोणती अडचण नाही. पण तुम्हाला नृत्य करता येतं ना, असा सवाल त्यांनी मला केला.

झाकीर हुसैन

फोटो स्रोत, Getty Images

चित्रपटात काम करण्याची इच्छा होते का?

मी काही सिनेमे आणि अमेरिकन टेलिव्हिजनवरील मालिकांमध्ये काम केलेलं आहे. मी स्वतःला अभिनेता म्हणून अनेक संधी देऊन पाहिली आहे. पण मी अभिनेता होण्याऐवजी तबला वादक म्हणूनच चांगला आहे, या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे.

आणखी काही करण्याची इच्छा आहे का?

माझा जन्म भारतात झाला. मुंबईत लहानाचा मोठा झालो. त्यामुळे बॉलिवूड प्रति माझे आकर्षण स्वाभाविकच होते. त्यामुळे बॉलिवूडमधील सिनेमांना संगीत देण्याची माझी इच्छा होती.

अनेकवेळा संधी मिळाली, पण त्यावेळी मी व्यस्त असल्यामुळे मला काम करता आले नाही. पण 'साज' सिनेमाला मी संगीत दिले होते. त्यातही माझी केवळ चार गाणी होती.

माझ्या वडिलांनी सुमारे 40 सिनेमांना संगीत दिले. अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गायनही केले. त्यांनी पृथ्वीराज कपूर यांना आवाज दिला. एका चित्रपटात तर त्यांनी सहकलाकाराची भूमिकाही केली.

काही अंशी त्यांच्याप्रमाणेच माझा प्रवास राहिला. मी ही एका चित्रपटासाठी गाणं म्हटलं. मिस्टर अँड मिसेज अय्यर सिनेमात मी गाणं म्हटलं आहे.

झाकीर हुसैन

फोटो स्रोत, Getty Images

एखादं आवडतं गाणं?

चित्रपटांबाबत बोलायचं म्हटलं तर संगीतकार मदनमोहन हे माझे आवडते संगीतकार होते. त्यांची सर्वच गाणी मला आवडतात. हकीकत सिनेमातील 'खेलो न मेरे दिल से' हे गाणं मला खूप आवडतं. संयोग चित्रपटातील 'वो भूली दास्ताँ फिर याद आ गई' हे गाणं तर अप्रतिम आहे.

दोन वाक्यात स्वतःचे वर्णन तुम्ही कसे कराल?

मला स्वतःला 'शागीर्द' (शिष्य) म्हणून घ्यायला आवडेल. मी रोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो.

माझे वडील मला नेहमी म्हणायचे, बेटा उस्ताद होण्याचा प्रयत्न कधी करु नकोस. चांगला शागीर्द हो खूप काही शिकशील.

हे मी केवळ विनम्रतेने किंवा म्हणायचे म्हणून म्हणत नाही. मी रोज जेव्हा घरातून बाहेर पडतो, तेव्हा मला माहीत असतं की मी आज काहीतरी नवीन शिकणार आहे. माझ्या मते, जीवन म्हणजे आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणे नव्हे, तर जीवनाच्या प्रवासाचा आनंद घेणे होय.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.