ए. आर. रहमान आणि सायरा बानू 29 वर्षांनंतर विभक्त, घटस्फोटाचं कारण काय सांगितलं?

फोटो स्रोत, Getty Images
ऑस्कर पुरस्कार विजेते संगीतकार ए. आर. रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांनी लग्नाच्या 29 वर्षांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांच्या वकिलांनी 19 नोव्हेंबर 2024 रोजी निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे.
घटस्फोटाची प्रकरणं हाताळणाऱ्या प्रसिद्ध वकील वंदना शहा यांनी या निवेदनात म्हटलं आहे की, या दोघांच्या नातेसंबंधातील 'भावनिक तणावामुळे' त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.
या निवेदनात म्हटलं आहे की, "लग्नाच्या अनेक वर्षांनंतर सायरा आणि त्यांचे पती ए. आर. रहमान यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. नातेसंबंधातील भावनिक तणावामुळे या दोघांनी हा निर्णय घेतला आहे."
वंदना शहा म्हणाल्या की, "या दोघांचं एकमेकांवर एवढं प्रेम असूनही त्यांचे संबंध ताणलेले होते. या नात्यातल्या अडचणी एवढ्या वाढल्या होत्या की, हा दुरावा कमी करणं अशक्य झालं होतं. दोघांपैकी एकालाही हे अंतर कमी करणं शक्य नव्हतं."
ए. आर. रहमान यांनी मंगळवारी (19 नोव्हेंबर) मध्यरात्री त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करूनही याबाबतची माहिती दिली आहे.


रहमान यांनी लिहिलंय की, "आम्हाला असं वाटत होतं की, आम्ही आमच्या लग्नाची 30 वर्षे पूर्ण करू. मात्र असं वाटतं की, अनेक गोष्टींचा असा अदृश्य शेवट होत असतो. तुटलेल्या हृदयाचा भार एवढा असतो की, त्यामुळे देवाचं सिंहासन देखील हादरतं. हे नातं जरी पूर्ववत झालं नाही तरी अशा घटनांमध्येही आपण आपला अर्थ शोधत असतो. या कठीण काळात आमच्या सोबत राहिलेल्या आणि आमच्या खासगी आयुष्याचा सन्मान करणाऱ्या आमच्या मित्रांचे आम्ही आभारी आहोत."
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार आधी सायरा बानू यांनी विभक्त होण्याची घोषणा केली आणि नंतर या दोघांचं संयुक्त विधान जाहीर करण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images
या निवेदनात सायरा आणि रहमान म्हणाले आहेत की, हा निर्णय घेणे अत्यंत वेदनादायी होतं. या दोघांनी त्यांच्या गोपनीयतेचा सन्मान करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून या कठीण काळातून जाण्यास त्यांना मदत होईल.
सायरा बानो आणि एआर रहमान (57) यांचा विवाह 1995 मध्ये झाला होता. या दोघांना तीन मुलं आहेत. मुलगा अमीन आणि खातिजा, रहिमा या मुली त्यांना आहेत.
त्यांचा मुलगा अमीन याने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत म्हटलंय की, "आमची तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की, या अवघड काळात आमच्या खासगी आयुष्याचा सन्मान करावा. आम्हाला समजून घेणाऱ्यांचे खूप खूप आभार."
ए. आर. रहमान यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत
संगीतकार ए. आर. रहमान यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. ज्यामध्ये ऑस्कर, ग्रॅमी सारख्या जागतिक पुरस्कारांचाही समावेश होतो. रहमान यांच्या संगीत कारकिर्दीला 32 वर्षे पूर्ण झाली आहेत.
ए. आर. रहमान यांनी 1989 मध्ये त्यांच्या वयाच्या 23 व्या वर्षी इस्लाम धर्माचा स्वीकार केला. इस्लामबाबत बोलताना रहमान म्हणाले होते की, त्यांच्यासाठी इस्लामचा अर्थ हा आयुष्यातील साधेपणा आणि मानवतेशी निगडित आहे.
रहमान यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, "इस्लाम हा एक महासागर आहे. या धर्मात 70 पेक्षा जास्त संप्रदाय आहेत. मी प्रेमाचा संदेश देणाऱ्या सुफी परंपरेचं पालन करतो. मी आज जो काही आहे, ते या पंथाच्या तत्वज्ञानामुळे आहे. मी आणि माझं कुटुंबं या शिकवणींचं पालन करतो. अनेक गोष्टी घडत आहेत, हे स्पष्ट दिसतंय पण यापैकी बहुतांश गोष्टी राजकीय आहेत."

फोटो स्रोत, Getty Images
57 वर्षीय रहमान यांना दोन ऑस्कर, दोन ग्रॅमी आणि एक गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी शेकडो चित्रपटांना संगीतबद्ध केलं आहे. ऑस्कर पुरस्कार विजेते चित्रपट 'स्लमडॉग मिलेनियर' सोबत 'लगान', 'ताल'सारख्या चित्रपटांनाही रहमान यांनी संगीत दिलं आहे.
रहमान यांनी जगभरातल्या मोठमोठ्या कलाकारांसोबत काम केलं आहे. मितभाषी असणाऱ्या रहमान यांनी एकदा सांगितलं होतं की, संगीत लोकांना एकत्र आणण्यात मदत करेल अशी आशा त्यांना आहे.
रहमान म्हणाले होते की, "ऑर्केस्ट्रामध्ये काम करत असताना तुमच्याकडे एक विशेषाधिकार असतो आणि नसतोसुद्धा कारण तुम्ही एका समूहात काम करत असता. एकत्र सादरीकरण करण्याचा अर्थ असाही असतो की, तुम्ही वेगवेगळ्या शर्यतींमध्ये धावत असता. आम्ही वेगवेगळ्या धर्माचे असतो आणि एकत्र कला सादर करतो. आमच्या अंतर्मनातून एकच आवाज येतो आणि आम्ही एका लयीत काम करतो."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











