दिलजीत दोसांज जगभरात इतका लोकप्रिय कसा झाला?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मनीष पांडे
- Role, बीबीसी न्यूजबिट
"पंजाबी आ गया ओये..."
जगात कुठेही कार्यक्रम असू द्या, दिलजीत दोसांजच्या या चार शब्दांमुळे शोच्या सुरुवातीलाच एक उत्साहाचं वातावरण तयार होतं. या वाक्याशिवाय दिलजीतचा शो सुरू होण्याचा दुसरा कोणताच मार्ग असू शकतो यावर विश्वासच बसू शकत नाही.
मागच्या काही वर्षात या पंजाबी कलाकाराचं नाव गाजत आहे. दिलजीतचा आवाज आता संपूर्ण जगात घुमतोय. एड शीरन, सिया आणि रॅपर साविटी यांसारख्या जागतिक कीर्तीच्या गायकांसोबत गाणे म्हटल्यामुळे दिलजीतचा आवाज संपूर्ण जगभर पोहोचलाय.
अमेरिकेतील जगप्रसिद्ध कोचेला म्युझिक फेस्टिव्हलमध्ये सादरीकरण करणारा पहिला पंजाबी भाषिक गायक होण्याचा बहुमान दिलजीत दोसांजला मिळाला. यामुळे त्याच्या मेगास्टारच्या प्रतिमेवर शिक्कामोर्तब झाले.
त्यानंतर जिमी फॉलनच्या द टुनाईट शो या जगप्रसिद्ध शोमध्ये देखील दिलजीत दिसला.
दिलजीतने जगाला गवसणी घातली असली तरी अजून देखील त्याच्या कार्यक्रमाची सुरुवात तो ज्या पद्धतीने करतो, त्यावरून असं दिसतं की हा गायक कुठेही गेला तरी पंजाबी मातीचा सुगंध तो त्याच्यासोबत जगभर पोहोचवतो आहे.
दिलजीतचे फॅन्स, सहकलाकार आणि मित्रांना असं वाटतं की दिलजीतच्या यशाचं गुपित यातच सामावलेलं आहे.


'पंजाबी पॉवर'
ब्रिटिश पंजाबी गायिका खुशी कौर म्हणते की, "एक कलाकार म्हणून तुमच्या संस्कृतीशी एकरूप होणं किती महत्त्वाचं असतं हे दिलजीतने दाखवून दिलं आहे."
20 वर्षांच्या खुशीने बीबीसी न्यूजबिटला सांगितलं की, "विशेषतः एखाद्या उगवत्या कलाकाराने, संस्कृतीचा एवढा पुरस्कार करणे खरोखर प्रेरणादायी आहे."
नॉटिंगहॅममध्ये राहणाऱ्या खुशीसाठी दिलजीत दोसांज हा तिचा पहिला आदर्श आहे. दिलजीतची पंजाबी संस्कृतीशी जुळलेली नाळ हीच त्याच्या यशाची किल्ली आहे असं खुशीला वाटतं.
ती म्हणते की, "त्याने पाश्चिमात्य कलाकारांसोबत काम करूनही, त्याचा पारंपरिक बाज कायम ठेवलाय. आणि ते खूप महत्त्वाचं आहे, कारण माझ्यासारखे तरुण कलाकार जेव्हा त्याच्याकडे बघतात, तेव्हा आमची संस्कृती जोपासून आम्ही देखील यशस्वी होऊ शकतो याची खात्री पटते."

फोटो स्रोत, @Casa.Lente
"दिलजीतच्या यशामुळे आमचा आमच्या संगीतावर, आमच्या वेशभूषेवर असणाऱ्या विश्वास द्विगुणित झाला आहे. आता आम्ही मान उंचावून अभिमानाने म्हणू शकतो, की आम्ही देखील हे करू शकतो."
जिमी फॉलनच्या द टुनाईट शोमध्ये दिलजीतने त्याच्या मातृभाषेतच सादरीकरण केलं. त्याने तिथे पंजाबी वेशभूषा घालून भांगडा सादर केला.
ब्रिटिश आशियाई कलाकार जी-फंकसोबत मिळून त्याने बनवलेलं G.O.A.T. हे गाणंदेखील त्याने त्या कार्यक्रमात सादर केलं.
जी-फंक म्हणाला की, दिलजीतच्या भाषा आणि गायकीकडे लोक आकर्षित होतात. कारण, त्याच्या सादरीकरणात एक गूढ आहे, त्याच्याबद्दल लोकांना कुतूहल आहे. त्याचा असा विश्वास आहे की जर त्याने इंग्रजीत गाणं गायलं की पाश्चिमात्य लोक त्याच्याकडे तेवढं लक्ष देणार नाहीत.
जी-फंक म्हणतो की, "जे लोक पंजाबी नाहीत त्यांना हे जाणून घ्यायचं आहे की दिलजीत नेमकं काय म्हणतोय आणि त्याच्या नावाचा एवढा गाजावाजा का सुरू आहे?"
"या गोष्टीची त्याला मोठी मदत झालीय."
पंजाबी संस्कृती आणि मातृभाषेतून केलेल्या सादरीकरणामुळे जगभरातील पंजाबी लोकांना देखील त्याचं आकर्षण वाटतं.
जी-फंक म्हणाला की, द टुनाईट शोमध्ये झालेल्या सादरीकरणानंतर दिलजीतने त्याला मेसेज करून कळवलं की, "माझ्या लोकांना जगाच्या नकाशावर आणण्यासाठी तुझे खूप खूप आभार."

फोटो स्रोत, Getty Images
दिलजीत म्हणतो की, "माझ्या लोकांचं इथे प्रतिनिधित्व करण्याची आणि माझ्या संस्कृतीला सादर करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे."
अमेरिकन रॅपर साविटीने पॉडक्रशला सांगितलं की दिलजीत हा एक अतिशय विनम्र कलाकार आहे. जी-फंकने देखील त्याच्या दिलजीतसोबत काम करण्याच्या अनेक वर्षांच्या अनुभवाबाबत बोलताना त्याच्या नम्रतेचा आणि चांगल्या स्वभावाचा उल्लेख केला.
जी-फंक म्हणतो की दिलजीत हा एक यशस्वी संगीतकार, अभिनेता आणि चित्रपट निर्माता असूनसुद्धा तो खूप, 'विनम्र आणि जमिनीवर पाय असणारा' व्यक्ती आहे. जी-फंक आणि दिलजीत दोसांज यांची पहिली भेट 'नांदोज' नावाच्या एका रेस्टॉरंटमध्ये डिनर करताना झाली.
जी-फंक पुढे म्हणाला की, "दिलजीत प्रत्येकाला 'पाजी' (मोठा भाऊ) म्हणून हाक मारायचा, मलाही तो पाजीच म्हणायचा. मी त्याच्यापेक्षा वयाने खूप लहान असूनसुद्धा आणि माझं काम त्याच्याएवढं नसूनही तो मला आदर देत होता."
ज्यांच्याकडे दिलजीतचा मोबाईल नंबर आहे, त्यांना येणार अनुभव देखील जी-फंकने सांगितला.
"त्याला व्हॉइसनोट्स पाठवायला आवडतात. मेसेज करत असताना दोन इमोजी तो प्रामुख्याने वापरतो. प्रार्थना करणारे दोन हात आणि डोळे वर करून मंद हसणारा चेहरा, हे दोन इमोजी तो नेहमी वापरतो."
खुशी म्हणते की, दिलजीतने वादांपासून दूर राहून आणि सभ्यतेने राहून माझ्यासारख्या तरुण कलाकारांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
खुशी म्हणते की, "त्याने त्याची तत्त्वं पाळली आहेत. त्याने स्वतःची नैतिकता ढळू दिली नाही आणि नेहमीच नम्र राहिला आहे. आम्ही त्याच्याकडून हे शिकलं पाहिजे."
ती म्हणते की, "त्यामुळे मी आयुष्यात काहीही मिळवलं तरी दिलजीतची ही गोष्ट कधीच विसरणार नाही."
केवळ संगीत क्षेत्रावरच दिलजीत दोसांजचा प्रभाव पडला आहे असं नाही.
सध्या ग्लासगोमध्ये राहणारे वैभव आणि तानिया हॅपी ही भावंडं दिलजीतची गाणी ऐकतच मोठी झाली आहेत. दिलजीतच्या संगीतामुळे त्यांना आपल्या मूळ गावाची कमतरता जाणवत नाही. त्यांचा जन्म पंजाबमध्ये झाला आहे.

फोटो स्रोत, Taniya Happy
न्यूजबिटला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दिलजीतच्या प्रवासाचा अभिमान असल्याचं सांगितलं.
20 वर्षांचा वैभव म्हणतो की, "जेव्हा त्याने कोचेला येथे त्याचं सादरीकरण केलं, तो क्षण प्रत्येक पंजाबी व्यक्तीसाठी अभिमानाचा क्षण होता."
"असं वाटतं तो हे सगळं आमच्यासाठीच करतो आहे. त्याने मंचावर पारंपरिक पंजाबी कपडे घातले होते आणि तो आनंद घेत होता. दुसऱ्या लोकांसाठी त्याने स्वतःच्या पेहरावात कसलाही बदल केला नव्हता."
25 वर्षांची तानिया हॅपी म्हणते की दिलजीतच्या बरोबरी कुणीच करू शकत नाही.

फोटो स्रोत, Taniya Happy
ती म्हणते की, "तुमच्या वाढत्या वयानुसार तुम्ही तुमच्या संस्कृती आणि परंपरांपासून दूर जाऊ शकता. इंग्रजी बोलणाऱ्या साहेबांच्या देशात पंजाबीत बोलणं अवघड असल्याचं मला वाटतं. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांशीच फक्त मातृभाषेत बोलू शकता."
"त्यामुळे दिलजीतची गाणी गाणारी गर्दी पाहून हुरूप येतो. कारण दिलजीत पंजाबीत गातो आणि मग तुम्हाला हा देश देखील तुमचाच आहे असं वाटू लागतं."
ती म्हणते की, "तुम्ही परदेशात आहात असं अजिबात वाटत नाही."
तानिया आणि वैभव हे दिलजीतला लव्हर, वाइब आणि लाख 28 कुडी दा ही पंजाबी गाणी गाताना बघणाऱ्या हजारोंच्या गर्दीत असणार आहेत. वैभव पहिल्यांदाच दिलजीतला लाईव्ह पाहणार असून, यामुळे तो प्रचंड उत्साहित असल्याचं सांगतो.
वैभव म्हणतो की, "हा क्षण मी माझ्या कुटुंबीयांसोबत म्हणजे आई आणि बहिणीसोबत अनुभवणार आहे. मी माझ्या पालकांसोबत दिलजीतची गाणी ऐकली आहेत, लहानपणासून अनेक कार्यक्रमांमध्ये त्याच्या गाण्यांवर थिरकलो आहे."
वैभव सांगतो की, "आता माझ्या कुटुंबासोबत त्याला प्रत्यक्ष बघण्याचा अनुभव यापेक्षाही सुंदर असेल."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











