या मुसलमानांना भजन-कीर्तन करताना पाहून इंग्रजही झाले होते थक्क

फोटो स्रोत, MUSIC IN COLONIAL PUNJAB: COURTESANS, BARDS AND CONNOISSEURS, 1800-1947, RADHA KAPURIA, OXFORD UNIVERSITY PRESS.
- Author, गुरजोत सिंह
- Role, बीबीसी पंजाबी प्रतिनिधी
पंजाबात दैनंदिन वापरातील भाषेत नदी, माती आणि शेती हे शब्द जितके प्रचलित आहेत, तितकाच 'मरासी' हा शब्ददेखील आहे.
मरासी एक जातीवर आधारित समुदाय आहे. ते पिढ्यान् पिढ्या संगीत, मनोरंजन आणि कलेचा वापर वडिलोपार्जित व्यवसायाच्या स्वरुपात करत आले आहेत.
एखाद्या घरात बाळ जन्माला आल्यावर करण्यात येणारा कार्यक्रम असो की एखाद्याच्या मृत्यूनंतर करायचा दुखवटा असो... मरासींच्या उपस्थितीशिवाय हे प्रसंग पार पडत नसत.
1947 मध्ये भारताची फाळणी झाली, त्यावेळेस पंजाब विभागला गेला. त्यानंतर मरासी समुदायाचे लोक मोठ्या संख्येने पाकिस्तानातील पंजाबात निघून गेले. त्याचबरोबर सामाजिक बदलांमुळे अलीकडच्या काळात मरासी समाजाचं महत्त्वदेखील कमी झालं आहे.
मात्र, एक गोष्ट अजूनही तशीच आहे, ती म्हणजे मरासी समुदायाला सन्मान न देण्याची वृत्ती.
मरासी समुदायासोबत होणाऱ्या या भेदभावाला झोनेब जाहीद नावाच्या तरुण पाकिस्तानी गायकाने त्याच्या एका गाण्यातून उत्तर दिलंय.
चार वर्षांपूर्वी युट्युबवर प्रदर्शित झालेल्या या गाण्याला 23 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. अनेक पिढ्यांपासून मरासी समुदात संगीत, मखौल (विनोद) आणि कलेचा व्यवसाय करत आला आहे.

फोटो स्रोत, YT/JUNOON RECORDS
झोनेबने त्याच्या गाण्यातून स्वतः मरासी असल्याची कबुली देणं ही एक अत्यंत विलक्षण गोष्ट आहे.
हसन नवाज नावाच्या आणखीन एका गायकाने झोनेबच्या गाण्यातील बोल वापरून मरासींबाबत समाजात असणाऱ्या गैरसमजांचे मळभ दूर करण्याचा प्रयत्न केलाय.
काळाच्या पडद्याआड गेलेल्या पंजाबातील परंपरा
मरासी समाज पाकिस्तानातील पंजाबबरोबरच भारतातील पंजाबमध्येही वास्तव्यास आहे. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी इथल्या कला आणि संगीताशी जोडलेली आहे.
भारत आणि पाकिस्तान, दोन्हीकडील मरासी समाजाशी निगडीत गायकांनी त्यांची ओळख लपवण्याऐवजी अभिमानाने सार्वजनिक स्तरावर त्यांची कला सादर करण्यास सुरूवात केली आहे.
पंजाबातील मरासी समाजातील कित्येक गायकांमध्ये नूरा सिस्टर्सचाही समावेश आहे. त्यांनी अनेक हिंदी गाणी गायली आहेत. याशिवाय कुलदिप मानक, सरदुल सिकंदर, मास्टर सलीम, साबर कोटी, एडु शरीफ, लाभ हिरा ही आणखी काही नावं आहेत.
याव्यतिरिक्त गुरबानी कीर्तनासाठी प्रसिद्ध असलेल्या कलाकारांमध्ये मरासी समाजातील लोकांची संख्या मोठी आहे.

फोटो स्रोत, SOURCE: CHARLES SWYNNERTON, ROMANTIC TALES FROM THE PANJAB (1903)
लोकगीत आणि शास्त्रीय संगीतातील त्यांच्या कौशल्याबद्दल मरासी समाजाला अभिमान होता. मात्र पंजाबातील या समाजाला खालच्या जातीतील मानलं जात असे.
संगीताच्या क्षेत्रात मोठ्या संख्येने अतिशय यशस्वी गायक, गीतकार आणि कलाकार मरासी समाजातून आले आहेत. मात्र, असं असूनदेखील त्यांच्याकडं पाहण्याचा प्रचलित सामाजिक दृष्टीकोन अद्याप बदलेला नाही.
कित्येक कलाकारांनी याबाबत त्यांचे अनुभव सार्वजनिक व्यासपीठावरून सांगितले आहेत. आजदेखील तथाकथित सवर्ण जातीतील लोकांना गायन किंवा कलेच्या क्षेत्रात सुरूवातीच्या टप्प्यात संघर्ष करावा लागला की या व्यवसायाला 'मरासींनी करायचं काम' असं हिणवलं जातं.
पंजाबात या संगीताशी निगडीत समाजाबद्दल असा दृष्टीकोन का निर्माण झाला, कसा निर्माण झाला आणि आजदेखील तो तसाच का आहे याबाबत ब्रिटनमधील संशोधक राधा कपूरिया यांचं एक पुस्तक अलीकडंच भारतात प्रकाशित करण्यात आलं आहे.
या पुस्तकाचं नाव आहे - 'म्युझिक इन कोलोनिअल पंजाब- कोर्टेसन्स, बार्ड्स अॅंड कन्नोइसर्स'
राधा कपूरिया यांनी किंग्स कॉलेज लंडन येथून पीएच.डी. केली आहे. सध्या त्या डरहम विद्यापीठात शिकवतात.
मरासी कोण आहेत?
राधा कपूरिया यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे की मरासी समाज एक जाती-आधारित समाज आहे. ते पिढ्यान् पिढ्या संगीत आणि कला शिकत आले आहेत.
या समाजाला जमीनदारांकडून आश्रय मिळत होता आणि मरासींना वंशावलीचं उत्तम ज्ञान होतं. या समाजाला सामाजिक उतरंडीत कनिष्ठ स्थान देण्यात आलं होतं.
राधा कपूरिया पुढं लिहितात, ''या समाजाबद्दल इंग्रजांच्या राजवटीत जे लिहिलं गेलं त्यावरून लक्षात येतं की मरासी समाजानं पंजाबातील संगीत क्षेत्रात मध्यवर्ती भूमिका बजावली आहे.''
मरासींचं समाजातील स्थान जरी कनिष्ठ असलं तरी त्यांची संगीताच्या क्षेत्रातील प्रतिभा उच्च कोटीची होती.
महाराजा रणजीत सिंह यांच्या दरबारात, मरासी समाज फारसी कवी हाफिज यांनी लिहिलेल्या गजल गायचे.

राधा कपूरिया सांगतात की मिरासी किंवा मरासी या शब्दाचा अर्थ परंपरा किंवा वारसा जतन करणारा असा होता. मीरास या शब्दाचा अर्थ वारसा असा असतो.
कान्ह सिंह नाभा यांच्या महान शब्दकोषानुसार गुरु नानक यांचे साथीदार भाई मर्दाना सुद्धा याच जातीतील होते.
भाई मर्दाना मुसलमान होते. आजदेखील भाई मर्दाना यांचे वंशज रुबाबी बनवून कीर्तन करतात.
राधा म्हणतात की मरासींनी एका बाजूला शास्त्रीय संगीताच्या परंपरेचं जतन केलं आहे, तर दुसरीकडे त्यांची पंजाबच्या लोकसंगीतावरदेखील तितकीच पकड आहे.
सुप्रसिद्ध पंजाबी गायक मोहम्मद सादिकही मरासी समाजाचाच एक भाग असलेल्या डूम समाजातील आहेत. ते फरीदकोट लोकसभा मतदारसंघाचे खासदारदेखील आहेत.
मरासींची कला पाहून इंग्रजही झाले थक्क
राधा कपूरिया यांच्या म्हणण्यानुसार मरासींबद्दल उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक माहितीवरून वसाहतपूर्व काळात असलेल्या आंतरधर्मीय संबंधाबद्दल बरीच माहिती मिळते.
त्या सांगतात, "शिखांचं कीर्तन असो की हिंदू भजन असो की इस्लामी संगीत असो... हे सर्व सादर करण्यासाठीची गुणवत्ता आणि उत्तम प्रशिक्षण मरासींकडे असायचं."
राधा पुढे सांगतात की मरासींना कोणत्याही एका श्रेणीपुरतं मर्यादित ठेवलं जाऊ शकत नाही.
आपल्या पुस्तकात त्यांनी एच ए रोझ नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्यानं रेकॉर्ड केलेल्या एका हिंदी कवितेचा दाखला दिला आहे.
ती कविता म्हणजे :
गुनिया सागर है, जाति के उजागर हैं, भिखारी बादशाहों के
प्रभों के मरासी, सिंघों के रबाबी, कव्वाल पीरज़ादों के
सभी हमें जानत हैं.. डूम मालज़ादों के

फोटो स्रोत, LAHORE MUSEUM/MUSIC IN COLONIAL PUNJAB: COURTESANS, BARDS AND CONNOISSEURS, 1800-1947, RADHA KAPURIA, OXFORD UNIVERSITY PRESS
राधा यांचं म्हणणं आहे की वसाहतवादाच्या कालखंडात पंजाबात मरासी वेगवेगळ्या परिस्थितीत आणि वेगवेगळ्या रुपांमध्ये अस्तित्वात होते. त्यावेळेस त्यांची निश्चित किंवा स्थिर अशी ओळख नव्हती.
ते डेरा गाजी खान, होशियारपूर, मंडी येथे शिया मुसलमान होते आणि डोंगरांमधील नगरांमध्ये देवीचे पुजारीदेखील होते.
राधा सांगतात की, 1870 च्या सुमारास जेव्हा आर्य समाजाची पहिली सभा झाली, तेव्हा मरासी मुसलमानदेखील भजन गात होते. इंग्रजांनी जेव्हा ते पाहिलं तेव्हा त्यांच्या आश्चर्यास पारावर राहिला नाही. इंग्रजांना वाटलं हे कसं काय होऊ शकतं!
पंजाबी संगीतापासून मरासींची फारकत कशी झाली?
आज पंजाबी संगीत आणि गायनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळी ओळख आहे.
राधा कपूरिया यांचं म्हणणं आहे की, आजच्या पंजाबी संगीतात, पंजाबची ग्रामीण ओळख आणि एक विशिष्ट समुदाय (जाट) यांना केंद्रस्थानी ठेवून गाणी आणि संगीत तयार होत आहेत. यातून मरासी समाजाच्या स्थितीवर आणखी विपरित परिणाम झाला आहे.
त्यांचं म्हणणं आहे की, सध्या पंजाबी संगीताची ओळख बऱ्याच अंशी ग्रामीण भागातील शेतकरी किंवा जाट यांच्या अवतीभोवतीच गुंफण्यात आली आहे. असा समज प्रचलित झाला आहे की पंजाबात शास्त्रीय संगीत किंवा संगीताच्या इतर प्रकारांना कोणतंही स्थान नाही. मात्र पूर्वी असं नव्हतं.
त्या सांगतात की, याची सुरूवात वसाहत काळात झाली आणि इंग्रजांनीदेखील पंजाबची याच प्रकारची ओळख निर्माण होण्यास प्रोत्साहन दिलं.
राधा म्हणतात की, वसाहत कालखंडादरम्यान युरोपात लोकगीतांना एकत्र करण्यासाठी आंदोलन सुरू होतं. त्यामुळे यातील कित्येक तज्ज्ञ पंजाबात आले. पंजाबात आल्यानंतर ते मरासींकडून पंजाबातील लोकगीतं ऐकायचे आणि त्यांचा उल्लेख पुस्तकांमध्ये करायचे.
राधा यांचं म्हणणं आहे की, वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये मरासीचं गाणं ऐकून गीत आणि किस्से लिहिले गेले. ते गाणाऱ्या मरासींची नावं मात्र लिहिण्यात आली नाहीत.

फोटो स्रोत, MUSIC IN COLONIAL PUNJAB/COURTESANS, BARDS AND CONNOISSEURS
त्यांचं म्हणणं आहे की, यातून एक बाब लक्षात येते ती म्हणजे मरासींबद्दल समाजात असलेला नकारात्मक दृष्टीकोन इंग्रजांनीदेखील स्वीकारला होता.
आपल्या पुस्तकात राधा लिहितात, "मरासी समाजाने महाराजा रणजित सिंह यांच्या लाहोर दरबारातदेखील महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र त्याचवेळी मरासीबद्दल अनेक अपमानास्पद शब्ददेखील वापरले गेले."
त्या पुढे लिहितात, ''फकीर वहीदुद्दीन, 'द रिअल रणजित सिंह' या आपल्या पुस्तकात लिहितात की सामाजिक उतरंडीत मरासी बऱ्याच खालच्या स्तरावर होते, मात्र ते फारसी भाषेतील पादर (उच्च प्रतीचे) गीत गाण्यात अतिशय वाकबगार होते.''
इंग्रज लेखकांनी मरासींबद्दल काय लिहिलं आहे?
इंग्रज लेखकांनी लिहिलेल्या असंख्य पुस्तकांमध्ये चार्ल्स स्वीनेर्टन यांच्या 'रोमांटिक टेल्स फ्रॉम द पंजाब' आणि रिचर्ड टेम्पल यांच्या 'द लीजेंड्स ऑफ द पंजाब' या पुस्तकांचादेखील समावेश आहे.
'रोमांटिक टेल्स फ्रॉम द पंजाब' या पुस्तकात चार्ल्स स्वीनेर्टन या इंग्रजी लेखकानं पंजाबात गायिल्या जाणाऱ्या कथांची मांडणी केली होती.
कॅंपबेल विल्सन या आणखी एक इंग्रज लेखिकेनं पंजाबातील संगीतासंदर्भात एक पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या आठवणीदेखील लिहिल्या आहेत.
सर जेम्स विल्सन या इंग्रज अधिकाऱ्याच्या त्या पत्नी होत्या.

फोटो स्रोत, ROMANTIC TALES FROM THE PUNJAB
आपल्या पुस्तकात कॅंपबेल विल्सन यांनी लिहिलं आहे की पंजाबातील प्रत्येक गावात मरासी जातीचे काही लोक राहतात. त्या पुढं लिहितात, स्कॉटलंडमधील हायलॅंडर्स आणि रशियातील शेतकऱ्यांप्रमाणेच मरासी ही एक संगीतमय भारतीय जाती आहे. त्यांच्याकडे आयुष्यातील प्रत्येक प्रसंगासाठी एक गीत आहे. पंजाबात मरासी मध्ययुगातील लोकांप्रमाणेच जगतात.
मरासींना जमीनदार किंवा सरंजामदारांचा आश्रय असतो. ते जन्म आणि लग्नकार्यात गातात. अनेकदा ते आपले पूर्वज आणि स्वत:च्या जातीचे कौतुक करणारी गीतेदेखील गातात.
मरासी लांबलचक गीते कित्येक तास गातात.
मरासी एका प्रसिद्ध संताचे कौतुक करणारे गीत गातात. त्याचबरोबर ते आपले गुरुचे कौतुक करणारे किंवा प्रमुखाच्या शत्रूची अवहेलना करणारे गीतदेखील गातात. त्याशिवाय ते शत्रूच्या पराजयाचे वर्ण करणारं गीतदेखील गातात.
मरासी महिलांची महत्त्वाची भूमिका
राधा कपूरिया लिहितात की, कॅंपबेल विल्सन आपल्या पुस्तकातून सामाजिक चालीरितींमधील मरासी महिलांच्या स्थानाबद्दलदेखील माहिती देतात.
कॅंपबेल विल्सन पुस्तकात म्हणतात की ''मरासी महिलांनी कशा रितीने कित्येक महत्त्वाच्या आणि छोट्या स्वरुपाच्या सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडल्या.''
''कित्येक प्रसंगांमध्ये मरासी महिलांना बोलावलं जायचं...एखादं मुल आजारी पडलं तर मरासी महिला शीतला मातेकडे प्रार्थना करायच्या. कधी कधी गावातील एखादा मित्र परगावी जात असेल तर किंवा अगदी एखादी व्यक्ती गावात परतत असेल त्याच्या स्वागतासाठी गीत गायलासुद्धा मरासी महिलांना बोलावलं जायचं.''

फोटो स्रोत, RADHA KAPURIA
कॅंपबेल विल्सन या त्यांच्या पुस्तका लिहिलं आहे की जर गाण्यासाठी काहीही नवीन नसेल तर ज्या महिलांना प्रेम मिळत नाही किंवा ज्या महिलांना त्यांच्या पतीने सोडून दिलं आहे अशा महिलांसाठी गीतं गायली जायची.
'हिंदूंबरोबर हिंदू, मुसलमानाबरोबर मुसलमान'
मरासी यांच्याकडे हजरजबाबीपणा होता आणि उच्च वर्गीय, श्रीमंत लोक त्यांच्यावर विसंबून राहू शकायचे. त्यामुळे मरासींचा उल्लेख वाईट शब्दांद्वारे किंवा त्यांना विरोध करण्यासाठीदेखील केला जायचा.
राधा सांगतात की 1891 मध्ये मुहम्मुद्दीन नावाच्या एका पोलिस शिपायानं 'मरासीनामा' नावाची एक पंजाबी कथा लिहिली होती. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे मरासींना विरोध दर्शविण्यात आला आहे.
'मरासीनामा' कथेचे लेखक गुजरावाला येथील रहिवासी होता. या पुस्तकात मोठ्या प्रमाणात मरासींची निंदानालस्ती करण्यात आली आहे. यातून मरासींचे सामाजिक स्थान आणि त्यांच्याबद्दलचा समाजाचा दृष्टीकोन दिसून येतो.
राधा कपूरिया सांगतात की मरासी प्रत्येक धर्मात होते आणि त्यांची ओळख कोणत्याही एका विशिष्ट धर्मापुरती मर्यादित नव्हती. त्यामुळे समाजातील काही वर्गात मरासींबद्दल आकस होता. 'मरासीनामा' च्या लेखकाच्या पुढील ओळींमधूनदेखील ही बाब स्पष्ट होते.
न है इनका दीं ईमान
हिन्दू के साथ हिन्दू बन जाएँ
और मुसलमान के साथ मुस्लमान
ऐसे यह अहमक नादान
राधा यांचं म्हणणं आहे की, पंजाबची फाळणी होत असताना बहुतांश मरासी पाकिस्तानातील पंजाबात निघून गेले.
अलीकडच्या काळात पाकिस्तानात राहणारे मरासी गायक अभिमानाने स्वत:ची ओळख स्वीकारत आहेत ही अतिशय सकारात्मक बाब आहे. मरासींबद्दल सामाजिक दृष्टीकोन आता खूप बदलला आहे.











