अमरसिंग चमकीला: एक दलित तरुण जो बनला पंजाबचा पहिला 'रॉकस्टार'

अमर सिंग चमकीलाः धनी राम पंजाबीचे पहिले रॉकस्टार कसे झाले?

फोटो स्रोत, BBC/PUNEET BARNALA

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी

पंजाबचा पहिला रॉकस्टार कोण विचारलं तर पंजाबी लोकांच्या तोंडी एकच नाव येतं ते म्हणजे गायक अमरसिंग चमकीला यांचं. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नीचंही नाव अमरजोत कौर हे देखील उत्साहाने घेतलं जातं.

पुन्हा आज भारतात अमरजोत आणि अमरसिंग चमकीला यांचं नाव गाजताना दिसत आहे. कारण त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे.

चित्रपट निर्माता इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा व दलजीत दोसांज मुख्य भूमिकेत आहेत.

चित्रपट पाहिला की लक्षात येतं अमरसिंग चमकीला यांचं आयुष्य एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नव्हतं. तरुण वयात प्रसिद्ध होणाऱ्या या गायकाचा शेवट एका वेदनादायक मृत्यूने होतो.

पंजाबमध्ये आजही चमकीला तितकाच प्रसिद्ध

अमरसिंग चमकीला या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या दिलजीत दोसांजने एका मुलाखतीत म्हटलं की चमकीलाचे गाणे आजही तितकेच प्रसिद्ध आहेत. आजही अनेक गायक त्यांचं अनुकरण करताना दिसतात.

चमकीला आणि त्यांच्या पत्नीची जोडी जेव्हा प्रसिद्धीच्या शिखरावर होती तेव्हा त्यांना एका कार्यक्रमासाठी त्या काळात साडे चार हजार रुपये इतकी रक्कम मिळत असे. त्यांना पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत असे.

त्यांच्या कॅसेट्सची तुफान विक्री होत असे आणि प्रत्येक कार्यक्रमात त्या वाजवल्या जात असत.

चमकीला यांना एल्विस ऑफ पंजाब म्हटले जाते. एल्विस प्रिस्ले हा जगप्रसिद्ध गायक आपल्या कार्यक्रमांच्या सादरीकरणासाठी ओळखला जात असे. त्यावरुनच चमकीला यांना एल्विस ऑफ पंजाब हे नाव त्यांच्या चाहत्यांना दिलं होतं.

कोण होते अमरसिंग चमकीला?

बीबीसी पंजाबीने केलेल्या बातमीनुसार अमरसिंग चमकीला यांचा जन्म 1960 च्या दशकात लुधियाना जिल्ह्यातील दुगरी येथे झाला.

अमरसिंह चमकीला यांचं मूळ नाव धनी राम होतं.

हलाखीच्या आर्थिक परिस्थिती असलेल्या दलित कुटुंबात जन्मलेल्या धनीरामवर कौटुंबिक जबाबदारीचं ओझं लवकरच खांद्यावर पडलं.

लुधियाना येथील एकाकपड्यांच्या कारखान्यात काम करत त्यांनी आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करायला सुरुवात केली.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अमरसिंग चमकीला यांना गाणी लिहिण्याची खूप आवड होती, पण हा छंद कदाचित संधीच्या प्रतीक्षेत होता.

धनीराम उर्फ ​​अमरसिंग चमकीला जेव्हा कारखान्यात रोजंदारीवर काम करत होते, तेव्हा सुरिंदर छिंदा यांनी गायनात नाव कमावलं होतं.

अमर सिंग चमकीलाः धनी राम पंजाबीचे पहिले रॉकस्टार कसे झाले?

फोटो स्रोत, GURMINDER GREWAL/BBC

सुरिंदर छिंदा चमकीला यांच्या सोबतची पहिली भेट आठवून सांगतात की, "मी मोगा येथे एका मित्रासोबत बसलो होतो, तेव्हा ड्रम मास्टर म्हणून काम करणारे केसरसिंग टिक्की माझ्याकडे आले."

"ते म्हणाले एक मुलगा आहे, धनीराम दुग्गरीवाला. खूप सुंदर गाणी लिहितो, तुम्ही एकदा गाणी ऐकावी असं मला वाटतं."

आधी मी नकार दिला पण नंतर भेटायला तयार झालो.

"माझ्या समोर एक हलकी दाढी असलेला, पगडी घातलेला मुलगा आला. मी त्याला विचारलं जेवणार का? तो म्हणाला माझ्याजवळ जेवण आहे. मी माझा डबा बरोबर आणलाय. तो अतिशय ग्रामीण भागातला दिसत होता. त्यादिवशी फारसं बोलणं झालं नाही पण मी त्याला विचारलं तू काय करतोस, तो म्हणाला मला गाणी लिहायची आवड आहे."

"पुढे आम्ही चंदीगडच्या बुरैल येथे रामलीलेच्या निमित्ताने बुकिंग घेतले होते. चमकिला मदतनीस म्हणून आमच्यासोबत आला. तिथे चमकीलाने आमची खूप सेवा केली आणि यामुळे मी आणि माझ्या सोबत्यांनी खुश होऊन त्याचं नाव ठेवलं 'अमरसिंह चमकीला'. हा माणूस काहीतरी करणार अशी आमची खात्री होती," असं छिंदांनी बीबीसी पंजाबीला सांगितलं होतं.

पहिलं गाणं मिळण्याची कथाही रंजक

सुरिंदर छिंदा सांगतात की, "एकदा मी राजस्थानला जात असताना माझे साथीदार म्हणाले, "चमकीलाचं एक गाणं ऐका. मी ते गाणं ऐकलं."

छिंदा सांगतात, "मला हे गाणं खूप आवडलं. हे गाणं मी गायलं आणि चमकीलाने लिहिलेलं पहिलं गाणं सुपरहिट झालं."

सुरिंदर छिंदा सांगतात की, त्यानंतर मी चमकीलाने लिहिलेली अनेक गाणी गायली.

जेव्हा-जेव्हा सुरिंदर छिंदा यांचा स्टेज बांधला जायचा, तेव्हा तो उभारण्याची जबाबदारी चमकीलाकडे असायची. दरवाजे लावण्यापासून ते स्पीकर लावण्यापर्यंतची सर्व कामे चमकीला करत.

सुरिंदर छिंदा सांगतात की, "एकदा मी राजस्थानला जात असताना माझे साथीदार म्हणाले, "चमकिलाचं एक गाणं ऐका. मी ही ते गाणं ऐकलं."

फोटो स्रोत, PUNEET BARNALA/BBC

सुरिंदर छिंदा 1977-78 मध्ये कॅनडाला गेले होते. त्यांच्याकडे भारतातील एचएमव्ही कंपनीचे रेकॉर्डिंग होते, ज्यासाठी कंपनीने पूर्ण तयारी केली होती.

सुरिंदर छिंदा सांगतात की, त्यांना कॅनडाहून येणं शक्य नव्हतं आणि कंपनीला रेकॉर्ड करण्याची घाई होती. ही गाणी चमकीला यांनी लिहिली आहेत, त्यामुळे त्यांना संधी द्या, असं कंपनीला सुचवण्यात आलं.

"कंपनीने चमकीला यांचं गाणं ऐकलं आणि त्यांना ते आवडलं. अशा प्रकारे चमकीला यांचा आवाज रेकॉर्ड झाला."

अमरजोत सोबत हिट गाणी

अमरसिंग चमकीला यांच्या गाण्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला विविध मुलींसोबत जोडी जमली पण अमरजोतसोबतची त्यांची जोडी खूप गाजली.

सुरिंदर छिंदा सांगतात, "चमकीलाला स्टेज पार्टनरची गरज होती. यावेळी अमरजोतची फरीदकोटच्या चमकीलाशी ओळख करून दिली. हळूहळू अमरजोत चमकीला सोबत गाऊ लागली आणि दोघांची केमिस्ट्री जुळून आली.

अमरजोत सोबत एक हिट गाणी

फोटो स्रोत, GURMINDER SINGH/BBC

छिंदा सांगतात, "मला अजूनही आठवतं की, जेव्हा दोघांची जोडी खूप गाजली. त्यांनी गायलेलं 'भुल गई मैं घुंड खाड़ना' गाणं जबरदस्त हिट झालं. तेव्हा चमकीला माझ्याकडे मिठाईचा डबा, दारूची बाटली घेऊन आला आणि पाचशे रुपये देऊ केले."

चमकीला आणि अमरजोत यांनी अनेक हिट गाणी दिली.

चमकीला आणि अमरजोत यांची हत्या

8 मार्च 1988 रोजी जालंधरच्या मेहसमपूरमध्ये अमरसिंह चमकीला, अमरजोत कौर आणि त्यांच्या साथीदारांची हत्या करण्यात आली.

अमरसिंग चमकीला यांच्या हत्येला इतकी वर्ष लोटली तरी याबाबत आजही गूढ कायम आहे.

अमरसिंग चमकीला हे बंडखोर वृत्तीचे गायक म्हणून प्रसिद्ध होते. द टेलिग्राफ इंडियानुसार अमरसिंग चमकीला हे द्विअर्थी गाणी लिहायचे. त्यामुळे अनेकांचा त्यांच्यावर रोष होता.

टेलिग्राफने पुढे म्हटलं आहे 80च्या दशकात पंजाबामध्ये द्वयर्थी गाण्यांची लाटच होती. अनेक गायक याच प्रकारची गाणी गात असत.

चमकीला आणि अमरजोत यांची हत्या

फोटो स्रोत, BBC/PUNEET BARNALA

8 मार्च 1988 रोजी अमरसिंग, अमरजोत आणि बँडमधील सदस्य पंजाबच्या मेहसमपूरमध्ये कार्यक्रमासाठी आले होते.

दुपारी दोन वाजता ते आपल्या गाडीतून बाहेर पडले, तितक्यात बाईकस्वारांच्या टोळीने त्यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला.

यावेळी अमरजोत गरोदर होत्या. छातीत गोळी लागून त्यांचा बाळासह मृत्यू झाला. तर चार गोळ्या लागल्याने अमरसिंह चमकीला यांचाही मृत्यू झाला. त्यांचे साथीदार गिल सुरजीत आणि ढोलकी वादक राजा यांनाही हल्ल्यात प्राण गमवावे लागले.

चमकीला आणि अमरजोत यांची हत्या

फोटो स्रोत, PARDEEP SHARMA/BBC

फोटो कॅप्शन, चमकीला आणि अमरजोत यांची हत्या झाली ते स्थळ

या हत्या प्रकरणात कधीच कोणाला अटक झाली नाही.

पोलिसांनी त्यांच्या प्रकरणाचा तपास बंद केला आहे. डीएसपी हरजिंदर सिंग यांनी सांगितलं की, "हत्येच्या घटनेबाबत चमकीलाच्या ड्रायव्हरच्या जबाबावरून नूरमहल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान या प्रकरणात तीन संशयितांची नावे समोर आली."

पण तिन्ही आरोपींना न्यायालयाने फरार घोषित केलं. हे तीन आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या वेळी पोलीस चकमकीत मारले गेले. हे प्रकरण न्यायालयाने निकाली काढलं आहे.