World Music Day: या 9 हिंदी गाण्यांमागचे मराठी चेहरे माहीत आहेत का?

मराठी संगीतकार, हिंदी गाणी

फोटो स्रोत, Getty Images/Twitter/Vishwakosh

    • Author, सिद्धनाथ गानू
    • Role, बीबीसी मराठी

हिंदी चित्रपटसृष्टी नावलौकिकाला येण्यात अनेक भाषा बोलणाऱ्या अनेक कलाकारांनी हातभार लावला आहे. हिंदी सिनेसंगीताच्या प्रवाहातही असे अनेक भाषांमधले, भिन्न भिन्न पार्श्वभूमी असलेले सूरप्रेमी एकत्र येऊन एक अनोखा मेळ जमून आला.

संगीताला भाषा नसते म्हणतात, पण जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने काही गाजलेल्या हिंदी गाण्यांमागच्या मराठी चेहऱ्यांचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न.

1. ऐ मेरे वतन के लोगो- लता मंगेशकरांच्या आवाजातलं हे गाणं ऐकताना भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनाही अश्रू अनावर झाले होते असं म्हणतात. या गाण्याचं संगीत सी. रामचंद्र अर्थात रामचंद्र चितळकर यांनी दिलं होतं.

नगर जिल्ह्यातल्या चितळी गावी जन्मलेल्या रामचंद्र नरहर चितळकर यांनी सी. रामचंद्र नावाने अनेक हिंदी चित्रपटांना संगीत दिलं. अलीकडेच लुडो या चित्रपटामुळे पुन्हा प्रसिद्ध झालेलं आणि मास्टर भगवान यांच्यावर चित्रित केलेलं 'ओ बेटाजी, ओ बाबूजी', अनारकली चित्रपटातलं 'ये झिंदगी उसी की है', 'शोला जो भडके', 'इना मिना डिका', यांसारखी अनेक संस्मरणीय गाणी सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केली होती.

अनेक दशकं हिंदी आणि मराठी चित्रपटांना संगीत दिलेल्या चितळकरांनी काही गाणी गायली देखील. अलबेला चित्रपटातलं 'शोला जो भडके' हे त्यातलंच एक.

लता मंगेशकर

फोटो स्रोत, Getty Images

2. ज्योती कलश छलके- बाबूजी हे बिरुद मराठी संगीतक्षेत्राला अनोळखी नाही. पण या बिरुदामागच्या व्यक्तीने काही अविस्मरणीय हिंदी रचनाही केल्या. अवघ्या मराठी सृष्टीला सुधीर फडके नावाने परिचित असलेले मूळचे राम फडके या गाण्याचे संगीतकार होते.

सुधीर फडके

फोटो स्रोत, Marathi Vishwakosh

मीना कुमारींवर चित्रित केलेल्या 'भाभी की चुडीयाँ' या सिनेमातलं हे गाणं, किंवा वर्षानुवर्षं रेडिओवर गाजलेलं 'खुश है जमाना आज पहली तारीख है' हे गाणं सुधीर फडकेंनीच संगीतबद्ध केलं होतं.

3. हवा हवाई- हिंदी चित्रपट संगीतात काही अजरामर संगीतकार जोड्या झाल्या. त्यातली एक दुक्कल म्हणजे लक्ष्मीकांत-प्यारेलाल. अनेकदा लक्ष्मी-प्यारे असा या द्वयीचा उल्लेख केला जातो. लक्ष्मीकांत कुडाळकर मुंबईतले, लहानपणी मेंडोलिन शिकत त्यांनी संगीताच्या दुनियेत प्रवेश केला.

प्यारेलाल

फोटो स्रोत, Getty Images

लक्ष्मीकांत कुडाळकर आणि प्यारेलाल शर्मा यांनी तीन दशकं एकत्र काम केलं. किशोर कुमारांचं 'ड्रीम गर्ल', मोहम्मद रफींच्या आवाजातलं 'दर्द-ए-दिल', अलका याज्ञिक यांचं माधुरी दीक्षितवर चित्रित केलेलं 'एक-दो-तीन' अशी अनेक लोकप्रिय गाणी या जोडीने दिली.

4. ऐ मालिक तेरे बंदे हम- सिनेमातून आलेल्या काही गाण्यांनी भक्तीगीत म्हणून रसिकांच्या मनात कायमचं स्थान मिळवलं. 'ऐ मालिक तेरे बंदे हम' या वसंत देसाईंनी रचलेल्या गाण्याने तीच किमया केली.

व्ही. शांताराम यांच्या दो आँखे बारा हाथ या चित्रपटातलं हे गाणं आजही लोकप्रिय आहे.

लता मंगेशकर

फोटो स्रोत, Getty Images

लता मंगेशकर आणि मन्ना डे यांच्या आवाजातलं हे गाणं या चित्रपटातल्या अत्यंत कळीच्या प्रसंगी येतं. मूळचे सावंतवाडीचे असलेले वसंत देसाई मराठी आणि हिंदी संगीतसृष्टीत कार्यरत होते.

प्रभात फिल्म कंपनी बरोबर त्यांनी काम केलं होतं. हिंदीमधील 'तेरे सुर और मेरे गीत', 'बोले रे पपिहरा' यांसारखी गाणीही देसाईंनीच केली होती.

5. पा लागू कर जोरी रे श्याम- हे गाणं कदाचित फारसं कुणाला माहीत नसावं. पण लता मंगेशकरांच्या अगदी सुरुवातीच्या गाण्यांमधलं हे एक होतं.

मराठीत बालगीतांपासून ते सर्व प्रकारच्या शैलीतील गाणी केलेल्या दत्ता डावजेकरांची ही चाल होती. डावजेकरांना डीडी या टोपणनावानेही ओळखलं जात असे. लता मंगेशकरांना हिंदी चित्रपटांमध्ये आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता असं म्हटलं जातं.

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

6. तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा- धार्मिक,सामाजिक सलोख्याचा संदेश देणारी अनेक गाणी हिंदी चित्रपटांनी दिली. 1959 सालच्या 'धूल का फूल' चित्रपटातलं हे गाणं त्यात विशेष गाजलं.

एन. दत्ता या नावाने ओळखले जाणारे दत्ता नाईक याचे संगीतकार होते. मूळचे गोव्याचे असलेल्या दत्ता नाईक यांनी सचिन देव बर्मन यांच्याबरोबर काम केलं होतं. अनेक हिंदी चित्रपटांबरोबरच त्यांनी मराठीतही संगीत दिलं होतं. 'निंबोणीच्या झाडामागे' ही अजरामर अंगाई त्यांनीच रचली.

7. यारा सिली सिली - ज्या एकाच कुटुंबात गायन क्षेत्रातले अनेक दिग्गज जन्माला आले त्या मंगेशकर कुटुंबातले हृदयनाथ यांनी शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि चित्रपट अशा अनेक प्रकारच्या संगीतात प्रावीण्य मिळवलं.

लेकिन या चित्रपटातलं 'यारा सिली सिली', 'सुरमयी शाम' ही त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी लता मंगेशकर, सुरेश वाडकर यांसारख्या नावाजलेल्या गायकांनी गायली.

सुरेश वाडकर, लता मंगेशकर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुरेश वाडकर, लता मंगेशकर

8. हम आपके है कौन- अनेक विक्रम करणाऱ्या या चित्रपटाचं संगीत राम-लक्ष्मण या जोडीने दिलं होतं. यातले लक्ष्मण म्हणजे नागपूरचे विजय पाटील.

नागपूरच्या कादर ऑर्केस्ट्रॉमधून सुरुवात केलेल्या विजय पाटील यांनी 75हून अधिक चित्रपटांना संगीत दिलं. राम लक्ष्मण जोडीतले राम म्हणजे संगीतकार सुरेंद्र. त्यांचं 1976 मध्ये निधन झालं पण विजय पाटील यांनी त्यानंतरही राम-लक्ष्मण या नावानेच संगीत दिलं. राजश्री प्रॉडक्शन्सच्या 'मैने प्यार किया' या चित्रपटाने राम-लक्ष्मण हे नाव घराघरात नेलं. त्यानंतरच्या 'हम आपके है कौन' ने तर यश आणि प्रसिद्धीचे अनेक विक्रम केले. मराठी चित्रपटांत त्यांनी सुरुवातीला दादा कोंडकेंच्या चित्रपटांवर काम केलं होतं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

9. सिंघम- संगीतकार जोड्यांमधली सध्याच्या काळातील आघाडीची जोडी म्हणजे अजय-अतुल. मराठी चित्रपटांमध्ये मोरया पासून ते झिंगाटपर्यंत वेगवेगळ्या ढंगाची गाणी करणाऱ्या या जोडगोळीने हिंदी चित्रपटांमध्येही काही सुपरहिट गाणी दिली आहेत.

अजय-अतुल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अजय-अतुल

बाजीराव सिंघमच्या दणदणीत व्यक्तिमत्त्वाइतकंच ढोल-ताशांच्या गजरातलं सिंघम शीर्षक गीत, विरुद्धमधलं 'श्री गणेशाय धीमही', अग्नीपथ या एकाच सिनेमात एकीकडे 'चिकनी चमेली' हे आयटम साँग आणि दुसरीकडे 'अभी मुझमें कहीं' सारखं भावपूर्ण गीत असा सुरेल गाण्यांचा एक अकॉर्डियनसारखा रेकॉर्ड या दोघांच्या नावावर आहे.

हिंदी सिने संगीताला समृद्ध करण्यात अनेक कलाकारांनी आपलं योगदान दिलं. त्यातल्या काही कलाकारांची ही निव्वळ तोंडओळख होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)