अमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्समुळे घरच बनलं थिएटर, पण बिग बजेट चित्रपट OTT वर रिलीज होणार?

गुलाबो सिताबो

फोटो स्रोत, GULABO SITABO

फोटो कॅप्शन, गुलाबो सिताबो
    • Author, अमृता कदम
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

गेल्या आठवड्यात अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांचा गुलाबो- सिताबो रिलीज झाला.

या चित्रपटाचं प्रदर्शन एका अर्थानं ऐतिहासिक ठरलं, कारण थिएटरमध्ये मे महिन्यात रिलीज होणारा हा चित्रपट प्रदर्शित झाला तो अमेझॉन प्राइमवर म्हणजेच ओव्हर द टॉप (OTT) प्लॅटफॉर्मवर.

अनेकांनी अगदी रात्री बारा वाजताची वेळ लावून हा सिनेमा पाहिला...एका अर्थानं फर्स्ट डे फर्स्ट शो. मी पण दोन तीन दिवसांनी हा गुलाबो-सिताबो पाहिला. पाहताना दोनवेळा फोन वाजल्यावर पॉज केला. मग मध्येच काहीतरी इकडं तिकडं झालं. तेव्हाही पॉज करा, थोडं मागे घ्या असं करत मग सिनेमा संपला. सिनेमा चांगलाच होता, पण तरी काहीतरी मिसिंग होतं....

मग जाणवलं सिनेमा पाहणं एक अनुभव असतो. मित्र-मैत्रिणी किंवा घरच्यांसोबत थिएटरमध्ये जाणं, एसीच्या गारव्यात आणि अंधारात गुबगुबीत खुर्च्यांमध्ये रेलून मोबाईल सायलेंटवर ठेवून शांतपणे सिनेमा पहायचा. कोणाचा फोन वाजला की, आजूबाजूच्यांचे नापसंतीचे चक् चक् आवाज, सिनेमा बोअर असेल तर होत असलेल्या कमेंट्स, इंटरव्हलमध्ये एवढ्या रुपयांना समोसा-पॉपकॉर्न विकतात का असं किरकिरायचं पण तरी खायला घ्यायचंच...या सगळ्या गोष्टी सिनेमाची मज्जा वाढवत असतात. पण कोरोनामुळे 24 मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आणि थिएटर्सना टाळे लागले.

हिंदीतले गुलाबो सिताबो, विद्या बालनचा शकुंतला देवी, अक्षय कुमारचा सूर्यवंशी, रणबीर सिंगचा 83 चित्रपट प्रदर्शनासाठी तयार होते. सुरूवातीला 21 दिवसांचा असलेला लॉकडाऊन वाढतच गेला.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यावर अद्याप उपलब्ध नसलेली लस या गोष्टींचा विचार करता सोशल डिस्टन्सिंग हाच उपाय असल्यामुळे थिएटर बंद राहणार हे ओघानंच आलं. त्यामुळेच शूजित सरकार दिग्दर्शित गुलाबो-सिताबो तसंच शकुंतला देवी हे दोन्ही चित्रपट अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला गेला.

तामिळमधील पोनमगल वंधल, तेलुगू आणि तमीळमधील पेंग्विन, मल्याळम भाषेतील सुफीयम सुजात्यम, कन्नडमधील लॉ तसंच फ्रेंच बिर्याणी हे चित्रपट पण OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला गेला.

लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात निर्बंधांमधून काही सवलती दिल्या गेल्या. पण थिएटर्स बंद ठेवण्याचा निर्णय कायम राहिला. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता अजून काही महिने थिएटर्स सुरू होणार नाहीत. अशावेळी इतर निर्मातेसुद्धा OTT प्लॅटफॉर्मचा विचार निश्चितच करू शकतात.

शकुंतला देवी

फोटो स्रोत, IDHYAN PR

पण OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करणं आर्थिकदृष्ट्या किती फायद्याचं आहे? मुळात या माध्यमाचं आर्थिक मॉडेल काय आहे? ओटीटीचा फायदा हा थिएटर मालकांसाठी नुकसानीचा ठरत आहे का? हे प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होत आहेत. या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला.

OTT प्लॅटफॉर्मचं आर्थिक गणित

ट्रेड अनलिस्ट कोमल नहाटा यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांच्या बॉलिवूड बिझनेस कार्यक्रमात OTT प्लॅटफॉर्मचं आर्थिक गणित समजावून सांगितलं होतं. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं, की आपल्याला आधी थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याची सवय असते. त्यानंतर मग काही महिन्यांनी आपण तो टीव्हीवर किंवा मग अमेझॉन नेटफ्लिक्ससारख्या OTT प्लॅटफॉर्मवर पाहतो.

पण आता OTT प्लॅटफॉर्म थेट चित्रपट खरेदी करतात. त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये स्पष्ट लिहिलेलं असतं, की या चित्रपटाचा प्रीमिअर रिलीज हा आमच्या प्लॅटफॉर्मवर होईल. प्रॉड्युसरला फिल्म विकल्यानंतर रिलीजच्या आधीच 'सेलिंग प्राइज' मिळून जाते. छोटया बजेटच्या, थिएटरच्या स्पर्धेत टिकू न शकणाऱ्या चित्रपटांसाठी हा पर्याय व्यवहार्य होता.

अर्थात, बिग बजेट चित्रपटांसाठी हा प्लॅटफॉर्म किती यशस्वी ठरेल, हे सांगता येत नाही. कारण चित्रपटाचं बजेट जास्त असेल, तर तो शंभर, दोनशे, तीनशे कोटीपर्यंतचा गल्ला जमवेल अशी अपेक्षा असते. चित्रपटाचा जो व्यवसाय होतो, त्याच्या पन्नास टक्के रक्कम ही प्रॉड्युसर किंवा चित्रपट डिस्ट्रीब्युटरने विकत घेतला असेल तर त्यांना मिळते.

म्हणजे एखाद्या चित्रपटानं तीनशे कोटींचा गल्ला जमवला, तर प्रोड्युसर किंवा डिस्ट्रीब्युटरला दीडशे कोटी मिळतात. स्वाभाविकपणे OTT प्लॅटफॉर्म एवढी रक्कम देऊ शकत नाहीत. त्यामुळे बिग बजेट चित्रपटांसाठी अजूनही हे प्लॅटफॉर्म अपेक्षित यश देतील, असं चित्र नसल्याचं कोमल नहाटा यांनी म्हटलं होतं.

ड्राईव्ह सिनेमा

फोटो स्रोत, Drive Film

फोटो कॅप्शन, करन जोहरची निर्मिती असलेला ड्राइव्ह थेट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता

शिवाय आता OTT प्लॅटफॉर्म हे स्वतः चित्रपट प्रोड्युसही करायला लागले असल्याचं त्यांनी नमूद केलं. निर्माता दिग्दर्शक करण जोहरनं नेटफ्लिक्ससोबत अशाप्रकारचा करार केला होता.

पण OTT प्लॅटफॉर्म हे चित्रपटसृष्टीचं भविष्य असू शकतं, हे सांगताना त्यांनी म्हटलं होतं, की ज्यावेळी भारतात खासगी वाहिन्या सुरू झाल्या, तेव्हा चित्रपट निर्मात्यांना आर्थिक लाभ होऊ लागला. कारण त्यापूर्वी निर्मात्यांना थिएटरमध्ये रिलीज करून होणारा व्यवसाय, ओव्हरसीज मार्केटमधले हक्क यातूनच पैसे मिळायचे. खासगी वाहिन्या आल्यानंतर हे चित्र बदललं. कारण आपली कन्टेन्ट बँक तयार करण्यासाठी या वाहिन्या चित्रपटांचे हक्क मोठ्या किमतींना विकत घेऊ लागल्या आणि त्याचा निर्मात्यांना फायदा होऊ लागला. अशाच प्रकारे आता OTT हे गेम चेंजर ठरत आहेत.

'छोट्या बजेटच्या चित्रपटांना फायदा'

"OTT प्लॅटफॉर्म हा आर्थिकदृष्ट्या किती फायद्याचा आहे, हे निश्चितपणे सांगता येणार नाही. कारण बऱ्याचदा हे प्लॅटफॉर्म आपली आकडेवारी जाहीर करत नसतात. त्यांचे व्यवहार हे 'झाकली मूठ' प्रकारातील असतात. त्यामुळे त्यांचा फायदा-तोटा हा निश्चित सांगता येणार नाही," असं लेखक आणि चित्रपटांचे अभ्यासक अमोल उदगीरकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं.

"पण छोट्या बजेटचे चित्रपटांच्या डील त्यांना नक्कीच फायद्याच्या ठरू शकतात. कारण लोकांना मनोरंजन हवं आहे. भारतीयांसाठी सिनेमा हा सगळ्या समस्यांपासून काही काळ दूर जाण्याचा पर्याय आहे. अशावेळी चांगला, नवीन सिनेमा ते OTT वर नक्की बघतील. पण त्याचा प्रेक्षक मर्यादित असेल. कारण आजही ग्रामीण, निमशहरी भागात अमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्स, हॉटस्टार फारसं पाहिलं जात नाही. इंटरनेट स्पीड, लोड शेडिंग, लँग्वेज बॅरिअर अशा अनेक कारणानं हा प्रेक्षक वर्ग OTT प्लॅटफॉर्मपासून दूर आहे," असं उदगीरकर यांनी म्हटलं.

जाह्नवी कपूरचा गुंजन सक्सेना हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.

फोटो स्रोत, Jahnvee Kapoor Instagram

फोटो कॅप्शन, जाह्नवी कपूरचा गुंजन सक्सेना हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.

"शिवाय सलमान खान, शाहरूख खान, अक्षय कुमार यांच्यासारख्या स्टार्सचं फॅन फॉलोइंग आपल्याकडे प्रचंड आहे. हे मास बेस असलेलं फॅन फॉलोइंग आहे, जे अजूनही सिंगल स्क्रीन थिएटरवर जाऊनच सिनेमा पाहणं पसंत करतं. शिवाय या स्टार्सच्या सिनेमाचं बजेटच प्रचंड असतं. त्यामुळे त्याहून अधिक कोटी मोजून सिनेमा विकत घेणं OTT प्लॅटफॉर्मला नक्कीच शक्य नाही. मध्ये मी सलमानचा सिनेमा हॉटस्टार पाचशे कोटींना घेणार अशी चर्चा ऐकली होती. पण अशा डील हे प्लॅटफॉर्म करतील किंवा त्यांना त्या परवडतील असं मला तरी नाही वाटत."

थिएटर मालकांचा आक्षेप कशावर?

गुलाबो-सिताबो ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय झाल्यानंतर बीबीसी हिंदीने सिनेमा ओनर्स अँड एक्सझिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष नितीन दातार यांच्याशी संवाद साधला होता.

चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज व्हावेत, अशी आमची अजिबात इच्छा नाही. निर्मात्यांना असा निर्णय घ्यायचाच होता, तर त्यांनी आमच्यासोबत विचार विमर्श करायला हवा होता. आम्हाला विचारात न घेता निर्णय घ्यायला नको होता.

ज्याप्रमाणे निर्मात्यांचा पैसा चित्रपटांमध्ये लागलेला असतो, त्याचप्रमाणे एक्झिबिटर्सनेही थिएटर्समध्ये भरपूर गुंतवणूक केलेली असते. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी सगळ्यांच्या अडचणींचा, मग त्या आर्थिक असो किंवा अन्य कोणत्याही विचारात घेणं आवश्यक होतं. या विषयावर आधी चर्चा घेऊन निर्णय झाला असता, तर बरं झालं असतं.

कोरोनामुळे थिएटर्स बंद आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

नितीन दातार यांनी म्हटलं, की एक्झिबिटर्स आणि फिल्म इंडस्ट्रीनं सरकारसोबत चर्चा करायला हवी. लहान बजेट चित्रपटांसाठी आम्ही निर्मात्यांना आमच्या कमाईचा 50 टक्के हिस्सा देतो. आम्ही निर्मात्यांना एवढी साथ दिली आहे. आता साथ देण्याची वेळ त्यांची आहे, पण ते असं वागणार असतील तर आम्हाला खूप नुकसान सहन करावं लागेल.

कार्निवल सिनेमाचे CEO मोहन उमरोटकर यांनी याबद्दल बीबीसी हिंदीशी बोलताना म्हटलं होतं, की यापूर्वी अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आले आहेत. मात्र त्यांना तितका चांगला प्रतिसाद नाही मिळाला. ज्या चित्रपटांचं बजेट जास्त आहे. त्या चित्रपटांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीजनंतर मोठा तोटा सहन करावा लागतो. त्यामुळेच लवकरच सर्व काही ठीक व्हावं आणि प्रेक्षकांना चित्रपट थिएटरमध्ये पाहायला मिळावेत.

प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे ज्येष्ठ सदस्य मुकेश भट्ट यांनी या सगळ्याबाबत बोलताना म्हटलं, की कोणताही निर्माता किंवा दिग्दर्शक आपल्या आवडीने चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करायला तयार होत नाही. त्याचीही यामागे काहीतरी अपरिहार्यता असू शकते. चित्रपट बनून तयार आहे आणि थिएटर सुरू होण्याचं काहीच चिन्ह नाही. अशावेळीच हा पर्याय निवडला गेलाय.

सहा महिन्यांनी थिएटर सुरू जरी झाले, तरी कोणी येईल याची काय गॅरंटी? आमचीही इच्छा आहे, की कोरोनावर लवकरात लवकर लस सापडावी आणि थिएटर पुन्हा सुरू व्हावेत. कारण आमचीही कमाई थिएटरवरच अवलंबून असते. पण जर एखाद्या निर्मात्यानं कर्ज घेतलं असेल आणि त्याला त्याचं व्याज द्यावं लागत असेल तर चित्रपटाचं प्रदर्शन खूप काळ रोखून धरणं अवघड असतं. अशावेळी तो चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करणं केव्हाही चांगलं, असं मुकेश भट्ट यांनी म्हटलं.

कोरोना
लाईन

'बिग बजेट चित्रपटांना थिएटरचीच गरज'

गुलाबो-सिताबो, शकुंतला देवी हे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत असले तरी अक्षय कुमारचा सूर्यवंशी किंवा रणबीर सिंगचा 83 यासारखे चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याची शक्यता फार कमी आहे.

कारण 100 कोटींपेक्षा अधिक बजेट असलेल्या चित्रपटांना त्यांची प्रॉडक्शन कॉस्ट भरून काढण्यासाठी थिएटरमध्येच चित्रपट प्रदर्शित करणं गरजेच आहे. त्यामुळेच जेव्हा यासारखे बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होतील, तेव्हा प्रेक्षक पुन्हा थिएटरकडेच वळतील अशी आशा थिएटर मालकांना आहे.

सूर्यवंशी

फोटो स्रोत, Getty Images

गुलाबो सिताबोसारखा चित्रपट सामान्य परिस्थितीत 20 ते 25 कोटी रुपयांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर विकला गेला असता, त्यातून त्याची प्रॉडक्शन कॉस्ट पण रिकव्हर झाली असती. पण आताच्या परिस्थितीत त्यांनी आपला चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर अधिक किमतीला, जवळपास 60 कोटींपर्यंत विकल्याची चर्चा आहे.

सबस्क्रिप्शन रेट वाढवणं परवडेल?

ट्रेड मॅगझिन कम्पलीट सिनेमाचे संपादक अतुल मोहन यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, की स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मलाही वर्षभराचं बजेट ठरवून देण्यात आलेलं असतं. त्यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी चित्रपट विकताना त्याच्या किमती एकदम अचानक वाढणार नाहीत. त्याऐवजी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म विकत घ्यायच्या चित्रपटांचं प्रमाण कमी करतील.

स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचं आर्थिक गणित हे सबस्क्रीप्शनवरच अवलंबून असतं. पण भारतासारख्या देशात सबस्क्रीप्शन रेट वाढवणं तितकं सोपं नाहीये. कारण भारत हे प्राइस सेन्सिटिव्ह मार्केट आहे. बरेचसे ग्राहक हे अधिक किंमत देऊन सबस्क्राईब करतील की नाही, याबद्दल अनेक ट्रेड अनॅलिस्टच्या मनात शंका आहेत.

गेल्या वर्षी जून महिन्यात ग्लोबल अकांउटिंग फर्म प्राइस वॉटरहाऊस कूपर्स इंडियानं एक सर्व्हे प्रसिद्ध केला होता. या सर्व्हेनुसार भारतात व्हीडिओ स्ट्रीमिंग इंडस्ट्री ही अतिशय वेगाने वाढेल आणि 2023 पर्यंत या उद्योगाची उलाढाल ही 11 हजार 977 कोटींची होईल. येत्या चार वर्षात एकूणच मीडिया आणि मनोरंजन इंडस्ट्रीची वाढ ही 11.28 टक्क्यांनी होईल आणि या क्षेत्राची आर्थिक उलाढाल ही 4 लाख 51 हजार 405 कोटींची होईल.

2023 पर्यंत मीडिया आणि मनोरंजन इंडस्ट्रीला मिळणाऱ्या महसूलापैकी सर्वाधिक महसूल हा पारंपरिक टीव्ही आणि होम व्हीडिओमधून येईल. या इंडस्ट्रीतली उलाढाल 1,23,047 कोटींची असेल.

अर्थात, हे आकडे कोरोनापूर्व काळातले आहेत. कोरोनामुळे शूटिंग तीन महिने ठप्प होते. टीव्ही इंडस्ट्रीला बसलेला आर्थिक फटका मोठा आहे. त्यामुळे आता मनोरंजन क्षेत्रातल सर्वच गणितं बदलेली आहेत. या बदललेल्या परिस्थितीत OTT ही मनोरंजन क्षेत्राचं भविष्य असेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)