'मालिका संपली की लोक हळूहळू विसरू लागतात'- युवा अभिनेत्रीने मांडलं ग्लॅमरमागचं वास्तव

किरण ढाणे, अभिनेत्री, मनोरंजन क्षेत्र
फोटो कॅप्शन, किरण ढाणे
    • Author, अमृता कदम
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

पूर्वी संध्याकाळाचे सात ही बातम्यांची वेळ असायची...आता हा 'प्राइम टाईम' आहे. यावेळी घराघरातून मालिकांचे टायटल साँग ऐकू येतात...मालिका हिंदी आहे, की मराठी यानं फरक पडत नाही. चॅनेल कोणतं आहे, हेही महत्त्वाचं नसतं. सात ते दहा ही वेळ महत्त्वाची असते. या तीन तासांत मुख्यतः घरातील बायका स्वतःला टीव्ही सीरिअलमध्ये गुंतवून घेतात. बऱ्याचदा त्यांच्या कल्पनेतलं त्या मालिकांच्या माध्यमातून अनुभवत असतात. त्यातल्या नायिकांच्या सुखदुःखांशी स्वतःला जोडून घेतात.

पण ज्या नायिकांना त्या टीव्ही स्क्रीनवर पाहत असतात, ज्यांचं ग्लॅमर त्यांना मोहवत असतं, त्यांचं खरं आयुष्य रील लाइफप्रमाणेच चकचकीत असतं का? त्यांच्या रिअल लाइफमध्येही मालिकातल्या ट्रॅकप्रमाणे सुख-दुःखाचे चढउतार असतात?

अभिनय क्षेत्रातील स्ट्रगल, अनिश्चितता, स्पर्धा आणि या सगळ्याला सामोरं जाताना येणारा मानसिक ताण, त्यांच्या मनात त्या-त्या वेळी येणारे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला.

News image

"जेव्हा एखादी मालिका, एखादा प्रोजेक्ट संपतो, तेव्हा आपण लोकांपासून इंडस्ट्रीपासून लांब गेलेलो असतो. कॉन्टॅक्टमध्ये नसतो. प्रोजेक्ट सुरू असताना लोक आपल्याला रोज बघत असतात. पण तो संपल्यावर सोशल मीडिया, इंटरव्ह्यू कमी होतात आणि लोक विसरतात आपल्याला. म्हणजे अगदीच विसरतात असं नाही म्हणता येणार, पण जे नवीन प्रोजेक्ट, मालिका सुरू असतात त्यावर सगळं लक्ष केंद्रित होतं. हा काळ खरंतर खूप अवघड असतो."

अभिनेत्री किरण ढाणे सांगत होती. झी मराठीवरील 'लागिरं झालं जी' या मालिकेत किरणनं साकारलेली 'जयडी' घराघरात पोहोचली होती. पण काही कारणामुळे तिनं ही मालिका सोडली. त्यानंतर तिला सोनी मराठीवरील 'एक होती राजकन्या' या मालिकेत लीड रोल मिळाला. सध्या 'एक होती राजकन्या' ही मालिका ऑफ एअर झालेली आहे आणि किरण तिच्या घरी साताऱ्यात आली आहे.

किरण ढाणे, अभिनेत्री, मनोरंजन क्षेत्र
फोटो कॅप्शन, किरण ढाणे

किरण मूळची साताऱ्याची. घरात अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नाही. अशावेळी छोट्या शहरातून मुंबईत येऊन राहायचं, काम करायचं, नवीन काम मिळविण्यासाठी स्ट्रगल करायचा याचा खरंच ताण येतो का?

line

आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर प्रत्येक स्त्रीला कठीण प्रसांगाना सामोरं जावं लागतं. त्यावेळी तिच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा क्वचितच कुणी विचार करतं. 'बाईचं मन' या मालिकेतून आम्ही तिच्या मनात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. हा लेख या सीरिजचा भाग आहे. मालिका आणि चित्रपटसृष्टीच कामं मिळवताना बराच संघर्ष करावा लागतो. कामं मिळवण्याच्या धडपडीपासून ते लोकांच्या चित्रविचित्र प्रश्नांना उत्तरं देण्याचा हा संघर्ष मनाची कसोटी पाहणारा असतो. या समस्येवर प्रकाश टाकणारा हा लेख.

line

या प्रश्नाचं उत्तर देताना किरणनं स्वतःचा अनुभव थोडा वेगळा असल्याचं सांगितलं. किरणची 'लागिरं झालं जी' ही मालिका आणि तिनं केलेला 'पळशीची पीटी' हा चित्रपट दोन्हीचं चित्रीकरण साताऱ्यातच झालं होतं. त्यामुळे तिला त्यावेळी घरापासून फार लांब राहावं लागलं नाही. तिचा मुंबईत राहण्याचा अनुभव 'राजकन्या'च्या वेळेचाच होता. पण छोट्या शहरातून मुंबईत अभिनयासाठी येणाऱ्या अनेकांचा स्ट्रगल किरणनं पाहिला आहे.

लहान शहरातून येऊन धडपड करणं अवघड

त्याबद्दल बोलताना तिनं सांगितलं, "सातारा, सांगली, कोल्हापूरसारख्या भागात यापूर्वी केवळ पिक्चरचं शूटिंग व्हायचं, आता कुठे मालिकांचं शूटिंग होत आहे. त्यामुळे इथल्या मुलांना कामासाठी मुंबईतच जावं लागतं. मुंबईत राहणाऱ्या मुलांच्या तुलनेत हे तितकं सोपं नसतं. कारण लहान शहरातून येणाऱ्या अनेकांची कौटुंबिक पार्श्वभूमी अशी नसते, की ते मुंबईत राहू शकतील. मग प्रत्येकवेळी ऑडिशनसाठी मुंबईत यावं लागतं. ऑडिशनचा कॉल एक दिवस आधी येतो. सहा-सात तासांचा प्रवास करून मुंबईत पोहोचायचं. तिथं साधी फ्रेश होण्याचीही सोय नसते. कसंबसं आवरून ऑडिशनला जावं लागतं. हे सगळंच खूप अवघड असतं. पण तरीही अनेक जण स्ट्रगल करतात."

किरण ढाणे, अभिनेत्री, मनोरंजन क्षेत्र
फोटो कॅप्शन, किरण ढाणे

आर्थिक बाजू तितकीशी बळकट नसेल तर हा स्ट्रगल अजूनच कठीण होऊ शकतो, असं किरणला वाटतं.

"अनेकजण मुंबईमध्ये येऊन धडपडत राहतात. काही महिन्यांनी, वर्षभरानं लक्षात येतं, की आपलं इथे काहीच होत नाहीये. जवळचे पैसेही संपत आलेले असतात. मग अशावेळी गावाला परत कसं जायचं, लोकांच्या प्रश्नांना उत्तरं कशी द्यायची असे प्रश्न पडतात. टेन्शनमध्ये येऊन मग नैराश्य येतं, अगदी आत्महत्येसारखं पाऊलही उचललं जातं."

लोकांच्या प्रश्नांमुळे चीडचीड व्हायची

एक होती राजकन्या संपल्यावर किरण जेव्हा साताऱ्याला आली, तेव्हा तिलाही लोकांच्या प्रश्नांना सामोरं जावं लागलं होतं.

किरण ढाणे, अभिनेत्री, मनोरंजन क्षेत्र
फोटो कॅप्शन, किरण ढाणे

"राजकन्या संपली आणि मी घरी परत आले. तेव्हा नातेवाईक किंवा आजूबाजूचे भेटायला येणारे लोक एकच प्रश्न विचारायचे...आता काय सुरू आहे? तेव्हा मला असं वाटायचं, की माझी सीरिअल काल संपलीये...मी आज सकाळी साताऱ्यात आलीये आणि तुम्ही मला विचारताय, की आता काय सुरू आहे? मी त्यांनाही दोष देत नाहीये. कारण त्यांनाही बऱ्याचदा माहीत नसतं, की कामं अशी नसतात. एक काम संपलं की दुसरं काम लगेच मिळालंय किंवा येईल ते काम केलंय. पण या गोष्टींबद्दल ते अनभिज्ञ असतात. सुरूवातीला या प्रश्नावर माझी खूप चीडचीड व्हायची. आता मी त्यांना समजावून सांगायला लागलीये, की कामं येताहेत, पण चांगलं काम मिळेपर्यंत थांबायचं आहे. सीरिअलचं हेक्टिक शूटिंग नुकतंच संपलंय, त्यामुळे थोडा ब्रेक घेतीये. स्वतःवर काम करतीये."

काम नसताना अनेकदा निगेटीव्ह विचार येतात

किरण लोकांना समजावून सांगत असली तरी तिला स्वतःलाही आपण साताऱ्यात परत आलोय, हे स्वीकारणं थोडं कठीण गेलं होतं. सीरिअल ऑफ एअर झाल्यानंतर मुंबईतून बाहेर पडलो तर आपण त्या विशिष्ट वर्तुळातून बाहेर पडू अशी भीती, दबाव होता का, असं विचारल्यावर तिनं सांगितलं, "एक होती राजकन्या संपल्यानंतर मी साताऱ्यात पुन्हा आले. एक टेन्शन होतं, की कंटिन्यू शूटिंगची आपल्याला सवय झालीये. आता घरी बसून आपण काय करणार? फ्रस्ट्रेशन येईल का किंवा वाईट विचार मनात येतील का? काम नसताना असं होतं, की आपल्या मनात वेगवेगळे विचार येतात, जे बऱ्याचदा निगेटीव्ह असतात. तेव्हा मी विचार केला, की हा 'फ्री-टाइम' आहे, त्याला 'बिझी टाइम' कसं बनवता येईल. मोकळा वेळ खरं तर 'मोकळा' नसतो. हीच ती वेळ असते, जेव्हा आपल्याला स्वतःवर काम करायला वेळ मिळतो, स्वतःसाठी जगायला वेळ मिळतो.

किरण आता साताऱ्यातला आपला वेळ वाचन, योगा, मेडिटेशन या गोष्टींमध्ये गुंतवत आहे. सध्या ऑडिशन असेल किंवा शूट असेल तरच मुंबईला जाते. एरवी आता ती साताऱ्यात आपल्या आई-बाबांसोबतच राहते.

किरण ढाणे, अभिनेत्री, मनोरंजन क्षेत्र
फोटो कॅप्शन, किरण ढाणे

एखादी मालिका संपणे हा एक भाग असतो आणि चांगलं चाललेलं काम सोडणं किंवा सुटणं हा दुसरा भाग. टीव्ही इंडस्ट्रीत हा प्रकार खूपदा पाहायला मिळतो. एखादं कॅरेक्टर मालिकेतून रातोरात गायब होतं किंवा रिप्लेस होतं. अशावेळी ती भूमिका करणाऱ्या कलाकाराच्या आयुष्यात अनिश्चिततेचाही काळ येतो.

सेफ झोनमधून बाहेर पडणं अवघड

किरणनंही इंडस्ट्रीमधली ही अनिश्चितता पाहिली आहे. त्यावेळी तिची मानसिक अवस्था काय होती?

"लागिरं झालं जी ही सीरिअल सोडल्यानंतर मला बऱ्याच कमेंट अशा आल्या, की तू एक मोठं काम सोडतीयेस. तू या मालिकेची निगेटीव्ह लीड आहेस, तुझं कॅरेक्टर लोकांना आवडतंय, एक महत्त्वाचा ट्रॅक सुरू आहे, अशावेळी तू ही मालिका कशी सोडू शकतेस? सेफ झोनमधून बाहेर पडणं कठीण असतं. तुझं शूट साताऱ्यामध्येच सुरू आहे. ते काम सोडून तू बाहेर काम मिळवण्यासाठी धडपडणार का? इंडस्ट्रीमध्ये किती स्ट्रगल आहे, हे तुला माहितीये का? शिवाय तू प्रोजेक्ट सोडल्यानंतर लोक तुझ्याबद्दल निगेटीव्ह गोष्टी पसरवतील. हिने प्रोजेक्ट सोडला म्हणजे हिच्यात काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा हिने काहीतरी प्रॉब्लेम केला असेल, असं बोललं जाईल. पण मी त्याचा विचार नाही केला."

किरण ढाणे, अभिनेत्री, मनोरंजन क्षेत्र
फोटो कॅप्शन, किरण ढाणे

एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली, घरामध्ये अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेली किरण ग्लॅमरच्या जगात टिकून राहण्यासाठी धडपडतीये. या प्रवासात ताण आहेत, मानसिकदृष्ट्या थकवणारे चढ-उतारही आहेत. पण त्यांना सामोरं जाण्याची तिची तयारी आहे. कारण तिच्यासाठी हा स्ट्रगल म्हणजे आयुष्यातली खूप मोठी समस्या नाहीये.

"बाहेर फिरतो, तेव्हा कळतं, की समाजात आपल्यापेक्षा मोठे प्रॉब्लेम असलेले लोक आहेत. ते त्या प्रॉब्लेमशी डील करू शकतात, तर आपण का नाही? त्यांच्याशी बोलल्यानंतर जाणवतं, की माझा प्रॉब्लेम एवढासा आहे. एवढ्याशा प्रॉब्लेमवर मी रडत बसले, तर मी आयुष्यात मोठ्या प्रॉब्लेमला कसं सामोरं जाणारं? कारण आयुष्यात पुढं जायचं असेल, तर प्रॉब्लेमला तर सामोरं जावंच लागणार? कारण जेवढा प्रॉब्लेम मोठे, तेवढं यश मोठं..."

बीबीसी

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)