'एक शीख म्हणून यांना भारतात पगडी घालण्याचं स्वातंत्र्य मिळेल का', राहुल गांधींच्या वक्तव्यावरून गदारोळ

अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी विविध कार्यक्रमात सहभाग घेत आहेत. या कार्यक्रमामध्ये केलेली वक्तव्यं बातम्यांचा विषय होत आहेत आणि त्यावर सत्ताधारी भाजपचे नेते प्रतिक्रियासुद्धा देत आहेत.
राहुल गांधी यांनी अमेरिकेत झालेल्या कार्यक्रमादरम्यान तिथे उपस्थित असलेल्या शीख व्यक्तीकडे बोट दाखवत म्हटले की 'या व्यक्तीला भारतात पगडी घालण्याचे स्वातंत्र्य मिळू शकते का, या व्यक्तीला कडं घालण्याचं स्वातंत्र्य मिळू शकेल का?' त्यांच्या या विधानावरुन भाजप आणि काँग्रेसमध्ये बरीच चर्चा सुरू झाली आहे.
त्यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी आणि भाजप नेते जगदंबिका पाल सरसावले आहेत.
वॉशिंग्टन डी.सी.मध्ये इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या एका कार्यक्रमात राहुल गांधी म्हणाले की, "मी पंतप्रधान मोदींना संसदेत जवळून पाहतो आणि सांगू शकतो की 56 इंच, देवाशी थेट संपर्क या त्यांच्या कल्पना आता कालबाह्य झाल्या आहेत."
इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की विरोधी पक्षनेते राहुल गांधी अमेरिकेत कोणत्याही अधिकृत पदावरची व्यक्ती म्हणून नाही तर खासगी दौऱ्यावर अमेरिकेत आहेत.
राहुल गांधी आणखी काय म्हणाले?
वॉशिंग्टन डीसीच्या जॉर्जटाऊन विद्यापीठात झालेल्या एका कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीवर बोलत होते.
राहुल गांधी म्हणाले नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणूक स्वतंत्र निवडणूक नव्हती तर अतिशय नियंत्रित पद्धतीची निवडणूक झाली आहे.
राहुल गांधींनी भाजपवर आरोप केला, “निष्पक्ष निवडणुका झाल्या असत्या तर माझ्या मते भाजपला 240 जागा सुद्धा मिळाल्या नसत्या. त्यांच्याकडे खूप पैसा होता आणि आमची बँकेची खाती सील करण्यात आली होती.”

फोटो स्रोत, Getty Images
“निवडणूक आयोगसुद्धा त्यांना (मोदींना) जे हवं तेच करत होता. मोदी आपला अजेंडा संपूर्ण देशात घेऊन जाऊ शकतील अशा पद्धतीने संपूर्ण प्रचार अभियान तयार केलं होतं त्यात प्रत्येक राज्यासाठी वेगळी रचना होती. माझ्यामते ही निवडणूक स्वतंत्र नव्हती. मी या निवडणुकीकडे अतिशय नियंत्रित निवडणूक म्हणून पाहतो,” असं राहुल गांधी म्हणाले.
"मी पंतप्रधान मोदींचा द्वेष करत नाही. त्यांचा दृष्टिकोन मला पटत नाही मात्र काही वेळा त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते."
त्याचबरोबर राहुल गांधी म्हणाले की जातीनिहाय जनगणनेला कुणीच रोखू शकणार नाही.
ते म्हणाले, “भारतातील 90% लोक ओबीसी, दलित, आदिवासी यांच्याजवळ पुरेसे प्रतिनिधित्व नाही. हा जाती, धर्म किंवा हिंदुत्वाचा प्रश्न नाही तर हा पारदर्शकतेचा प्रश्न आहे. ज्या देशातल्या 90% लोकांकडे समान संधी नाही अशा देशाची मी कल्पना करू शकत नाही,” असं राहुल गांधी अमेरिकेत म्हणाले.
पुढे ते म्हणाले, "लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतात काही बदल झाले आहेत. लोक म्हणतात की, आता भीती वाटत नाही, भीती निघून गेली आहे."
'ही लढाई राजकारणाची नाही हे आधी समजून घ्यावं लागेल,' असं राहुल गांधी म्हणाले.
शीख व्यक्तीकडे पाहून राहुल गांधी काय म्हणाले?
इंडियन ओव्हरसीज काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी यांनी भाषण करत असताना एका शीख व्यक्तीला त्यांचे नाव विचारले.
राहुल गांधी पुढे म्हणाले, “एक शीख व्यक्ती म्हणून त्यांना भारतात पगडी घालण्याची परवानगी मिळेल का? हाच खरंतर संघर्षाचा मूळ मुद्दा आहे. त्याचबरोबर शीख म्हणून त्यांना भारतात हातात कडं घालण्याची परवानगी मिळेल का? त्यांना गुरुद्वाऱ्यात जाण्याची परवानगी मिळेल का? ही लढाई फक्त त्यांचीच नाही तर सर्वच धर्मांची आहे.”
“इथे तामिळनाडू, पंजाब, हरियाणा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, आणि महाराष्ट्राचे लोक आहेत. हे लोक फक्त नाव नाही तर इतिहास, भाषा आणि परंपरेचं प्रतिनिधित्व करतात. आरएसएसच्या मते ही राज्यं, भाषा, धर्म आणि समुदाय दुसऱ्यांपेक्षा निम्न स्तरावर आहेत.
"आमचा प्रत्येक राज्य, परंपरा, धर्म, संस्कृती, आणि भाषेवर विश्वास आहे. तो अतिशय गरजेचा आहे. तामिळनाडूच्या एखाद्या व्यक्तीला म्हटलं की त्याला तामिळ बोलायची परवानगी नाही तर त्याला कसं वाटेल? हीच आरएसएस ची विचारसरणी आहे,” असं राहुल गांधी म्हणाले.
भाजपने दिलं प्रत्युत्तर
राहुल गांधींनी अमेरिकेत केलेल्या वक्तव्यावर भारतातही प्रतिक्रिया उमटल्या आहेत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी मंगळवारी (10 सप्टेंबर) राहुल गांधी यांच्यावर टीका केली आणि म्हणाले की देशाबद्दल परदेशात जाऊन ते जी वक्तव्यं करत आहेत ती गंभीर आहेत.
राहुल गांधी यांनी शीख आणि विविध धर्माच्या लोकांच्या स्वातंत्र्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर हरदीप सिंह पुरी यांनी टीका केली.
ते म्हणाले, “अचानक ते (राहुल गांधी) म्हणतात की भारतातील शीख समुदाय घाबरलेला आहे आणि ते पगडी घालू शकत नाही. मी गेल्या साठ वर्षांपासून पगडी घालतोय. शिखांच्या हितासाठी या सरकारने सर्व काही केलंय आणि मला वाटत नाही की हा काही मुद्दा आहे. इतिहासात आम्हाला (शिखांना) जेव्हा भीती वाटली तेव्हा राहुल गांधी यांच्या कुटुंबाची सत्ता देशात होती."
असं म्हणताना पुरी यांनी 1984 मध्ये दिल्लीत घडलेल्या हिंसाचाराचा उल्लेख केला.

दरम्यान भाजप नेते आर. पी. सिंह यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्यावर टीका केली आहे. 1984 च्या दंगलीचा संदर्भ देत ते म्हणाले की 'या दंगली काँग्रेसच्या कार्यकाळात झाल्या होत्या.'
हेच वक्तव्य त्यांनी भारतात करावं असं आवाहन सिंह यांनी राहुल गांधींना केलं. असं केलं तर मी त्यांच्यावर केस करेन आणि त्यांना कोर्टात खेचेन असं ते म्हणाले.
जॉर्जटाऊन विद्यापीठातील कार्यक्रमात राहुल गांधींनी सध्या चीनच्या उत्पादन क्षमतेचा उल्लेख केला. भारत आणि चीनची तुलना करत ते म्हणाले की चीन ज्या प्रमाणात उत्पादन करतो त्या तुलनेत भारत करू शकत नाही.
यावर भाजप खासदार जगदंबिका पाल म्हणाले, की 'हे विधान अत्यंत बेजबाबदारपणाचं आहे.'
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, “भारताचे विरोधी पक्ष नेते असून सुद्धा ते भारतावरच टीका करत आहेत. त्यांना जितकी टीका करायची आहे त्यांनी देशातल्या संसदेत करावी. गेल्या दहा वर्षात आम्ही पाच सर्वोच्च अर्थव्यवस्थेमध्ये आलो आहोत हे वास्तव आहे."


या आधी राहुल गांधी काय काय म्हणाले?
वॉशिंग्टन डीसी आधी राहुल गांधी यांनी टेक्सासमध्ये झालेल्या कार्यक्रमात वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यांचाही भाजपने चांगलाच समाचार घेतला.
टेक्सासमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात राहुल गांधी म्हणाले, “संघाला वाटतं की भारत ‘एक विचार आहे’. मात्र आम्हाला असं वाटतं की भारत ‘अनेक विचारसरणींनी’ तयार झाला आहे. अमेरिकेसारखं आम्हालाही वाटतं की प्रत्येकाला स्वप्न पाहण्याचा हक्क आहे .सगळ्यांना योग्य संधी मिळायला हव्या आणि इथेच खरा संघर्ष आहे.”
या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चव्हाण म्हणाले की, राहुल गांधी यांना नैराश्य आलं आहे.
ते म्हणतात, “राहुल गांधी विरोधीपक्ष नेते आहेत आणि हे जबाबदारीचं पद आहे. याआधी कोणत्याही विरोधीपक्ष नेत्यांनी देशाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केलेला नाही. मात्र राहुल गांधी यांना नैराश्य आलं आहे. सलग तिसऱ्यांदा पराभव झाल्यामुळे ते भाजप, संघ आणि मोदींचा आंधळेपणाने टीका करत आहे आणि हे करता करता ते देशावरही टीका करत आहेत. देशाबाहेर काँग्रेस आणि भाजप असं काही नसतं.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











