राहुल गांधींचा अमेरिकेत आरएसएसवर हल्लाबोल, गिरिराज सिंह यांनी दिलं 'हे' प्रत्युत्तर

फोटो स्रोत, INC
काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्यापासून राहुल गांधी यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे.
भारतीय प्रमाणवेळेनुसार नऊ सप्टेंबरच्या सकाळी अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहुल गांधींनी दोन कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. राहुल गांधी यांनी भारतीय वंशाच्या लोकांचीही भेट घेतली. त्याचबरोबर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या एका कार्यक्रमात त्यांची मतं मांडली.
या कार्यक्रमांत बोलताना राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) जोरदार टीका केली.
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काही मिनिटांत लोकांच्या मनातून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलची भीती नष्ट झाली, असं राहुल गांधी म्हणाले.
तर टेक्सासमधील कार्यक्रमात त्यांनी आरएसएसवर टीका केली. भारत 'एक विचार' आहे, असं आरएसएसला वाटतं. पण भारत 'अनेक विचारां'नी बनलेला देश आहे. अमेरिकेप्रमाणेच आमचंही असं मत आहे की, स्वप्नं पाहण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. सर्वांनाच सहभागाची संधी मिळाली पाहिजे असं वाटतं. नेमका हाच संघर्ष असल्याचं ते म्हणाले.
राहुल गांधींच्या टीकेवर भाजपचे गिरिराज सिंह यांनी लगेच प्रत्युत्तरही दिलं.
लोकसभा निवडणुकीत भाजपाला 240 जागी विजय मिळाला. हा आकडा बहुमतापासून दूर असला तरी, एनडीएतील घटक पक्षांच्या मदतीनं नरेंद्र मोदींनी केंद्रात सरकार स्थापन केलं.
काँग्रेससह इंडिया आघाडी हा निकाल म्हणजे त्यांचा मोठा विजय असल्याचा दावा करत आहे.
राहुल गांधी या दौऱ्यात वॉशिंग्टन डीसीमध्येही अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.


राहुल गांधींच्या अमेरिका दौऱ्यावर भाजपाची प्रतिक्रिया
राहुल गांधींनी आरएसएस वर केलेल्या टीकेला भाजपचे खासदार गिरिराज सिंह यांनी उत्तर दिलं.
"आरएसएस समजण्यासाठी राहुल गांधींना अनेक जन्म घ्यावे लागतील. देशद्रोही व्यक्तीला आरएसएस काय आहे हे समजू शकत नाही. परदेशात जाऊन देशावर टीका करणाऱ्याला आरएसएस समजू शकत नाही. राहुल गांधी देशाला बदनाम करण्यासाठीच परदेशात जातात," अशी टीका गिरिराज सिंह यांनी केली.
ते पुढं म्हणाले की, "मी अनेकवेळा सांगितलं आहे की, ही संघटना भारतीय संस्कार आणि संस्कृतीमधून जन्मली आहे. त्यामुळं या जन्मात राहुल गांधी यांना आरएसएस कळणार नाही."
राहुल गांधी याआधीही अमेरिका दौरा केला आहे. त्यांच्या परदेश दौऱ्यांवर भाजपनं आक्रमकपणे टीकाही केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्याआधी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे चेअरमन सॅम पित्रोदा टेक्सासमध्ये राहुल गांधी यांचा परिचय करून देताना म्हणाले की, "राहुल गांधींकडे व्हिजन आहे. भाजपानं त्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. प्रत्यक्षात वस्तुस्थिती उलटी आहे. ते पप्पू नाहीत. ते अतिशय उच्च-शिक्षित व्यक्ती आहेत आणि त्यांनी भरपूर अभ्यास केलेला आहे. कोणत्याही मुद्द्यावर गहन विचार करणारे ते रणनीतिकार आहेत."
यावर भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी याच वक्त्यव्याचा एक भाग शेअर करून त्यांची खिल्ली उडवली.
एक्स या सोशल मीडिया व्यासपीठावर अमित मालवीय यांनी लिहिलं की, "कोणीतरी राहुल गांधींचा परिचय ते पप्पू नाहीत असा करून देत आहे याची कल्पना करून पाहा. सॅम पित्रोदा यांनी तेच करून दाखवलं आहे."
लोकसभा निवडणुकीच्या काळातही सॅम पित्रोदा एका विधानामुळं चर्चेत आले होते. त्यानंतर सॅम पित्रोदा यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, निवडणूक संपताच त्यांची पुन्हा त्या पदावर नियुक्ती करण्यात आली.
मे 2024 मध्ये एका मुलाखतीत सॅम पित्रोदा म्हणाले होते की, "भारतासारख्या विविधतेनं नटलेल्या देशाला आपण एकत्र ठेवू शकतो. या देशात पूर्वेला राहणारे लोक चिनी लोकांसारखे दिसतात, पश्चिमेला राहणारे लोक अरबांसारखे दिसतात. उत्तरेत राहणारे लोक माझ्या दृष्टीनं पाश्चात्यांसारखे दिसतात तर दक्षिणेत राहणारे आफ्रिकन लोकांसारखे दिसतात. पण त्यामुळं काहीही फरक पडत नाही. आम्ही सर्व बंधू-भगिनी आहोत."
आणखी काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधी यांनी दावा केला की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या राज्यघटनेवर हल्ला करत आहेत, राज्यघटना बाजूला सारू पाहत आहेत. निवडणुकीच्या काळात लाखो लोकांना ही गोष्ट स्पष्टपणे लक्षात येत होती, असंही ते म्हणाले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसह इंडिया आघाडीनं 'राज्यघटना धोक्यात' असल्याचा मुद्दा मांडला होता. विरोधी पक्षांनी निवडणुक प्रचार सभांमध्ये दावा केला होता की, जर भाजप पुन्हा केंद्रात सत्तेत आलं तर ते देशाची राज्यघटना बदलून टाकतील.
भाजपाकडून मात्र विरोधी पक्षांच्या हा दावा फेटाळण्यात येत होता.

फोटो स्रोत, Congress/X
देशातील तळागाळातील, कमकुवत घटकांना राज्यघटनेत देण्यात आलेलं आरक्षण भाजप संपवू पाहत असल्याचा आरोप, इंडिया आघाडीकडून करण्यात आला.
राहुल गांधी म्हणाले की, "देशात भाजपबद्दल लोकांना जी भीती होती ती आता संपली आहे. भारताच्या लोकांचं हे यश आहे. भारताच्या राज्यघटनेवर करण्यात आलेला कोणताही हल्ला आम्हाला मान्य असणार नाही."
भारतीय वंशाच्या नागरिकांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात राहुल गांधी म्हणाले की, "तुम्ही इथं मनात द्वेष नाही तर सन्मान, आदर घेऊन आला आहात. तुम्ही इथे आमचे दूत आहात. त्यामुळेच तुमची भूमिका खूप महत्त्वाची आहे. भारताला अमेरिकेची आवश्यकता आहे आणि अमेरिकेला भारताची. तुम्ही तुमचं जुनं घर आणि नव्या घरामध्ये (अमेरिका) असलेला दुवा आहात."
बेरोजगारीवरूनही केली टीका
युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासमध्ये विद्यार्थ्यांसमोर बोलताना राहुल गांधींनी जगभरातील बेरोजगारी आणि इतर मुद्द्यांवर भाष्य केलं.
राहुल गांधी विद्यार्थ्यांना म्हणाले की, आज भारतात फोन, फर्निचर आणि कपडे प्रत्येक गोष्टीच्या मागे 'मेड इन चायना' लिहिलेलं असतं. राहुल गांधी त्यांच्या 4 हजार किलोमीटर लांबीच्या भारत जोडो यात्रेबद्दलही बोलले.

फोटो स्रोत, ANI
राहुल गांधी यांनी दावा केला की, "भारत जोडो यात्रेमुळे कामाबद्दल विचार करण्याच्या माझ्या दृष्टीकोनात बदल झाला. या यात्रेत अनेक लोक सहभागी झाले होते. यात कोणत्याही नियोजनाशिवाय स्वाभाविकपणे जी सर्वात चांगली गोष्ट घडली ती म्हणजे राजकारणात प्रेमाचा विचार मांडणं.
ही गोष्ट विचित्र आहे. कारण बहुतांश देशांमध्ये राजकारणात तुम्हाला प्रेम या शब्दाचा वापर दिसणार नाही. तुम्हाला द्वेष, राग, अन्याय, भ्रष्टाचार असे सर्व शब्द दिसतील."
'चीनचा उत्पादन क्षेत्रावर कब्जा'
राहुल गांधी म्हणाले की, जगात प्रत्येक ठिकाणी रोजगाराची समस्या नाही. पाश्चिमात्य देशांमध्ये, भारतात रोजगाराची समस्या आहे. मात्र चीन आणि व्हिएतनाममध्ये रोजगाराची समस्या नाही.
"1940, 50 आणि 60 दशकात अमेरिका जगाचं उत्पादन केंद्र होतं. तेव्हा अमेरिकेत कार, वॉशिंग मशीन, टीव्ही सर्वकाही बनवलं जात होतं. मात्र हळूहळू हे उत्पादन कोरिया, जपानमध्ये होऊ लागलं आणि आता चीनमध्ये होतं आहे."
"आज चीन जगाचं उत्पादन केंद्र बनला आहे. भारतात तुम्हाला जे फोन, फर्निचर, कपडे दिसतील त्यावर देखील सर्वांच्या मागे "मेड इन चायना" लिहिलेलं असतं. ही वस्तुस्थिती आहे," असंही ते म्हणाले.
उत्पादन प्रक्रियेमुळे रोजगार निर्माण होतो. पण, भारत, अमेरिका किंवा पाश्चात्य देश उपभोगावर लक्ष केंद्रित करत आहेत, असंही त्यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, Congress/X
नवीन रस्ते, विमानतळं, बंदरं आणि मेट्रो मार्ग हे नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणाच्या केंद्रस्थानी राहिलं आहे. तीन वर्षापासून त्यांचं सरकार दरवर्षी 100 अब्ज डॉलरची रक्कम पायाभूत सुविधांच्या विकासकामात खर्च (भांडवली खर्च) करत आहे.
2014 ते 2024 दरम्यान भारतात जवळपास 54 हजार किलोमीटर (33,553 मैल) लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बनवण्यात आले आहेत. त्याआधीच्या दहा वर्षांमध्ये जितके राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आले होते, त्यातुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेच्या जीडीपीतील याचं प्रमाण पाहिल्यास 2020-21 मध्ये खासगी गुंतवणूक फक्त 19.6 टक्के होती. तर 2007-08 मध्ये खासगी गुंतवणुकीचं प्रमाण जीडीपीच्या 27.5 टक्के होतं. खासगी गुंतवणूक तेव्हा उच्चांकीवर होती.
मात्र, बेरोजगारीच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींवर नेहमीच टीका होत आली आहे.
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (ILO) ताज्या आकडेवारीनुसार, 2000 मध्ये देशातील बेरोजगारीत शिक्षित तरुणांचं प्रमाण 54.2 टक्के होतं. तर 2022 मध्ये हे प्रमाण वाढून 65.7 टक्क्यांवर पोहोचलं आहे.
राहुल गांधी म्हणाले, "लोकशाही वातावरणात उत्पादन करण्याच्या पद्धतीवर भारताला पुनर्विचार करावा लागेल. जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत आम्हाला बेरोजगारीला तोंड द्यावं लागेल."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











