‘कोल्डप्ले’ कॉन्सर्ट : अर्ध्या तासात तिकिटं संपली आणि साईटही क्रॅश, या बँडविषयी जाणून घ्या

फोटो स्रोत, Getty Images
जानेवारी 2025 मध्ये मुंबईमध्ये होणाऱ्या 'कोल्डप्ले' या बँडच्या कॉन्सर्टची तिकिटं 22 सप्टेंबरला (रविवारी) विक्रीसाठी उपलब्ध झाल्यानंतर अवघ्या 30 मिनिटांत संपली.
जगातील सर्वांत आघाडीचा आणि लोकप्रिय समजल्या जाणाऱ्या या म्युझिक बॅन्डचा 'म्युझिक ऑफ द स्फिअर्स वर्ल्ड टुर' होत आहे. त्या दरम्यान ते जानेवारीमध्ये भारताला भेट देणार आहेत.
कोल्डप्ले हा जगप्रसिद्ध मुझ्यिक बॅन्ड भारतातही तितकाच लोकप्रिय असून त्याची प्रचिती काल तिकीट विक्री सुरू झाल्यानंतर आली.
कधी आहे कोल्डप्लेची भारतातील कॉन्सर्ट ?
'म्युझिक ऑफ द स्फिअर्स वर्ल्ड टूर'च्या आयोजनानुसार 18 आणि 19 जानेवारी रोजी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर ही कॉन्सर्ट होणार असल्याची घोषणा झाली होती.
म्युझिक ऑफ द स्फिअर्स हा कोल्डप्लेचा आठवा वर्ल्ड टुर आहे. 14 ऑक्टोबर 2021 रोजी या दौऱ्याची घोषणा करण्यात आली होती आणि भारतातल्या कॉन्सर्टची तिकिटविक्री रविवारी झाली.
या वर्ल्ड टुरमधील पहिली कॉन्सर्ट कोस्टा रिका येथे 18 मार्च 2022 ला झाली. तर 31 ऑगस्ट 2025 रोजी लंडनमधील वेम्बले स्टेडियमवरील कॉन्सर्टने या दौऱ्याची सांगता होईल.
काल (रविवारी) या दौऱ्याच्या मुंबईतील कार्यक्रमाची तिकीट विक्री सुरू झाल्यानंतर कोल्डप्लेच्या भारतातील चाहत्यांनी तिकिटावर अक्षरशः उड्या टाकल्या.
'बुक माय शो' या ऑनलाईन संकेतस्थळावर तिकीट विक्री होणार होती. रविवारी 22 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता तिकीट विक्री सुरू झाली.

फोटो स्रोत, Getty Images
वेबसाईटवर एकाच वेळी सर्व ट्रॅफिक आल्यामुळे वेबसाईटच क्रॅश झाल्याचं दिसून आलं.
बुक माय शोच्या म्हणण्यानुसार ऑनलाईन तिकीट विक्री सुरू झाल्यावर 1.3 कोटी लोकांनी वेबसाईटला भेट दिली. 18 आणि 19 तारखेच्या कॉन्सर्टची तिकीटे 30 मिनिटांच्या आत संपली.
वाढती मागणी लक्षात घेऊन या म्युझिक बॅन्डने 21 तारखेला आणखी एक कॉन्सर्ट होईल अशी घोषणा केली. पण त्या कॉन्सर्टचीही तिकिटं तत्काळ विकली गेली. पुन्हा वेबसाईट क्रॅश झाल्याने आणि तिकिटे तत्काळ संपल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला.
18, 19 आणि 21 तारखेला नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर कोल्डप्लेच्या 3 कॉन्सर्ट होणार आहेत. स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 50 हजार आहे. तीन दिवसांची 1.5 लाख तिकीटे अवघ्या काही मिनिटात विकली गेली.
तिकिटांचा काळा बाजारही जोरात
2,000 ते 35,000 या श्रेणीत तिकिटांचा दर आधी ठरवण्यात आला होता. पण वाढत्या मागणीमुळे तिकिटांचा काळा बाजारही होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहे.
बुक माय शोच्या वेबसाईटवर सगळी तिकिटं विकली गेलेली आहेत असं दाखवलं जात असतानाही दुसऱ्या काही वेबसाईट्सवरून वाढीव दराने तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जात असल्याचं आढळून आलं.
बुक माय शो या संकेतस्थळानं ही सगळी तिकिटंच नकली असल्याचं पत्रक काढून स्पष्टीकरण दिलं. तीन दिवसांसाठी एकूण 1.5 लाख तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध होती. संकेतस्थळ ठप्प पडल्यानं बुक माय शोच्या यूजर्सनी नाराजी व्यक्त केली.


तिकीट न मिळाल्याने हिरमोड झालेल्या या चाहत्यांनी तिकीट विक्रीची व्यवस्था नीट नसल्याचा आरोप केलाय.
दुसऱ्या अनेक अनाधिकृत वेबसाईट्सवरून अजूनही चढ्या दराने तिकिटांचा काळाबाजार सुरू असून अशी अनाधिकृत तिकिटे अवैध ठरवली जातील, असा इशारा बुक माय शो वेबसाईटनं दिला आहे.
कोल्डप्लेचं वलय आणि चाहतावर्ग
कोल्डप्ले हा 1997 साली सुरू झालेला ब्रिटिश रॉक बॅन्ड असून आजघडीला जगातील सर्वांत प्रसिद्ध म्युझिक बॅन्डपैकी एक आहे.
गीतकार आणि पिअॅनिस्ट ख्रिस मार्टिन, गिटारवादक जॉनी बकलंड, बेस गिटारिस्ट गाय बेरीमन आणि ड्रमर विल चॅम्पियन या चार संगीतकारांचा मिळून हा कोल्डप्ले बॅन्ड बनलेला आहे.
याशिवाय या म्युझिक बॅन्डचे व्यवस्थापक म्हणून काम पाहणारे फिल हार्वी हे कोल्डप्लेचे पाचवे सदस्यच मानले जातात.
1999 साली पहिल्यांदा पार्लोफोन या संगीत कंपनी सोबत कोल्डप्लेचा पहिला करार झाला. 2000 साली आलेल्या 'पॅराशूट्स' या अल्बममुळे कोल्डप्ले जगप्रसिद्ध बँड बनला.
या अल्बममधील 'यलो' हे गाणं तर प्रचंड गाजलं. यानंतर आलेल्या प्रत्येक अल्बमने तितकाच धुमाकूळ घातला. कोल्डप्ले बॅन्ड त्यांच्या गाण्यांसोबतच कॉन्सर्टसाठीही तितकाच प्रसिद्ध आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सध्या सुरू असलेली 'म्युझिक ऑफ द स्फिअर्स' ही त्यांची आठवी वर्ल्ड कॉन्सर्ट टूर आहे.
याआधी आठ वर्षांपूर्वी ग्लोबल सिटिझन फेस्टिव्हल टूर अंतर्गत भारतात कोल्डप्लेची कॉन्सर्ट झाली होती.
संगीत आणि सांस्कृतिक जगावरील कोल्डप्लेचा प्रभाव आणि त्याला मिळालेलं वलय वादातीत आहे.
सगळ्यात जास्त पुरस्कार मिळवणाऱ्या म्युझिक बॅन्डच्या यादीत कोल्डप्ले सहाव्या क्रमांकावर आहे. सर्वांत जास्त विकला गेलेला म्युझिक अल्बम ते स्पॉटिफायवर सर्वांत जास्त वेळा ऐकला अल्बम असे सगळे विक्रम कोल्डप्लेच्या नावावर आहेत.
'कोल्डप्ले' च्या चार संगीतकारांची मिळून असलेली संपत्ती तब्बल 471 मिलीयन युरो इतकी आहे.
कोल्डप्ले यांचं हिम्न फॉर वीकएंड हे गाणं भारतात चित्रित झालं होतं. या गाण्याला युट्युबवर 2 बिलियन व्हूज आहेत तर त्यांचं हायर पॉवर हे गाणं अवकाश केंद्रातून प्रसिद्ध करण्यात आलं होतं. त्याची ही चर्चा झाली होती.
संगीतातून सामाजिक भान जपण्याचा पायंडा
कोल्डप्ले हा म्युझिक बॅन्ड त्यांच्या गाण्यांशिवाय त्यांनी घेतलेल्या सामाजिक भूमिकांमुळेही नावाजला जातो. आपल्या स्थापनेपासून नफ्याचा 10 टक्के भाग हा बॅन्ड सामाजिक कामासाठी दान करत आलेला आहे.
हवामान बदल, गरिबी आणि विकसनशील देशांना व्यापारी करारांचा बसणारा फटका याबाबत सातत्यानं कोल्डप्लेनं आवाज उठवलेला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
कोल्डप्लेच्या चालू म्युझिक ऑफ द स्फिअर्स या वर्ल्ड टूरमध्ये कॉन्सर्टमधून एरवीच्या कॉन्सर्टपेक्षा 47 टक्के कमी प्रदूषण झालेलं आहे.
आपल्या कॉन्सर्टची आखणी पर्यावरणपूरक ठेवून पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व अधोरेखित करणं हा त्यांचा उद्देश आहे.
याशिवायही आपल्या वेगवेगळ्या कॉन्सर्टमधून वंशभेद, LGBT समुदाय ते पॅलेस्टाईन मुक्ती सारख्या वेगवेगळ्या मुद्यांवर सुधारणावादी भूमिका कोल्डप्लेनं वेळोवेळी घेतल्या आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











