एस. पी. बालसुब्रमण्यम: सलमान खानचा आवाज म्हणून ओळखला जाणारा गायक

फोटो स्रोत, Instagram/ispbofficial
- Author, वंदना
- Role, बीबीसी टीव्ही एडिटर (भारतीय भाषा)
गेली 40 वर्षं मधाळ आवाजाने भारतभरातल्या संगीतप्रेमींच्या मनावर राज्य करणाऱ्या एस. पी. बालसुब्रमण्यम यांचं निधन झालं. विविध भाषांमधली 40 हजारांपेक्षा जास्त गाणी गाणाऱ्या एस. पी. बालसुब्रमण्यम यांची कारकीर्द अभिनेता, फिल्म प्रोड्यूसर आणि संगीतकार म्हणूनही यशस्वी होती.
भारतातल्या सिने गायकांच्या लोकप्रिय आणि अजरामर गाण्यांची यादी प्रचंड मोठी आहे. लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार, आशा भोसले, येशुदास या यादीत समावेश होऊ शकणारं आणखी एक नाव...एसपीबी - एस. पी. बालसुब्रमण्यम.
बॉलिवुड सिनेमांमध्ये पडद्यावर गाणाऱ्या अभिनेता सलमान खानचा पडद्यामागचा आवाज म्हणून एस. पी. बालसुब्रमण्यम ओळखले जात. साधारण दशकभरापूर्वी त्यांनी प्लेबॅकमधून निवृत्ती घेतली आणि पूर्णवेळ अभिनय आणि प्रोडक्शनला सुरुवात केली.
त्यांच्यानंतर मग सोनू निगम, उदित नारायण आणि इतर गायकांनी सलमानच्या गाण्यांना आवाज द्यायला सुरुवात केली. पण सलमानच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या 'मैनें प्यार किया', 'साजन' सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमाला आणि 'हम आपके है कौन...!'या सुपरहिट सिनेमामध्ये एसपीबींच्या मधाळ आवाजातली गाणी आहेत.
पण एस. पी. बालसुब्रमण्यम रसिकांच्या सगळ्यांत जास्त लक्षात राहतील ते कमल हासन आणि रती अग्निहोत्रींच्या 'एक दुजे के लिए' सिनेमातल्या गाण्यांसाठी.
काही वर्षांपूर्वी आलेल्या 'चेन्नई एक्स्प्रेस' सिनेमाचं टायटल साँगही त्यांनीच गायलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
एस. पी. बालसुब्रमण्यम यांना आदरांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते फिल्म जगतातल्या अनेकांनी एसपीबींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय.
एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्या मृत्यूमुळे आपल्या सांस्कृतिक जगताचं मोठं नुकसान झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
बॉलिवुड अभिनेता सलमान खानने ट्विट केलंय, "एस. पी. बालसुब्रमण्यम सरांविषयी ऐकून वाईट वाटलं. संगीतजगतातला तुमचा ठेवा कायम लक्षात राहील."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
दक्षिण भारतापासून हिंदी सिनेमांपर्यंत
1981मध्ये आलेला हिंदी सिनेमा 'एक दुजे के लिए' साठी त्यांनी पहिल्यांदा हिंदीत गाणं गायलं. कमल हासनवर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
गाणं होतं - 'तेरे मेर बीच में कैसा है ये बंधन अंजाना'

फोटो स्रोत, @Shemaroo
यानंतर त्यांची अनेक हिंदी गाणी लोकप्रिय झाली.
'सागर' सिनेमातलं 'सच मेरे यार है...' आणि 'ओ मारिया...', 'मैंने प्यार किया' सिनेमातली 'दिल दिवाना...', 'कबूतर जा जा...', 'आजा शाम होने आई...'. किंवा मग 'मेरे रंग मे रंगने वाली...' 'हम आपके हैं कौन' सिनेमातील गाणी किंवा मग 'रोजा' सिनेमातलं 'रोजा जानेमन...' हे सदाबहार गाणं एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्या आवाजात आहेत.
मोहम्मद रफींचे फॅन
सोनू निगमसोबतच्या एका कार्यक्रमात त्यांनी सांगितलं होतं, "मी कॉलेजला सायकलवरून जात असे. रफींचं एक गाणं होतं - दिवाना हुवा बादल. ते गाणं ऐकत ऐकत मी अनेकदा एकाच जागी थांबत असे..."

फोटो स्रोत, @SPB
त्यांचे वडील एस. पी. सांबमूर्ती 'हरि-कथा' कलाकार होते. हरि-कथा हा हावभाव आणि संगीताद्वारे भगवान विष्णूच्या कथा सांगणारा लोककला प्रकार आहे.
आंध्र प्रदेशच्या सीमेवरच्या आणि आताच्या थिरुवल्लूर जिल्ह्यात असणाऱ्या कोनडमपट्टू गावात 4 जून 1946ला एसपीबींचा जन्म झाला. बालपणापासूनच त्यांना संगीतात रुची होती.
शाळेत असताना विविध गायन स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या बालसुब्रमण्यम यांना अनेक पारितोषिकं मिळाली होती. 1964मध्ये वयाच्या 18व्या वर्षी त्यांना एका स्पर्धेत सुगम संगीत गायनासाठीचं पहिलं बक्षीस मिळालं. या स्पर्धेचे परीक्षक होते तेलुगु संगीतकार एस. पी. गोठंदापनी आणि गायक घंतसला.
या स्पर्धेनंतर गोठंदापनी एसपीबींचे गुरू आणि मार्गदर्शक बनले. त्यांच्याच दिग्दर्शनाखाली त्यांनी पहिलं गाणं गायलं. सिनेमा होता 'श्री श्री मरिवथ रमणा.' 1966च्या डिसेंबरमध्ये हा सिनेमा रीलिज झाला.
त्यानंतर एसपीबींनी कन्नड सिनेमांसाठी गायलाही सुरुवात केली.
नंतर त्यांनी आंध्र प्रदेशातल्या अनंतपूरमधल्या JNDU इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, पण नंतर त्यांनी चेन्नईच्या कॉलेजमधून इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं.
तामिळ सिनेसृष्टीतला प्रवेश
एसपीबींनी तामिळ सिनेसृष्टीमध्ये प्रवेश केला तेव्हा टी. एम. सुंदरराजन लोकप्रिय होते. MGR आणि शिवाजी गणेशन् यांच्यासारख्या त्यावेळच्या सुपरस्टार्ससाठी तेच गात.
त्यांच्या ऐवजी दुसऱ्या कोणाचा आवाज वापरायला संगीतकार कचरत होते. हा नवीन आवाज या सुपरस्टार्सच्या फॅन्सना आवडेल की नाही, याची त्यांना भीती होती.
मे 1969मध्ये रीलिज झालेल्या एमजीआरच्या 'आदिमायपेन' या सिनेमात एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी पहिल्यांदा गाणं गायलं. त्यांच्या भावपूर्ण गायनशैलीमुळे ते हळुहळू तामिळ फिल्म इंडस्ट्रीत लोकप्रिय होऊ लागले.
1970मध्ये एसपीबींनी इलाया राजांसाठी गायला सुरुवात केली. त्याकाळात संगीतकार म्हणून ते नावारूपाला येऊ लागले होते. एसपीबी- इलायाराज - एस. जानकी या त्रयीची गाणी तामिळ सिनेप्रेमी विसरणं शक्य नाही.
तामिळ, तेलुगु आणि कन्नड सिनेसंगीतावर एसपीबींनी जवळपास 30 वर्षं अधिराज्य गाजवलं.
गिनिज रेकॉर्ड
त्याकाळात एसपीबी एका दिवसात 15 पेक्षा जास्त गाणी गात! 8 फेब्रुवारी 1981 ला त्यांनी सकाळी 9 ते रात्री 9 या काळात कन्नड सिनेमासाठी 17 गाणी गायली. इतकंच नाही तर त्यांनी एकाच दिवशी तामिळ आणि तेलुगु सिनेमांची 19 गाणी गाण्याचा आणि संगीतकार आनंद - मिलिंद यांनी संगीत दिलेली हिंदी चित्रपटाची 16 गाणी गाण्याचा विक्रमही केला होता.

फोटो स्रोत, @SPB
1980मध्ये रीलीज झालेल्या 'सागरप्रणाम' सिनेमातल्या गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. के. व्ही. महादेवन् यांनी संगीत दिलेली ही गाणी कर्नाटकी संगीतावर आधारित होती.
अभिनेता चिरंजीवाच्या तेलुगु सिनेमांसाठीची आणि रजनीकांत यांच्या बहुतेक तमिळ सिनेमांची टायटल साँग्सही एसपीबींनी गायली आहेत.
एसपीबी फक्त गायक म्हणूनच नाही तर संगीतकार म्हणूनही प्रसिद्ध होते. अभिनेता आणि डबिंग आर्टिस्ट म्हणूनही त्यांनी काम केलं. कमल हासन यांच्या बहुतेक तेलुगू सिनेमांचं डबिंग त्यांनीच केलंय.
दशावतारम् या सिनेमाच्या तेलुगू आवृत्तीमध्ये 10 पात्रांपैकी बहुतेकांसाठीचं डबिंग त्यांनी केलंय. डबिंगसाठी त्यांना दोनदा नंदी पुरस्कारही मिळाला होता. तेलुगू सिनेमा, थिएटर आणि टीव्ही क्षेत्रासाठीचा 'नंदी पुरस्कार' हा आंध्र प्रदेश सरकारकडून देण्यात येणारा सर्वोच्च सन्मान आहे.
या सोबतच एसपीबींनी 45 तामिळ आणि तेलुगु सिनेमांमध्ये अभिनय केलाय.
गायक म्हणून त्यांना 6 वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अनेक राज्य सरकारांनी आणि संस्थांनी त्यांना पुरस्कारांनी गौरवलं होतं. 50 वर्षांपेक्षा मोठ्या कारकीर्दीत एसपीबींनी 40,000 पेक्षा जास्त गाणी गायली.
गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही त्यांच्या नावाची नोंद झाली. चार विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट पदवीने गौरवलं. 2011साली भारत सरकारने पद्म विभूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान केला होता.
हिंदी, तामिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळमसोबत 14 भारतीय भाषांमध्ये एसपीबींनी गाणी गायली. संस्कृतमधूनही त्यांनी गाणी गायली आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)









