आशालता वाबगावकर यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

फोटो स्रोत, Facebook
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी प्रतिनिधी
ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनामुळं निधन झालं. साता-याजवळ 'आई माझी काळूबाई' या मालिकेचं चित्रीकरण गेले काही दिवस त्या करत होत्या.
या चित्रीकरणादरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. साता-याच्या एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते, मात्र 83 वर्षांच्या ज्येष्ठ अभिनेत्रीची कोरोनासोबतची झुंज कमी पडली.
पण या धक्कादायक घटनेनंतर कोरोनाकाळात होणारं मालिका, सिनेमाचं काम, सेटवरची खबरदारी आणि विशेषत: वयानं ज्येष्ठ कलाकारांचा सहभाग याबद्दल पुन्हा प्रश्न उठू लागले आहेत.
लॉकडाऊन जाहीर केल्यापासून अनेक महिने सिनेमा-मालिकांचं शूटिंग थांबलं होतं. निर्माते आणि या क्षेत्रात काम करणा-या अनेकांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस अनेक अटीशर्तींसह चित्रिकरण करायला परवानगी देण्यात आली.
सेटवर किती लोकांनी असावं, राहायची व्यवस्था कशी असावी, सॅनिटायझेशन कसं आणि केव्हा करावं, डॉक्टर्स, पीपीई किट आणि इतर वैद्यकीय सेवा तिथं उपलब्ध असाव्यात यांसारख्या अनेक नियमांची सक्ती ही परवानगी देतांना राज्य सरकारनं केली. त्यासोबतच 65 वर्षांवरील ज्येष्ठ कलाकारांना मात्र काम करण्यास बंदी करण्यात आली.
कारण अर्थात हेच होतं की, वयस्कर नागरिकांना संसर्गाचा आणि त्याच्या गंभीर परिणामांचा धोका अधिक असतो. सोबत वयोमानानुसार आरोग्याचेही अन्य प्रश्न असतात. पण त्याबद्दल अनेक मतमतांतरं झाली. शेवटी जून महिन्यात राज्य सरकारनं काही अटींसह स्पष्टीकरणात्मक आदेश काढले. ही मागणी काही संघटनांनी न्यायालयापर्यंतही नेली आणि मान्यता मिळवली.

फोटो स्रोत, SONY MARATHI PR
पण आता आशालता वाबगावकरांच्या निधनानंतर अनेक प्रश्न पुन्हा निर्माण झाले आहेत आणि दिवसागणिक वाढत चाललेल्या कोरोना संसर्गाबरोबर ते अधिक गंभीर बनले आहेत.
शूटिंगदरम्यान कोरोना संसर्गाच्या घटना
शूटिंगदरम्यान कोरोना संसर्ग होण्याचा हा काही पहिला प्रसंग नाही. काही हिंदी आणि मराठी कार्यक्रमांदरम्यान अशा घटना घडल्या आहेत. पण एका ज्येष्ठ अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर काही प्रश्न पुन्हा विचारले जात आहेत. जे नियम घालून देण्यात आले आहेत ते पुरेसे आहेत का? या नियमांचं काटेकोर पालन निर्माते, कलाकार यांच्याकडून होतं आहे का? वयानं ज्येष्ठ असणा-या कलाकारांना धोकादायक आहे का आणि त्यावर पुनर्विचार व्हायला पाहिजे का?

फोटो स्रोत, Getty Images
'महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी चित्रपट सेने'नं घडलेल्या घटनेनंतर सर्व वाहिन्या आणि मालिका निर्मात्यांना लिहिलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की, "दुर्दैवानं मराठी तसंच हिंदीतील विविध मनोरंजन वाहिन्यांचे संचालक आणि मालिकांचे निर्माते कोव्हिड प्रोटोकॉलला पुरेशा गांभीर्यानं घेत नसल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे.
"ज्येष्ठ अभिनेत्री आशालता ज्या मालिकेत काम करत होत्या, त्या सेटवर कोव्हिड प्रोटोकॉलचे पालन करण्यात हलगर्जीपणा झाला आहे का याची चौकशी प्रशासन करेलच. मात्र, आपल्या मनोरंजन वाहिनीच्या, तसंच निर्मितीसंस्थेच्या मालिकांच्या सेटवर कोव्हिड प्रोटोकॉलचे सर्वतोपरी पालन करणे ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे याचं भान प्रत्येक वाहिनीनं आणि निर्मात्यानं बाळगायलाच हवं."
अन्यथा चित्रीकरण थांबविण्यात येईल असा इशाराही 'मनसे'च्या चित्रपट सेनेनं दिला आहे.
'सेटवर नियमांचं तंतोतंत पालन'
ज्या मालिकेच्या चित्रीकरणासाठी आशालता वाबगावकर साता-यात होत्या त्याचं जवळपास दीड महिना शूटिंग सुरू होतं. त्यांच्यासोबत या सेटवर काम करणारे जवळपास 22 अन्य तंत्रज्ञ, कामगारही पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. अर्थात, त्यानंतर चित्रीकरण थांबविण्यात आलं.
प्रसिद्ध अभिनेत्री आणि या मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांच्या मते जे नियम सरकारनं घालून दिले आहेत त्याचं तंतोतंत पालन केलं गेलं.
"आम्ही जवळपास 2 महिने इथे आहोत. सगळं व्यवस्थित होतं. सॅनिटायझेशन होत होतं. सतत सगळ्यांची ऑक्सिजन लेव्हल आणि तापमान चेक करत होतो. कोव्हिड टेस्टशिवाय कोणीही सेटवर येऊ शकत नव्हतं. आमच्या सेटवर एक कोव्हिड इन्स्पेक्टरही असतो. प्रत्येकाचे इन्शुरन्सही केले गेले.

फोटो स्रोत, ZEE MARATHI PR
"अचानक हे कुठून आलं माहीत नाही, पण हा संसर्ग झाला. आशाताईंना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं, पण बाकी सा-यांसाठी आम्ही एक इमारत घेऊन प्रत्येकाला स्वतंत्र खोलीत क्वारंटाईन केलं. ते सगळे बरे झाले," अलका कुबल यांनी सांगितलं.
पण त्यांना आता वाटतं की, 65 वर्षांवरच्या रिस्क झोनमधल्या कलाकारांनी आता काम करु नये. "गरज असते हे बरोबर आहे. पण इथलं काम सांभाळता येईल. प्रश्न फक्त कोरोनाकाळाचा आहे. तोपर्यंत बाकी कलाकारांना मेक-अप करुन काम करता येईल," अलका कुबल म्हणतात.
'सगळ्यांनाच काम करू द्यावं'
गेली अनेक वर्षं मराठी नाटक आणि मालिकांमध्ये काम करणारे ज्येष्ठ कलाकार सुनील गोडबोले म्हणतात, "काम सगळ्यांनाच करू द्यावं. साठीच्या पुढचे हाय रिस्क झोनमध्ये आहेत. पण प्रत्येकानं योग्य ती खबरदारी घेतली तर काम शक्य आहे. मला वाटतं प्रत्येकानं स्वत:ची जबाबदारी घेतली पाहिजे."
सेटवर संसर्ग होण्याच्या घटना यापूर्वीही हिंदी, मराठी मालिकांच्या सेटवर गेल्या काही काळात घडल्या आहे. जे काम करतात ते दावा करतात की नियमांमध्ये असते त्यापेक्षाही अधिक खबरदारी घेतली जाते आहे.
एका प्रतिष्ठित मराठी मनोरंजन वाहिनीत काम करणा-या कार्यकारी निर्मात्या नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगतात," आम्ही अतिशय कमी लोकांमध्ये काम करतो आहोत. सेटवर फारतर 20-25 जणांचाच क्रू असतो. मोठे कलाकार सोडले तर बाकी इथेच राहतात. पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरणा-या कोणालाही आम्ही येऊ देत नाहीये. मेक-अप करणारेही पीपीई कीट घालूनच काम करतात. येता जाता चेकिंग होतं. पण अर्थात हे केलं तरीही स्वत: एक व्यक्ती जी काळजी घेते ते सर्वात जास्त आवश्यक असतं. बाहेर प्रत्येकानं स्वत:च खबरदारी घेतली तरच शक्य आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
आदेश बांदेकर टीव्हीवरचे गाजलेले कलाकार आणि शिवसेनेचे नेते आहेत. जेव्हा लॉकडाऊनच्या पहिल्या काही टप्प्यांनंतर जेव्हा अर्धवट राहिलेले चित्रपट, मालिका यांचं काम सुरु करावं अशी मागणी सुरू झाली तेव्हा बांदेकरांसोबत अनेक निर्माते, वाहिनी संचालक यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली होती.
"अनेक कलाकार, तंत्रज्ञ आणि कामगार यांचा रोजगार या कामावर अवलंबून आहे. त्यामुळे या उद्योगातील अनेकांकडून सर्वानुमते मागणी झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी अत्यंत सहानुभूतीपूर्वक विचार करुन प्रोटोकॉलनुसार काम सुरु करण्याची परवानगी दिली होती. आता त्यानुसार जबाबदारीनं सर्व खबरदारी घेऊन काम सगळ्यांनीच करायला हवं आणि सगळे तसं करताहेत देखील. संसर्ग ज्येष्ठ वा कनिष्ठ पाहून होत नाही. अनेक ज्येष्ठ कलाकारांचीही रोज काम करण्याची गरज आहे. त्यामुळे सगळे नियम पाळून आणि कडक शिस्त ठेवून हे काम सुरु ठेवावं लागेल. दुस-याकडे हात पसरण्याची वेळ कोणावरही येऊ नये असं सगळ्यांनाच वाटतं," असं आदेश बांदेकर म्हणतात.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
जेव्हा सुरुवातीच्या टप्प्यात सरकारनं 65 वर्षांवरील कलाकारांना काम करण्यास मज्जाव केला होता तेव्हा 'इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन'(इम्पा) ही संघटना त्याविरुद्ध उच्च न्यायालयात गेली. त्यानंतर सर्वांना काम करण्याची परवानगी मिळाली.
आता आशालता वाबगावकरांच्या निधनानंतर संघटनेची भूमिका काय आहे असं अध्यक्ष टी.पी. अग्रवाल यांना विचारल्यावर ते म्हणतात, "जे झालं ते दुर्दैवी आहे. आमचं म्हणणं हे नाही आहे की ज्येष्ठांनी काम करावं. आमचं म्हणणं हे आहे की ज्यांची खाण्याची आबाळ होते आहे त्यांना गरज म्हणून काम करु द्यावं."
"अनेकांची काम थांबल्यामुळे घर चालवणं अवघड झालं होतं. भुकेनं लोक जातील अशी स्थिती झाली होती. बाकी ठिकाणी 65 वर्षांवरचे लोक काम करू शकत होते. मग आमच्या क्षेत्रातच बंदी का असा आमचा सवाल होता. संसद सध्या सुरु आहे आणि तिथेही अनेक वयानं ज्येष्ठ आहेतच. हे बरोबर नव्हे. पण आमची मागणी ही आहे, की जर ज्येष्ठ कलाकार काम करत असतील तर काळजी आणि खबरदारीचे उपाय हे जास्त कडक असले पाहिजेत," अग्रवाल पुढे सांगतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








