उस्ताद झाकीर हुसैन यांचं अमेरिकेत निधन, सातव्या वर्षापासून कार्यक्रम करत मिळवली जगभर ओळख

झाकीर हुसैन

फोटो स्रोत, Getty Images

जगातील सर्वोत्तम तबला वादकांपैकी एक असणाऱ्या झाकीर हुसैन यांचं निधन झालं आहे. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हुसैन 73 वर्षांचे होते.

झाकीर हुसैन यांच्या कुटुंबीयांनी जारी केलेल्या निवेदनात त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली आहे. सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात झाकीर हुसैन यांच्यावर उपचार सुरु होते.

सोमवारी (16 डिसेंबर) सकाळी पीटीआय या वृत्तसंस्थेने सांगितलं की, झाकीर हुसैन यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने हुसैन यांच्या कुटुंबीयांचं निवेदन प्रकाशित केलं आहे.

इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस या फुफ्फुसाच्या आजाराने झाकीर हुसैन यांचं निधन झालं आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

अमेरिकेतील पब्लिक ब्रॉडकास्टर नॅशनल पब्लिक रेडिओने (एनपीआर) झाकीर हुसैन यांच्या कुटुंबीयांचं वक्तव्य प्रसिद्ध केलं आहे.

त्यात असं लिहिलंय की, "शिक्षक म्हणून त्यांच्या कार्याने असंख्य संगीतकारांवर त्यांची अमिट छाप सोडली आहे. त्यांनी पुढच्या पिढीला नवनवीन कामं करत पुढे जाण्याची प्रेरणा दिली. झाकीर हुसैन यांनी एक महान संगीतकार आणि सांस्कृतिक राजदूत म्हणून मोठा वारसा निर्माण केला आहे"

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

उस्ताद झाकीर हुसैन यांच्या निधनाबद्दल शास्त्रीय संगीतकार उस्ताद वसीफुद्दीन डागर यांनी पीटीआयला सांगितले, "झाकीरभाई हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान होते. देवाने त्यांना खूप चांगले जात दिले होते. हे कधीही न भरून निघणारे नुकसान आहे. त्यांनी त्यांच्या प्रतिभेच्या जोरावर करोडो लोकांची मने जिंकली."

केवळ भारतातीलच नाही जगभरातल्या संगीत विश्वात झाकीर हुसैन यांचं नाव आदराने घेतलं जायचं.

संगीत क्षेत्रातील ऑस्कर मानल्या जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्कारांसाठी झाकीर यांना सातवेळा नामांकन मिळालं होतं. यापैकी चार वेळा त्यांना हा पुरस्कार मिळाला होता.

2009 मध्ये त्यांनी पहिल्यांदा हा पुरस्कार जिंकला होता. त्यावेळी त्यांना 'ग्लोबल ड्रम प्रोजेक्ट'साठी हा पुरस्कार देण्यात आला होता. हुसैन यांनी यासाठी मिकी हार्ट आणि जिओव्हानी हिडाल्गो यांच्यासोबत एकत्र काम केलं होतं.

हा पुरस्कार त्यांना बेस्ट कंटेम्पररी वर्ल्ड म्युझिक अल्बम श्रेणीत देण्यात आला.

यानंतर, 2024 मध्ये झालेल्या 66 व्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये त्यांना तीन ग्रॅमी पुरस्कार मिळाले होते. बेस्ट कंटेम्पररी इंस्ट्रुमेंटल अल्बम कॅटेगरीत 'ॲज वी स्पीक'साठी, बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम कॅटेगरीत 'दिस मोमेंट' आणि बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स कॅटेगरीत 'पश्तो'साठी त्यांना हे पुरस्कार मिळाले आहेत.

झाकीर हुसैन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 66 व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार स्वीकारताना झाकीर हुसैन

भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या पद्मविभूषण पुरस्काराने झाकीर हुसैन यांना गौरविण्यात आलं होतं.

रविवारी (15 डिसेंबर) संध्याकाळी त्यांची तब्येत खराब झाल्याची बातमी आली, त्यानंतर त्यांचे निधन झाल्याची अफवा पसरली. यानंतर अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली होती.

त्यानंतर कुटुंबीयांनी मीडियाला सांगितले की, झाकीर हुसैन यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

झाकीर हुसेन यांना 2009 मध्ये ग्रॅमी पुरस्कार मिळाल्यानंतर बीबीसीचे माजी संपादक संजीव श्रीवास्तव यांनी बीबीसी हिंदी सेवेच्या 'एक मुलाकात' या विशेष कार्यक्रमांतर्गत झाकीर हुसैन यांच्याशी संवाद साधला होता.

झाकीर हुसैन हे सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद अल्ला रखा खान यांचे पुत्र होते. वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी पहिला संगीत कार्यक्रम सादर केला आणि पुढे जगविख्यात तबलावादक म्हणून ख्याती मिळवली.

झाकीर हुसैन यांच्या मृत्यूनंतर जगभरातून दुःख व्यक्त केलं जात आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.